स्वयंशिस्त आणि आपण 

ऋता बावडेकर
सोमवार, 27 एप्रिल 2020

संपादकीय
 

काही अपवाद वगळता शिस्तीचा आणि आपला तसा दूरान्वयानेही संबंध येत नाही. तसे नसते, तर आपण ट्रॅफिक सिग्नल पाळले असते, रस्त्यावर थुंकलो नसतो, रांगेचे महत्त्व आपल्याला वेगळे सांगायला लागले नसते, सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने बोललो नसतो.. वगैरे वगैरे. पण सध्या आपल्यावर ‘कोरोना’ नामक असे संकट कोसळले आहे, की आपल्याला शिस्त पाळणे आवश्‍यक झाले आहे. पण आपण शिस्त पाळतो का? हा खरा प्रश्‍न आहे. 

अगदी प्रामाणिकपणे बोलायचे, तर परत इथेही काही अपवाद वगळता कोणी शिस्त पाळताना दिसत नाही. मॉर्निंग वॉकला जाणे, दूध-ब्रेड आणायला जाणे, भाजी आणायला जाणे, औषधे आणायला जाणे.. अगदी बाकी काही नाही, तर थोडे पाय मोकळे करायला जाणे.. यासाठी बरीचशी माणसे बाहेर पडताना दिसतात. अनेक सोसायट्यांमध्ये संध्याकाळी लोक फिरणे, पळणे, जॉगिंग करताना दिसतात. हे सगळे चित्र बघितले, की प्रश्‍न पडतो क्वारंटेशन, सोशल डिस्टन्सिंग वगैरे संज्ञांचा अर्थ आपल्याला समजला आहे ना? की फक्त चर्चा करताना, इतरांना शिकवताना वापरावयाचे हे शब्द आहेत? दिवसभर घरात बसून कंटाळा येणे स्वाभाविक आहे, पण सध्याच्या परिस्थितीत त्याला पर्यायही नाही. तसे केले नाही तर केवळ आपल्यालाच धोका आहे असे नाही, तर आपल्यामुळे आपल्या घरचे, आपल्या आसपासचे अशा सगळ्यांनाच धोका आहे. पण या गोष्टी कोणी मनावर घेताना दिसत नाही. 

कोरोनामुळे अगदी सुरुवातीला २२ मार्च या दिवशी सरकारने संपूर्ण देशात कर्फ्यू लावला. त्या दिवशी अनेकांना पक्ष्यांचे मंजुळ स्वर कोणतीही अडचण न येता घरात ऐकू आले. त्यानंतर काही वेळातच मोबाइलवर वेगवेगळी चित्रे, व्हिडिओज येऊ लागले. घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिसांचे दंडुके खावे लागत होते. तेव्हा तर एकच दिवसाचा बंद होता. पण तेवढेही लोकांना नीट पाळता आले नाही. पोलिसांचे काम तेव्हापासून जे सुरू झाले आहे, ते अजूनही सुरूच आहे. २५ मार्चला पहिला लॉकडाऊन सुरू झाला. तो संपता संपता पुन्हा ३ मे पर्यंत तो वाढवण्यात आला. पण काही भागांचा अपवाद वगळता रस्त्यावरील रहदारी कमी प्रमाणात का असेना पण सुरूच राहिली. ती आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रत्न सुरू होते. प्रसंगी त्यांना बळाचा वापर करावा लागत होता, त्यावरही टीका सुरू झाली. 

अनेकांच्या दृष्टीने मॉर्निंग वॉकचे, एकूणच चालण्याचे महत्त्व खूप आहे. त्यात चुकीचे काहीच नाही. पण सध्याच्या काळात ते चुकीचे ठरते आहे. तरीही ती बंधने झुगारून अनेक लोक फिरायला जाताना दिसू लागले. तेव्हा विविध ठिकाणच्या पोलिसांनी शक्कल लढवली. ते त्यांच्याकडून योगासने, सूर्यनमस्कार, इतर व्यायाम प्रकार करून घेऊ लागले. काही ठिकाणी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आरती केली जाऊ लागली. काही ठिकाणी त्यांना नुसते रस्त्यावर बसवून ठेवू लागले आणि या सगळ्याच्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल करू लागले. मात्र एवढे करूनही पोलिसांची डोकेदुखी थांबत नव्हती. कारण स्वयंशिस्तीचा अभाव. 

सरकारने जीवनावश्‍यक गोष्टींचा पुरवठा सुरूच ठेवला आहे. तरीही भाजीवाला दिसला, की कधी भाजी न बघितल्यासारखे त्यावर तुटून पडणारे आता दिसू लागले आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणत्याच गोष्टीचा तुटवडा अजून तरी भासलेला नाही. पण अनेकदा घाबरून किवा त्याहून अधिक वेळा बाहेर जाण्याच्या निमित्ताने या वस्तू खरेदी करायला गर्दी होऊ लागलेली आहे. 

आता २० एप्रिलपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड पूर्णपणे सील करण्यात आले आहे. पण पहिल्याच दिवशी अनेक भागात सुखेनैव संचार सुरू दिसत होता. कदाचित पोलिस आता अधिक कडक करतील. 

असे बेशिस्त वागणारे एक लक्षात घेत नाहीत, हे जे चालले आहे ते आपल्यासाठी - आपले आरोग्य जपण्यासाठीच चालले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिस आपल्यासाठीच प्रयत्न करत आहेत. ते आले, की पळायचे, गेले की परत रस्त्यावर असे करून त्यांचे नाही आपलेच नुकसान आपण करत आहोत. पण हे समजूनच घेण्याची या लोकांची तयारी नाही. त्यामुळे जे प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी पाळताहेत, त्यांचेही नुकसान होते आहे. 

डॉक्टर पहिल्यापासून सांगत आहेत, या साथीच्या आजाराला घाबरण्याचे काही कारण नाही. काही गोष्टी फक्त पाळायला हव्यात. त्या म्हणजे, साबणाने सतत हात स्वच्छ धुवा, हात सारखा चेहऱ्याला, नाकाला, डोळ्यांना लावू नका, परस्परांपासून लांब राहा (सोशल डिस्टन्सिंग) वगैरे. या साथीवर अजूनही औषध सापडलेले नसले, तरी असे केल्याने साथ आटोक्यात यायला खूप मदत होणार होती. पण हे सगळे काही प्रमाणांतच पाळले गेले. नेहमीप्रमाणे नियम धाब्यावर बसवण्यातच अनेकांनी धन्यता मानली. त्याचे परिणाम म्हणजे ३ मेपर्यंतची लॉकडाऊन आणि सध्याचा पुणे, पिंपरी-चिंचवडमधील कर्फ्यू होय. हा लॉकडाऊनही ३ मे रोजी संपतो की त्याचा कालावधी वाढतो, हे बघायचे. 

या सगळ्याला ही साथ जशी कारणीभूत आहे, तशीच आपल्यापैकी काही जणांची बेफिकीरीही कारणीभूत आहे. आपण शिस्तीला इतके का नाकारतो कळत नाही. नियम मोडण्यातच आपल्याला धन्यता वाटते. पण जिवावर बेतलेले असतानाही जर आपल्याला त्यातच समाधान मिळणार असेल तर मात्र आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. काही मूठभर लोकांसाठी इतरांनी का सहन करायचे? त्यामुळे ‘मला काय त्याचे’ म्हणून आपण जे गप्प राहण्याचे धोरण स्वीकारतो, ते आता सोडून द्यायला हवे. आपण शिस्त पाळायलाच हवी, पण दुसरा मोडत असेल तर त्यालाही हटकायला हवे. तरच आपण सगळे तग धरू शकू...

संबंधित बातम्या