अभियंता ते गोपालक..!

आशिष तागडे
सोमवार, 16 मार्च 2020

उपक्रम
 

शिक्षणाने मेकॅनिकल अभियंता.. एका प्रख्यात कंपनीत अनेक वर्षे नोकरीही केली. नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात सहज म्हणून पत्नीबरोबर नर्मदा परिक्रमा करत असताना आपणही आता आयुष्यात वेगळे काही करण्याचा निर्धार केला जातो. वयाच्या ५५व्या वर्षी नोकरीचा रीतसर राजीनामा देऊन गोसेवा करण्याचा वसा घेतला. या अवलियाचे नाव आहे, के. टी. पोपटी. मुळशीजवळ शेडगेवाडी (माळेवाडी) येथे केवळ गोसेवाच सुरू केली नाही, तर त्यातून गोमूत्र, शेणापासून विविध औषधांची निर्मिती करत आहेत.

‘अचानक एकेदिवशी पत्नीने नर्मदा परिक्रमा करण्याची कल्पना मांडली. मीपण लगेच हो म्हणालो. अगदी किरकोळ साहित्य घेऊन आम्ही दोघे २००७ मध्ये नर्मदा परिक्रमा करण्यासाठी निघालो,’ पोपटी सांगत होते. ‘सुरुवातीला थोडे जड गेले. परंतु, आठवडाभरातच परिक्रमेमध्ये मन रमले. सेवा म्हणजे काय, याचा अनुभव साडेचार महिन्यांत संपूर्ण नर्मदा परिक्रमेत घेतला. आपणही पुण्यात माघारी गेल्यावर सेवा कार्य करण्याचा निर्धार या परिक्रमेतच आम्ही उभयतांनी घेतला. पुण्यात आल्यावर माझी गोविज्ञान संशोधन केंद्राचे काम पाहणारे बापुसाहेब घाटपांडे यांच्याशी गाठ पडली. त्यांनी अनेक पर्याय माझ्यासमोर ठेवले. मी आधी कंपनीच्या नोकरीचा राजीनामा दिला. गायीबद्दल काहीच माहिती नव्हती आणि थेट गोसेवा करण्याचा प्रस्ताव आल्याने मनात विचार सुरू झाला. परंतु काही हरकत नाही, करून तर पाहू असा विचार केला. कामाला सुरुवात केली. अगदी जागा शोधण्याबरोबर गायींचाही शोध घ्यायचा होता. त्यावेळी कोथरूडला डॉ. अजित रावळ दवाखाना चालवीत. गोमूत्र, शेणापासून काही औषधे तयार करता येतात, याची त्यांनी सविस्तर माहिती दिली. मनाने आणखी उभारी घेतली. यासाठी आपली गोशाळा पाहिजे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यादृष्टीने आणखी विचार सुरू झाला.’

प्रशिक्षण ते गोशाळा...!
गोशाळा सुरू होईल, परंतु गोमूत्र आणि शेणापासून औषध आणि अन्य विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घ्यायला पाहिजे, असा विचार पुढे आला. त्यासाठी देवलापार (जि. नागपूर) येथे गेलो, असे सांगत पोपटी म्हणाले, ‘तिथे सविस्तर प्रशिक्षण घेऊन पुण्यात आलो. आल्यावर आपली गोशाळा नाही, याची खंत होती. ती गोविज्ञान संस्थेचे राजेंद्र लुंकड यांना बोलून दाखविली. दरम्यान पुण्यात आल्यावर मालिश तेलाचे उत्पादन सुरू केले होते. परंतु कच्च्या मालाचा प्रश्‍न निर्माण व्हायचाच. शेवटी गोशाळा काढण्याचा पक्का विचार केला. मेकॅनिकल अभियंता असल्याने गोशाळेची कल्पना कागदावर मांडली. या काळात अनेक गोशाळा पाहिल्या. अगदी २० गायींपासून ते एक हजार गायींपर्यंतची संख्या असलेल्या गोशाळांचा अभ्यास झाला. अनेक संस्थांनी गायींचा सांभाळ करण्यासाठी माणूस मिळत नसल्याची तक्रार केली. त्यामुळे गायींना चरायला नेणे, शेण, पाणी, गोठा स्वच्छ ठेवणे इत्यादी कामे स्वत:ला करता आली पाहिजे, अशा हिशोबाने गोठा तयार करण्याची कल्पना केली. त्यासाठी किमान अर्धा एकर तरी जागा अपेक्षित होती. जागेचा शोध घेत असताना अचानक एकेदिवशी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सितारामजी कोंढाळकर यांची भेट झाली. त्यांना कल्पना सांगितली. माझे बोलणे पूर्ण व्हायच्या आत ‘जागा दिली’ असे कोंढाळकर यांनी जाहीर केले. दुसऱ्या दिवशी शेडगेवाडी येथे जागा पाहण्यासाठी गेलो. जागेची लेव्हलिंग आणि तात्पुरता गोठा बांधून देण्याचे सितारामजी यांनी सांगितले. २६ जानेवारी २००९ ला गोठ्याचे भूमिपूजनही झाले.

गायींची आणि पैशांची सोय..!
चांगले काम हाती घेतले, की देणारे हातही तितक्‍याच झपाट्याने पुढे येतात, असा अनुभव असल्याचे सांगत पोपटी म्हणाले, ‘गायी घेण्यासाठी निधी लागणार होता. तो उभा करण्याचा विचार करत असतानाच भूगाव येथील एच. पी. जोशी यांनी त्यांच्याकडील पाच गायी दिल्या. पाच गायी आणि एक वासरू घेऊन तात्पुरत्या उभारलेल्या गोठ्यात आलो. अक्षरक्ष: काय झाले सांगता येत नाही. मदतीसाठी अचानक अनेक हात पुढे यायला लागले. कोणी पत्रा आणून दिला. कोणी सिमेंट आणून दिले. कल्पना करणार नाही, परंतु सात ते आठ महिन्यात चांगला गोठा तयार झाला. त्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च आला. या कामामुळे हुरूप वाढला. सांगताना खूप आनंद आणि समाधान वाटते, की आज गोठ्यात २५ ते ३० गायी आहेत, परंतु एकही गाय विकत घेण्याची वेळ आली नाही. सर्व गायी भेट म्हणून दिल्या आहेत.’

औषधी उत्पादनांना सुरुवात..
पोपटी यांनी सांगितले, ‘गायी, गोठ्याची सोय झाल्यामुळे औषधे निर्मितीला जोर आला. सुरुवातीला पाषाण-भेद अर्क सुरू केला. मुतखड्यावर तो प्रभावी ठरला. त्यानंतर मधुमेह व अन्य व्याधींसाठी औषधे तयार करण्यास सुरुवात केली. सध्या विविध व्याधींवर उपयोगी ठरतील अशी १२ प्रकारची औषधे, धुपकांडी, गोवऱ्या यांची निर्मिती केली जाते. यासाठी या ठिकाणी आता प्रशिक्षण केंद्रही सुरू केले आहे. दरवर्षी साधारण ५ ते ६ प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. एका प्रशिक्षण शिबिरात वीसजणांना प्रवेश दिला जातो. यामध्ये गोमूत्रापासूनची ७, शेणापासून ३ आणि गोमूत्र आणि शेण यांचा वापर करून ३ अशी एकूण १३ औषधे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.’

गोसेवा उत्तमच
बदलत्या परिस्थितीमुळे अनेक व्याधींमध्ये वाढ झाली आहे, त्यावर गो उत्पादक योग्य मात्रा असल्याचे पोपटी यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणतात, ‘दिवसेंदिवस अगदी कमी वयात काही व्याधींना आपणाला सामोरे जावे लागत आहे. आता अगदी चाळिशीतही मधुमेह झाल्याच्या तक्रारी अगदी सर्रास आहेत. त्याचबरोबर कर्करोग व अन्य व्याधींचा सामना करावा लागत आहे. आपण आपल्या मूळ संस्कृतीकडे वळण्यास अनेक व्याधींपासून सुटका करून घेत निरोगी जीवन जगू शकतो. शेतात रासायनिक खते वापरण्यापेक्षा गोमूत्रापासून तयार झालेल्या औषधाचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. गोमूत्राबद्दल नागरिकांमध्ये जागृती वाढत असून गोमूत्र अर्क आणि पंचगव्यावर आधारित औषधांची मागणीही वाढणार आहे. यासाठी अनेक गोशाळांची आवश्‍यकता भासणार आहे.’

कठीण प्रसंगात गायच मदतीला
शेडगेवाडी येथे गोठा तयार करण्याच्या काळात या भागात दळणवळणाची साधने खूपच अपुरी होती. सायंकाळी सातनंतर त्या भागातून पुण्यात येण्यासाठी कोणतेच वाहन उपलब्ध नसायचे. एकदा पोपटी यांना तातडीच्या कामासाठी पुण्याला यायचे होते. गोठ्यातील आणि औषध निर्मितीचे काम आटोपून ते बरोबर सात वाजता फाट्यावर पोचले. परंतु तत्पूर्वीच बस निघून गेली होती. आता एखाद्या दुचाकी किंवा कोणत्या तरी खासगी वाहनाशिवाय पर्याय नव्हता. अखेर ४० मिनिटे वाट पाहिल्यावर एक ट्रक येत असल्याचे लक्षात आले. पोपटी यांनी हात दाखविला. जवळ येऊन पाहता तो लष्कराचा ट्रक होता. त्यामधून जाता येणे अवघड होते. परंतु, चालकाने स्वत:च्या जबाबदारीवर त्यांना केबिनमध्ये बसविले. त्यांनी सहज चालकाला विचारले, ‘तुम्हाला सिव्हिलियन लोकांना घेण्याची परवानगी नाही, मला कशी लिफ्ट दिली.’ त्यावर चालक म्हणाला, ‘तुमच्या अंगाला येणारा गोमूत्र आणि शेणाचा वास.’ अशारीतीने कठीण प्रसंगातही गायच मदतीला आली हे सांगायला पोपटी विसरले नाहीत. 

गायच करते माझा सांभाळ
‘सुरुवातीला म्हणजे गोशाळा सुरू केल्यापासून तीन वर्षांपर्यंत मी गायींचा सांभाळ करतो, असे अभिमानाने सांगत असे. परंतु त्यानंतर मला असे लक्षात आले, की मी गायींचा नव्हे तर गायच माझा सांभाळ करत आहे. दरम्यान, मध्यंतरी माझ्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर तर अक्षरक्ष: गायच माझा सांभाळ करत आहे. त्या दुःखातून सावरण्याचे सामर्थ्य मला केवळ गोसेवेमुळेच मिळाले. आता या ठिकाणची सेवा पूर्ण झाली असून आता पुढील लक्ष्य नाशिक आहे.’ या ठिकाणी मोठा गोठा निर्माण करणार असल्याचे सांगत असताना ७८ वर्षीय पोपटी यांच्या डोळ्यांत वेगळीच चमक दिसत होती. पोपटी आजही पहाटे उठून सर्व गोठा साफ करतात. त्यांचा उत्साह तरुणाला लाजविणारा आहे. याबाबतचे श्रेयही ते गोमातेला देतात.

संबंधित बातम्या