कोतेपणा अजून किती दिवस? 

ऋता बावडेकर
गुरुवार, 10 जानेवारी 2019

संपादकीय

नवीन वर्षाची सुरुवात महिलांच्या दृष्टीने अगदी खास ठरली. शबरीमलाच्या देवळात दोन जानेवारीला दोन महिलांनी प्रवेश केला आणि अय्यप्पा या देवाचे दर्शन घेऊन त्या बाहेर आल्या. त्या बाहेर आल्यानंतरच सगळ्या देशाला या घटनेची माहिती कळली. या घटनेनंतर केरळमध्ये अतिशय प्रतिकूल आणि हिंसक प्रतिक्रिया उमटली. केरळचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्याच्या घरावर बाँब फेकण्यापर्यंत निदर्शकांची मजल गेली. 

इतकी टोकाची नाही, पण महिलांच्या मंदिरप्रवेशावर प्रतिक्रिया येणार हे अपेक्षितच होते. तसे बघता, मंदिर प्रवेशाचा प्रयत्न करणाऱ्या या काही पहिल्या महिला नव्हेत. आतापर्यंत अनेकींनी अयशस्वी प्रयत्न केले. पण ते अयशस्वी ठरल्याने त्यावर प्रतिक्रिया उमटली नाही. बिंदू आणि कनकदुर्गा यांचा प्रयत्न यशस्वी ठरला. देवाचे दर्शन घेऊन त्या बाहेर आल्यामुळे निदर्शने झाली. अर्थात त्यामुळे ही निदर्शने अजिबातच समर्थनीय ठरत नाहीत. ब्रह्मचारी असल्याने अय्यप्पा देवाच्या दर्शनाला १५ ते ५० या वयोगटातील महिलांनी जाऊ नये असा आतापर्यंतचा प्रघात होता. कारण त्या वयात महिलांना पाळी येत असते, असा काही तरी अनाकलनीय युक्तिवाद होता. पण अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने हा नियम रद्द करून सर्व वयोगटातील महिला शबरीमलात दर्शनासाठी जाऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक प्रयत्न झाले. त्यातील काही खूप प्रामाणिक होते, तर तुरळक थोडे केवळ प्रसिद्धीसाठी असल्यासारखे वाटले. गाजावाजाच अधिक! अनेक प्रामाणिक प्रयत्नांपैकी बिंदू, कनकदुर्गाचे प्रयत्न होते. त्यांना अखेर यश मिळाले, पण हा यशापयशाचा मुद्दाच नाही. तर आपले अधिकार मिळविण्यासाठी महिलांना अजूनही किती प्रयत्न करावे लागतात, हे अधोरेखित करणारा मुद्दा आहे. इतके असूनही महिलांचा संघर्ष अजूनही संपलेलाच नाही. कारण बिंदू-कनकदुर्गांच्या प्रवेशानंतर त्या देवाचे शुद्धीकरण करण्यात आले. त्यानंतरही महिलांना प्रवेश सुलभ झालेला नाही. अजूनही महिला तिथे मोकळेपणाने जाऊ शकत नाहीत. विरोधाची पातळी वाढलीच आहे. त्यामुळे केवळ या दोन महिलांनी प्रवेश मिळवला या आनंदात मश्‍गूल राहण्यापेक्षा सर्वच महिलांना तिथे नियमित प्रवेश करता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. हा संघर्ष कधी संपेल कल्पना नाही. 

कनकदुर्गा आणि बिंदू यांचे प्रयत्न विशेष होते. त्यासाठी त्यांनी तयारीही खूप केली होती. या तयारीत त्यांना डॉ. प्रसाद अमोरे या त्रिसूरच्या मानसशास्त्रज्ञाची मोलाची मदत झाली. डिसेंबरमध्ये या दोघींचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर मानसशास्त्राचा वापर करून त्यांना प्रयत्न करण्याचे डॉ. अमोरे यांनी ठरविले आणि या तिघांचे नियोजन सुरू झाले. ‘एखादी महिला मंदिर प्रवेश करणार, याची माहिती मिळाली, की मीडिया ॲलर्ट होत होता. त्यामुळे सगळेच सतर्क होत होते. त्यामुळे ‘द इन्व्हिजिबल गोरिला’ हा वेगळाच मार्ग आम्ही निवडला.’ काय होता हा मार्ग? तर एखाद्या ठिकाणी जाताना विशिष्ट दृश्‍यावरच लक्ष केंद्रित करायचे. त्यामुळे आपोआपच आजूबाजूला काय घडते आहे, याकडे दुर्लक्ष होते. या दोघींना तशाच सूचना देण्यात आल्या. त्या गर्दीत इतके स्वाभाविकपणे वावरायचे, की आपल्या शेजारी एक बाई आहे हे कोणाला कळू नये. कारण महिला पोलिस बंदोबस्तात येतील असे गर्दीला वाटत असते. तसेच या महिलांनी अजिबात घाबरायचे नाही. बोलणेही नॉर्मल हवे. कोणाकडे टक लावून बघायचे नाही. आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचे नाही... या सगळ्या सूचनांचा या दोघींनी पुरेपूर अवलंब केला. 

त्याचप्रमाणे त्यांनी कोणता पोशाख करायचा याचेही स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले होते. मात्र, साडी नेसून वयस्कर बायकांसारखे दिसणे किंवा पुरुषी पेहराव करणे त्यांनी नाकारले. त्यांनी चुडीदार घालणे पसंत केले. त्यात त्या लहानही दिसत होत्या. पण ठरवल्याप्रमाणे तेथील त्यांचा वावरच इतका स्वाभाविक होता, की मंदिरात आत जाऊन, दर्शन घेऊन त्या बाहेर आल्या तरी कोणाला साधा संशयही आला नाही. हे या दोघींचे आणि त्यांना मदत करणाऱ्या डॉ. अमोरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे धाडसच होते. अर्थात या महिलांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेण्यात आली होती. केरळबाहेरील पोलिस साध्या वेशात, कोणालाही संशय येणार नाही असे त्यांच्या आसपास वावरत होते. 

हा प्रयत्न कल्पनेपलीकडे यशस्वी झाला. पण त्यावर आलेली प्रतिक्रियाही तशीच कल्पनेपलीकडची होती. याला विरोध होणार, निदर्शने होणार वगैरे गोष्टी अपेक्षितच होत्या. पण याला हिंसक प्रतिक्रिया आली. राजकारणही करण्यात आले - अजूनही होत आहे. हे सगळे बघता प्रश्‍न पडतो, की अजूनही महिला इतक्‍या तिरस्करणीय, उपेक्षित आहेत? त्यांच्या प्रवेशामुळे देव विटाळतो? या प्रवेशामुळे तर देवाने अजून तरी कुठलीही विचित्र प्रतिक्रिया दिलेली नाही. जी प्रतिक्रिया उमटली ती मानवनिर्मित होती. याचा अर्थ काय घ्यायचा? देवाला महिलांच्या प्रवेशाशी काहीही देणे घेणे नाही. महिलांना त्याने कधीच प्रवेशबंदी केलेली नव्हती, असाच घ्यावा लागेल. त्याच्या नावावर आपण किती दिवस अशा रूढी, परंपरा चालवत राहणार आहोत? अजून किती दिवस आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडवत राहणार आहोत? आपण कधीतरी सुधारणार आहोत, की नाहीच!? 

संबंधित बातम्या