मुलांना आश्‍वस्त करा  

​ऋता बावडेकर
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

संपादकीय
 

दहावी- बारावीच्या परीक्षा म्हटल्या की आजही घाबरायला होते. नेमके माहिती नाही, पण अगदी पूर्वीपासून चालत आलेली घाबरण्याची ही परंपरा आजही कायम आहे. मात्र, या परीक्षांना परीक्षार्थी मुले अधिक घाबरतात की त्यांचे पालक - विशेषतः अलीकडच्या काळातील, याबद्दल संभ्रम आहे. खरे तर तसा संभ्रम नसावा, कारण मुलांपेक्षाही पालकच या परीक्षांचा अधिक बाऊ करतात, हे आतापर्यंत अनेकदा स्पष्ट झालेले आहे. वास्तविक, नेहमीच्या परीक्षांसारख्याच या दोन परीक्षा आहेत. पण स्पर्धेला घाबरून आपल्या मुलांच्या (यात मुलीही आहेत) भवितव्यासाठी (?) पालक या परीक्षांना अति महत्त्व देतात आणि मुलांबरोबरच स्वतःचेही स्वास्थ्य गमावून बसतात. 

दहावी - बारावीत मेरिटमध्ये आलेली, ऐंशी - नाहीच - नव्वदच्या पुढे गुण असलेल्या मुलांचेच करिअर किंवा भवितव्य उज्ज्वल असते आणि बाकीची मुले टाकाऊच असतात, असे अजिबातच नाही. पण आपण या मार्कांनाच इतके महत्त्व देतो, की त्यापुढे सगळ्या गोष्टीच आपल्याला गौण वाटायला लागतात. चांगले गुण मिळाले नाही, तर चांगल्या शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही, त्यामुळे पालक आणि अनेकदा मुलेही त्याचे प्रचंड दडपण घेतात... आणि घाण्याला जुंपल्यासारखे ‘अभ्यास एके अभ्यास’ करू लागतात. 

अभ्यास करण्यात वाईट काहीच नाही. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नसावा. करिअरसाठी, आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी अभ्यास करणे - मेहनत घेणे चांगलेच; पण केवळ तेवढेच करणे योग्य नाही. शेवटी करिअर किंवा भवितव्य म्हणजे तरी काय? आपले ध्येय साध्य करणे, त्या क्षेत्रात प्रगती करणे, सर्वोच्च पातळीवर पोचण्याचा प्रयत्न करणे.. वगैरे. मग या गोष्टी केवळ अभ्यास करूनच साध्य होतात का? उत्तर ‘नाही’ असेच आहे. कारण या सगळ्या गोष्टी मिळवण्याचे अभ्यास हे ‘एक’ साधन आहे; ‘एकमेव’ साधन नव्हे. तसे केले तर मुले ‘पुस्तकी किडा’ होतील. आपले ध्येय साध्य करायचे असेल तर मुलांना आपले व्यक्तिमत्त्व बहुविध करायला हवे. त्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नाही, तर त्याबरोबर इतर ‘ॲक्‍टिव्हिटीज’ही हव्यात. त्यातील एक आणि सर्वांत महत्त्वाची म्हणजे खेळ - व्यायाम होय. मुलांनी लहानपणापासून खेळायलाच हवे. मैदानावर जायलाच हवे. मैदानी खेळांची आवड नसली, तरी मैदानाला पळत पळत फेऱ्या मारायलाच हव्यात. व्यायाम करायलाच हवा. मोकळ्या हवेत चार क्षण घालवायलाच हवेत. त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो. मन प्रसन्न होते आणि अभ्यास करायला उत्साह येतो. अर्थात अभ्यासाला पर्याय नाही. पण अभ्यास म्हणजेच सर्वकाही असेही नाही. मुलांना ही गुंतागुंत कळणार नाही, पण त्यांच्या पालकांना नक्की कळेल. ज्यांची कळून घेण्याची इच्छा नाही, त्यांनीही आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या गोष्टींचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. 

मुले अभ्यासू असण्यात काही चूक नाही. पण अभ्यासू आहे, भरपूर गुण मिळवते आहे, पण बाकी त्याला काही येत नाही हेही योग्य नाही. आपले मूल एककल्ली करायचे की त्याचे व्यक्तिमत्त्व चौफेर फुलू द्यायचे हे पालकांनी ठरवायचे. सतत अभ्यास केल्याने आज कदाचित ते लौकिक अर्थाने ‘यशस्वी’ होईलही. चांगली नोकरी मिळवेल, गलेलठ्ठ पगार मिळवेल, कदाचित परदेशीही जाईल; पण पुढे काय? या सगळ्या गोष्टी मिळवल्यानंतर काय करायचे हा त्याच्यापुढे भलामोठा प्रश्‍न उभा राहणार आहे, याची पालकांनी आजच मनाशी खात्री बाळगावी. कारण साध्य करायला नंतर त्याला काही राहणारच नाही. आयुष्य पोकळ वाटू लागेल. पण हेच त्याने आधीपासून काही छंद जोपासले, वेगळ्या आवडी जोपासल्या, खेळ खेळला; तर कदाचित इतका गहन प्रश्‍न त्याला पडणार नाही.. आणि मुलांना हे समाजावून सांगण्याची जबाबदारी पालक म्हणून आपली - मोठ्यांचीच आहे. मुले काय, त्यांना घडवू तसे घडतात. पण त्यांच्या मोठेपणी या सगळ्यातला फोलपणा लक्षात आल्यावर ते पालक म्हणून आपल्याला नावे ठेवणार नाहीत याची मात्र खात्री नाही. त्यामुळे केवळ ‘स्पर्धेत धावणे’ एवढेच त्यांचे लक्ष्य न ठरवता, त्यांना फुलू द्यावे, मोकळे वाढू द्यावे. पालकांची ही फार मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी मुळात त्यांनी दडपण घेऊ नये आणि मुलांना ताण देऊ नये. 

यासाठीच ‘सकाळ साप्ताहिका’च्या या अंकात डॉ. विद्याधर बापट आणि डॉ. अविनाश भोंडवे या तज्ज्ञांचे लेख आम्ही प्रसिद्ध करत आहोत. ते मुलांसाठी कमी आणि पालकांसाठीच जास्त आहेत. 

परीक्षेच्या ताणाचा परिणाम शरीर आणि मन या दोहोंवरही होत असतो. मुळात तसा परिणाम होऊ नये आणि झालाच तर काय करावे, याचे मार्गदर्शन हे दोन्ही लेख करतात. अभ्यास करताना मूळ प्रश्‍न असतो एकाग्रतेचा. तर ही एकाग्रता कशी साधावी, अभ्यास तर करावाच पण तो करताना थोडा विरंगुळा कसा शोधावा, परीक्षेच्या काळातला आहार - काय खावे, काय खाऊ नये, परीक्षेला जाण्यापूर्वी कोणता आहार घ्यावा, अभ्यासाच्या वेळा कशा ठरवाव्यात, झोप व विश्रांती कशी असावी, व्यायाम कोणता करावा, मनाचे स्थेैर्य कसे मिळवावे वगैरे मुद्‌द्‌यांवर हे सविस्तर मार्गदर्शन आहे. ते अर्थातच वर म्हटल्याप्रमाणे पालकांसाठीच अधिक आहे. 

या सगळ्याचा तात्पर्य एकच - मुलांना मोकळे सोडा, त्यांना खेळू - बागडू द्या, त्यांच्या आवडीनिवडी जोपासू द्या; मग आपला अभ्यास ते कसा मनापासून करतील बघा! मात्र आजचा काळ बघता, मुलांवर नियंत्रणही हवे, पण तेही सकारात्मक! त्यांची दिशा योग्य आहे ना ते बघण्यापुरते. मुलांचे मित्र व्हा, आपले मूल नक्की यशस्वी होईल, याची खात्री बाळगा.   

संबंधित बातम्या