माझी गोधडी

सुजाता थोरात    
सोमवार, 29 मार्च 2021

उपक्रम

नुकत्यात पार पडलेल्या ‘इंडिया इंटरनॅशनल क्विल्ट फेस्टिव्हल’मध्ये पुण्याच्या सुजाता थोरात यांनी तयार केलेल्या ‘बिटवीन द लाइन्स’ या ‘क्विल्ट’ला, अर्थात गोधडीला कंटेम्पपरी विभागात विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त त्यांच्या गोधडीच्या प्रवासाविषयी...

‘गोधडी’ या शब्दातच भरपूर माया भरलेली आहे. या शब्दात खूप ऊब आहे. त्यात अनेक आठवणी दडलेल्या आहेत, आजीच्या जुन्या आठवणी. आपल्या महाराष्ट्रात गोधडीची परंपरा फारच जुनी आहे. गोधडीला ‘वाकळ’ असेही म्हणतात. अंगावर पांघरण्याचे पांघरूण. पूर्वीच्या काळी जुने झालेले मऊसूत कपडे टाकून न देता आजीचे नऊवार, आईची साडी, बहिणीचा फ्रॉक किंवा अजून घरातले काही जुने कपडे घेऊन त्यांची ठिगळे एकमेकांना जोडून मजबूत असे पांघरूण तयार होत असे. त्याला मजबुती आणण्यासाठी त्यावर दोरे घातले जात असत. हे काम बायका घरात फावल्या वेळात करत असत. त्यात खूप सुंदर सुंदर डिझाईन्स काढत असत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टाके घालत असत. अशी ही आपली पारंपरिक गोधडी तयार होत असे.

माझ्या गोधडीचीही आठवण तशीच आहे. माझ्या आजीचे नऊवार सुरेख रंगाचे आणि मऊसूत असत. आईची साडी आणि आजीचे पातळ असे मिळून त्यावर जसे जमेल तसे दोरे घालून शिवून देत असे. त्या मऊसूत पांघरुणात इतकी ऊब मिळायची की आजी आपल्याजवळ आहे असे वाटायचे. मी कित्येक वर्षे आजीच्या गोधडीच्या उबेतच काढली आहेत. काही वर्षांपूर्वी आजी गेली. पण त्या पांघरुणाची ऊब, आठवण आणि माया अजूनही माझ्या स्मरणात जशीच्या तशी आहे.

काळ बदलला आणि गोधडीचे स्वरूपही बदलले. या स्पर्धेच्या युगात आपली पारंपरिक कलासुद्धा मागे राहिलेली नाही. गोधडीने आपले असे नवीन रूप धारण करायला सुरुवात केली आहे आणि परत एकदा आपली पारंपरिक कला समोर यायला लागली आहे. ‘इंडिया इंटरनॅशनल क्विल्ट फेस्टिव्हल’ ही स्पर्धा नुकतीच पार पडली. भारतामध्ये या प्रकारची स्पर्धा २०१९ मध्ये पहिल्यांदा झाली. या वर्षी स्पर्धा जानेवारीमध्ये झाली. २०१९ साली झालेल्या स्पर्धेतल्या गोधड्या मी फेसबुकवर बघितल्या आणि तेव्हाच ठरवले की पुढच्या वेळी मी या स्पर्धेत नक्की सहभाग घेणार.

मी कलाकार आहे. त्यामुळे मला रंगांचे ज्ञान आहे. परंतु गोधडी हा विषय माझ्या करिता नवीन होता. गोधडीमध्ये काही तरी नवीन करावे हा विचार खूप दिवसांपासून डोक्यात घोळत होता. मी जेव्हा तुकडे जोडायचे तेव्हा मला त्यात चित्र दिसायचे; अनेक रचना, अनेक रंगसंगती दिसायच्या आणि मी गोधडीला चित्राचे रूप देण्याचे ठरवले.

लॉकडाउनचा हा काळ नकारात्मक गोष्टींनी भरलेला होता, तरी माझ्या करिता तो खूप सकारात्मक ठरला. याच काळात शांतपणे भरपूर विचार करून काहीतरी सर्जनात्मक काम करता आले. मी आणि माझी मैत्रीण आधीपासून गोधड्या करत होतो. पण त्याचे स्वरूप अगदी पारंपरिक होते. माझ्या गोधड्यांवर ज्या दोरे घालून द्यायच्या त्या रेखाताईंनी मला एप्रिलमध्ये फोन केला आणि म्हणाल्या, ‘ताई या लॉकडाउनमुळे आमच्याकडे कोणाकडेच काम नाही. तर थोडी पैशांची मदत कराल का?’ एक दोनदा पैसे दिले, तर त्या म्हणाल्या मी तुमचे गोधडीचे काम करून पैसे परत करीन. पण यावेळी तुम्ही आमच्या पाठीशी उभ्या राहा. मलाही वाटले मी जर आत्ता थोडी मदत केली, तर त्यांचा हातखर्च निघेल आणि माझे पण काम मला करता येईल. त्यांना आणखी पैसे देता यावे या विचारांनी मी आणखी गोधड्या करायला सुरुवात केली आणि एका मागून एक नवीन डिझाईन्स तयार झाली.

खूप दिवसांपासून माझ्या मनात विचार येत होता, की आपल्या पारंपरिक गोधडीला नवीन रूपात कसे समोर आणता येईल? गोधडीचाच वापर करुन आपल्या घरातले सौंदर्य कसे वाढवता येईल? रंगसंगती आणि सुंदर रचना केली तर ही गोधडी एक चित्र म्हणून आपण भिंतींवर लावू शकू किंवा कधी ती आपल्या टेबलचे कव्हर होऊ शकेल किंवा तुम्ही सतरंजी, कारपेट म्हणूनही तिचा उपयोग करू शकाल. मी कलाकार असल्याने मला गोधडीची वेगवेगळी रूपे दिसायला लागली आणि गोधडीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. ते फक्त पांघरूण न राहता एक कलाकृती तयार झाली. गोधडीमध्ये चौकोनी आकार खूप कमी बघायला मिळतो आणि हा आकार सहजरीत्या कुठेही वापरू शकतो, म्हणून मी तोच आकार जास्त करायचे ठरवले. गोधडी आपल्या घरातल्या सौंदर्याचा एक भाग झाली पाहिजे आणि घरातली रचना आकर्षक दिसावी हाच उद्देश ठेवून काम करायला सुरुवात केली.

गोधडीच्या या स्पर्धेत गोधडीचा कोणता आकार असावा हे बंधन नव्हते. पण ती तीन स्तरांची असावी हे बंधन होते. त्यात वेगवेगळ्या सहा श्रेणी होत्या. प्रत्येक श्रेणीमध्ये दोन गोधड्या पाठवता येणार होत्या. मी माझी एन्ट्री कंटेम्पररी विभागात पाठवली होती. ‘बिटविन द लाइन्स’ हे शीर्षक दिले होते. ही गोधडी मॉडर्न क्विल्ट केली होती. ही गोधडी तयार करायला मला जवळजवळ दोन महिने लागले. मी एका लहान चौकोनापासून सुरुवात केली आणि पुढे ती चार फूट बाय चार फुटापर्यंत वाढवली. अनेक रंगांच्या कपड्यांचे तुकडे वापरले. रचना तयार झाली. मग त्यावर मशीनने अनेक दोऱ्यांनी रेषा मारल्या. मग काही रिकाम्या जागी हाताने धावदोरे घातले. जोपर्यंत वाटत नव्हते की काम पूर्ण झाले, तोपर्यंत काम करत गेले. स्पर्धेकरिता पाठवायचे ठरवले होते, म्हणून फिनिशिंगकडे पण खूप लक्ष ठेवले... आणि गोधडी रूपातली सुंदर कलाकृती तयार झाली, ज्याच्यासाठी मला ‘ऑनरेबल मेन्शन रेकग्निशन’ मिळाले आहे. 

माझ्या या गोधडीच्या प्रवासात माझा नवरा प्रशांत याने मला खूप साथ दिली. त्यामुळेच मी आज इथे पोहोचू शकले. असे नवीन नवीन प्रयोग आत्ताच्या पिढीने नक्कीच करायला हवेत. म्हणजे आपली पारंपरिक कला पण जोपासली जाईल आणि नवीन कलेचा त्यातून जन्म होईल. नवीन रूपात एखादी कला समोर आली की तिची मागणी पण आपसूकच वाढेल. रोजगाराच्या दृष्टीने त्याचा विचार होईल आणि आपल्या पारंपरिक कलाही जपल्या जातील.

 क्विल्ट फेस्टिव्हल
या वर्षीचा ‘इंडिया इंटरनॅशनल क्विल्ट फेस्टिव्हल’ चेन्नईमध्ये झाला. हा फेस्टिव्हल दर एक वर्षाआड होतो. २०१९ला पहिल्यांदाच फेस्टिव्हल भारतात झाला. या फेस्टिव्हलमध्ये देशोदेशीचे कलाकार सहभागी होत असतात. कंटेम्पररी, ट्रॅडिशनल, इंडियन, थीम, जनरेशन नेक्स्ट आणि मिनिएचर क्विल्ट अशा सहा विभागांमध्ये स्पर्धा घेतली जाते. त्याशिवाय कलाकारांसाठी कार्यशाळा, व्याख्याने आयोजित केली जातात. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ३०० स्पर्धकांनी भाग घेतला होता.

संबंधित बातम्या