बिबट्यांना ‘कॉलर’!

 सुनील लिमये
गुरुवार, 25 मार्च 2021

उपक्रम  

मानव आणि बिबट्यांच्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर बिबटे घनदाट मानवी वस्तीमध्ये कसे राहतात? ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे जातात? मनुष्य वस्ती ते कसे टाळतात? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने सुरू केला आहे. त्यासाठी बिबट्यांच्या गळ्यात कॉलर लावून त्यांच्या हालचालींचा अभ्यास करण्यात येणार आहे.

माणसाच्या बाबतीत त्याच्या शर्टाची ‘कॉलर’ ही एक प्रतिष्ठेची गोष्ट आहे. पण एखाद्या माणसाच्या शर्टाची ‘कॉलर’ कशी आहे, हा सर्वसामान्यतः फारसा चर्चेचा विषय नसतो. परंतु, जेव्हा वन्यप्राण्यांना कॉलर लावली जाते तेव्हा मात्र हा विषय चर्चेचा होतो; ही कॉलर लावून काय केले जाते, अशी विचारणा होते. विशेषतः मुंबईसारख्या दाट वस्तीच्या महानगरात बिबट्या मनुष्य वस्तीजवळ अगदी आरामशीर राहतो, हे समजल्यावर चर्चेला उधाण येते, की हे बिबटे या घनदाट मानवी वस्तीमध्ये कसे राहतात? या बिबट्यांचा जंगलातला अाणि मानवी वस्‍तीतला वावर कसा असतो? म्हणजेच ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे जातात? ते मनुष्य वस्ती कसे टाळतात? मनुष्याबरोबरचा संघर्ष ते कसा टाळतात? याच सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठीच बिबट्यांना कॉलर लावण्यात येत आहे. त्यासाठी ‘Understanding urban leopard and their interaction with people in Mumbai using GPS telemetry’ हा दोन वर्षांचा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन, वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट यांच्या सहकार्याने व काही कॉर्पोरेट संस्थांच्या मदतीने फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात आला आहे.  

दहा वर्षापूर्वी माळशेज घाटामध्ये रेडिओ कॉलर लावून सोडण्यात आलेला व ‘आजोबा’ या नावाने प्रसिद्ध असलेला बिबट्या असाच घाट रस्त्यातून, रेल्वे रुळांवरून, राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर तो वसई खाडी पोहून तुंगारेश्वर व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जा-ये करीत होता. परंतु दुर्दैवाने त्याचा घोडबंदर येथे अपघातामध्ये मृत्यू झाला. मुंबईमधील दाट लोक वस्तीमध्ये हे बिबटे चांगल्या पद्धतीने राहत आहेत व ते त्यांच्या परीने मानवाबरोबर संघर्ष करण्याचे टाळतात, हे आत्तापर्यंतच्या अभ्यासावरून दिसूनही आले आहे. परंतु, बिबट्या हा अत्यंत लाजाळू प्राणी असल्याने तो कोठून कोठे व कसा हिंडताे, हे मात्र कळणे बऱ्याचदा दुरापास्त होत आहे. मानवी वस्‍तीत वावरताना हे ‍बिबटे अत्यंत रहदारीच्या जागेतून वाहनांना कसे शिताफीने चुकवतात, तसेच दाट लोकवस्तीतून मानवाशी संघर्ष टाळत कसे जीवन जगतात, हेच समजून घेण्यासाठी हा प्रकल्प आता कार्यान्वित झालेला आहे.  

अवकाशातील उपग्रहाद्वारे बिबट्यांचा मागोवा घेऊन मग त्यांच्या ठिकाणाविषयी माहितीचा संदेश देणाऱ्या रेडिओ कॉलर्स दोन नर बिबटे आणि तीन मादी बिबटे अशा एकूण पाच बिबट्यांना या दोन वर्षांच्या कालावधीत बसविण्यात येणार आहेत.  या प्रकल्पात खालील मुद्द्यांचा अभ्यास हाेईल.

१. मानव-वन्यजीव एकमेकांशी कसे संबंध ठेवतात व एकमेकांच्या उपस्थितीमध्ये कसे वागतात? 
२. बिबटे महत्त्वाचे रस्ता मार्ग, नद्या, रेल्वे रूळ, खाड्या, नाले, मानवी वस्त्या इत्यादी कशाप्रकारे ओलांडून प्रवास करतात?
३. बिबटे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व त्या लगलतचा परिसर, जसे उत्तरेकडील वसईची खाडी आणि दक्षिणेकडील आरे कॉलनी, फिल्मसिटी या परिसराचा कसा वापर करतात?
४. या बिबट्यांच्या सर्व प्रवासात त्यांचा मानवाशी कमीतकमी संघर्ष व्हावा यासाठी प्रशासनाला माहिती व व चांगल्या व्यवस्थापनासाठी सल्ला देणे हादेखील उद्देश आहे आहे.
बिबट्या हा मूळचाच लाजाळू प्राणी असल्यामुळे व तो अत्यंत हुशारीने मानवी वस्तीजवळ राहात असल्यामुळे तो आपल्याला वारंवार दिसणेही अवघड असते. तो जेव्हा दिसतो, तो अचानकच दिसतो. त्यामुळे त्याच्या अस्तित्वाचा व संचाराचा नियमितपणे शोध घेणे हे एक मोठेच काम आहे व त्यासाठीच या प्रकल्पाची आपल्याला खूप मोठी मदत होणार आहे.

महाराष्ट्रातील बिबट्या-मनुष्‍य संघर्षाची माहिती घेताना असे दिसून आले आहे, की २०२० मध्ये एकूण १७३ बिबटे मृत्युमुखी पडले. त्यापैकी ८५ नैसर्गिक कारणांनी, ६४ विविध अपघातांत (६४ विविध   अपघातांपैकी २९ वाहनांच्या अपघाताने, २५ विहिरीत पडून, ३ रेल्वे रूळ ओलांडताना व ७ इतर अपघातात), १७ शिकारीमुळे, तर ७ विजेच्या तारांचा धक्का बसल्याने मृत पावले आहेत. सन २०१९ मध्ये हाच आकडा ११० एवढा होता. म्हणजेच २०२० मध्ये बिबट्यांचे मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसून येते. हे बिबटे कोणकोणत्या भागात मृत्यू पावले आहेत हे पाहता, २०२० मध्ये १७३ पैकी नाशिक परिसरात ७०, कोल्हापूर परिसरात २६, पुणे परिसरात २६, विदर्भात २९ व इतर ठिकाणी २२ बिबटे मृत्युमुखी पडले. सन २०१९ मध्ये बिबट्याशी झालेल्या संघर्षात आठ माणसांचा मृत्यू झाला, तर २०२० मध्ये डिसेंबरपर्यंत या संघर्षात २३ माणसांचा मृत्यू झालेला आहे. 

एकंदरीत बिबट्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्याच्या अधिवासात मानवामुळे होणाऱ्या बदलामुळे त्याचा मनुष्याबरोबर होणारा संघर्ष दिवसेंदिवस वाढला आहे व या संघर्षात मनुष्याबरोबर बिबट्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी व या दोन्ही बाजूंचे मृत्यू रोखण्यासाठी शासनाने बरेच उपाय योजले आहेत. नुकसान भरपाई देणे, स्थानिकांनी वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी जाऊ नये म्हणून जनजागृती करणे, स्थानिकांनी जळण गोळा करण्यासाठी जंगलात जाऊ नये म्हणून म्हणून स्वयंपाकासाठी एलपीजी देणे, वन क्षेत्राबाहेर पण जंगलाच्या जवळच स्थानिकांच्या जनावरासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे, वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखणे व स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्थानिकांमध्ये जनजागृती करणे, वन्यप्राण्यांच्या मनुष्य वस्तीजवळील फिरण्यावर संनियंत्रण ठेवणे इत्यादी बऱ्याचशा बाबी वन विभागाने/शासनाने हाती घेतल्या आहेत. 

हे सर्व करीत असताना याच बिबट्याचा संचार वनात व वनक्षेत्राबाहेर मानवी वस्तीत कसा व कोठे होतो,  याबाबतची निश्चित अशी माहिती मात्र फारच कमी उपलब्ध आहे असे दिसून आले. त्यातूनच मोठमोठ्या शहरांमध्ये जेथे दाट वस्ती आहे व जेथे बिबट्यांचा संचार जास्त आहे अशा ठिकाणी या सर्वच बाबींचा अभ्यास करणे जरुरीचे असल्याने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.याआधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्याचा Leopard Monitoring and Density हा प्रकल्प काही वर्षांपूर्वीच राबविण्यास सुरुवात झाली होती. त्याआधारेच आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व परिसरात किमान ४७ बिबटे वावरत आहेत याची माहिती, म्हणजेच त्यांच्या अस्तित्वाबाबत माहिती गोळा करता आली होती. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे रेडिओ कॉलरिंग किंवा टेलेमेट्री स्टजिज्‌द्वारा करण्यात येणारा हा प्रकल्प. बऱ्याच जणांना मायक्रो चीप हा प्रकार व त्याचा उपयोग माहिती असतो. परंतु, ही मायक्रो चीप बिबट्याच्या शेपटीखाली बसविली की तो कोणता बिबट्या आहे एवढेच कळून येते. परंतु तो बिबट्या कुठे असतो? तो काय करतो? कुठे हिंडतो? हे मात्र कळत नाही. आता मात्र या प्रकल्पामध्ये बिबट्यांना एकदा रेडिओ कॉलर बसवली की ते कोणकोणत्या भागात व कसे हिंडतात हे आपल्याला कळेल व आपला उद्देश साध्य होईल.  

फेब्रुवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यापासूनच या प्रकल्पाची सुरुवात क्षेत्रीय कामाद्वारे सुरू करण्यात आली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उत्तरेकडील, म्हणजेच ठाणे व पालघर जिल्ह्याच्या भागाकडील एक नर बिबट्या व राष्ट्रीय उद्यानाच्या दक्षिणेकडील म्हणजेच फिल्मसिटी, आरे कॉलनी भागाकडील एक मादी बिबट्या यांना पकडण्याचे निश्चित करण्यात आले. त्यांच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर नजर ठेवून, कॅमेरा ट्रॅप लावून त्यांना यशस्वीरीत्या व सुरक्षितपणे कसे पकडता येईल व त्यानंतर त्यांना रेडिओ कॉलर कशा लावता येतील, याची निश्चिती करण्यात आली. ‘सावित्री’ला, जिची २०१९ पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील अभ्यासादरम्यान कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद झाली होती, पकडण्यात २० फेब्रुवारीला रोजी यशही आले. ही मादी साधारणतः अडीच ते तीन वर्षांची असून तिच्या गळ्याभोवती जीपीएस असलेली कॉलर बसवून तिला त्याच दिवशी जंगलामध्ये सोडण्यात आले. तेव्हापासून जवळजवळ तीन आठवड्यांच्या कालावधीत ती राष्ट्रीय उद्यानाच्या दक्षिणेकडील पाच ते सात चौ.कि.मी. क्षेत्रात निर्धास्तपणे हिंडते आहे. त्यानंतर २२ फेब्रुवारीला राष्ट्रीय उद्यानाच्या उत्तरेकडील भागात सहा ते आठ वर्षे वयाच्या ‘महाराजा’ या नर बिबट्याला पकडून त्याच्या गळ्याभोवती जीएसएम असलेली कॉलर बसवून त्यालादेखील जंगलात सोडण्यात आले. आता तीन आठवड्यांनंतर तो उत्तरेकडील २० ते २५ चौ.कि.मी. क्षेत्रात निर्धास्तपणे हिंडत असल्याचे दिसून आले आहे. या नर बिबट्याचे दर १५ मिनिटांचे Location मिळत असल्याने तो कशा प्रकारे हिंडतो? कशा प्रकारे रस्ता, डोंगर, दऱ्या पार करतो? हे आता कळू लागले आहे. तर दक्षिणेकडील भागातील ‘सावित्री’ मादी तिच्या मूळ क्षेत्रातच उन्हात झाडाखाली आराम करून संध्याकाळी या सर्व परिसरात कशी हिंडत आहे, हे फार चांगल्यारीतीने कळू लागले आहे. पावसाळ्यानंतर म्हणजेच सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये आणखी तीन बिबट्यांना अशाच रेडिओ कॉलर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील एक ते दीड वर्षात आपल्याला या लाजाळू, मानवाबरोबर अत्यंत सहजतेने जगू पाहणाऱ्या, पण दुर्दैवाने प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागणाऱ्या या वन्यप्राण्याबाबत व त्यांच्या मानवासोबतच्या संघर्षविरहित सहजीवनासाठी निश्चित उपाय करण्यासाठी काही ठोस बाबी निश्चित मिळू शकतील असा विश्वास आहे. (लेखक महाराष्‍ट्र राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आहेत.)
 

संबंधित बातम्या