ये हौसला बुलंद रहें। 

ऋता बावडेकर
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

संपादकीय
 

महिलांमध्ये जग जिंकण्याची ताकद असते, असे म्हणतात ते काही खोटे नाही. पी. व्ही. सिंधू असो, हिमा दास असो किंवा कोमलिका बारी असो.. या मुलींनी अतिशय सहजपणे जग जिंकत सुवर्णपदके मिळवली आहेत. अशा महिला खेळाडू अनेक आहेत, या खेळाडूंचे विजय ताजे असल्यामुळे इथे ही नावे घेतली आहेत इतकेच! 

‘आज मी जगज्जेती झाले आहे. मात्र हा आनंद व्यक्त करण्यासाठी मला शब्द सुचत नाहीत. खरोखरच मी खूप आनंदी आहे.. आज माझी प्रतीक्षा संपली...’ ही प्रतिक्रिया आहे पी. व्ही. सिंधू या नुकत्याच जगज्जेत्या झालेल्या बॅडमिंटनपटूची. हे जगज्जेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय आहे. जपानच्या नाओमी ओकुहारा या माजी जगज्जेतीचा सिंधूने २१-७, २१-७ असा सहज पराभव केला. दोन वर्षांपूर्वी अशाच लढतीत ओकुहाराने सिंधूला नमवले होते. हाताशी आलेले विजेतेपद गेल्याने साहजिकच ती नाराज झाली, पण निराश नाही. आपले प्रयत्न तिने सुरूच ठेवले. या वर्षी तिच्या कष्टाला चांगले फळ मिळाले. साहजिकच ती खूप सुखावली आहे... ‘सामन्यातील, तसेच त्यानंतरच्या प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेते आहे. गेली कित्येक वर्षे मी या क्षणाची वाट पाहात होते. यंदा मी सुवर्णपदकावर मोहोर उमटवलीच. पदक स्वीकारल्यानंतर आपला तिरंगा सर्वोच्च स्थानी जात होता अन् आपले राष्ट्रगीत पार्श्‍वभूमीवर वाजत होते.. तो क्षण मी कधीही विसरणार नाही. हेलावून टाकणाऱ्या या प्रसंगाचे वर्णन तरी कसे करू? आम्ही खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरतो, तेव्हा विजयाशिवाय काहीही दिसत नाही. जेव्हा ध्येयपूर्ती होते आणि देशाचे नाव उंचावते, तेव्हा स्वतःचाच अभिमान वाटतो. देशबांधवांनाही आमचा अभिमान वाटतो. या कृतार्थतेच्या क्षणाचे वर्णन कसे करायचे?’ सिंधू अगदी भारावून गेली आहे. 

तीच अवस्था कोमलिका बारी हिचीही आहे. तिने माद्रिद येथे जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेतील कॅडेट गटात सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच ‘पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये मानसी जोशी हिने सुवर्ण पदक मिळवले आहे. हे सगळे अिभमानाचे क्षण आहेत. 

काही दिवसांपूर्वी हिमा दास या ॲथलिटनेही अशीच सुवर्णपदकांची लयलूट केली होती. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या हिमा दासने सगळ्या प्रतिकूलतेवर मात करत आपले ध्येय गाठले. स्पर्धा सुरू होण्याआधी अमेरिका, ब्रिटन, जर्मनी वगैरे देशांच्या खेळाडूंपुढे कोणी हिमाची कदाचित दखलही घेतली नसेल. पण आपल्या कामगिरीमुळे हिमाने आपली दखल घेण्यास सगळ्यांना भाग पाडले. अशा विजयांना ‘फ्लूक’ म्हणून हिणवण्याचीही पद्धत आहे. पण हिमाने तशी कोणाला संधीच दिली नाही. तिने पाठोपाठ सुवर्णपदकांची लयलूट केली. 

अशा कितीतरी महिला खेळाडू असतील, ज्या संधीअभावी अजून समोर आलेल्या नाहीत. केवळ महिलाच का? असे अनेक पुरुष खेळाडूही असतील. अंधारातून असे हिरे शोधण्याचे आपल्यापुढे फार मोठे आव्हान आहे. तसेच हे काम केवळ सरकारनेच करावे, अशी अपेक्षा न करता या क्षेत्रातील संबंधितांनी, संबंधित कंपन्यांनी सरकारला मदत केली तर अधिक उपयुक्त ठरू शकेल. 

असे खेळाडू फक्त मोठमोठ्या शहरांतच सापडतात, ही एक भ्रामक कल्पना आहे. याचा अर्थ शहरात टॅलेंट नसते असे अजिबात नाही. पण त्यापलीकडे खेड्यापाड्यांत, दुर्गम भागांतही हे टॅलेंट मोठ्या संख्येने आहे. फक्त ते शोधण्याची आवश्‍यकता आहे. जगाचा परिचयच नसल्याने किंवा स्वतःच्या टॅलेंटची कल्पना नसल्याने ही मुले-मुली पुढे येतच नाही. त्यांना आपणच पुढे आणायला हवे. 

टीव्हीवर डान्सचे अनेक रिॲलिटी शोज सुरू असतात. लहान मुलांच्याही स्पर्धा घेतल्या जातात. त्या किती योग्य - किती अयोग्य, हा वेगळ्या चर्चेचा विषय; पण यामध्ये सहभागी होणारी अनेक मुले दहा-बारा वर्षांपेक्षा कमी वयाची असतात आणि अत्यंत लवचिक असतात. असे टॅलेंट शोधून त्यांना योग्य प्रशिक्षण दिले तर एखादा चांगला जिम्नॅस्ट आपल्याला मिळू शकतो. असा शोध वेगवेगळ्या ठिकाणी घ्यायला हवा. अशा खेळाडूंपुढे खरे आव्हान फंडिंगचे असते. कोणताही खेळ वाईट नाही, कोणत्याही खेळावर टीका करण्याचा उद्देश नाही. तरी आपल्याकडे निधीचा सगळा ओघ क्रिकेटकडे वळलेला आहे, हे सत्य मान्य करायलाच हवे. त्याबद्दल तक्रार नाही. पण इतर खेळांनाही प्रोत्साहन मिळायला हवे. अर्थात क्रिकेटमध्येही अजून खूप मोठे टॅलेंट समोर आलेलेच नाही, अशी परिस्थिती आहे. नाही म्हणायला ‘प्रो-कबड्डी’मुळे कबड्डीपटूंना बरे दिवस आले आहेत. तसेच इतर खेळांच्या बाबतही व्हायला हवे. अर्थात त्यासाठी प्रेक्षकांचीही मोठी जबाबदारी आहे. आपणच या खेळांना प्रोत्साहन दिले, तर प्रायोजकही तिकडे आपोआप वळू लागतील. 

अर्थात, या कोणत्याही गोष्टींसाठी आपला कोणताही खेळाडू अडून बसलेला नाही. अवलंबून राहिलेला नाही. उपलब्ध सामग्रीत त्याने त्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. आपल्या कामगिरीवरच हिमाने प्रायोजकांचे लक्ष वेधले आहे. ते प्रमाण किती आहे, कल्पना नाही, पण त्यासाठी तिने आपले प्रयत्न थांबवले नाहीत. खेळाडू तर प्रयत्न करतच राहणार, त्यांना यश येतच राहणार, आपले प्रोत्साहन त्यांचा ‘हौसला’ अधिक ‘बुलंद’ करतील यात मात्र शंका नाही.

संबंधित बातम्या