घर असावे... 

ऋता बावडेकर
सोमवार, 11 मे 2020

संपादकीय
 

घर असावे घरासारखे 
नकोत नुसत्या भिंती 
इथे असावा प्रेमजिव्हाळा 
नकोत नुसती नाती... 

विमल लिमये या कवयित्रीची ही कविता अनेकांच्या स्मरणात ताजी असेल. आपल्या बहुतेक सर्वांच्याच दृष्टीने अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी अति महत्त्वाच्या असतात. परिस्थितीमुळे अगदी रस्त्यावर मुक्काम ठोकणाऱ्यांनाही आपल्या हक्काचे छप्पर डोईवर असावे असे वाटत असते. त्यात गैर काहीच नाही. पण हे घरकुल घेण्याची वेळ जेव्हा येते, तेव्हा काय काय दिव्ये करावी लागतात हे ज्याचे त्यालाच ठाऊक! या सगळ्यांना मदत व्हावी, यासाठी ‘सकाळ साप्ताहिका’चा हा प्रॉपर्टी विशेषांक आहे. 

आपले हक्काचे घर असावे, ही भावना खूप स्वाभाविक आहे. पण मनात आले आणि घर झाले असे सहसा होत नाही. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप गोष्टींची - विशेषतः आर्थिक जमवाजमव करावी लागते. मुख्य म्हणजे, मानसिकदृष्ट्या तयार व्हावे लागते. तरीही पूर्वीपेक्षा ही प्रक्रिया बऱ्यापैकी सोपी झाली आहे. पूर्वी खूप क्लिष्ट, किचकट होती. पण कायदे, नियम कितीही सोपे झाले तरी नीटच बघावे लागतात. घर घेणे, ही तर अनेकांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि एकदाच होणारी गोष्ट आहे. या सगळ्यांना उपयोगी पडावे असे विषय आम्ही या अंकात देण्याचा प्रयत्न केला आहे. 

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो घर घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हा. घर खरेदी करताना कोणती कागदपत्रे तपासावीत, पुनर्खरेदी असेल तर कोणती काळजी घ्यावी, प्लॉट खरेदी करताना काय काळजी घ्यावी, सगळ्या गोष्टींची पडताळणी कशी करावी, जुन्या कायद्यात काय बदल झाले आहेत हे कसे बघावे, तसेच केंद्र सरकारने आणलेल्या स्थावर संपदा कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती.. वगैरे मुद्द्यांच्या अनुषंगाने ॲड. नारायण नाईक यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रत्येकासाठी घर महत्त्वाचेच असले, तरी अनेक जण गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनदेखील त्याकडे बघत असतात. त्यादृष्टीने ‘रिअल इस्टेट - गरज की गुंतवणूक?’ या विषयाचे नियोजन आम्ही अंकात केले आहे. गुंतवणूक म्हणून आपण घरखरेदीकडे बघत असू तर आपला दृष्टिकोन कसा असावा, त्याबद्दलचे कोणते निकष असावेत इत्यादी मुद्द्यांचा ऊहापोह औद्योगिक घडामोडींचे अभ्यासक कौस्तुभ मो. केळकर यांनी केला आहे. 

राहण्यासाठी म्हणून घ्या किंवा गुंतवणुकीसाठी म्हणून घ्या, खरेदी झाल्यानंतर घर सजवण्याचे वेध लागतात. आता तर घरात राहायला जाण्यापूर्वीच इंटिरियर वगैरे करून घेण्याची पद्धत आहे. गृहसजावटीचेही खूप पर्याय आज उपलब्ध आहेत. प्रत्येक खोलीची सजावट अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. हा कल बघून गृहसजावटीची माहिती देणारा लेखही अंकात आहे. प्रत्येक खोली सजवताना, विचार केला जातो. त्या खोलीचे वैशिष्ट्य ठरवले जाते. उदाहरणार्थ, मुलांची खोली. त्यानुसार प्रत्येक खोलीसाठी फर्निचरही ठरवले जाते. सध्या बाजारात कोणत्या फर्निचरला मागणी आहे, का आहे याचाही परामर्ष अंकात घेण्यात आला आहे. 

बाजारात एक फेरफटका मारला, की गृहोपयोगी किती वस्तू आज उपलब्ध आहेत, हे लक्षात येते. पारंपरिक वस्तूंबरोबरच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अक्षरशः रेलचेल बाजारात दिसते. ही उपकरणे वापरण्यातही खूप सुलभीकरण आल्याचे या वस्तू बघताना जाणवते. हल्लीच्या धावपळीच्या जगात यापैकी अनेक वस्तूंची मदतच होण्यासारखी असते. तर होम अप्लायन्सेसमधील ट्रेंड्सही या अंकात वाचायला मिळणार आहेत. या सगळ्यामुळे आपले घरकुल छानपैकी सजवायला मदत मिळणार आहे. 

वर उल्लेख केलेल्या कवितेतील शेवटच्या दोन ओळी आहेत - 
या घरट्यातून पिल्लू उडावे
दिव्य घेऊनि शक्ती 
आकांक्षांचे पंख असावे 
उंबरठ्यावर भक्ती 

अतिशय महत्त्वाची बाब कवयित्रीने या ओळींत अधोरेखित केली आहे. आपल्याकडे फार पूर्वीपासून एकत्र कुटुंबपद्धती होती. अनेक पिढ्या एका घरात नांदत होत्या. सोयीप्रमाणे त्यातील काही कुटुंबे वेगळी झाली तरी कुटुंबपद्धती ‘एकत्र’च होती. पण असे वेगळे होता होता, विभक्त कुटुंबांपर्यंत आपण कधी पोचलो हे कळलेच नाही. आईवडील आणि त्यांची मुले किंवा मूल; इतके सगळे सुटसुटीत झाले. पण खरेच तो सुटसुटीतपणा होता का? असा व्यवस्थेत नाही म्हटले तरी आटोपशीरपणा होता, पण तो आटोपशीरपणाच अनेकदा अडचणीचा ठरू लागला. मोठ्या व्यक्तींची उणीव भासू लागली. सरसकट नाही, पण आज अनेक कुटुंबे पुन्हा एकत्र येऊ लागली आहेत. मुलांना आजीआजोबांसह इतर नातीही मिळू लागली आहेत. अनेक ठिकाणी भले घरे वेगळी असतील, पण पूर्वीचा ओलावा पुन्हा जाणवू लागला आहे. वरच्या ओळींतून हीच तर अपेक्षा व्यक्त केली आहे. शेवटी घरांच्या निर्जीव वाटणाऱ्या भिंती प्रेमजिव्हाळ्याची नातीच तर जपत असतात. गृहसजावटही त्यामुळेच खुलते.. त्यांना आपली साथ मिळाली, तर ते खरे घर - ‘आपले घर.’

संबंधित बातम्या