कचऱ्यातून फुलली गच्चीवर बाग

इरावती बारसोडे
सोमवार, 30 डिसेंबर 2019

उपक्रम
 

वेलीला लटकलेला हातभर लांब दुधी भोपळा, लालचुटूक टोमॅटो, बाराही महिने कारली-तोंडल्यांनी लगडलेले वेल; केळ्यांच्या घडांनी बहरलेली मोठाली झाडं; केवडा, मरवा आणि जाई-जुईसारख्या फुलांच्या सुगंधानं भारून गेलेला आसमंत... हे कुठल्या शेतीचं किंवा फळबागेचं वर्णन नव्हे. तर, पुण्याच्या डेक्कनसारख्या मध्यवस्तीतल्या एका गच्चीचं वर्णन आहे. डेक्कन इथं पाचमजली इमारतीच्या गच्चीवर फुलली आहे परसबाग आणि तीही कचऱ्यामधून!

प्रिया व सुनील भिडे या दाम्पत्याच्या कष्टांतून साकारलेली ही गच्चीवरची बाग बघायला हवी अशीच आहे. या बागेचं वैशिष्ट्य असं, की इथं वापरली जाणारी सगळी माती तिथंच तयार होते, ओला कचरा आणि पालापाचोळ्यामधून. 

तसं पाहायला गेलं, तर गेली तीसेक वर्षं गच्चीवर ते बागकाम करत आहेत. पूर्वी जंगली महाराज रस्त्यावरील जुन्या घराच्या गच्चीवरही बाग साकारली होती. तिथं लॉन होतं, छोटं तळं आणि त्यात कमळं होती, भाजीपाला, फळं पिकत होती. प्रियाताई सांगतात, ‘...पण आज मागं वळून बघताना ती फक्त हौसेसाठी केलेली बाग होती. तिथंही आम्ही ओला कचरा जिरवत होतो. पण त्यामध्ये खूप काही वेगळा दृष्टिकोन नव्हता. १९९१ च्या दरम्यान आम्ही दोघंही महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीशी जोडले गेलो आणि आम्हाला देवराया जवळून पाहायला मिळाल्या. त्यानंतर २००५ पर्यंत आमच्या विचारांमध्ये परिवर्तन झालं होतं. तसंच माती तयार व्हायला खूप वर्षं लागतात हेही लक्षात आलं. प्रत्येक ठिकाणची मातीही वेगळी असते. जेव्हा आपण आपल्या हौसेसाठी बाग करतो, तेव्हा कुठूनतरी माती आणावीच लागते. आपण बागेसाठी माती आणली म्हणजे तिथल्या पर्यावरणाचा, परिसंस्थेचा ऱ्हास होईल. देवरायांमध्ये फिरल्यानंतर तिथली परिसंस्था ऋतुमानाप्रमाणं असते हे लक्षात आलं. तिथं जमिनीवर पालापाचोळा, ह्युमस असतं. झाडं आपली आपण वाढलेली असतात. तेव्हा वाटलं की आपण असंच काही करू शकू का?’

या विचारातूनच नंतर कचऱ्यातून इमारतीच्या गच्चीवर माती तयार झाली आणि त्या मातीत सुंदर बाग बहरली. या बागेचा प्रवास सांगताना त्या म्हणाल्या, ‘डेक्कनला राहायला आल्यावर आजूबाजूला बघितलं, तर बंगले पाडून बिल्डिंग्ज केल्या होत्या. त्यामुळं आता मोकळी जागाच नसते आणि त्यातच निसर्गाचं चक्र विस्कळीत झालं आहे. निसर्गात पानं खाली पडतात, कुजतात, त्यातूनच झाडांचं पोषण होतं. फरशीवर पानं पडून त्याचा कचरा होतो आणि झाडाला उपयोग होत नाही. म्हणून आम्ही माती अजिबात न आणता ती तयार करायचं ठरवलं. त्यासाठी पालापाचोळा गोळा करायला सुरुवात केली. तो जिरवला आणि आम्हाला चांगले परिणाम मिळाले. मग आम्ही वेगवेगळा कचरा आणून जिरवायला सुरुवात केली आणि या कचऱ्यातूनच बाग फुलवूया असं ठरवलं. आमची बाग १०० टक्के सेंद्रिय मालावर आणि जैवविघटनशील कचऱ्यातून फुलली आहे. हळूहळू आम्ही इतरही कचरा, भाजीपाला आणायला सुरुवात केली. पूर्वी आम्ही स्वतः जाऊन कचरा आणायचो, पण आता आजूबाजूच्या लोकांना माहीत असल्यामुळं ते स्वतःच अंगणातला पालापाचोळा, कचरा आणून देतात.’ 

आता इतक्या वर्षांनंतर बागेचं नैसर्गिक चक्र निश्‍चित झालं आहे. बागेतल्या झाडांचा आणि लोकांकडून आलेला पालापाचोळा मोठ्या प्रमाणात असतो. हा पालापाचोळा वाफ्यांमध्ये किंवा वेगळा न ठेवता थेट संपूर्ण गच्चीवरच पसरला जातो. आता पानगळीचा ऋतू सुरू झाला आहे. मेअखेरपर्यंत बागेत पालापाचोळ्याचा छान दोन फुटांचा थर तयार होतो. बागेत वावरतानाही त्यावरूनच चालायचं. याचे दोन-तीन फायदेही आहेत. एक, थेट जमिनीवर पालापाचोळ्याचा थर असल्यामुळं छत अजिबात तापत नाही. कचऱ्यात खालच्या थरात गांडुळंही छान वाढतात. पाचोळ्यावरून चालल्यामुळं तो दबलाही जातो आणि खतनिर्मिती लवकर होते. जूनच्या सुमारास, म्हणजे ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला पाचोळा काढला जातो. तोपर्यंत खालच्या-वरच्या दोन्ही थरांचं मस्त कंपोस्ट तयार झालेलं असतं. 

बागेत जैवविविधता भरपूर आहे. कुठल्याही एका प्रकारची झाडं नाहीत. बऱ्याच गोष्टी एकत्र लावल्या जातात. काही १२-१५ वर्षं जुनी फळझाडंसुद्धा आहेत. केळी, पपई ही भिडेंची आवडती झाडं. ही झाडं कचरा खूप खातात आणि त्यांना कमी देखरेख लागते. त्याशिवाय चिक्कू, आवळा, पपया, केळी, पेरू, सीताफळ, संत्र, कॉफी प्लांट, डाळिंब ही फळंही असतात. 

भाजीपालाही बराच पिकतो. भाजीपाल्याचं साधारण तीन-तीन महिन्याचं चक्र आहे. फळभाज्यांमध्ये वांगी, भेंडी, टोमॅटो, मिरची, मका, चेरी टोमॅटो; वेलवर्गीय भाज्यांमध्ये घेवडे, दुधी, दोडका, कारलं, बारमाही तोंडली, लाल भोपळा, फ्लॉवर, कोबी इत्यादी भाज्या पिकवल्या जातात. पालेभाज्यांमध्ये मेथी, शेपू, पालक, करडई, आंबट चुका, अळू, हळद, चायनीजमध्ये आवडते म्हणून कोवळी कांदा पात, लसूण पात घेतली जाते. लेट्युस, थाईम, बेसिलही असते. 

फुलांचेही अनेक प्रकार आहेत. काही सीझनल आहेत, काही बारमाही. जास्वंद, सोनटक्का, लिलींचे प्रकार, सुगंधी फुलांमध्ये जाई, जुई, सायली, मोगरा, कुंद, केवडा, मरवा असे अनेक प्रकार लावले जातात. छोट्या तळ्यामध्ये वॉटर लिली आणि कमळही आहे. शोभिवंत वनस्पतींमध्ये पाम, कॅलिडियमसारखे पानांचे प्रकार, रंगीत आळूचे प्रकारही आहेत. जास्त काही न करता बारा महिने हळद, रताळीही भरपूर निघतात. अडुळसा, कोरफड, तुळस, गवतीचहासारख्या औषधी वनस्पतीही आहेत. 

बागेमधून भरपूर भाजीपाला, फळफळावळ निघत असली, तरी यातील एकही भाजी किंवा फळ विकलं जात नाही. ज्या भाजीवाल्यांकडून, लोकांकडून कचरा आणला जातो त्यांना आणि इतरांनाही सगळं फुकट वाटलं जातं. 

बाग फुलवताना ‘रियुज आणि रिसायकल’ हे तत्त्व प्रकर्षानं पाळलं जातं. बादल्या, टायर, ड्रम यांचा पुनर्वापर केला जातो. प्रिया भिडे सांगतात, की हे ‘अनटेम्ड गार्डन’ आहे. म्हणजे कुठलीच वनस्पती बंधनात नाही, तिला पाहिजे तिकडं वाढते. निसर्गचक्रानुसार सारं व्यवस्थित सुरू असतं. वेली झाडांवर चढलेल्या असतात, त्यांना फुलं येत असतात. बागेत छोट्या परिसंस्था निर्माण होत असतात. पक्षी, फुलपाखरं येतात. मॉन्सूननंतर सगळ्या झाडांवर फुलपाखरांचे कोष दिसायला लागतात. या वर्षीही पावसाळ्यानंतर अनेक झाडांवर फुलपाखरांनी अंडी घातली होती. अनंत प्रकारचे सुरवंट, अळ्या झाडांवर हिंडत होते. त्यांनी पानं खाल्ली तरी कीटकनाशकं फवारली जात नाहीत, कारण ती बागेचाच भाग असतात. जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर करण्याचा प्रयत्न असतो. उन्हाळ्यात बाग उष्णतेनं भकास होते, पण दोन पावसांत पुन्हा हिरवीही होते. 

बागेमुळं छत गळू नये यासाठीचं नियोजन इमारत बांधतानाच केलेलं होत. वॉटर प्रुफिंग, स्लॅबचा उतार, डांबराचा वापर इत्यादी गोष्टींची आधीच काळजी घेतली होती. माती सकस असली, की झाडांवर कीड पडत नाही. तसंच कीड नियंत्रणासाठी झेंडू, पुदिनासारखी उग्र वासाची झाडंही लावली आहेत. तसंच रासायनिक घटक न वापरता शेण, नीम तेल, नीम पेंड इ. गोष्टींचा वापर केला जातो.

गच्चीवरील बागेव्यतिरिक्त ग्रे वॉटर रिसायकलिंगही केलेलं आहे. संपूर्ण इमारतीचं पाणी पुन्हा बागेसाठी वापरलं जातं. बागेमध्ये ऑटोमेटेड ड्रिप सिस्टिम बसवण्यात आलं आहे. त्यामुळं ठराविक वेळेला योग्य प्रमाणात झाडांना पाणी दिलं जातं. 

बागेच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन करणं हा मूळ उद्देश आहे. जैविक कचरा अशा पद्धतीनं जिरवला तर कचऱ्याची समस्या कमी होईल, सौरऊर्जेचा वापर होईल. तापमानवाढ नियंत्रणात येण्यास मदत होईल. सध्याच्या वाढत्या तापमानात आणि शहरीकरणामध्ये गच्चीवरची बाग अनिवार्य आहे, असं भिडे यांचं मत आहे. त्या म्हणतात, ‘शहरात मोकळी जागा नाही, पण इमारतींवर गच्च्या आहेत. प्रत्येकानं थोडं योगदान देऊन त्या गच्च्यांवर हिरवाई जपायला हवी. त्यामुळं सौरऊर्जेचा योग्य वापर होईल. झाडं वाढली की नवनिर्मितीही होईल. वाढत्या कार्बन फूटप्रिंटचं भान ठेवणं आवश्‍यक आहे. ’ 

भिडे यांच्याकडे गच्चीवरील बागेसंदर्भात असलेली माहिती, त्यांच्या प्रयोगांतून, अनुभवातून मिळालेलं ज्ञान हे सगळं लोकांपर्यंत पोचावं, लोकांनीही कचऱ्यातून बाग फुलवावी अशी भिडे यांची खूप इच्छा आहे. यातून कचऱ्याच्या समस्येवरही तोडगा निघू शकतो आणि तापमानवाढीवरही. म्हणून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. विविध क्लब्स, बचत गटांना स्वतः प्रिया भिडे मार्गदर्शन करतात. त्यांनी नुकतंच एक प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्यामध्ये मार्गदर्शनपर व्याख्यानं, कार्यशाळा, कचऱ्यातून खत कसं करावं याबाबत मार्गदर्शन, पर्यावरणपूरक खेळ अशा अनेक गोष्टी होत्या. त्यांचं Soil Circuit नावाचं फेसबुक पेजही आहे. या पेजवर कचऱ्यातून खत कसं करावं, त्यात अळ्या झाल्या तर काय करावं, कोणती झाडं लावावीत, मुंग्या का येतात, छोट्या कुंड्या कशा तयार कराव्यात, सीझनल फुलं कोणती यांसारख्या अनेक बाबींवर मार्गदर्शन करणारे छोटे छोटे व्हिडिओज बघायला मिळतील. 

संबंधित बातम्या