वेगळे ‘नाटक’ नको 

ऋता बावडेकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

संपादकीय
 

चित्रपट, मालिका, अलीकडेच आलेल्या वेबसीरिज यात नाटकाने आपले स्थान अजूनही राखले आहे. मोठमोठे कलावंत वर्षातून एकदा किंवा जमेल तसे नाटकाचे प्रयोग करून स्वतःला फ्रेश ठेवत असतात. ती ‘झिंग’च वेगळी असते, अशीही प्रतिक्रिया अनेकजण देतात. मात्र, या नाटकात वेगळे नाटकही घडू शकते - घडते, तसे होता कामा नये, असा इशारा मराठी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांनी दिला आहे. 

‘नाटक हे आजही प्रभावी माध्यम आहे. मात्र अनेकदा संहितेनुसार नाटकाचा प्रत्यक्ष प्रयोग सादर होतोच असे नाही. संवादांमध्ये बदल होतात. अंगविक्षेप केले जातात. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. या सगळ्याचा विचार करता नाटक सादर करताना काही ताळतंत्र हवेच. म्हणून नाटकाच्या सादरीकरणात काही आक्षेपार्ह आढळल्यास नाटकाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ अर्थात नाट्य सेन्सॉर बोर्डाने घेतला आहे. मंडळाने घालून दिलेल्या नियमावलीचा भंग होत असेल आणि समाजामध्ये अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असेल तर अशा नाटकांविरुद्ध मंडळाला कारवाई करावीच लागेल,’ असे श्री. नलावडे यांनी स्पष्ट केले. 

ते पुढे म्हणतात, ‘रंगभूमीवर कोणतीही कला सादर करण्यापूर्वी मंडळाकडून संहिता मान्य करून घेणे बंधनकारक आहे. पण अनेकदा उद्या प्रयोग असताना ऐनवेळी संहिता मान्यतेसाठी पाठवली जाते. त्यास मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्षात सादरीकरण वेगळेच असल्याचे प्रकार घडले आहेत. मंडळाने कलावंतांसाठी अनेकदा धोरण लवचिक केले आहे. तरीही नियम मोडले जात असल्याचे दिसते. संहितांना शक्यतो मान्यता देण्याचे धोरण आहे. मी स्वतः नाटकात काम करतो, त्यामुळे लेखकांचे कष्ट मला परिचित आहेत. त्यामुळे उगीचंच कात्री लावणे योग्य नाही, हे आम्हालाही कळते. बोल्ड विषय केवळ ते बोल्ड आहेत म्हणून नाकारले जात नाहीत. काही आक्षेपार्ह वाटलेच तर नाटककाराबरोबर चर्चा करून मार्ग काढला जातो. जिवंत कला वेगळा परिणाम साधते, त्यामुळे नाटक सादर करताना काही ताळतंत्र हवेच. जातिवाचक आशयाला बंदी आहे. बोल्ड विषयांना अजिबात आक्षेप नाही. कलाकाराचे अभिव्यक्ती आणि आविष्कार स्वातंत्र्य कायम आहेच, समाजाचा विचार करून त्या सादर व्हाव्यात. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड नकोच या मताशी मी सहमत नाही. मान्यतेसाठी येणाऱ्या नाटकाची संहिता वेगळी आणि प्रत्यक्षात सादरीकरण भलतेच, असे आढळल्यास त्या नाटकाची मान्यता रद्द करण्यात येईल. तशी तळटीपच त्या संहितेला मान्यता देणाऱ्या पत्रात आता लिहिली जाणार आहे. तसेच संहितेला मान्यता दिल्यानंतर मंडळाचे सदस्य किमान पाच प्रयोग बघणार आहेत.’ 

वास्तविक, इतक्या बंधनांची आवश्‍यकता नसावी, असेच कोणी म्हणेल. पण नलावडे यांनी उल्लेख केला, त्याप्रमाणे नियमांचे सगळसरळ उल्लंघन होत असेल, तर काही गोष्टी त्यांना कराव्याच लागणार आहेत. स्वतःवर नियंत्रण ठेवून गोष्टी पाळणारेही लोक आहेत, पण तुलनेने ही संख्या खूपच अल्प आहे. स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणारे जर जास्त असतील तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे कोणीतरी हवेच. अर्थात, परत या गोष्टीही सापेक्ष आहेत. स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? प्रत्येकाच्या त्याबाबतीतील कल्पना वेगवेगळ्या आहेत. पण तरी कुठेतरी काहीतरी मर्यादा ठरवावीच लागते. त्यादृष्टीने नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे निकष ठरवले आहेत. त्यावर साधकबाधक चर्चा होऊ शकते, पण ते नियम पाळणे हे त्या क्षेत्रातील प्रत्येकाचे कर्तव्यही ठरते. मुळात एक संहिता दाखवून सादर भलतेच करायचे, हीच मोठी फसवणूक आहे. त्यामुळे त्या विरोधात कोणीही बोलू शकत नाही. अशी एखादी चूक कोणीतरी करते आणि ती दुरुस्त करण्याची जबाबदारी सगळ्यांवरच येते. त्याचे परिणाम सगळ्यांनाच सहन करावे लागतात. काही मूठभरांचे हे वागणेच, सेन्सॉर बोर्ड का हवे याचे खरेतर उत्तर आहे. 

खरेतर इंटरनेटमुळे आज जग खूप जवळ आले आहे. ‘अंतर’ ही गोष्टच जणू अस्तित्वात राहिलेली नाही. अशावेळी माणूस अधिक प्रगल्भ व्हायला हवा. तो होतोही आहे, पण वर म्हटल्याप्रमाणे हे प्रमाण खूपच कमी आहे. ते वाढायला हवे. नाटक असो किंवा चित्रपट (कोणत्याच भाषेतील मालिका यात गृहीत धरलेल्या नाहीत. कारण त्या अजूनही खूपच बाल्यावस्थेत आहेत); समाजात जे घडते त्याचेच ते प्रतिबिंब असते. पण हे वास्तव किती उघडे नागडे करून दाखवायचे यालाही काही मर्यादा असतात. वेबसीरिजमध्ये किती हिंसा, शिव्या, लैंगिकता दाखवावी याला काही मर्यादा आहेत की नाही, अशी चर्चा आज घरोघरी, समाजमाध्यमांवर चर्चा ऐकायला मिळते. जे समाजात घडते आहे, तेच आम्ही दाखवतो, असे लेखक-दिग्दर्शक म्हणतील. पण हे इतके उघड दाखवण्याची खरेच गरज आहे का, हाही प्रश्‍न आहेच. याला कदाचित कोणी ‘पिढ्यांतील अंतर’ म्हणून मोडीत काढेल. पण खरेच तसे आहे का? प्रेमप्रसंग दाखवताना पूर्वीसारखे अगदी दोन फुले जवळ आलेली वगैरे दाखवू नका, पण काही गोष्टी तुम्हाला सूचितही करता येतात. थेट तसे दृश्‍य दाखवण्यापेक्षा सूचकतेतून अधिक परिणाम साधता येतो, हे कोणी अमान्यच करू शकत नाही. पण तसे करायला लेखक-दिग्दर्शकाकडे वेळ आणि कल्पनाशक्ती हवी. 

अभिव्यक्ती-आविष्कार स्वातंत्र्याला कोणाचीच ना नाही. फक्त त्याचा वापर विचारपूर्वक व्हावा. तो कसा, हे प्रत्येकाने समाजाचा विचार करून ठरवावे. कारण आपण जे दाखवतो, जे सादर करतो त्याचा प्रभाव समाजातील घटकांवर पडणार असतो. त्यामुळे सादर करणाऱ्यांची जबाबदारी फार मोठी असते. ती त्यांना झेपत नसेल, तर मार्गदर्शन करायला सेन्सॉर बोर्ड हवेच. त्यांतील सदस्यही समंजस असावेत. सगळ्या अपेक्षा संपूर्णपणे पूर्ण होतील असे नाही, पण जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न व्हावा. त्यात ‘नाटक’ नको.   

संबंधित बातम्या