कोरोनोत्तर करिअर... 

ऋता बावडेकर
मंगळवार, 28 जुलै 2020

संपादकीय

करिअर हा विषय सगळ्यांच्याच प्रचंड जिव्हाळ्याचा आहे. विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे पालक; अभ्यासक्रम, नोकऱ्या, करिअर हे विषय आले की त्यांची अवस्था वेगळीच होते. त्यातही पालकांची! विद्यार्थ्यांपेक्षाही त्यांच्या पालकांना याबाबतीत अधिक रस असल्याचे अनेकदा दिसते. अशी सगळी परिस्थिती लक्षात घेऊन ‘सकाळ साप्ताहिक’ अनेक वर्षांपासून ‘करिअर विशेषांक’ प्रसिद्ध करत आहे. यंदाचे वर्ष तरी याला अपवाद कसे असेल? यंदाचे वर्ष अपवाद अजिबातच नाही, पण हे वर्ष वेगळे मात्र नक्कीच आहे... 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सुरळीत चाललेले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दोन-अडीच महिन्यांपूर्वीचे आपण आणि आत्ताचे आपण एकच का, यावर विश्‍वास बसत नाही. विचारप्रक्रियेतच पूर्णपणे बदल झाला आहे. काल केलेल्या अनेक गोष्टी आज चुकीच्या, अयोग्य किंवा सुधारणेला भरपूर वाव असलेल्या वाटतात. जीवनातील प्रत्येक क्षेत्राचे हे वास्तव झाले आहे. शिक्षण क्षेत्र तरी याला अपवाद कसे असेल? 

‘कोरोना’ हा केंद्रबिंदू मानून आम्ही या करिअर विशेषांकाची मांडणी केली आहे. या कोरोनोत्तर काळात शिक्षणाची दिशा कशी असेल? करिअरची दिशा कशी असेल? विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक या सर्व घटकांनी कसा विचार केला पाहिजे? अशा मुद्द्यांच्या आधारे या अंकात मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच अभ्यासक्रमही तसे सुचविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्याशी संबंधित घटकांना याचा नक्कीच उपयोग होईल.. तुकाराम जाधव, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. श्रीराम गीत, सुरेश वांदिले आदी तज्ज्ञांचे यात मार्गदर्शनपर लेख आहेत. सध्याच्या स्थितीमुळे काहीशा भांबावलेल्या विद्यार्थी व त्यांच्याशी संबंधित सर्व घटकांना यामुळे नक्कीच दिलासा मिळू शकेल. 

सध्याच्या परिस्थितीत केवळ विद्यार्थी व त्यांच्याशी संबंधित सर्व घटकच केवळ भांबावलेले नाहीत, तर शिक्षण व्यवस्थाही काहीशी गोंधळलेली दिसते. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव लगेच आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. जगातील सर्वच डॉक्टरांनी तसे सांगून टाकले आहे. पण त्यामुळे थांबलेल्या सर्व व्यवस्था, यंत्रणा सुरू करायला हव्यात; त्यात शैक्षणिक व्यवस्थाही येते. या व्यवस्थेचा मुख्य आत्मा विद्यार्थी आहेत. त्यांचे भवितव्य या व्यवस्थेबरोबर जोडले गेले आहे. हे सगळे लक्षात घेऊन, त्यांची सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे सरकारने ठरवले आहे. 

कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष नक्कीच काहीसे अनिश्‍चिततेचे आहे. विद्यार्थी व पालकांना ‘कोरोनाबरोबरच शैक्षणिक वर्ष’ अशी मनाची तयारी करावी लागेल. पण त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाण्याचे किंवा भीती बाळगण्याचे कारण नाही, असे सुरेशा वांदिले यांना वाटते. ते का आणि यामुळे कशी वेगळी संधी मिळेल हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ‘कोरोनोत्तर करिअर दिशा’ या आपल्या लेखात सांगितले आहे. हे सांगताना तयारीच्या पुढील दिशा कोणत्या, रोजगार/स्वयंरोजगार क्षेत्रातील बदल कोणते, आत्तापासून कशी तयारी करावी, इंग्रजीवर प्रभुत्व का हवे, चौफेर ज्ञानार्जनाची आवश्‍यकता, नवीन संधी कोणत्या असतील... याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. नोकऱ्या, शिक्षण, परीक्षा, परदेशांत शिकण्याचे स्वप्न... या साऱ्यावर कोरोनामुळे या वर्षी प्रचंड अशाश्‍वततेचे सावट आहे. ‘अनिश्‍चितता पूर्वीही होती, नंतरही असेल. त्यामुळे सध्याच्या काळाने अस्वस्थ होऊन गडबडून जाण्याचे काही कारण नाही,’ असे डॉ. श्रीराम गीत आपल्या ‘नोकऱ्या आणि अकलेचे प्रारूप’ या लेखात म्हणतात. ‘भारतातील बेरोजगारी किमान २३ टक्के, तर शहरी बेरोजगारी ३१ टक्क्यांवर पोचली आहे. अशा या काळ्याकुट्ट परिस्थितीकडे पाहताना एक रुपेरी किनार मला दिसते आहे. या रुपेरी किनारीला शाश्‍वत असे एक अंगभूत स्वरूप आहे. तांत्रिक भाषेत त्याला मी ‘अकलेचे प्रारूप’ असे म्हणतो..’ डॉ. गीत म्हणतात, ते ‘अकलेचे प्रारूप’ म्हणजे काय, हे त्यांच्या शब्दांत, त्यांच्या लेखात वाचून समजून घ्यायला हवे. 

‘संधी, आव्हाने आणि कोरोनानंतरची स्थिती’ या लेखात तुकाराम जाधव यांनी स्पर्धा परीक्षेचे स्वरूप समजावून सांगितले आहे. तसेच कोरोना, त्यामुळे आलेले लॉकडाउन यामुळे काय परिस्थिती उद्‍भवली आहे, याचेही विवेचन त्यांनी केले आहे. मात्र, असे असूनही विद्यार्थ्यांना त्यातून मार्ग काढावा लागणार आहे हे सांगताना, तो कसा काढावा याचे मार्गदर्शन त्यांनी या लेखात केले आहे. 

‘करिअर निवडण्याच्या टप्प्याला विद्यार्थ्याच्या बुद्धीचे पैलू, त्याचा मानसिक, बौद्धिक आणि वैचारिक कल महत्त्वाचा असतो. अनुभवी तज्ज्ञांचे त्यासाठी मिळणारे मार्गदर्शनही महत्त्वाचे असते. मात्र करिअर निवडल्यावर सामोऱ्या येणाऱ्या प्रत्येक टप्प्यातून पुढे जाताना बौद्धिक, व्यावहारिक चातुर्य, कार्यक्षमता, सातत्य, नेतृत्वगुण, आवश्यक असलेली सॉफ्ट स्किल्स अशा अनेक गोष्टींची गरज भासते. यशस्वी कारकिर्दीतील हे टप्पे ओलांडताना, त्यातील यशापयश पचवत पुढे जाताना आणि मिळालेल्या यशाचा आनंद घेताना एका गोष्टीची नितांत गरज असते, ती म्हणजे उत्तम आरोग्य. नेमक्या या गोष्टीचा यशाची शिखरे काबीज करताना विसर पडतो. मिळालेल्या प्रत्येक यशासोबत प्रकृतीची एकेक तक्रार डोके वर काढू लागते आणि यश उपभोगायच्या काळात शरीर विविध आजारांचे आगार होऊन बसते. त्यामुळे उत्तम आणि भक्कम आरोग्य हा कोणत्याही यशस्वी करिअरचा पाया ठरतो,’ असे अतिशय प्रभावी विवेचन डॉ. अविनाश  भोंडवे यांनी केले आहे. 

करिअरच्या संधींमध्ये किती आणि कसा फरक पडेल, हे जरी ठामपणे सांगता येणार नसले, तरी कोणत्या अभ्यासक्रमांचा, क्षेत्रांचा प्रभाव असेल, याविषयी तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे. करिअर, अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थी आणि त्यांच्याशी संबंधित सर्व घटकांना याचा लाभ होईल, अशी खात्री वाटते.

संबंधित बातम्या