जबाबदारी पुढेच आहे... 

ऋता बावडेकर
सोमवार, 16 मार्च 2020

संपादकीय
 

कुंटणखान्यातून इतक्या इतक्या मुलींची सुटका, वेश्‍याव्यवसायाचे रॅकेट उद्‍ध्वस्त, मुलींना घरी पाठवले... वगैरे बातम्या अनेकदा वाचनात येत असतात. मुलींची सुटका झाली म्हणून बरेही वाटते. पण पुढे या मुलींचे काय होते? घरचे त्यांना स्वीकारतात का? असे अनेक अनुत्तरित प्रश्‍न मनात येतात. अर्थात अनुत्तरित म्हणण्याचेही कारण नाही, कारण या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहेत. 

पुण्यातील एका उच्चभ्रू भागात ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या वेश्‍याव्यवसायाच्या (एस्कॉर्टिंग) ठिकाणांवर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने नुकतीच कारवाई केली. त्यामध्ये तीन परदेशी महिलांसह सहा जणींना ताब्यात घेण्यात आले. या सामाजिक सुरक्षा विभागाने मागील दोन महिन्यांत केलेल्या कारवायांमध्ये या वर्षी ९७ महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांपैकी ६७ महिलांना त्यांच्या देशांत परत पाठवण्यात आले आहे. ‘मागील दोन महिन्यांत वेश्‍याव्यवसायाला आळा घालण्यासाठी ठोस पावले आम्ही उचलली आहेत. जानेवारी-फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत १२४ गुन्हे दाखल केले आहेत. वेश्‍याव्यवसायामध्ये २८८ भारतीय महिला आढळल्या, तर ९७ परदेशी महिला पोलिस कारवाईत आतापर्यंत सापडल्या आहेत,’ अशी माहिती पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली. साधारणपणे अशा कारवायांमध्ये सापडलेल्या महिला - मुलींना त्यानंतर त्यांच्या घरी पाठवले जाते. अशा बातम्या वाचून खरोखरच बरे वाटते. पण हा आनंद किती क्षणिक आहे, याची आपणा सर्वांनाच कल्पना असते - आहे. या मुलींना घरी घेऊन गेलेल्या अधिकाऱ्यांना या संदर्भात आलेले अनुभव अक्षरशः मन विषण्ण करणारे असतात. काही वर्षांपूर्वी महिला अधिकारी अशाच एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरी सोडायला गेली असता, त्या कुटुंबाने प्रथम त्या मुलीला ओळखण्यासच नकार दिला. नंतर पोलिसी खाक्या दाखवल्यावर ते तयार झाले. पण तिच्या आईने या अधिकाऱ्याजवळ जे मन मोकळे केले, ते ऐकून ही समस्या किती खोलवर रुजलेली आहे हे ऐकून स्तब्ध व्हायला झाले. ही आई म्हणाली, ‘तुम्ही हिला इथे सोडून जाल. पण दोन-तीन दिवसांतच तिच्यासाठी दुसरे गिऱ्हाईक शोधले जाईल. आम्हाला यातूनच पैसा मिळतो. अजून तीन मुली आहेत. एवढ्यांची पोटे कशी भरायची. हिच्या जिवावरच तर हिचे वडील अवलंबून आहेत.. कदाचित काही काळानंतर तिच्या बहिणींनाही हेच करावे लागेल. तुम्ही त्यांना कितीवेळा वाचवणार?’ 

अतिशय विदारक, पण आपल्याकडचे हेच वास्तव आहे. प्रचंड गरिबी; गरिबी कसली दारिद्र्यच! त्यात मुलगा होईल या आशेवर पाठोपाठ झालेल्या मुली. सततच्या बाळंतपणामुळे आई खचलेली.. हाताला काम नसलेल्या आणि मिळाले तरी ते करायचीही इच्छा नसलेल्या बापाला कोणीतरी हा ‘सोपा’ उपाय सुचवतो किंवा त्यालाच तो सुचतो आणि मुलींची परवड सुरू होते. अनेक चित्रपटांत वगैरे हा विषय येऊन गेलेला आहे. काही अपवादात्मक भाग्यवान मुली वगळता आजपर्यंत कोणीही या नष्टचक्रातून पूर्णपणे बाहेर पडल्याचे ऐकिवात नाही. 

या परिस्थितीलाही समाज म्हणून आपणच जबाबदार आहोत. अनेकदा हे दुष्टचक्र आपल्यासमोरच सुरू झालेले असते. पण आपण त्याचे मूक साक्षीदार होतो. पुढे त्या मुलीला सोडवून आणले जाते. पण तिच्या घरचे तिला घरात घेत नाहीत, अनेकदा समाजाला घाबरूनच आई-वडील मुलींना स्वीकारत नाहीत, असे दिसते. अगदी अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या घराने मुलीला स्वीकारलेच, तर त्यांची साथ देण्यापेक्षा आपल्यातलेच अनेकदा त्या कुटुंबाला नावे ठेवतात; त्यांना त्रास देतात. ती मुलगी कोणत्या नरकातून आली आहे, याची जाणीव असूनदेखील तिला तिचे अनुभव विसरू देत नाही. वास्तविक, अशा मुलींच्या पुनर्वसनासाठी अनेक स्वयंसेवी संस्था काम करतात, सरकारी संस्थादेखील आहेत. पण समाजच अनेकदा त्यात खोडा घालताना दिसतो. 

काही अपवाद वगळता, कोणतीही मुलगी - स्त्री या व्यवसायात आपणहोऊन येत नाही. ‘काही अपवाद’ म्हणण्याचे कारण म्हणजे, अलीकडे काही उदाहरणे वाचनात आली आहेत; ती अशी- नवीनच लग्न झालेल्या जोडप्यातील नवऱ्याला रात्री गुंगीचे द्रव देऊन बायको झोपवून ठेवत असे. त्यानंतर तिच्याकडे कोणी कोणी येत असत. एकदा ते द्रव्य कमी पडले किंवा कोणत्यातरी कारणाने नवऱ्याला जाग आली आणि त्याला सगळा प्रकार कळला. दुसऱ्या एका उदाहरणात, नवऱ्याने कॉलगर्लसाठी फोन केल्यावर जी महिला त्याच्यासमोर आली, ती त्याचीच बायको होती... अर्थात ‘ईझी मनी’साठी चालणारे असे काही प्रकार वगळता कुठलीही बाई या नरकात येऊ इच्छित नाही. नशीब म्हणा, दैव म्हणा, नियती म्हणा.. नाव काहीही द्या, दुर्दैवाने त्यांच्याकडे इतर पर्याय नसतात. 

या महिलांबद्दल समाजाला, विशेषतः महिलांना नक्कीच सहानुभूती असते. या महिलांमुळेच वासनेने वखवखलेल्यांमध्ये आपण सुरक्षित आहोत, याची बहुतांश स्त्रियांना जाणीव असते. त्यांचे दुर्दैव कळत असते. पण जेव्हा त्यांना समाजात मिसळून घेण्याची वेळ येते तेव्हा बरेच जणांची पावले मागे सरकतात. आपल्याला, आपल्या लेकीबाळींना समाजाकडून त्यांच्यासारखा त्रास व्हायला नको, असे त्यांना वाटत असते. पण शेवटी समाज म्हणजे तरी कोण असते, आपणच ना? तसे बघायला गेले तर चुकीचा विचार करणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असते. पण योग्य विचार करणारे एकत्र येत नाहीत त्यामुळे त्यांचे फावते. बरोबर विचार करणाऱ्यांचा त्यामुळे प्रभाव पडत नाही. हे चित्र बदलले पाहिजे. कारण कुंटणखान्यातून सुटका करून या मुलींची सुटका होत नाही, तर समाजाने त्यांना मनापासून सामावून घेतले पाहिजे. अवघड आहे, पण अशक्य अजिबात नाही...   

फोटो फीचर

संबंधित बातम्या