मुलींची बाजी... पण पुढे काय? 

ऋता बावडेकर
सोमवार, 17 जून 2019

संपादकीय
 

दहावी - बारावीच्या परीक्षा, त्यांचे निकाल नेहमीच वलयांकित ठरत आले आहेत. इतर कोणत्याही परीक्षेपेक्षा या दोन परीक्षांना पहिल्यापासूनच प्रचंड महत्त्व आहे. त्यातही दहावीच्या परीक्षेला आणि त्यातील यशापयशाला जरा अधिक महत्त्व आहे. मॅट्रिक, बोर्डा परीक्षा, शालान्त परीक्षा अशा विविध नावांनी दहावी किंवा पूर्वीची अकरावी प्रसिद्ध आहे. मुलांच्या (अर्थातच मुलींच्याही) आयुष्यातील हा खूप महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आयुष्यातील एक विद्यार्थीदशा संपून येथून त्यांच्या आयुष्यातील पुढील पर्वाची सुरुवात होते. वास्तविक, यापुढेच मुलांची खरी कसोटी लागते. त्यांच्या आयुष्याची दिशा यापुढेच ठरणार असते. याची सगळ्यांना जाणीव असली तरी अजूनही ‘दहावी’ने आपला रुबाब राखला आहे. दहावीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या काय किंवा बारावीच्या परीक्षेत काय, गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मुली बाजी मारत आल्या आहेत. गेल्या काही वर्षांची वर्तमानपत्रे जरी काढून बघितली, तरी याची खात्री पटावी. या संदर्भातील शीर्षकांमध्ये ‘यंदाही मुलींची बाजी’ हे तीन शब्द कायम दिसतील. ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे. मात्र पाठोपाठ एक प्रश्‍न मनात डोकावतो.. पण पुढे काय? 

खरोखरच प्रत्येक विचारी मनाला हैराण करून टाकणारा हा प्रश्‍न आहे. कारण आपल्याकडची परिस्थितीच तशी आहे. मुली यश तर छान मिळवतात, पण त्यांना पुढे संधी मिळतेच असे नाही. अनेकदा तर दहावी पूर्ण होण्याआधीच त्यांची शाळा बंद होते. त्याला अनेक कारणे असतात. पहिले कारण म्हणजे मानसिकता! त्यातूनच ‘शिकून कुठे बालिष्टरिण व्हायचंय?’ असे कुजकट प्रश्‍न येतात. ‘बालिष्टरिण’ची जागा आता इतर अनेक शिक्षण-व्यवसायांनी घेतली आहे. पण मूळ मुद्दा म्हणजे, मुलगी शिकून पुढे काय करणार आहे? तिला घरसंसारच सांभाळायचा आहे ना, मग त्यासाठी शिक्षण कशाला घ्यायला हवे! खरेतर मुलीच विविध क्षेत्रांत चमकताना आज दिसत आहेत. पण दुर्दैवाने फार कमी मुलींना ही संधी मिळताना दिसते. 

पण प्रत्येकवेळी म्हणजे, अगदी दरवर्षी मुलींनीच बाजी मारण्याचे काय कारण असावे? याचा अर्थ मुलगे अगदीच मागे असतात असे नाही. त्यांनाही चांगले गुण असतात. तेही हुशार असतात. पण त्यांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक असते, एवढे नक्की. याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे, मुलांना (मुलगा याअर्थी) व्यवधाने अधिक असतात. लक्ष विचलित करू शकतील अशा गोष्टी, केवळ या अर्थाने ‘व्यवधाने’ हा शब्द इथे वापरला आहे. त्या तुलनेत मुली अगदी एकचित्त होऊन आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करतात. त्यांना ही व्यवधाने नसतात, असा याचा अजिबात अर्थ नाही. पण अनेकींना ते परवडणारेच नसते. कारण मोठ्या मिनतवारीने त्या इथपर्यंत पोचलेल्या असतात. त्यांच्याकडून जरा जरी इकडे तिकडे झाले, तर त्यांचे शिक्षण थांबण्याचाच धोका जास्त असतो आणि हे त्या जाणून असतात. अर्थात अभ्यासात लक्ष नसणाऱ्या मुलीही असतातच. पण मुलगेही हुशार असतात, मुला-मुलींचे अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींतच लक्ष असते, असे सगळे मुद्दे गृहीत धरून आपण इथे घवघवीत यश मिळविणाऱ्या मुलींबद्दल अधिक बोलत आहोत. 

मुली जात्याच हुशार असतात, कितीही कष्ट घेण्याची त्यांची तयारी असते.. वगैरे अनेक कारणे त्यांच्या या यशासाठी दिली जातात. ती खरी असतीलही, पण केवळ ती आणि तेवढीच कारणे असतात-आहेत असे नाही. मुलांपेक्षा मुलींना मिळणाऱ्या संधी कमी किंवा मर्यादित असतात हे आपण मान्य करायला हवे. त्यामुळे मिळालेली संधी हातची जाऊ देण्यास या मुली सहजासहजी तयार नसतात. सगळ्या प्रतिकूलतेवर मात करत आपले उद्दिष्ट साध्य करणे, हे त्यांचे ध्येय असते. सरसकट नाही, पण या मुलींना घरातील आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून अभ्यास करायचा असतो. या जबाबदाऱ्यांत काय नसते? आपल्या लहान भावंडांना सांभाळणे, स्वयंपाक करणे, पाणी भरणे - ग्रामीण भागात तर कितीही अंतरावरून पाणी आणावे लागते, धुणी-भांडी करणे.. वगैरे. यातून वेळ मिळाल्यानंतर त्या अभ्यास करत असतात. अनेक भागांत शिक्षणाच्या सुविधा नसतात. लांबच्या गावात जावे लागते. सायकल असतेच असे नाही. चालत जावे लागते. वाटेत कसले कसले अनुभव येतील माहिती नसते. छेडछाड होत असते. पण तक्रार केली तर त्या मुलांना काय शिक्षा होईल माहीत नाही, आपलेच शिक्षण बंद होण्याचा धोका अधिक असतो. अशा सगळ्या शारीरिक, मानसिक, भावनिक आव्हानांना तोंड देत या मुली जिद्दीने शिकत असतात. त्यांना पैकीच्या पैकी गुण कदाचित मिळणार नाहीत. पण त्यांचे यश परीक्षेतील एकूण मुलींचा टक्का वाढवत असते, हे नक्की. 

त्यांची आयुष्याची परीक्षा खरेतर येथून पुढे सुरू होते. दहावीची मजल मारली, काहींनी बारावीही पार केली... पुढे काय? हा खरेतर मुलींच्या बाबतीत महत्त्वाचा प्रश्‍न असतो. लग्न ठरेपर्यंत काही मुलींना शिकण्याची ‘परवानगी’ असते. काहींना तर तीही नसते. लग्न सातवी-आठवीत जरी ठरले तरी मुलींची शाळा बंद होते, तिचे संसाराचे शिक्षण सुरू होते. तिची इच्छा, आकांक्षा यात कोणालाही रस नसतो. काही मुली दहावी-बारावीपर्यंत मजल मारतात, पण पुढे तेच.. चूल आणि मूल. हे चित्र बदलायला हवे. मुलींना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण घेता यायला पाहिजे. त्यांना त्यांच्या पायावर उभे करून योग्य वयात त्यांचे लग्न व्हायला हवे. पण लग्न म्हणजे, सगळे संपले असे नाही. पुढेही तिला हवे तसे जगता यायला हवे. यासाठी फार काही करण्याची गरज नाही. समाजाने आपली ‘नजर’ बदलायला हवी. कारण असंख्य मुलींच्या वाट्याला जे ‘चूल आणि मूल’ येते ते ‘समाज काय म्हणेल?’ या भीतीनेच. त्यामुळे समाजानेच आपली ‘दृष्टी’ बदलून ‘पुढे काय?’ हा प्रश्‍न पुसून टाकायला हवा. जमेल का हे आपल्याला?   

संबंधित बातम्या