परिस्थिती बदलेल? 

ऋता बावडेकर
सोमवार, 20 मे 2019

संपादकीय
 

स्त्रीचा जन्म मिळणे, बाई म्हणून जन्माला येणे ही खरेच खूप अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे. पण किमान आपल्या देशात तरी प्रत्येकीच्याच बाबतीत ही घटना तेवढी आनंददायी असेल असे नाही. एकीकडे महिला खरोखरच खूप प्रगती करत आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहात आहेत; पण दुसरीकडे यापेक्षा एकदम वेगळी परिस्थिती आहे. हे सगळे बघताना ही दरी कधीच भरून येणार नाही का, असा प्रश्‍न पडतो. या विषयावर जितके लिहू तितके कमीच, अशी दुर्दैवाने सध्याची परिस्थिती आहे. पण कधी ना कधी या परिस्थितीत बदल घडेल, ही आशा असतेच! 

मागील काही दिवसांत महिलांसंदर्भात अतिशय लाजिरवाण्या काही घटना घडल्या आहेत. तशा अनेक असतील पण उघडकीस आलेल्या, चर्चा झालेल्या या काही घटना म्हणायला लागतील. त्यातील तीन-चार घटना तर महाराष्ट्रातील आहेत. 

निघोज (जि. नगर) येथील एका तरुण दांपत्याला पेटवून देण्यात आले, अशी बातमी प्रसिद्ध झाली. आंतरजातीय विवाह मान्य नसल्याने मुलीच्या माहेरच्यांनी हे कृत्य केले, हा ऑनर किलिंगचा प्रकार असावा, अशी ती बातमी होती. मुलीचा यात मृत्यू झाला. तिचे काका, मामा यांना अटक झाली. वडील फरार होते. त्यांना त्यांच्या मूळ गावातून नंतर अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या हाती वेगळाच धागा लागला. रुक्‍मिणी आणि मंगेश यांचा आंतरजातीय विवाह होता, पण त्याला कोणाचा विरोध नव्हता. मात्र, मंगेश नंतर रुक्‍मिणीला त्रास द्यायचा. मारहाण करायचा. म्हणून ती माहेरी आली होती. एक दिवस तो तिच्या घरात घुसला. तिची अल्पवयीन तीन भावंडेही होती. त्यांच्या समोर त्याने तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. तिने त्याला मिठी मारल्यामुळे तोही भाजला. पण रुक्‍मिणी खूप भाजली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. पोलिस आता या दुसऱ्या शक्‍यतेवर तपास करत आहेत. अशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनेत मुलीने मनाविरुद्ध लग्न केलेले. दोघेही औषधांच्या दुकानात काम करत. लग्न झाले, तरी आईवडिलांचा राग शांत झाला नव्हता. गोड बोलून त्यांनी मुलीला माहेरपणाला बोलावले. बरेच दिवस बायको परत आली नाही, फोनही नाही, म्हणून नवरा तिच्या माहेरी पोचला. त्यावेळी एका आजारपणात मुलगी गेल्याचे तिच्या आईवडिलांनी त्याला सांगितले. तिचे अंतिम संस्कारही त्यांनी त्याच्या नकळत करून टाकले होते. त्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यांच्या तपासात मुलीचा मृत्यू नैसर्गिक नसून ती हत्या आहे, असे निष्पन्न झाले. मात्र आईवडील आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. दरम्यान, वडील पळून गेले असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. अशाच एका कारणामुळे एका मुलीने न्यायालयाकडे संरक्षणाची मागणी केली आहे. तिचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध आहेत. मात्र तो तरुण जातीतील नसल्यामुळे घरच्यांचा विरोध आहे. घरच्यांपासून जिवाला धोका आहे, त्यामुळे संरक्षण द्यावे, अशी मागणी तिने उच्च न्यायालयात केली. न्यायालयानेही तिला संरक्षण पुरविण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. आपल्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याचे समजल्यावर तिच्या डोक्‍यात दगड घालून आईनेच तिचा खून केल्याची घटना बारामती परिसरात घडली. त्यानंतर तीच पोलिसांत हजर झाली. या घटनेने पोलिसदेखील सुन्न झाले, इतका हा भीषण प्रकार होता. 

अशा घटना आता नेहमीच्या झाल्यासारख्या झाल्या आहेत. याबद्दल वाचून या लोकांना कशाचाच धाक वाटेनासा झाला आहे की काय, असा प्रश्‍न पडतो. कारण गुन्हा कधीही लपून राहात नाही. गुन्हेगाराला शिक्षा होतेच. तरीही असे प्रसंग घडतच आहेत. घराणे, त्याची प्रतिष्ठा आपल्या मुला-मुलींपेक्षा इतके मोठे असते? ज्यांना आपण जन्म दिला, मोठे केले त्यांना आपल्याच हाताने मारवले कसे जाते? कुठून येते ही हिंमत? अशा घटना वाचताना आपणही हळहळण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. करत नाही. ‘आपण काय करू शकतो?’ असा आपला हताश प्रश्‍न असतो. बरोबरही आहे, पण आपल्या आजूबाजूलाही अशा मनोवृत्तीचे लोक वावरत असतात, त्यांचे प्रबोधन तर नक्कीच करू शकतो. 

अशा घटनांबद्दल वाचताना ‘आणखीही एक घटना’ असाच विचार बहुतेकांच्या मनात येतो. पण या मुली कोणकोणत्या दिव्यातून जात असतील, गेल्या असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. 

उत्तर प्रदेशातील एका चौदा वर्षांच्या मुलीचे लग्न तिच्या वडिलांनी तिच्यापेक्षा मोठ्या माणसाबरोबर लावून दिले. काही दिवसांनी त्याने तिला सोडून दिले. ती परत घरी आल्यावर दहा हजारांच्या बदल्यात वडिलांनी तिचे परत लग्न लावून दिले किंवा तिला विकले. ती व्यक्ती फारच क्रूर निघाली. तो या छोट्या मुलीवर बलात्कार करायचा. एवढेच नाही, तर त्याच्या मित्रांबरोबरही तिला जायला भाग पाडायचा. वडिलांनीही तिच्याकडे लक्ष देणे बंद केले. सगळ्याला कंटाळून तिने पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनीही तिची दखल न घेता तिला घालवून दिले. त्यानंतर सगळा धीर गमावलेल्या त्या मुलीने स्वतःला पेटवून घेतले. त्यात ती गंभीररीत्या भाजली आहे. या अवस्थेत ती जे बोलली ते ऐकून अशा अवस्थेतील महिला-मुली कसल्या दिव्यातून जात असतील, याची कल्पनाही करवत नाही. ती म्हणाली, ‘जगण्याची मला अजिबात इच्छा नाही. पण जगले तरी आता काही वाटणार नाही. कारण मी इतकी भाजले आहे, की ते बघून आता किमान माझ्यावर बलात्कार तरी होणार नाही..’ अतिशय अस्वस्थ करणारे हे तिचे म्हणणे आहे. 

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे याबद्दल तक्रार केली आहे. आता सगळी चौकशी होईल, काही लोकांवर कारवाईही होऊ शकेल. पण या मुलीने किंवा अजूनही ज्या अंधारात अशा तिच्यासारख्या मुली जे गमवत असतात, त्याचे काय? समाज म्हणून त्यांच्यासाठी आपण काय करणार? ही आपलीही जबाबदारी आहेच ना!

संबंधित बातम्या