भय इथले संपत नाही... 

ऋता बावडेकर
सोमवार, 13 एप्रिल 2020

संपादकीय
 

जगभरातून येणाऱ्या साथी आपल्याला अजिबात नवीन नाहीत. अगदी प्लेगपासून याची सुरुवात धरता येईल. अलीकडच्या सार्स, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लूपर्यंत हा प्रवास येतो. अगदी अलीकडची साथ म्हणजे कोरोनाची साथ होय. या प्रत्येक वेळी प्रचंड घबराट होऊन नंतर सगळे त्यातून सहीसलामत इथपर्यंत आलोत. या व अशा साथींनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या, आपण त्या किती शिकलो, आत्मसात केल्या हा खरे तर प्रश्‍न आहे. पण कोरोनाने मांडलेला उच्छाद बघता आपण त्यातून फारसे काही शिकलो नाही असेच वाटते. 

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, या साथीचे स्वरूप. ही संसर्गजन्य साथ आहे. या साथीचे काही नियम आहेत. ते आपण अगदी कडकपणे पाळले, तर साथीचेही त्यापुढे काही चालत नाही आणि ती हळूहळू नाहिशी होते. कारण या साथीवर अजून तरी परिणामकारक लस सापडलेली नाही. त्यामुळे सरकारने केलेले नियम पाळणे आणि डॉक्टरांच्या उपचारांना साथ देणे एवढेच आपल्या हातात आहे. 

आतादेखील कोरोनाचा वाढता संसर्ग बघता केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने, औषधे, दूधवाटप, वर्तमानपत्रे वाटप, काही व्यक्ती व वाहनांना सूट देण्यात आली. प्रत्यक्षात काय झाले, तर उद्यापासून सगळ्याच गोष्टींची जणू टंचाई भासणार आहे आणि आपण उपाशीच राहणार आहोत, असे वातावरण तयार झाले. सगळे नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक ठिकाणी खरेदीच्या निमित्ताने गर्दी होऊ लागली. त्यामुळे बडगा उगारण्याखेरीज पोलिसांच्या हातात काही उरले नाही. 

कोरोना टाळण्यासाठी दोन प्रमुख गोष्टी करायला हव्यात. एक म्हणजे, गर्दी टाळणे आणि कमालीची स्वच्छता पाळणे. या दोन्ही गोष्टी आपण या काळात किती पाळल्या, असा प्रश्‍न स्वतःलाच विचारला तरी त्याचे उत्तर मिळेल. प्रश्‍न हाच आहे, आपण ठरलेल्या गोष्टी का पाळू शकत नाही. उदाहरणार्थ, आपण 24x7 स्वच्छता का पाळू शकत नाही? कारण एखादी साथ नेमकी कशामुळे येते, याची कारणे जरी वेगवेगळी असली तरी त्यातले एक कारण तेच असते, ते म्हणजे स्वच्छतेचे. आतापर्यंत आपण हे अनुभवले आहे. आताची कोरोनाची साथ तर प्रामुख्याने स्वच्छतेशीच निगडित होती. कारण साबणाने सतत हात - चेहरा धुवा, चांगल्या कापडाने ते पुसा, खोकताना - शिंकताना तोंडावर हातरुमाल धरा, ऑफिसेस-दुकानांतील टेबले-पृष्ठभाग सतत पुसा.. अशा सूचनाच प्रामुख्याने देण्यात येत आहेत. पण केवळ एखादी साथ असेल तेव्हाच स्वच्छता पाळावी, असे नाही. स्वच्छता ही खरेतर आपल्या वैयक्तिक, सामाजिक आयुष्याचा अविभाज्य भाग असायला हवी. कारण कितीतरी गोष्टी स्वच्छतेशी निगडित असतात. एकतर त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. रोगराईला वावच उरत नाही. बरेचदा आपली घरे, त्याभोवतीचा परिसर स्वच्छ असतो. पण त्या पलीकडे काय? सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, हे तर अनेकांच्या गावीच नसते. रस्त्यात थुंकणे, नाक शिंकरणे.. वगैरे अनेक गोष्टी आपण बिनदिक्कत करत असतो. 

सुदैवाने आपली आरोग्यसेवा चांगली आहे. अपडेट आहे. आपले आरोग्यविषयक तज्ज्ञ चांगले आहेत. ते लोकांना सतत धीर देत असतात. सगळा धोका पत्करून उपचार करतात. आरोग्यविषयक संशोधनही आपल्याकडे सुरू आहे. त्यात वाढ व्हायला हवी यात शंका नाही, पण सध्याची यंत्रणा चांगल्यापैकी सक्षम आहे. पण जग म्हणून जसजशी आपण प्रगती करत आहोत, तसतशी अशा साथींच्या स्वरूपात किंवा दुर्धर आजार वगैरेंच्या स्वरूपात आपल्यासमोर नवनवीन आव्हाने उभी राहात आहेत. त्याचा सामना करण्यासाठी आपण सदैव तत्पर आणि सज्ज असायला हवे, त्यासाठी आरोग्यविषयक संशोधनात अधिक वाढ व्हायला हवी. कारण आजच्या या स्पर्धेच्या युगात ‘संशोधन’ या मूलभूत आणि महत्त्वाच्या विषयाकडे आपले खूप दुर्लक्ष होते आहे. मुलांचा कल असला, तरी व्यवसायभिमुख शिक्षण घेऊन त्याने किंवा तिने नोकरी-व्यवसायाला लागावे अशीच अजूनही अनेक पालकांची अपेक्षा असते. यात चुकीचेही काही नाही, पण सगळ्यांनीच असा विचार केला, तर मूलभूत काम कोण करणार, असाही प्रश्‍न उरतोच. 

इंटरनेटमुळे जग कमालीचे जवळ आले आहे. माहितीचा तर विस्फोट झाला आहे. अशा काळात नागरिक म्हणून आपण खूप जबाबदारीने वागण्याची वेळ आली आहे. या माध्यमातून आलेली माहिती नेमकी काय आहे, याबद्दल शहानिशा करूनच ती पुढच्या माणसापर्यंत आपण पोचवायला हवी. अन्यथा अफवांचे पीक फोफावते आणि कोणाचेच कशावर नियंत्रण राहात नाही. उगाच घबराट मात्र उडते. ‘कोरोना’संदर्भातही अशाच अनेक अफवा उडाल्या. त्यातील एक म्हणजे, मांसाहार करू नये. तातडीने याबाबतीत काही झाले नाही, पण अशी अफवा उडवणाऱ्या दोघांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे सगळ्यांनीच खूप जबाबदारीने वागायला हवे. ‘कोरोना’वरील विनोदांना तर उधाणच आले, तेही योग्य नाही. 

सरकारपातळीवर, वैद्यकीय पातळीवर प्रयत्नांची शर्थ केली जात आहे, पण अजूनही ही साथ आटोक्यात आलेली नाही. या संदर्भात रोज समोर येणारे वास्तव भयावह आहे. हे अजून किती काळ चालणार, अशी चिंता वाढवणारे आहे. सामान्य माणूस म्हणून जरी आपण काही करू शकत नसलो, तरी घरात थांबून सहकार्य नक्कीच करू शकतो. तो आपला खारीचा वाटाच ठरेल. घरात बसून कंटाळा येतो वगैरे ठीक आहे, पण हे सगळे प्रयत्न आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्यासाठीच सुरू आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. 
‘कोरोना’ हा आजार काही शेवटचा नाही. त्यानंतर कुठला आजार, साथ येणारच नाही याची खात्री कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे तसा विचार करून आपले वर्तन हवे.

संबंधित बातम्या