वाघांच्या जिवावर... 

ऋता बावडेकर
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

संपादकीय

माणसासह प्रत्येक प्राण्याची राहण्याची जागा ठरलेली असते.. पाळीव प्राणी किंवा मानवी वस्तीत राहणारे प्राणी हे त्याला काही प्रमाणात अपवाद म्हणावे लागतील. कारण त्यांना विशिष्ट अशी जागा नसते. पाळीव प्राणी त्यांच्या मालकांबरोबर राहतात तर मोकाट जनावरे उदा. कुत्री, मांजरे वगैरे.. माणसांबरोबर त्यांच्याच वस्तीत कुठेही राहतात. पण अलीकडे वाघांसाठी राखीव असलेल्या क्षेत्रात कुत्रीही आढळून येत आहेत. ते धोकादायक आहे. 

कुत्री मांजरी वगैरे प्राणी माणसाळलेले असतात त्यामुळे ठीक असते. पण जंगली प्राणी असे कुठेही राहू शकत नाहीत किंवा राहात नाहीत. त्यांच्यासाठी सरकारने अभयारण्यासारखी जागा राखीव ठेवलेली असते. तेथे केवळ या प्राण्यांचाच अधिवास अपेक्षित असतो. मात्र, देशातील १७ मोठ्या व्याघ्र संरक्षण प्रकल्पांमध्ये वाघांपेक्षा कुत्र्यांचीच संख्या अधिक असल्याचे व्याघ्र सर्वेक्षणासाठी लावलेल्या कॅमेऱ्यांतील चित्रणांतून स्पष्ट झाले आहे. किमान ३० व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाळीव प्राण्यांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळले. 

कुत्र्यांबरोबरच जंगलात चरायला येणाऱ्या गायी-म्हशींचाही वावर आढळतो आहे. जंगलातील त्यांच्या वाढत्या संचारामुळे जंगलातील प्राण्यांमध्ये अनेक रोगांचा फैलाव होण्याची शक्यता तज्ज्ञांना वाटते. तसेच जंगलात पाळीव प्राण्यांचा वावर असाच वाढल्यास अन्न आणि पाण्यासाठी त्यांच्यात आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष होऊ शकतो, असेही या तज्ज्ञांना वाटते. व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाळीव प्राण्यांची भटकंती वाढताना दिसत असली, तरी पर्यावरण मंत्रालयाने मात्र हे प्राणी प्रकल्पांच्या बाह्य भागांमध्ये वावरत असल्याचा दावा केला आहे. 

सन २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणातील माहितीनुसार १७ व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांपेक्षा कुत्र्यांचीच संख्या अधिक नोंदवली गेली आहे. या १७ व्याघ्र प्रकल्पांमध्ये आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर-श्रीशैलम, राजस्थानातील सरिस्का, मध्य प्रदेशातील पेंच, पन्ना आणि बांधवगड, कर्नाटकातील भद्र, तमिळनाडूतील सत्यमंगलम आणि महाराष्ट्रातील मेळघाट या सात मोठ्या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. या सात व्याघ्र प्रकल्पांतील वाघांची एकूण संख्या ४०० आहे. 

सर्वेक्षणातील माहिती योग्य धरली तर वन्यजिवांना निश्‍चितच धोका आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाळीव किंवा माणसाळलेले प्राणी आणि जंगलात राहणारे प्राणी यांच्यात मूलभूत फरक असतो. जंगलातील प्राण्यांना त्यामुळे रोग होऊ शकतात - त्रास होऊ शकतो. तसेच त्यांच्या अन्न-पाण्यात भागीदार निर्माण झाल्यामुळे संघर्ष अटळ ठरतो. त्याचप्रमाणे या पाळीव प्राण्यांचा माग काढत हे जंगली प्राणी मानवी वस्तीतही येऊ शकतात. त्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती अभूतपूर्वच ठरेल. 

वाढत्या लोकसंख्येमुळे म्हणा, अधिकाच्या हव्यासामुळे म्हणा... माणूस आपले हातपाय वाटेल तसे पसरू लागलेला आहेच. बेसुमार जंगलतोड करून, टेकड्या-डोंगरे भुईसपाट करून आधीच त्याने प्राण्यांच्या विश्‍वात प्रवेश केला आहे. त्यात आता त्याचे पाळीव प्राणीही घुसखोरी करू लागलेले दिसतात. प्रत्येकाच्या संयमाला मर्यादा असतात, त्यात हे प्राणी आणि तेही जंगली. त्यांना कितीही आत ढकलले, तरी ते कधी तरी बंड करणारच. आक्रमण करणारच. त्याआधीच आपण वेळेत थांबायला हवे. 

आपल्याला जितके मिळेल तेवढे कमीच असते. मिळेल ते घेण्याची, खरे तर ओरबाडण्याची माणसाची वृत्ती; त्यामुळे ही वेळ आली आहे. जंगले तोडायची, टेकड्या - डोंगर फोडायचे, समुद्र हटवायचा; त्यातून मिळालेल्या जागेत टोलेजंग इमारती उठवायच्या. अवाच्या सवा किमतीत त्या विकायच्या. जंगले तोडून, परत या इमारती विकल्या जाव्यात म्हणून ‘निसर्गाच्या सान्निध्यात’ अशा जाहिराती करायच्या. माणसाइतका परस्परविरोधी वागणारा दुसरा कोणताही प्राणी नसेल. आपल्याच पहिल्या वाक्याचा आपल्याच दुसऱ्या वाक्याशी काहीही संबंध नाही, हेही अनेकदा त्याच्या लक्षात येत नाही.. किंवा लक्षात येऊनही तो त्याकडे दुर्लक्ष करतो. 

जंगलतोडीचा - निसर्गाच्या ऱ्हासाचा कधी ना कधी फटका त्याला बसतोच. पूर येतो, दरडी कोसळतात.. अनेकदा जिवावर बेतते. अशावेळी निसर्गाला ‘लहरी’ म्हणून हा मोकळा. पण निसर्ग अजिबात लहरी नसतो. अनेकवेळा अनेक प्रकारचे संकेत तो देतो; ते आपल्याला कळत तरी नाहीत किंवा आपण त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतो. निसर्ग कोणासाठी कशाकरता थांबेल? असह्य झाले की त्याच्याकडून काहीतरी प्रतिक्रिया येणारच तशी पूर, भूकंप, जमीन खचणे, दरडी कोसळणे... अशी कुठल्या तरी स्वरूपात प्रतिक्रिया येतेच. अशावेळी त्याला ‘लहरी’ कसे म्हणता येईल? त्याला दोष कसा देता येईल? 

त्याप्रमाणेच प्राण्यांचेही आहे. वाघ, हत्ती, बिबट्या, साप, नाग, अजगर वगैरे प्राणी मानवी वस्तीत (?) दिसले की एकच हलकल्लोळ उडतो. मूळात ‘मानवी वस्ती’ या शब्दालाच हे प्राणी आक्षेप घेतील. नीट मागोवा घेतला, अभ्यास केला, तर लक्षात येईल की आपण राहतो तिथे आधी जंगल होते.. आणि हे सगळे प्राणी तिथे राहायला होते. राहण्याची ही जागा आपण - माणसांनी बळकावली आहे. ते सवयीने त्यांच्या मूळ जागी आलेत. पण आपला अरेरावीचा, ओरबाडण्याचा स्वभाव असल्याने हे वास्तव आपण  
स्वीकारतच नाही. उलट त्यांच्याच जिवावर उठतो. 

आत्ताही अभयारण्यात माणसाळलेले प्राणी अधिक प्रमाणात दिसणे हे त्याचेच कारण आहे. आपली हातपाय पसरण्याची सवय... आहे ती जागा आपल्याला कधीच पुरत नाही. प्राणी पाळण्याची हौस, पण त्यांच्या खाण्या-पिण्याचे, राहण्याचे काय? ते कोणी करायचे? पण ही जबाबदारी खूप कमी लोक स्वीकारतात. एरवी हे प्राणी मोकाटच फिरत असतात. असेच ते या अभयारण्यात फिरत असणार... परस्पर भागत असेल तर कशाला काळजी करायची, हीच वृत्ती यामागे आहे. तीच आता जंगली प्राण्यांना घातक ठरू पाहात आहे. वेळीच काळजी घ्यायला हवी.

संबंधित बातम्या