आईबाबा गिरवताहेत A B C

ऋता बावडेकर
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

संपादकीय
 

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांना चांगले आयुष्य मिळावे यासाठी काहीही करण्याची आईवडिलांची तयारी असते. प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलाबाळांसाठी ते कष्ट करत असतात. आपल्या वाट्याला जे आयुष्य आले ते आपल्या मुलाबाळांच्या वाट्याला येऊ नये, अशी त्यांची रास्त अपेक्षा असते. त्यामुळे आपल्याला न मिळालेली सुखे, ऐश्‍वर्य आपल्या मुलांना मिळावे यासाठी ते प्रयत्नशील असतात.. आणि याला कोणत्याही स्तरातील आईवडील अपवाद नसतात. प्रत्येकाची पद्धत कदाचित वेगळी असेल, पण मुलांसाठीचे त्यांचे प्रयत्न सारखेच असतात. 

मागील पिढीतील खूप कमी पालक इंग्रजी माध्यम किंवा कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहेत. त्यावेळी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रमाणच मुळात कमी होते. ते शहरांतच कमी होते, तर ग्रामीण भागात त्याचे प्रमाण जवळजवळ नव्हतेच. कॉन्व्हेंटची गोष्टच दूरची. पण म्हणून काही अडले नाही. पण जेव्हा महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षण सुरू होते, तेव्हा ते अपरिहार्यपणे इंग्रजीतच असते. पुढची सगळी व्यवहाराची भाषा इंग्रजी होते. पण तेव्हा बहुतेक सगळेच मराठी माध्यमातील असल्यामुळे तेवढा प्रश्‍न येत नसे. तरीही एखाद्या कसोटीच्या प्रसंगी इंग्रजी दांडी उडवतच असे. पुढे इंग्रजीचे हे प्रस्थ वाढत गेले. अनेकांना आपल्याला इंग्रजी येत नाही किंवा आपण सफाईदारपणे या भाषेत व्यवहार करू शकत नाही याचे वैषम्य वाटे. मग नकळत ‘आपली अवस्था झाली, तशी आपल्या मुलांची होऊ नये’ अशी भावना पालकांच्या मनात घर करू लागली. जागतिकीकरणामुळेही इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचे प्रस्थ वाढू लागले. सुविधा उपलब्ध आहे, तर आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातच का शिकवू नये, असे विचार पालकांच्या मनात येऊ लागले आणि ते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालू लागले. शहरांतील कुठलीही गोष्ट ग्रामीण भागात पोचतेच. त्यामुळे ही गोष्टदेखील पोचली. एकूण जनमत बघता, शिक्षण क्षेत्रातील तेव्हाच्या मंडळींनीही ही गोष्ट मनावर घेतली व आपापल्या गावांत पूर्णपण नसले तरी इंग्रजी माध्यमाचे स्वागत केले. आता बहुतेक गावांत इंग्रजी माध्यमांच्या शाळा असतील. इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम असा वाद घालण्याचा इथे हेतू नाही. पण इंग्रजी नीट न आल्यामुळे आपली जी अडचण झाली ती आपल्या मुलांची होऊ नये, एवढा माफक उद्देश त्यावेळी होता. हे शिक्षित पालकांचे झाले. ज्यांना परिस्थितीमुळे किंवा अन्य काही कारणामुळे शिक्षणच घेता आले नाही असा अशिक्षित पालकांचेही असेच स्वप्न असते. ते पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना (आता बऱ्याच ठिकाणी मुलींनाही) शिकवतात. 

पण मुले मेहनत घेऊन, कष्ट करून शिकू लागली. पण ते काय बोलतात, काय करतात हे या आईवडिलांना कळतेच असे नाही. मुलांबरोबर संवाद साधताना अडचणी येऊ लागल्या. हे लक्षात घेऊन या आईबाबांनी एक शक्कल लढवली. तेही शिकू लागले. शिकून फार मोठे कोणी होण्याचे त्यांचे स्वप्न नाही, पण आपली मुले नेमके काय करतात हे तर कळायला हवे ना! त्यांनी काही शंका विचारली, काही प्रश्‍न विचारले तर त्याची उत्तरे तर त्यांच्या भाषेत देता यायला हवीत ना. इथे तर इंग्रजीचाही प्रश्‍न नव्हता. मराठी तर वाचता-लिहिता यायला हवे. पालकांनी हे आव्हान स्वीकारले आणि आपल्या मुलांसाठी ते शिकू लागले. रात्रशाळांमध्ये शिकणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. काम करून रात्री शिकणाऱ्या मुला-मुलींबरोबरच प्रौढ लोकही या शाळांत दिसू लागले आहेत. आपल्या राज्यात सुमारे १७६ रात्रशाळा आहेत. त्यामध्ये साधारणपणे ३३ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेतील अर्ज भरता येत नव्हता, पालक सभेत बोलण्याची भीती वाटायची. ही भीती घालवण्यासाठी पुण्यातील कसबा पेठेतील मोनाली गव्हाणे यांनी अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निश्‍चय केला. मुलगी इंग्रजीत प्रश्‍न विचारते आणि तिच्या प्रश्‍नांना उत्तरे देता येत नाहीत म्हणून अमोल कांबळे पुन्हा धडे गिरवू लागले. घरातील गरिबीमुळे, इतर काही कारणांमुळे-जबाबदाऱ्यांमुळे अनेकांना आवड असूनही शिक्षण पूर्ण करता येत नाही. काही तर शाळेची पायरीही चढू शकत नाहीत. असे अनेक कामगार, कष्टकरी, गृहिणी रात्रशाळांतून दहा-वीस वर्षांनी पुन्हा शिक्षणाकडे वळत आहेत. कोणी आपली गरज म्हणून, कोणी सरकारी सुविधा मिळवण्यासाठी तर कोणी आपल्या मुलांच्या प्रश्‍नांच्या भडिमारापुढे उभे राहण्यासाठी, मुलांचा अभ्यास घेण्यासाठी शिक्षण घेऊ लागले आहेत. कारण कोणतेही असो, उशिरा का होईना शिक्षण घ्यावेसे वाटणे हे महत्त्वाचे आहे. 
आपल्या आयुष्यात शिक्षणाचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे नोकरी-कामधंदा मिळतो हा फायदा आहेच, पण माणसाला सुसंस्कृत करण्याचे फार मोठे सामर्थ्य शिक्षणात आहे. अर्थात त्यासाठी तशी क्षमता, तसा वकूब असणारे शिक्षक हवेत आणि हे शिक्षण घेण्याची संवेदनशीलता असणारे विद्यार्थीही हवेत. शिक्षण म्हणजे अभ्यास आहेच. पण केवळ ठरवून दिलेला अभ्यासक्रम

घोटणे म्हणजे शिक्षण नव्हे. त्यापलीकडे जाऊन परिस्थितीचे भान येणे, आपल्या जबाबदारीची जाणीव होणे, समाजाप्रती आपली कर्तव्ये लक्षात येणे अशा कितीतरी गोष्टी या शिक्षणात येत असतात. चार भिंतीतील बंद खोलीतील शिक्षण महत्त्वाचे आहेच, पण त्याबाहेर असलेल्या समाजाबद्दलही आपल्या जाणिवा जागृत व्हायला हव्यात. शिक्षकाचे महत्त्व इथे असते. तो पाठ्यपुस्तके तर शिकवतोच, पण ही जाणीवही आपल्या मनात निर्माण करतो. त्यामुळे शिक्षणाचे माध्यम कोणते, यापेक्षाही तुम्ही काय शिकता, त्याचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम होतो, आपल्या शिक्षणाचा समाजाला काय आणि कसा उपयोग होतो, हे महत्त्वाचे असते. आईवडिलांनी आणि प्रत्येकानेच आपल्या पुढच्या पिढीसाठी असे शिक्षण घ्यायला हवे आणि द्यायलाही हवे.

संबंधित बातम्या