मूक आक्रंदन 

ऋता बावडेकर
सोमवार, 4 मार्च 2019

संपादकीय
 

आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे, मोर्चे काढणे ही गोष्ट आपल्याला अजिबात नवीन नाही. रीतसर परवानगी घेऊन अशी आंदोलने केली जातात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मोर्चांबरोबर पोलिस पथकही असते. मात्र अशा एका मोर्चा किंवा निदर्शनांदरम्यान पुण्यात नुकताच एक विचित्र प्रकार घडला. पुणे पोलिसांनी या निदर्शकांवर लाठीमार केला. अर्थात, असा प्रकारही आपल्याला नवीन नाही. काही गडबड झाली तर पोलिसांना हे पाऊल उचलावे लागते. पण इथे तसा काहीही प्रकार घडलेला नव्हता. नेमके कारण लवकरच समजेल, अशी आशा आहे. पण आंदोलक हातवारे करत होते, ते आपल्याला चिथावणी देताहेत, असे समजून पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार सुरू केला. पण दुर्दैवाने हे ‘हातवारे’च या आंदोलकांची भाषा आहे. दुर्दैव अशासाठी की ते कर्णबधिर आहेत. या कारणामुळेच हा लाठीमार अतिशय संवेदनाहीन ठरतो. 

कर्णबधिर (दिव्यांग) मुलांना बारावीनंतर राज्य सरकारने शिक्षण देण्यासाठी विशेष महाविद्यालये सुरू करावीत, त्यांचे शिक्षण सांकेतिक भाषेत मिळावे, त्यांच्या तंत्रशिक्षणासाठी नव्या संस्था उभाराव्यात इत्यादी मागण्यांचा पाठपुरावा करणाऱ्या कर्णबधिर आंदोलकांवर पुणे शहर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात १२ जण जखमी झाले. त्यातील दोघांवर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. 

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दोन हजारापेक्षा जास्त कर्णबधिर तरुण पोलिस आयुक्तालयाशेजारील समाजकल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर सकाळपासून जमले होते. पुण्यातून मुंबईपर्यंत चालत जाण्याचा त्यांचा निर्धार होता. दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांनी त्यांना थांबवले. तत्पूर्वी अपंग कल्याण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी खाली येऊन त्यांचे निवेदन स्वीकारले होते. पण याबाबतचा आदेश लगेच काढावा, असा या तरुणांचा आग्रह होता. त्यातच पुढे जाऊन त्यांनी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखले, पण आंदोलक आक्रमक होऊ लागल्याने पोलिसांनी लाठीमार केला. सुमारे १५-२० मिनिटे हा लाठीमार सुरू होता. नंतर आंदोलकांच्या प्रतिनिधींबरोबर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी फोनवर चर्चा केली. मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. दरम्यान, प्रसंगाचे गांभीर्य पाहून खासदार अनिल शिरोळे यांनी आंदोलकांचा संपर्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधून दिला. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे आंदोलकांबरोबर चर्चा करतील असे यावेळी ठरले. दरम्यान, आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

वरवर बघता आंदोलकांच्या आक्रमकतेमुळेच हा लाठीमार झाला असे वाटते. परिस्थिती कदाचित तशी असेलही, पण म्हणून इतका निर्दय लाठीमार करावा? यासंदर्भातील व्हिडिओ बघवत नाहीत. ‘पायावर मार’, ‘हातावर मार’.. अशा पोलिसांनी परस्परांना दिलेल्या सूचनाही यात ऐकू येतात. सामाजिक स्वास्थ्य, शांतता राखणे हे पोलिसांचे काम आहे, याबद्दल दुमत नाही. पण असा लाठीमार समर्थनीय होऊच शकत नाही. 

मुळात असे मोर्चे जेव्हा निघतात तेव्हा आंदोलकांची थोडी माहिती पोलिसांना असायला हवी. कारण ‘हे आंदोलक कर्णबधिर आहेत, हे पोलिसांना माहितीच नव्हते’ असा युक्तिवाद करण्यात आला आहे. हेच मुळात चुकीचे आहे ना! आपण कोणत्या मोर्चाबरोबर आहोत, त्यांच्याबरोबर काय बोलायचे वगैरे माहिती पोलिसांना नको? समजून न घेताच लाठीमार करता? हे आंदोलक ऐकू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत.. काय आणि कसे समजावणार? ते त्यांच्या हातवाऱ्यांच्या भाषेत बोलू लागले, तर पोलिसांना हे हातवारे चिथावणी वाटले. यावर बोलणेच संपते. पोलिस जे म्हणतात आंदोलक आक्रमक झाले, ते या हातवारे बघूनच कशावरून म्हणत नसतील? आणि खरेच ते आक्रमक झाले असतील, तर आधी त्यांच्याबरोबर शांततेत बोलण्याचा प्रयत्न झाला का, हेही समजायला हवे. मुळात लाठीमार करण्याचा आदेश कोणी दिला? आदेश देणाऱ्यालाही हे कर्णबधिर आहेत हे माहिती नव्हते का? या असह्य वेदना त्यांनी कसा सहन केल्या असतील. आपण ओरडतो, रडतो.. इथे आवाजच नाही. सगळे काही मूकपणे सहन करायचे. आक्रंदनही मूकपणेच करायचे. त्यांना मारहाण करताना आपण इतके संवेदनाहीन होतो, की मारले तरी समोरचा आवाजही करत नाही हेही आपल्या लक्षात येऊ नये? 

काही वर्षांपूर्वी बादल सरकार यांच्या सन्मानार्थ एक कार्यक्रम अमोल पालेकर यांनी आयोजित केला होता. त्यात कर्णबधिर मुलांचा एक कार्यक्रम झाला. फार सुंदर होता. सगळे टाळ्या वाजवू लागले. रंगमंचावरील मुले शांतच होती. टाळ्यांचा कडकडाट थांबेना, पण मुलांचा प्रतिसादही मिळेना. तेव्हा त्यांच्या शिक्षिका आल्या आणि म्हणाल्या, तुम्हा टाळ्या वाजवू नका, त्यांना त्या ऐकूच येत नाहीत. हात वर करा आणि बोटे हलवा. त्याच त्यांच्या टाळ्या आहेत... या कृतीवर त्या मुलांचे चेहरे इतके खुलले.. कितीतरी वेळ हा मूक जल्लोष सुरू होता... 

जगात कोणीच कोणासारखे नसते. सगळेच सतत गुण्यागोविंदाने राहतील असे नाही. पण बरोबरच्या लोकांना समजून घ्या. आपल्याला खूप ताण आहे, वेळ नाही.. मान्य. पण त्यामुळे आपल्या हातून काही अनर्थ घडू नये, एवढी तर काळजी आपण घ्यायलाच हवी. आज ही मुले ऐकू-बोलू शकत नाहीत हे आपल्याला कळले. पण अशी किती मूक आक्रंदने असतील, जी आपल्यापर्यंत पोचतच नसतील. बाकी काही नाही, चांगला - संवेदनशील माणूस होण्याचा प्रयत्न करू; आजच्या परिस्थितीत तेही खूप आहे.

संबंधित बातम्या