समाजबंधचा स्तुत्य उपक्रम

ज्योती बागल 
सोमवार, 14 जून 2021


उपक्रम     

अलीकडच्या काळात सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या, परंतु अत्यंत महत्त्वाच्या अशा विविध प्रश्नांवरती काम करण्याकरिता अनेक तरुण मंडळी पुढे येत आहेत. अशाच स्वयंप्रेरणेने सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देणाऱ्या तरुणांची सामाजिक संस्था म्हणजे ‘समाजबंध’! मासिक पाळीतील आरोग्य व्यवस्थापन आणि स्वच्छता, महिला आरोग्य, लैंगिक शिक्षण आणि लिंगभाव समानता या विषयांवर ही संस्था काम करते. या संस्थेने नुकतेच ‘पिरियड रिव्होल्युशन २०२१’ हे आगळेवेगळे अभियान राबवले आहे.

समाजबंधच्या सामाजिक चळवळी मागची प्रेरणा ठरली संस्थेचे संस्थापक सचिन यांची आई! वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी लग्न होऊन सासरी आलेल्या सचिनच्या आईला पहिली पाळी आली ती लग्नानंतर दोन वर्षांनी. पण मासिक पाळीविषयी असलेल्या अज्ञानामुळे त्या काळात योग्य ती काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांना सतत गर्भाशयाच्या जंतुसंसर्गाचा त्रास होऊ लागला. याची परिणिती म्हणजे अत्यंत कमी वयातच त्यांना गर्भाशयाची पिशवी काढावी लागली. मासिक पाळीबाबत जागरूकता नसल्याने महिलांच्या केवळ शरीरावरच नव्हे तर संपूर्ण आयुष्यावर होणारे दुष्परिणाम सचिनने अगदी जवळून पाहिले... आणि जे आपल्या आईला सोसावे लागले ते इतर महिला व मुलींना सोसावे लागू नये या जाणिवेतूनच समाजबंधचे काम उभे राहिले.      

सुरुवातीला कृतिआराखडा ठरवत असताना या विषयावर काम करणाऱ्या ‘नॅशनल हेल्थ रूरल मिशन’ आणि इतर काही संस्थांच्या सर्वेक्षणांचा आधार घेण्यात आला. त्यातून या तरुणांच्या असे लक्षात आले की भारतातील ८८ टक्के महिला या मासिक पाळी दरम्यान स्वच्छ शोषक साहित्य वापरत नाहीत. तर ७३ टक्के महिलांना पाळी दरम्यान स्वच्छता न राखल्यामुळे जंतुसंसर्ग होतो. या गोष्टी घडण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या समाजात मासिक पाळीविषयी म्हणावी तेवढी जागरूकता नाही. शिवाय बरेचसे गैरसमज आणि अंधश्रद्धादेखील आहेत, ज्या दूर करणे खूप गरजेचे आहे.

आज मासिक पाळीमध्ये लागणारे 
साहित्य बाजारात सहज उपलब्ध असले, तरी ते सर्वच स्तरातील महिलांना परवडेल अशा किमतीत नसते. त्याचप्रमाणे ज्या महिला सॅनिटरी पॅड खरेदी करू शकतात त्यांना ते मेडिकलमधून आणण्याची लाज वाटते. घरातील पुरुष मंडळीही आपल्या घरातील स्त्रियांना स्वतःहून अशा आवश्यक वस्तू आणून देत नाहीत. कित्येकांना तर मासिक पाळीसारख्या गोष्टींवर खर्च करणे महत्त्वाचे वाटत नाही. या सर्व गोष्टींना जबाबदार आहे आपल्याकडे या विषयाचा असणारा ‘सोशल टॅबू’. त्यामुळेच बऱ्याचशा मुली, महिला मासिक पाळीत घरातीलच कपडा वापरण्यास प्राधान्य देतात. पण ते चुकीच्या पद्धतीने वापरणे हे नक्कीच आरोग्याला घातक ठरू शकते. त्यामुळे खऱ्या अर्थाने या गोष्टींवर काम करण्याची गरज असल्याचे समाजबंधने ओळखले. किशोरवयीन मुली, महिला यांना मासिक पाळीतील व्यवस्थापनासाठी ‘प - पाळीचा; जागर स्त्री अस्तित्वाचा’ हे समुपदेशन सत्र, पाळीविषयक अंधश्रद्धा निर्मूलन, कापडी ‘आशा’ पॅडची निर्मिती आणि प्रशिक्षण देणे अशा प्रकारे कामाला सुरुवात केली.

काय आहे ‘पिरियड रिव्होल्यूशन’ अभियान?  
दरवर्षी अठ्ठावीस मे हा ‘जागतिक मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन दिन’ म्हणून साजरा केला जातो. खरेतर ही आंतरराष्ट्रीय संकल्पना असल्यामुळे याला ‘मेन्स्ट्रुअल हायजिन डे’ असे म्हटले जाते. परंतु भारतामध्ये मासिक पाळी संदर्भात बऱ्याच अंधश्रद्धा आणि गैरजमज असल्यामुळे ‘हायजिन राखणे’ म्हणजे मासिक पाळीतील आरोग्य राखण्यावर भर देणे असे होत नाही. त्यामुळे समाजबंध याला ‘मेन्स्ट्रुअल हेल्थ मॅनेजमेंट’ असे म्हणते. कारण मासिक पाळीदरम्यान स्त्रीला जोपर्यंत पुरेसा आराम, उत्तम आहार आणि चांगली वागणूक मिळणार नाही, तोपर्यंत फक्त स्वच्छतेनेच मासिक पाळीतील आरोग्य राखले जाईल असे नाही. या सर्व बाबींचा विचार करून समाजबंधने २८ मेनिमित्त महिनाभर (२८ एप्रिल ते २८ मे) या विषयांवर जनजागृती करायचे ठरवले. ‘मासिक पाळीस पूरक समाज निर्मितीसाठी’ हे ब्रीद घेऊन ‘पिरियड रिव्होल्यूशन २०२१’ हे अभियान राबवले.      

या अभियानांतर्गत पाळीविषयी समाजात असणारी लज्जा, अस्पृश्यता, गैरसमज नाहीसे होण्याच्या दृष्टीने त्याविषयी जास्तीत जास्त बोलले, लिहिले, ऐकले व वाचले जावे याकरिता प्रयत्न केले आहेत. त्यासाठी या विषयाला धरून पत्रलेखन, कविता लेखन, निबंध लेखन, वक्तृत्व, चित्रकला, मुलाखत, पोस्टर तयार करणे, अनुभव कथन अशा अनेक स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केल्या होत्या. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तरुणांना या अभियानात स्वयंसेवी कार्यकर्ते म्हणून सहभागी होण्याचे आवाहनही केले होते. अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभरातून साडेतीनशेच्या आसपास सक्रिय कार्यकर्ते या अभियानात सहभागी झाले होते आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन अभियानाला हातभार लावत होते. या कामामध्ये रोजचे पोस्टर डिझाईन करणे, ग्राफिक्स तयार करणे, व्हिडिओज तयार करणे, सोशल मीडियावर ते शेअर करणे, अशी बरीच कामे वेगवेगळ्या पातळ्यांवर या कार्यकर्त्यांनीच पार पाडली. शर्वरी सुरेखा अरुण, प्रशांत बावसकर, राहुल बिराजदार, चंद्रकांत गावंडे, स्मिता गायकवाड, अवंती धायगुडे, वैभव गडकरी, डॉ. मानसी पाटील, विक्रम शिंदे, सुदर्शन लहाडे, अक्षय सोमासे, अजित जगताप, अविनाश भुजबळ समाजबंधसाठी काम करतात. अभियानातील स्पर्धांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला. कमी कालावधीतच जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवून लेखन साहित्यही मोठ्या प्रमाणात पाठवले होते.            

या अभियानाच्या अखेरीस प्रत्यक्ष दहा हजार लोकांपर्यंत आणि अप्रत्यक्ष किमान एक लाख लोकांपर्यंत पोचण्याचा समाजबंधचा मानस होता, मात्र समाजबंधने हा आकडा अभियानाच्या सुरुवातीलाच सहज पार केला होता. फेसबुक लाईव्ह, इन्स्टाग्राम लाईव्ह अशा माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाऊ लागले. यामध्ये मासिक पाळी आणि आरोग्य या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांची सत्रे आयोजित केली गेली. तसेच माध्यमिक शिक्षकांसाठी काही समुपदेशन सत्रे आयोजित केली गेली. जेणेकरून त्यांना हा विषय नीट समजून घेता येईल आणि तो विद्यार्थ्यांपर्यंत योग्यरीतीने पोचवता येईल. तसेच जे कार्यकर्ते या विषयात काम करू इच्छितात त्यांना ट्रेनिंग देण्याचे कामही सुरू आहे. ग्रामीण भागातील बारावी व्होकेशनल अभ्यासक्रमाची जवळपास ६५० मुले इंटर्नशिप करण्यासाठी म्हणून समाजबंधबरोबर या अभियानात सहभागी झाली होती.    
या अभियानाचा नक्कीच सकारात्मक परिणाम झाला आहे असे म्हणता येईल, कारण जेवढे जास्त लोक या अभियानात जोडले गेले आहेत, तेवढे जास्त लोक आता मासिक पाळी या विषयावर मोकळेपणाने बोलतील, ऐकतील. शिवाय पाळी ही कोणतीही वाईट किंवा अपवित्र गोष्ट नसून ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे लोकांच्या लक्षात आले आहे. अर्थात यासाठी थोडा वेळ लागेल परंतु हळूहळू का होईना लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होईल हे मात्र नक्की!      

हे अभियान राबवत असताना ‘समाजबंध’च्या असे लक्षात आले, की अगदी बारा वर्षांच्या मुलीपासून ते ८९ वर्षांच्या आजींपर्यंत सर्वांना व्यक्त व्हायचे आहे, काहीतरी सांगायचे आहे आणि यासाठी त्यांच्याकडे कोणताही प्लॅटफॉर्म उपलब्ध नाहीये. त्यामुळेच २८ मेच्या निमित्ताने समाजबंधच्यावतीने ‘मासिका टॉकलाईन’ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली. ७७०९४८८२८६ हा क्रमांक समाजबंधने जाहीर केला आहे. ही सुविधा पूर्णपणे विनामूल्य असून कोणीही याचा लाभ घेऊ शकते. या टॉकलाईनमध्ये तीन भाग आहेत. एक – ज्यांना कोणाला व्यक्त व्हायचे असेल, त्यांचे म्हणणे समाजबंधचे कार्यकर्ते (महिला किंवा पुरुष कार्यकर्ता) व्यवस्थित ऐकून घेतील. दोन – कोणाचे काही प्रश्न, शंका असतील किंवा वरील विषयासंबंधी काही माहिती हवी असेल तर ती त्यांना पुरवली जाईल. तीन – कोणाला एखाद्या डॉक्टरांशी बोलायचे करायचे असेल, ते वैद्यकीय सहाय्य हवा असेल तर यांना त्यांच्याशी जोडून दिले जाईल. यासाठी समाजबंधने गायनॉकॉलॉजिस्टची एक टीम तयार केली आहे. 

हे अभियान राबवत असताना चांगली माणसे जोडली गेली आहेत. ठरवल्याप्रमाणे कसलाही खर्च न करता आम्ही हे अभियान राबवू शकलो आहोत. (समाजबंध संस्था पूर्णपणे लोकांनी दिलेल्या मदतीवर चालते.) या अभियानात जोडल्या गेलेल्या लोकांच्या मदतीने आम्ही आरोग्य सचिव, आरोग्य मंत्री अशा धोरणकर्त्या व्यक्ती, तसेच स्टेक होल्डर्स यांना ईमेल करण्यासाठी खास ‘ईमेल अवर’ (Email hour) ठेवला होता. त्याद्वारे समाजबंधच्या लेटरहेडवरून प्रत्येकाला असंख्य ईमेल पाठवले गेले आहेत. 

मासिक पाळीवरून समाजात जो भेदभाव केला जातो. तो होऊ नये यासाठी राज्य सरकारने काही कायदे, मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात असे काही मुद्दे या मेलमध्ये आहेत. याआधीही संस्थेने खेडेगावात जाऊन बऱ्याच ठिकाणी समुपदेशन सत्रे, प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा घेतल्या आहेत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेले हे पहिलेच अभियान आहे. अभियानात गोळा केलेला सर्व डेटा पुढील कामात नक्कीच उपयोग पडेल. सिंहगड लॉ कॉलेज आणि लोकबिरादरी मित्रमंडळ पुणे व इतर अनेक संस्थांनी या अभियानाच्या आयोजनात सक्रिय भूमिका बजावली. पुढल्या काही वर्षांत आम्ही तयार केलेले ‘आशा पॅड’ म्हणजेच ‘कापडी पॅड’ आणि मेन्स्ट्रुअल कप कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. मी आणि शर्वरी सध्या रायगड जिल्ह्यातील कातकरी-ठाकर आदिवासी भागात राहून तेथील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याबरोबर आरोग्य राखण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी काम करत आहेत.    
- सचिन अाशा सुभाष, संस्थापक, समाजबंध

संबंधित बातम्या