कलाकारांची ‘भूमिका’ 

ऋता बावडेकर
गुरुवार, 23 जानेवारी 2020

संपादकीय
 

नवी दिल्लीतील जेएनयु अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मागील आठवड्यात हिंसाचार घडला. काही बुरखेधारी लोकांनी तेथील विद्यार्थी, प्राध्यापकांवर लाकडी रॉड, सळ्यांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात अनेक जण जखमी झाले. त्यात विद्यार्थिनींचाही समावेश आहे. साहजिकच या संदर्भात देशभर संतापाची लाट पसरली. समाजमाध्यमांवर मते प्रदर्शित होऊ लागली. अनेक सेलिब्रिटींनी याबाबत आपापली मते मांडली. अर्थातच बाजूने आणि विरोधात अशी दोन्ही प्रकारची ही मते होती. प्रत्येक जण हिरीरीने ती मांडत होता. शाब्दिक वाद होत होते... आणि त्यातच आजची आघाडीची नायिका दीपिका पदुकोन कॅंपसमध्ये पोचली. ती बोलली काहीच नाही, पण तिने तेथील पाहणी केली. विद्यार्थी तिच्याबरोबर बोलले. या एका घटनेने सगळा नूरच पालटला. हल्ला कोणी केला, का केला वगैरे मुद्दे बाजूला पडून वेगळाच वाद सुरू झाला... 

दीपिका पदुकोनने कॅंपसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना भेटणे हेच अनेकांना रुचले नाही. तर अनेकांनी तिच्या या कृतीचे स्वागत केले. दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट त्यावेळी प्रदर्शनाच्या मार्गावर होता, (१० जानेवारी रोजी तो प्रदर्शित झाला) त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच तिने हे पाऊल उचलले असा आक्षेप अनेकांनी घेतला. तसे करणे कसे चुकीचे आहे, या बद्दलही अनेक मते प्रदर्शित झाली. खरे तर ‘ही परिस्थिती पाहून खूप वाईट वाटले’ एवढीच प्रतिक्रिया तिने दिली, पण तिने तिथे जाणेच अनेकांना रुचले नाही. प्रमोशनसाठी तिने इतके खाली (?) उतरायला नको होते, असे त्यांचे मत. तर दीपिकाने केले, ते योग्यच केले असे दुसऱ्या बाजूचे मत होते. त्यामध्ये अनेक चित्रपट कलाकारांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलायलाच हवे, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवायलाच हवी, असे या लोकांचे म्हणणे आहे. तर, एरवी अशा कुठल्याही वादात दीपिका पडली नाही, याचवेळी का? कारण तिला तिच्या चित्रपटाची जाहिरात करायची होती आणि त्यासाठी ही जागा योग्य नव्हती, असे विरोधातले मत आहे. त्यामुळे हा चित्रपट बघू नये, असे टोकाचे मत व्यक्त झाले; तर चित्रपट आणि हा मुद्दा पूर्णतः वेगळा असल्याने अशी भूमिका घेणे चुकीचे असल्याचे मतही व्यक्त झाले. 

दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या वादाच्या पार्श्‍वभूमीवर त्याला कसा प्रतिसाद मिळतो ते बघायचे. सरकारने तो करमुक्तही केला आहे. लक्ष्मी अग्रवाल या तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्याने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. त्यातून ती कशी सावरली, तिचे कुटुंबीय, तिचे मित्रमैत्रिणी, समाजाने तिला कसा प्रतिसाद दिला.. अशी लक्ष्मीच्या संघर्षाची कथा ‘छपाक’मध्ये चित्रीत करण्यात आली आहे. त्यात दीपिकाची भूमिका आहे म्हणून केवळ नव्हे, तर ही कथाच खूप जणांना प्रेरणा देणारी आहे. असा विकृत आनंद घेणाऱ्यांचे डोळे उघडणारी आहे, अर्थात त्यांच्यात तेवढी जाणीव असेल तर! तिच्यासारख्या असंख्य मुली आपला संघर्ष करत आयुष्य जगत आहेत. समाजाचेही डोळे या चित्रपटामुळे उघडले तर हवेच आहे. संवेदनशील दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे केवळ दीपिका कँपसमध्ये गेली म्हणून चित्रपटावर बहिष्कार टाकणे चुकीचे आहे. ज्या कारणासाठी हा चित्रपट झाला, त्याला प्रतिसाद द्यायला हवा.. 

मात्र, या निमित्ताने एक चर्चा सुरू झाली. अशा गंभीर मुद्द्यांवर कलाकारांनी भूमिका घ्यावी की न घ्यावी? तसे बघितले, तर भूमिका घेणे किंवा मत व्यक्त करणे यात काही चुकीचे नाही. समाज जिवंत असल्याचेच ते लक्षण आहे. त्यावर वादही व्हावेत. पण कोणी पातळी सोडू नये. समाजात दोन गट पडल्याचे स्पष्ट दिसते आहे. बाजूचा आणि विरोधातला. या कलाकारांनी किंवा कोणीही घेतलेले मत बाजूचे असेल तर त्याचा उदोउदो केला जातो. पण तेच विरोधातले असेल, तर मात्र त्याच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते आणि त्याबाबत कोणतीही बाजू कमी नाही. दोघेही तेवढ्याच त्वेषाने टीका करत असतात. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे, काही दिवसांपूर्वी सुधारित नागरिकत्व कायदा या मुद्द्यावरून अभिनेत्री जुही चावलाने नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली. त्यांचे कौतुक केले. लगेच तिच्यावर लोक तुटून पडले. दीपिकाचे कौतुक करणारे यात अगदी पुढे होते. एकूण काय, आपल्या विरोधात कोणी बोललेले कोणालाही सहन होत नाही. त्यामुळे ‘चांगले’ असणारे घटकेत ‘वाईट’ होतात किंवा या उलट होते. 

हो सगळे बघता, गरज सहिष्णू असण्याची आहे. ते कोणतेही सरकार किंवा कोणताही राजकीय पक्ष आपल्याला शिकवणार नाही, तर आपणच ते समजून घेऊन शिकायला हवे. अन्यथा विशेषतः समाज माध्यमांवर होणारी हीन दर्जाची टीका बघून - वाचून कोणीही विचारी माणूस व्यक्तच होणार नाही. कलाकारांनीही आपल्यावरची जबाबदारी ओळखूनच वागायला हवे. अभिनेता अजय देवगन हेच म्हणाला, ‘सेलिब्रिटी म्हणून आमची मते ग्राह्य धरली जातात. त्यामुळे खूप जबाबदारीने मत द्यायला हवे. अन्यथा त्यामुळे समाजात अशांतता निर्माण होईल. त्यापेक्षा फारसे न बोललेले बरे..’ अशी भूमिका घेणे योग्य नसले, तरी अशी परिस्थिती आपणच निर्माण केलेली आहे. ती आपणच बदलायला हवी... बरोबर ना?

संबंधित बातम्या