मुलींच्याही इच्छा असतात! 

ऋता बावडेकर
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

संपादकीय
 

हिंगणघाटची तरुणी गेली.. ती शिक्षिका होती. रोज उत्साहात कामावर जायची. मुलांना शिकवायची... तिचीही काही स्वप्ने असतील, काही इच्छा असतील, काही आकांक्षा असतील... 

पण त्यापैकी एकही आता पुरी होऊ शकणार नाही. कारण या सगळ्या अच्छा-अपेक्षा प्रत्यक्षात उतरवायला तीच आता जगात नाही. कायकाय मनात ठेवून तिने या जगाचा निरोप घेतला असेल, तीच जाणे! 

कारण काय? तर कोणाच्या तरी मनाप्रमाणे वागायला तिने नकार दिला. त्याच्या इच्छा पूर्ण करण्यास तिने नापसंती दर्शवली. त्याचे म्हणे तिच्यावर प्रेम होते. तिने त्याला स्पष्ट नकार दिला होता, की तिच्या देहबोलीतून तो त्याला समजला होता, कळायला मार्ग नाही; पण हा नकार तो पचवू शकला नाही. त्याला ते सहन झाले नाही आणि एक दिवस संधी बघून त्याने भर चौकात तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार बघितला, त्यांनी व नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान तिचा पूर्ण चेहरा भाजला होता. तिची वाचा गेली होती. नंतर दिवसागणिक तिची प्रकृती ढासळत गेली व अखेर सोमवारी (ता. १० फेब्रुवारी) सकाळी तिचे निधन झाले. काही दिवसांत होत्याचे नव्हते झाले होते. दरम्यान पोलिसांनी त्याला पकडले. पण त्याच्या मनात कुठलीही पश्‍चात्तापाची भावना नाही, असे एका पोलिस रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तो विवाहित असून त्याला तान्ही मुलगी आहे. पण त्याला कसलाच पस्तावा नसणे, ही गोष्ट फारच गंभीर आहे आणि विचार करायला लावणारी आहे. 

आपला समाज कुठे चालला आहे? असले प्रकार सर्रास का घडताहेत? कोणाला कायद्याची भीतीच नाही का? खूप प्रश्‍न पडतात, पण दुर्दैवाने उत्तरे सापडत नाहीत.. 

काही महिन्यांपूर्वी हैदराबाद येथे एका पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिला जाळून टाकण्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांबरोबरच्या चकमकीत चारही संशयित मारले गेले. त्यावर अनुकूल - प्रतिकूल खूप प्रतिक्रिया आल्या. तसे बघितले तर हा झटपट ‘न्याय’; अशा प्रकारच्या ‘न्याया’मुळे अशा घटनांमध्ये घट होईल, गुन्हेगारांवर वचक बसेल अशी काहींची धारणा आहे - असते. पण इतका थेट न्याय (?) होऊनही अशा प्रकारच्या घटना अजिबात कमी झालेल्या दिसत नाहीत. एवढेच कशाला, हिंगणघाटच्या या घटनेनंतर, म्हणजे आठवडाभराच्या काळात अशा किती घटना घडल्या हे बघितले, तर अवाक व्हायला होते. म्हणूनच समजूतदार लोकांच्या मानत प्रश्‍न पडतो, या प्रवृत्तीला कोणाची तरी भीती वाटते का? ‘आमचे कोण वाकडे करणार?’ ही वृत्ती का वाढते आहे? उत्तरे शोधायला हवीत. 

कोणाचा वचक राहिला नाही, ही तर वस्तुस्थिती असल्यासारखेच सध्याचे वातावरण आहे. पण केवळ तेवढेच कारण नाही. अगदी मूळापासून विचार करायचा, तर आपल्या संकुचित विचारपद्धतींत, आपल्या समाजमूल्यांत याचा दोष सापडतो. आपल्याकडे पुरुषसत्ताक पद्धती आहे. त्यामुळे म्हणा किंवा इतर कशामुळे म्हणा, पहिल्यापासूनच स्त्री आणि पुरुष यांना समान दर्जा मिळालेला नाही. स्त्रीला कायमच दुय्यम पद्धतीने वागवले जात आले आहे. ‘स्त्री ही पायातली वहाण आहे’ अशी वाक्ये अजूनही दाद मिळवून जातात. त्यातून समाजाचा दृष्टिकोन लक्षात यावा. पुढे काळ बदलला तसे तिच्या अर्थार्जनाची गरज कुटुंबांना जाणवू लागली. पण तसे मान्य न करता, तिच्यावर उपकार केल्यासारखी तिला काम करण्याची परवानगी मिळाली. एरवी, शक्य तिथे तिच्या प्रगतीला विरोधच झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, तिला विरोध करणाऱ्यांमध्ये अनेक स्त्रियाही होत्या. हा ‘स्त्री-वर्ग’ जरी एकत्र राहिला असता तरी खूप फरक पडला असता. पण तसे झाले नाही आणि अजूनही होत नाही. आजही काही वाईट घडले, की ‘ती मुलगीच तशी होती’ असे म्हणणाऱ्यांत स्त्रिया आघाडीवर दिसतात. 

समाजाचाच छोटा भाग म्हणजे कुटुंब! तिथेही समाजाचेच प्रतिबिंब दिसते. घरातील मुलाला वेगळी वागणूक आणि मुलीला वेगळी. खूप कमी कुटुंबे असतील, जिथे याला छेद देणारे चित्र असेल. परिस्थिती बदलते आहे, पण प्रामुख्याने विषमताच दिसते. सगळे संस्कार मुलीवरच.. तिने काय घालावे, कसे वागावे, कसे बोलावे, कसे हसावे, कुठे जावे... सगळी बंधने मुलीवरच. पण तिलाही काही भावना आहेत, तिचीही काही स्वप्ने असतील, तिच्या काही आशा असतील, याकडे क्वचितच लक्ष दिले जाते. एरवी, मी म्हणीन तेच व्हायला हवे हा पुरुषी खाक्याच दिसतो. यापैकी थोडे संस्कार जरी मुलांवर झाले तरी अशा घटना बऱ्यापैकी कमी होतील. पण मुलगा हा ‘वंशाचा दिवा’ वगैरे कल्पनांमुळे मुलाच्या जन्माचे प्रस्थ वाढले. त्याचे फाजील लाड झाले. आयुष्याच्या उतारवयात, मुलीच बघतात, मुलगे झिडकारतात, असे अनुभव अनेकांना येऊनही अजूनही, ‘मुलगाच हवा’ हा हट्ट सुटत नाही. तसेच घरात आपल्या आजी, आई, आत्या, बहिणींना कशी वागणूक मिळते ते ही मुले बघत असतात. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या वागण्यात पडले, तर नवल वाटू नये. अनेक घरांत सर्रास शिव्या दिल्या जातात. त्यातून आपण आपल्याच आई-बहिणींचा गलिच्छ भाषेत उद्धार करत असतो, हेही कोणाच्या गावी नसते. अर्थात या सगळ्यात अपवाद आहेतच. पण साधारण आपल्या समाजात दिसणारे हे चित्र आहे, हे नक्की. 

सध्याच्या या परिस्थितीवर नेमका उपाय काय याचे उत्तर अजून मिळायचे आहे. पण हा उपाय एक आणि एकच नसेल. तर वेगवेगळ्या पद्धतीने ही गोष्ट हाताळायला हवी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, मुलांवर संस्कार करताना आपण स्वतः कसे वागतो, हे बघितले पाहिजे. बायकांनी नीट वागावे (?) अशी अपेक्षा करताना, आपल्या ‘नजरा’ही सुधाराव्यात. आपला दृष्टिकोन सुधारावा. कारण अशा घटनांचे मूळ अशा प्रकारच्या ‘पुरुषी अहंकारा’तच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.   

संबंधित बातम्या