आमचे जरा ऐकता का? 

ऋता बावडेकर
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

संपादकीय
 

अलीकडे जगण्याचा रेटा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे साहजिकच ताणही वाढले आहेत. ताणतणावातून जात नाही, अशी व्यक्ती सापडणे अवघड झाले आहे. कर्जबाजारीपणा, प्रेमभंग, विवाहबाह्य संबंध, परीक्षेची भीती - त्यातील (संभाव्य) अपयश, पालकांच्या अवाजवी अपेक्षा, स्वतःच्या स्वतःकडून अवाजवी अपेक्षा, कार्यालयीन ताण, व्यसनाधीनता, विस्कटलेला संसार, आर्थिक चिंता.. अशी कितीतरी कारणे त्यामागे आहेत. या ताणांचा - काळजीचा अतिरेक झाला, की नैराश्‍य येऊ शकते. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही जणांना दिसतो, बहुसंख्य मात्र त्याच गर्तेत अडकत जातात आणि आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात. अर्थात, आत्महत्या हा काही मार्ग होऊ शकत नाही. पण आपली समस्या सुटणारच नाही, आपल्याबरोबरच तिचा अंत करावा, या भावनेने ग्रासून अनेक जण हा मार्ग स्वीकारतात. वास्तविक, बोलल्यामुळे कुठलीही समस्या सुटू शकते, पण दुर्दैवाने अनेकांकडे हा ऐकणारा कान नसतो. केवळ समुपदेशकच नाही, तर आपल्यापैकी प्रत्येकाने सजगपणे समाजात पाहिले आणि अशा गरजवंतांचे म्हणणे नुसते ऐकले तरी ही समस्या बऱ्यापैकी सुटू शकते. आपले म्हणणे कोणी ऐकते आहे, एवढेही त्यांच्यासाठी पुरेसे असते. नुकताच १० सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन झाला. या दिनाचे हेच सांगणे आहे... समोरच्याचे ऐका. तेवढी मदत तर आपण सगळेच करू शकतो. 

‘आत्महत्या ही काही क्षणार्धात घडणारी क्रिया नाही. प्रत्येकाने आपल्या सभोवतालच्या व्यक्तीचे म्हणणे किमान ‘ऐकले’, तरी दिवसागणिक अजस्र होऊ लागलेली ही समस्या काही अंशी कमी होण्यास नक्कीच मदत होईल,’ असे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबईतील ‘समारिटन्स मुंबई’ ही हेल्पलाइन गेल्या कित्येक वर्षांपासून आत्महत्या करू इच्छिणाऱ्यांचे म्हणणे ‘ऐकून’ घेण्याचे आणि त्याविषयी प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. या प्रशिक्षणामध्ये भावनिक आधार देण्याचे महत्त्व आणि जागरूकतेने ऐकणे या दोन गोष्टींवर भर दिला जातो. आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीबरोबर बोलण्यासाठी आपण सक्षम असणे, तो भावनिक गुंता समजून घेण्याएवढी संवेदनशीलता, तो सोडवण्यास हातभार लावण्याची क्षमता आपल्यात असणे आवश्यक असते. तसे स्वयंसेवक ही संस्था तयार करते. मुंबईच्या केईएममध्येही दर बुधवारी दुपारी दोन ते चार यावेळेत ‘आत्महत्या प्रतिबंध समुपदेशन’ या नावाने खास ओपीडी चालवली जाते. ओपीडीमध्ये दर आठवड्याला अशा सात ते आठ केसेस येतात. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार आणि मग त्यांचे काउन्सिलिंग केले जाते. 

ताण आणणाऱ्या वर उल्लेख केलेल्या समस्या तशा नवीन नाहीत. पूर्वीपासून त्या आहेत, पण अलीकडे त्यांचे स्वरूप बदलताना दिसते आहे. धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन ही व्यसने फार पूर्वीपासून आहेत. पुण्यात अवचट दांपत्याने त्यासाठी ‘मुक्तांगण’ सुरू केले. पण या व्यसनांचे स्वरूप बदलताना दिसते आहे. मोबाईल, इंटरनेटचे ॲडिक्शन, पोर्नोग्राफीचे व्यसन असे बदल त्यात दिसू लागले आहेत. ‘मुक्तांगण’च्या मुक्ता पुणतांबेकर यांनी काही दिवसांपूर्वी याविषयी चिंता व्यक्त केली होती. आता इतर व्यसनांबरोबरच या व्यसनांतून लोकांना बाहेर काढण्याचे आव्हानही त्यांच्यापुढे आहे. मोबाईल फोन काढून घेतल्यामुळे बेळगावच्या एका मुलाने आपल्या वडिलांचाच खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यावरून या व्यसनांचे गांभीर्य लक्षात यावे. हल्ली विवाहबाह्य संबंधांचे प्रमाणही वाढल्याचे दिसते. त्याचा ताण संबंधित, त्यांचे जोडीदार यांच्यावर येतोच; पण त्यांच्या मुलांवरही त्याचे परिणाम होऊ शकतात. समलैंगिकतेचाही प्रश्‍न हल्ली जाणवतो. कर्जबाजारीपणा हे कारणही तसे जुनेच आहे. कोणी बँकेकडून पैसे घेतलेले असतात, कोणी मित्रांकडून-आप्तांकडून, खासगी सावकारांकडून घेतलेले असतात. त्या परतफेडीचा ताण त्यांच्यावर असतो. 

हल्ली समाजमाध्यमांमुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचे ताणही वेगवेगळे आहेत. इथे केवळ मुलेच नाही, तर मोठेही अनेकजण स्वतःची एक प्रतिमा तयार करत असतात. हळूहळू आपल्या त्या प्रतिमेच्याच प्रेमात पडत जातात; खरे तर या प्रतिमेपेक्षा अनेकदा ते खूप वेगळे असतात. पण ते भान खूप थोड्यांना असते. त्या प्रतिमेत अधिकाधिक गुंतत जाणे किंवा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे हा त्यांचा वेगळाच संघर्ष सुरू असतो. वास्तव जग आणि हे आभासी जग; याचा तोल सांभाळताना अनेकजण नैराश्‍यात जातात. लैंगिक शोषण हेही निराशेचे एक कारण आहे. या अनुभवाचा त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतच असतो. पुढे त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी याचे पडसाद उमटतच असतात. 

यापैकी काही समस्या माणूस नक्कीच टाळू शकतो. पण प्रत्येकवेळी तो तेवढा खंबीर, कणखर असेलच असे नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती, या न्यायाने त्यात फरक पडू शकतो. म्हणूनच या सगळ्या समस्यांवर एक प्रभावी उपाय म्हणजे, परस्परसंवाद. तो घरी मिळत नाही, तेव्हा समुपदेशकाकडे जावे. पण अनेकांना हा पर्यायच माहिती नसतो. त्यामुळे ते स्वतःच झुरत राहतात, खंगत राहतात. अशावेळी मित्र, सुहृद, चांगले नागरिक म्हणून आपण हे काम करायला हवे. त्यांना काय म्हणायचे आहे, ते फक्त ऐकून घ्यायचे. शक्य असेल तर त्यांना उपाय सुचवायचा. नाही तर त्यांना सल्ला देऊ शकेल असा पर्याय सुचवायचा. अनेकदा तर त्यांना सल्ल्याचीही गरज नसते. केवळ आपले कोणी ऐकून घेते आहे, एवढा दिलासाही पुरेसा असतो. 

निराश झालेला प्रत्येकजणच आत्महत्या करेल असे नाही. पण ती शक्यता नाकारताही येत नाही. त्यामुळे शक्य असेल, तिथे दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घ्यावे. ही सवयही चांगलीच आहे. त्यातून कोणाला फायदा झाला तर चांगलेच. एकदा मिळणारे आयुष्य अर्ध्यात सोडण्यात काय हशील, प्रत्येक समस्येवर उपाय असतोच; फक्त योग्य ठिकाणी तुम्ही तो सल्ला मागायला हवा, एवढे जरी प्रत्येकाला समजले तरी खूप गोष्टी सोप्या होतील. 
त्यामुळे ‘ऐकून घ्या..’  

संबंधित बातम्या