पाण्यासाठी वणवण...

ऋता बावडेकर
सोमवार, 6 मे 2019

संपादकीय
 

उन्हाळ्याची चाहूल लागली की प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्‍न म्हणजे, यंदा पाणीटंचाई किती तीव्र असेल? पाणीटंचाई असेल का, असा प्रश्‍न अपवादानेही कोणाला पडत नाही. तर या टंचाईची तीव्रता किती असेल हाच प्रत्येकाच्या मनातला प्रश्‍न असतो. पाऊस समाधानकारक असो वा नसो, हा प्रश्‍न वर्षानुवर्षे पडत आला आहे. पण या प्रश्‍नाची काय किंवा पाणीटंचाईची काय, तीव्रता दिवसेंदिवस वाढतेच आहे. 

हे वर्षही अर्थातच या सगळ्याला अपवाद नाही. पुणे, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्र या टंचाईत पिचून जात असतो. पुण्यातही टंचाई असते, पण इतरत्र दिसणारी तीव्रता खूप जास्त असते. पुण्या-मुंबईतील (मुंबईत टंचाई असेल तर, कारण तशा बातम्या तरी फारशा कुठे वाचनात आलेल्या नाहीत) पाणीटंचाई ही प्रामुख्याने मानवनिर्मित असते. या टंचाईसाठी मुख्यतः नियोजनाचा अभाव हे कारण असते. त्याला जोडून पाण्याचा अमर्याद, बेपर्वाईने केलेला वापर ही कारणेही असतात. याचा अर्थ सगळेच नागरिक असे बेजबाबदार वागतात असे नाही. पण या मूठभर लोकांनी वेगवेगळ्या प्रयत्नांनी वाचवलेले पाणी उर्वरित शहराला कसे पुरावे? राजकीय अनास्था हेही एक कारण आहेच. आपापला मतदार सांभाळण्याच्या नादात पाण्याचा अमर्याद वापर होत असतो. अशा अनेक वस्त्यांमध्ये नळांना एकतर तोटीच नसते आणि असलीच तर ती बंद केलेली नसते. अमूल्य असे पाणी धो धो वाया जात असते. बांधकाम, रस्ते, वाहने वगैरे धुण्यासाठी, बागा फुलवण्यासाठी हेच पिण्याचे पाणी सर्रास वापरले जाते. पण कोणालाही त्याची काही फिकीर नसते. याउलट पाणीवापर जबाबदारीने करणारे लोकही शहरात असतात. पाणी जिरवणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पाणी जपून वापरणे, थोडक्‍या पाण्यात अंघोळ करणे असे उपायही अनेकजण करत असतात. पण अशा लोकांचे प्रमाण फारच कमी असते. वास्तविक, दरवर्षी येणाऱ्या या परिस्थितीसाठी प्रत्येक नागरिकाने सज्ज असायला हवे. तक्रारी करण्यापेक्षा आपल्याकडून पाण्याचा योग्य वापर कसा होईल हे बघितले पाहिजे. कारण पाण्याचा हा पुरवठा मर्यादित असतो आणि दिवसेंदिवस तो अधिकाधिक मर्यादित होत जाणारा आहे. अशी परिस्थिती आली तर आपण काय करणार, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. अशावेळी कितीही आरडाओरडा केला तरी कोणताही राजकीय पक्ष आपली ही गरज भागवू शकणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. मुळात त्यावेळी ते सगळेच आपल्यासारखे पाण्याच्या शोधात फिरताना दिसतील. त्यामुळे वेळीच गांभीर्य ओळखून प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे. 

ही पाण्याची टंचाईही सुखाची किंवा बरी म्हणावी अशी उर्वरित भागात स्थिती असते. मार्च सुरू झाला, एप्रिल अजून संपलाही नाही; तोच राज्यातील विविध भागांतून पाणीटंचाईच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचे टॅंकर सुरू झाले आहेत. घरातील, शेतातील कामे सोडून बायाबापड्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. एखाद्या विहिरीत पाणी दिसतेही, पण त्या पाण्याने अक्षरशः तळ गाठलेला असतो. पण तेवढे पाणीही सोडवत नाही. मग त्यातलीच एखादी गृहिणी जिवाची पर्वा न करता दोराच्या साह्याने त्या विहिरीत उतरते, आपल्याला पाणी घेतेच, पण बरोबरच्या महिलांचेही पाणी छोट्या छोट्या भांड्याने भरून देताना दिसते. असे कुठूनही पाणी भरण्यासाठी या महिलांना दिवस नसतो आणि रात्र नसते. मिळेल तेव्हा त्या पाणी भरत असतात. अंधारात पाणी भरताना विहिरींच्या कपारीत बसलेल्या विंचू, सापांची भीती असते. पण त्या भीतीवर मात करून या महिला पाणी भरताना दिसतात. अशी छायाचित्रे कुठल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली, तर प्रशासन जागे होते आणि टॅंकर पाठवला जातो. पण तो किती वेळा पाठवला जातो. दुर्गम भागातील परिस्थितीबद्दल तर काही बोलायलाच नको. पाण्याची अशी वाट बघण्यात या लोकांच्या आयुष्यातील किती महत्त्वपूर्ण क्षण वाया जात असतात याची कल्पनाच केलेली बरी. या बिचाऱ्या लोकांना तर याची जाणीवच नसते. पाणी मिळणे हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. पण आत्ता झाले, पुढचे काय? असा दुसरा प्रश्‍न आ वासून उभाच असतो. 

अनेक शहरांत, तालुका पातळीवरील गावांतही पाण्याची टंचाई जाणवत असते. अशा अनेक गावांत आठवड्यांतून, दहा-बारा दिवसांतून एकदा काही तासांसाठी (एखाद-दोन) पाणी येत असते. त्यालाही जोर (फोर्स) नसतो. अनेक गावांत त्यामुळे घरांच्या अंगणात खड्डे खणून तेथे पाण्याचे कनेक्‍शन घेतलेले दिसते. पण एखाद-दोन तासांत दहा-बारा दिवसांचे पाणी कसे भरायचे? कसे पुरवायचे हा प्रश्‍न असतोच. 

पाण्याचा प्रश्‍न असा दिवसेंदिवस बिकट आणि गंभीर होत चालला आहे. राजकीय पुढारी, प्रशासनाने नागरिकांचे फाजील लाड पुरवण्यापेक्षा अगदी कठोरपणे उपाययोजना केली पाहिजे. नागरिकांनीही त्यांना साथ द्यायला हवी. मात्र, त्यासाठी सर्वप्रथम नियोजन करायला हवे. काही भागांना भरपूर पाणी, तर काही भागांत खडखडाट असे होता कामा नये. वाया जाणारे पाणी कसे वाया जाणार नाही हे बघितले पाहिजे. जलवाहिन्यांची खरोखरच दुरुस्ती-देखभाल व्हायला हवी. अन्यथा त्या मधेच फुटून काहीशे लिटर पाणी अक्षरशः वाया जाते. 

पाण्याची समस्या अनेक स्वयंसेवी संस्थांनीही खूप गंभीरपणे घेतली आहे. अभिनेता आमिर खानचे ‘पानी फाउंडेशन’तर्फे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी ते स्पर्धाही घेतात. राज्य सरकारला ते अशा प्रकारे मदत करत असतात. 
असे प्रयत्न वाढायला हवेत. सरकार पातळीवर तर ते वाढायलाच हवेत, त्या प्रयत्नांना प्रशासन आणि जागरूक नागरिक म्हणून समाजानेही साथ द्यायला हवी. आज थोडे तरी पाणी आहे. अजूनही बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे. यंदातर ९६ टक्के पावसाचा अंदाज आहे. पण जंगलतोड, डोंगर फोडणे अशी निसर्गाची हानी सुरूच राहिली तर निसर्ग तरी काय करणार? कुठून पाणी देणार? त्यामुळे वेळेत जागे होऊ या, अन्यथा नुकसान आपलेच आहे.

संबंधित बातम्या