इलाजच भयंकर 

ऋता बावडेकर
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

संपादकीय
 

गेले काही आठवडे जवळजवळ रोज मुली-महिलांबद्दल काही ना काही भयंकर बातम्या ऐकू येत आहेत. वाचायला मिळत आहेत. त्यावर आतापर्यंत उलट सुलट बरेच लिहिलेही गेले आहे. बहुतांश लेखनांत अत्याचार झालेल्या, त्यात बळी गेलेल्या मुलींना सहानुभूती मिळत असली, तरी प्रत्यक्षात अशा घटना घडू नयेत म्हणून जे उपाय राबवले जात आहेत, ते महिलांच्या पूर्णपणे विरोधात जाणारे आहेत. रोगापेक्षा इलाज भयंकर, असे त्याला म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

आमच्या एका संपादकीयांतही या वास्तवाचा उल्लेख करण्यात आला होता. या अंकातील ‘सहजच’ या सदरातही हेच नमूद करण्यात आले आहे. जे पुरुष किंवा मुले हे अत्याचार करत आहेत, त्यांच्यावर कायद्याने कारवाई व्हायची ती होईल; पण त्यांचे प्रबोधन करण्यापेक्षा मुलींवरच बंधने घालण्यात आजही आपला समाज धन्यता मानताना दिसतो आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. 

ते कसे, याची प्रकाशात आलेली दोन उदाहरणे आहेत. अमरावतीतील चांदूर येथील महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थिनींना ‘मी प्रेमविवाह करणार नाही’ अशी शपथ देण्यात आली. अर्थातच त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘अशी शपथ मुलींनाच का?’ असा प्रश्‍न माजी महिला-बालकल्याण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. त्या ट्विटरवर पुढे म्हणतात, ‘प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ कॉलेजात मुलींना देणे हा अतिशय विचित्र प्रकार आहे. ही शपथ मुलींनाच का? आणि तीही प्रेम न करण्याची... त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला हवी, की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर ॲसिड फेकणार नाही. कोणाला जिवंत जाळणार नाही. कोणाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आणि कोणी तसे करत असेल, तर त्या प्रकारांना विरोध करेन.’ पंकजा मुंडे यांच्या मताला कोणाचा विरोध असण्याचे कारणच नाही. त्यांनी अगदी योग्य मत मांडले आहे. 

व्हॅलेंटाइन्स डे हा दिवस आपल्याकडे अति महत्त्वाचा दिवस झाल्यासारखा आहे. प्रेमीजनांसाठी तो प्रेमदिवस आहे, तर स्वयंघोषित संस्कृतिरक्षकांसाठी तो संस्कृती जपण्याचा (?) दिवस आहे. याही व्हॅलेंटाइन्स डे ला काही ठिकाणी प्रेमीयुगुलांना विरोध झाला. एके ठिकाणी या प्रेमीयुगुलांचे प्रबोधन घेऊन त्यांना घरी पाठवण्यात आले. नुकत्याच घडलेल्या हिंगणघाट घटनेमुळे तर हे संस्कृतिरक्षक समाजातील या आपल्या भगिनींबाबत फारच जागरूक होते. 

पण यातला महत्त्वाचा भाग म्हणजे, समाजातील अपप्रवृत्तींबद्दल हे लोक काहीच बोलत नाहीत. करत नाहीत. सगळे ज्ञान मुलींनाच देतात किंवा त्या मुलींबरोबर असलेल्या मुलांना. पण या मुलींना जे खरोखरंच त्रास देतात त्या अपप्रवृत्ती खुलेआम फिरक असतात. ना त्यांचे प्रबोधन होते, ना त्यांच्या कृत्यांना अटकाव होतो? असे का? 

‘असे का?’ हा खरेतर फार महत्त्वाचा प्रश्‍न आहे. खरेच काय कारण असेल? या अपप्रवृत्तींना पण घाबरतो? या मुलांच्या ‘गॉडफादर्स’ची आपल्यावर दहशत असते? की त्या तुलनेत मुली आणि त्यांच्याबरोबरची मुले हे ‘सॉफ्ट टार्गेट’ असते? त्यांना ‘समजावणे’ सोपे असते. परत समाजकर्तव्य पार पाडल्याचे स्वतःला समाधान. पण हे ‘कर्तव्य’ पार पाडायला या लोकांना कोण सांगते? कोणीच नाही, मग हे फक्त मुलींनाच का टार्गेट करतात? संस्कृतिरक्षणाची जबाबदारी मुलींवरच आहे, यावर यांचा ठाम विश्‍वास असतो का? अ,णारच; त्याशिवाय मुख्यतः मुलींचेच प्रबोधन करावे असे त्यांना वाटणारच नाही. मग त्यांना प्रेम न करण्याच्या, प्रेमविवाह न करण्याच्या शपथा देणे खूप सोपे होते. अवघड कामे करायला कोणालाच आवडत नाही. त्यामुळे मग समाजातील अपप्रवृत्ती तशाच राहतात. मुलींना तसाच त्रास देत राहतात. यात कोणी पकडले जाते. त्याला पुढे-मागे कधीतरी शिक्षा होते. पश्‍चात्ताप होतो की नाही, हा भाग वेगळा; पण दरम्यान मुलींचे आयुष्य उद्‍ध्वस्त होते. ॲसिडने तिचा चेहरा, देह विद्रुप होतो. जळाल्याने तिचा जीव तरी जातो किंवा ती कायमची अपंग तरी होते. अत्याचारामुळे तर ती आयुष्यातून उठते. कारण अशा मुलींना समाजात मानाचे सोडा, कसलेच स्थान नसते. येता जाता सगळे तिच्याकडे बोट दाखवत असतात. तिच्यावर अत्याचार करणारा मात्र उजळ माथ्याने फिरत असतो.. ‘असे का?’ या प्रश्‍नाचे उत्तर या विरोधाभासात आहे. 

या सगळ्या प्रसंगांवर, विसंगतींवर अजून तरी उत्तर सापडलेले नाही. पण आता कशाचीही पर्वा न करता मुलींनी, त्यांच्या पालकांनी आणि त्यांच्या नातेवाईक-आप्तजनांनी मनाने खंबीर होण्याची गरज निर्माण झाली आहे. असे काही प्रकार घडले, की ‘मीच का?’ असा अपराधीपणाचा प्रश्‍न प्रत्येक मुलीच्या मनात निर्माण होतो. तो प्रश्‍न सर्वप्रथम मनातून हद्दपार करायला हवा. कारण त्या प्रसंगात आज कोणीतरी ‘मी’ आहे, उद्या दुसरी कोणी ‘मी’ असणार आहे. या अपप्रवृत्तींना तुमच्याशी, तुमच्या नावाशी काहीही कर्तव्य नसते. मुंबईतील त्या फलाटावर ज्या मुलीचा अगदी सहजपणे विनयभंग करण्यात आला, त्या व्यक्तीला तिच्या नावा-गावात काहीही रस नव्हता.. त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही असू शकते. याचा स्वतःला किती दोष द्यायचा? कारण आयुष्य तिथे संपत नाही. त्रास होतो, कमालीचा मनःस्ताप होतो; पण त्यामुळे आपणच दुःखी होतो. संबंधित व्यक्ती पसार झालेली असते. त्यामुळेच केवळ मुलींनीच नाही, तर समाजानेही आपला अशा घटनांबद्दलचा दृष्टिकोन बदलायला हवा. तुम्ही त्या अपप्रवृत्तींना रोखू शकत नाही ना; मग तुमच्या या नाकर्तेपणाची शिक्षा निष्पाप मुलींना देऊ नका. त्यांचे आयुष्य असे खुडू नका. 

अवघड आहे, प्रचंड अवघड आहे, सांगणेही खूप सोपे आहे; पण अशक्य अजिबात नाही. कोणाच्या तरी विकृत, चोरटेपणाच्या कृतीची शिक्षा स्वतःला का करून घ्यायची? बदल एका दिवसात होत नाही, पण त्या दिशेने प्रयत्न सुरू करायला हवेत. अपराधीपणा झटकून टाकायला हवा. खूप अवघड आहे, पण विनाकारण अपराधीपणा घेऊन जगणेही अवघडच आहे, मग सकारात्मक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे...

संबंधित बातम्या