कोरोना आणि काळजी 

ऋता बावडेकर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020


संपादकीय

आपण अगदी उत्सवप्रिय माणसे आहोत. केवळ सणसमारंभच नव्हे, तर आनंदाचा एखादा छोटासा क्षण - प्रसंगही आपल्याला साजरा करायला पुरे पडतो. तेवढाच घटकाभर विरंगुळा, असा आपला त्यामागे विचार असतो.. त्यात चुकीचेही काही नाही, पण वेळ काळ बघून हे प्रसंग साजरे झाले, तर अधिक योग्य होते... सध्या आपण असे वागायला हवे. सण-समारंभ येत राहणार, त्यामुळे यावर्षी उत्सव मर्यादेत साजरे केले तर अधिक बरे ठरणार आहे. अर्थातच अनेक लोक हे भान ठेवत आहेत आणि ती अतिशय चांगली गोष्ट आहे. 

यंदा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन उत्सव सुरू होण्याआधीपासूनच सरकार, प्रशासन, पोलिस प्रशासन वगैरे सर्व घटकांकडून करण्यात येत आहे. या उत्सवाचे विराट स्वरूप आणि कोरोना या साथीची स्थिती हे प्रमाण व्यस्त तर आहेच, पण जुळणारेही नाही. कोरोना हा संक्रमित होणारा रोग आहे. स्पर्श नव्हे, तर श्‍वास, शिंकणे, खोकणे, थुंकणे या कशातूनही हे विषाणू एका माणसातून दुसऱ्या माणसाकडे नाक, डोळ्यातून संक्रमित होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, यावर अद्याप औषध, लस तयार नाही. तिच्या संशोधनाचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे सध्या काही पथ्य, बंधने, निर्बंध पाळूनच हा रोग - ही साथ आपल्याला आटोक्यात ठेवावी लागत आहे. यासाठी साबणाने सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क वापरणे, शिंकताना - खोकताना हाताचा तळवा आडवा न धरता हाताचा कोपरा आडवा धरणे... अशी कितीतरी बंधने आपण सगळेच पाळत आहोत. स्वच्छ मास्क तोंडावर लावल्याशिवाय हल्ली कोणी घराबाहेर पडताना दिसतच नाही. हे अगदी योग्यच आहे. 

अगदी कडक लॉकडाउननंतर सरकारने काही प्रमाणात बंधने शिथील केली. सुदैवाने परिस्थिती फार हाताबाहेर गेली नाही. एकदा परिस्थिती हाताबाहेर जाते आहे, असे वाटल्याने सरकारने पुन्हा दहा-पंधरा दिवसांचा कडक लॉकडाउन आणला. त्यानंतर परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचे मानले जाते. यालाच लागून सणसमारंभांचे दिवस सुरू झाले. श्रावणातील सणसमारंभ नागरिकांनी खूप संयमाने साजरे केले. त्यानंतर येणाऱ्या गणेशोत्सवाने मात्र सगळेच चिंतेत होते. 

याचे कारणही तसेच आहे.. गणेशोत्सव तोही पुण्यातला गणेशोत्सव याला ऐतिहासिक महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या सार्वजनिक उत्सवाने बघता बघता विराट रूप धारण केले. उत्सव काळातील देखावे विशेष आकर्षण ठरले. हे देखावे बघण्यासाठी गौरींनंतर पुण्यात गर्दी व्हायला सुरुवात होते; साधारण विसर्जन मिरवणूक होईपर्यंत ही गर्दी शहरांत असते. कारण विसर्जन मिरवणुकीचे आकर्षणही असतेच. 

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनात काळजीचे कारण असणे साहजिकच आहे. गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव अधिक झाला, तर या साथीवर नियंत्रण मिळवणे अधिक अवघड होणार, हे प्रशासन जाणते. त्यामुळेच उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करावा, मांडव घालू नयेत, असे आवाहन पोलिसांनी गणेश मंडळांना केले. मानाच्या, मोठ्या मंडळांसह अनेकांनी ही विनंती मान्य करून मंदिरातच श्री गणेशाची स्थापना करण्याचे ठरवले. ज्यांची मंदिरे नाहीत, त्यांनी अगदी छोटे मंडप घालावेत असे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार अनेकांनी केलेही. ज्यांनी केले नाही, त्यातील अनेकांना पुन्हा विनंती करण्यात आली व मंडपांचा आकार अनेक मंडळांनी कमी केला किंवा मंडपच काढून टाकले. 

सर्वच पातळ्यांवर सध्या या सहकार्याची आवश्‍यकता आहे. कारण कोणाही एकासाठी वैयक्तिक पातळीवर हे सुरू नाही; तर याचा फायदा संपूर्ण समाजालाच होणार आहे. कारण कोरोना हा रोग किंवा हा आजार कोणा एकट्याला होत नाही. तर त्यामार्फत किंवा दुसऱ्या कुठल्या बाधितामार्फत तो इतरांपर्यंत पोचतो. म्हणूनच जबाबदारीने वागणे हे कधी नव्हे इतके महत्त्वाचे ठरत आहे. 

याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे, या रोगावर अद्याप औषध सापडलेले नाही. लसी संशोधनाचे काम सुरू आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी ‘कोणत्याही आजाराची लस अस्तित्वात आणण्यासाठी चार-पाच वर्षे प्रदीर्घ प्रयत्न करावे लागतात. एचआयव्ही-एड्सची लस आज तीस-चाळीस वर्षे झाली तरी येऊ शकलेली नाही. तरीसुद्धा कोरोनाच्या जगद्व्यापी संकटात ही लस वेगाने विकसित करण्याचे प्रयत्न झाले. असंख्य समस्यांचा सामना करून आज कित्येक लसी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मात्र  विज्ञान वेगाने पुढे सरकत असले, तरी लस वेगाने विकसित करण्याचा जागतिक दबाव सर्व संशोधकांवर आहे. परिणामतः ही लस बाजारात आणण्यासाठी कमालीची घाई केली गेली, ही वस्तुस्थिती आहे. जगाच्या वैज्ञानिक इतिहासात एवढ्या वेगाने आणि एवढ्या मोठ्या संख्येने लसींची निर्मिती कधीही झाली नव्हती. त्यामुळेच या लसींच्या कार्यक्षमतेबद्दल एक चिंतेचे वलय या तमाम संशोधकांमध्ये आहेच. या लसींची रोगजंतूंना कायमचा प्रतिबंध करण्याची क्षमता आणि लस दिल्यावर होणारे दुष्परिणाम किंवा तिच्यामुळे येणाऱ्या रीअॅक्शन्स, साईड इफेक्ट्स यांच्या चाचण्या व्यापक स्वरूपात केल्या जाणार नाहीत. साहजिकच लस दिल्यावर भविष्यात काय घडेल, ती कितपत उपयुक्त ठरेल, तिचे न तपासलेले कोणते दुष्परिणाम आढळून येतील, ते परिणाम मानवी आयुष्याला किती धोकादायक आणि गंभीर असतील अशा प्रश्नचिन्हांची टांगती तलवार या साऱ्यांच्या डोक्यावर आहे,’ असे डॉ. अविनाश भोंडवे याच अंकातील लेखात म्हणतात. ‘कोरोना लसीकरण आणि त्यानंतर’ या लेखात या परिस्थितीसंदर्भात डॉ.  
भोंडवे यांनी सविस्तर विवेचन केले आहे. 

हे सगळे बघता आपली वागणूक-वर्तणूक किती जबाबदारीची असायला हवी याची जाणीव होते. आपल्यामुळे अनेकांचे जीव पणाला लागू शकतात, हे प्रत्येकाने मनाशी ठाम बाळगायला हवे. उत्सव, सण साजरे करण्यापासून कोणी रोखत नाही, पण सध्या सगळ्या गोष्टी मर्यादेत करण्याची आवश्‍यकता आहे. कारण ही परिस्थिती कधी संपणार, कधी नियंत्रणात येणार, नियंत्रणात येणार की नाही, हेदेखील अजून कोणी ठामपणे सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत स्वतःची, कुटुंबाची, समाजाची काळजी घेणे, हेच आपल्या हाती आहे. ते काम आपण चोख बजावू.

संबंधित बातम्या