सोशल मीडियाचे प्रस्थ

ऋता बावडेकर
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

संपादकीय
 

हा जमाना सोशल मीडिया; अर्थात समाज माध्यमाचा आहे. पूर्वी काही जणांपुरते मर्यादित असलेले ‘माध्यम’ हे ‘समाज माध्यम’ या संकल्पनेमुळे अगदी तळागाळापर्यंत पोचले असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. आपले साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी नाना सायास पूर्वी करावे लागत; आता इंटरनेटमुळे या समाज माध्यमावर कोणालाही व्यक्त होता येऊ लागले आहे. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग... असे अनेक पर्याय या निमित्ताने मिळाले आहेत. त्याची पुढची पायरी म्हणजे व्हिडिओज.. अगदी खासगी समारंभात काढलेले व्हिडिओज ठरवले तर क्षणार्धात ‘व्हायरल’ होऊ लागले आणि कोणालाही तोपर्यंत माहिती नसलेला माणूस पापणी लववण्याआत ‘फेमस’ होऊ लागला आहे. आता प्रसिद्धीची सोय खूप सोपी झाली आहे, पण ही प्रसिद्धी टिकते किती, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अर्थात, त्याची फिकीर फार कोणालाही नाही. 

तंत्रज्ञान जितके प्रगत तितके जग जवळ येऊ लागले आहे. काही काळापूर्वी ‘ऑर्कुट’मुळे मंडळी एकत्र येऊ लागली होती. अनोळखी लोकांच्या ‘मित्रां’च्या माध्यमातून ओळखी होऊ लागल्या होत्या. पण काही काळाने ऑर्कुटच्या मर्यादा जाणवू लागल्या आणि ही संकल्पना जवळजवळ मागेच पडली. साधारण त्याच सुमारास मार्क झकरबर्गचे ‘फेसबुक’ डोकावले. कोणत्याही गोष्टीची सवय व्हायला वेळ लागतो. त्यात अशा तंत्रज्ञानाचा आपल्याला (उगाचच) बाऊ वाटत असतो. मग ‘अशा आभासी जगात वावरायला मला आवडत नाही’ अशी नाके मुरडत मंडळी दुरून कानोसा घेऊ लागली आणि बघता बघता, त्यांच्याही नकळत या तथाकथित ‘आभासी’ जगाकडे ओढली गेली. ज्यांना ‘आजी’, ‘आजोबा’, ‘काका’, ‘काकू’ वगैरे म्हटले जाते, तेही आज या माध्यमावर आढळतात आणि खूप सक्रियही असतात. त्यानंतर कमीतकमी शब्दांत आपले मत ठामपणे मांडता येणारे, ट्विटर सुरू झाले. इन्स्टाग्राम आले... ही सगळी माध्यमे अल्पावधीत लोकप्रिय झाली. आबालवृद्धांनी ती आपलीशी केली. 

जगाचा या माध्यमाकडचा हा ओढा बघून संबंधितांनी त्यात खूप नवीन सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. लेखनाबरोबरच ऑडिओ, व्हिडिओ हा भाग त्यापैकी महत्त्वाचा. या सगळ्यामुळे माणसे वेगळ्या अर्थाने ‘स्वयंपूर्ण’ झाली. आपल्या समाजाचा विचार करता आपल्याकडे कवितालेखन अगदी आवडते आहे. खूप कवी आहेत; साहित्य संमेलनातील कविसंमेलनांतील कवींची उपस्थितीवरून या म्हणण्याची प्रचिती यावी. इथे कवींचा अवमान करण्याचा अजिबात हेतू नाही, पण आज हे कवी कुठल्याही नियतकालिकांवर तसे फारसे अवलंबून नाहीत. त्यांची कविता, त्यांचे साहित्य ते या समाज माध्यमावर प्रसिद्ध करू शकतात; नव्हे करतात. अर्थात नियतकालिकांत असे साहित्य प्रसिद्ध होत नाही, असे नाही पण ती गरज थोडी तरी कमी झाली आहे, हे नक्की. 

व्हिडिओजनी तर अक्षरशः धूम उडवून दिली आहे. कोणत्यातरी लग्नात एकाने नृत्य केले. ते त्यांच्याच कोण्या नातेवाइकाने व्हायरल केले आणि काही क्षणात हा ‘डान्सर अंकल’ घराघरांत पोचला. विस्मरणात गेलेले गोविंदाचे ‘मय से मीना से..’ हे ‘खुदगर्ज’ या चित्रपटांतील गाणे पुन्हा लोक गुणगुणू लागले. १९८७ मध्ये आलेल्या या चित्रपटातील या गाण्याला तेव्हाही एवढी लोकप्रियता लाभलेली नव्हती, पण डान्सर अंकलने ते गाणे विस्मृतीतून बाहेर काढले. हे ‘अंकल’ कानपूरच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांना नृत्य करायला आवडते. गोविंदाचे ते फॅन आहेत. एका नृत्याच्या कार्यक्रमात आपल्या आवडत्या कलाकाराबरोबर नृत्य करण्याची संधीही त्यांना मिळाली. 

काही महिन्यांपूर्वी कोलकात्याच्या रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है...’ हे गाणे म्हणतानाचा एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला. अशी गाणी म्हणून ती स्वतःचा चरितार्थ चालवत होती. पण काही दिवसांतच ‘प्रतिलता’ म्हणून तिच्याविषयी चर्चा सुरू झाली. संगीतकार हिमेश रेशमिया यांनी तिला गाण्याची संधीही दिली. अल्पावधीतच रानू मंडल ही ‘इंटरनेट सेन्सेशन’ झाली. 

काही दिवसांपूर्वी एका आदिवासी जोडप्याच्या नृत्याचा व्हिडिओ गाजू लागला. वेगवेगळ्या गाण्यांवर हे जोडपे थिरकतानाचे हे व्हिडिओज आहेत. ई-सकाळने या जोडप्याचा शोध घेतला. जामदेपासून जवळच शेतात झोपडीवजा घरात राहणाऱ्या या जोडप्याचे नाव दिनेश शंकीलाल पवार व लखाणी दिनेश पवार असे आहे. या दोघांना लहानपणापासूनच नृत्य व अभिनयाची आवड होती, ती त्यांनी अशा पद्धतीने पूर्ण केली. त्यांच्या या व्हिडिओजची सध्या बरीच क्रेझ आहे. 

अशा अनेक गोष्टी आहेत. एकाने केले मग त्याच्यासारखे अनेकजण करू लागतात. डान्सर अंकलच्या व्हिडिओनंतर असे अनेक अंकल - आंटी डान्स करताना दिसू लागले. एवढेच नाही, तर आजी-आजोबाही दिसू लागले. रानू मंडलनंतर पंजाबमधील एका महिलेचाही व्हिडिओ मध्यंतरी दिसला होता. आता आदिवासी जोडप्यासारखे अनेकजण दिसू लागतील. 

अर्थात ही क्रेझ असते. लोकांना सतत काहीतरी नवीन हवे असते. असे काही वेगळे दिसले, की त्यामागे सगळे धावू लागतात. पण म्हटल्याप्रमाणे ही एक क्रेझ असते. साहजिकच तिचे आयुष्य अल्पच असते. ते नेमके किती, हे ती क्रेझ संपल्यावरच सांगता येते; पण हे फार काळ टिकत नाही. टिकणार तरी कसे? ते काही ‘ओरिजिनल’ नव्हे. कितीही नाही म्हटले, तरी ती नक्कलच असते, हे अजिबात नाकारता येत नाही. गोविंदाचा डान्स आणि गोविंदा‘सारखा’ डान्स किंवा लता मंगेशकर यांचे गाणे आणि लता मंगशकरां‘सारखे’ गाणे हा त्यातला मूलभूत फरक आहे. अर्थात ‘सारखा’ डान्स किंवा गाणाऱ्यांचा तसा काही आग्रह नसतो. ते आपली हौस भागवत असतात. बघणारे आपण त्याला नावे देत असतो. डोक्यावर घेत असतो. कौतुक जरूर करावे, पण ते अति होत नाही ना हेही बघायला हवे. कारण मूळ कलाकृतीप्रमाणे ही नक्कल टिकणारी नसते. यात या कलाकारांचा अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही. पण त्यांना क्षणात आकाशात, तर दुसऱ्या क्षणी खाली आणणाऱ्या आपल्यासारख्या प्रेक्षकांनी सगळे भान ठेवून दाद द्यायला हवी. कुठल्याही माध्यमाची हीच पेक्षा असते.  

संबंधित बातम्या