ऱ्हास, असंतुलन आणि उपाय 

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
मंगळवार, 11 जून 2019

पर्यावरण संवर्धन
पर्यावरणाचे संतुलन ढासळते आहे. ते का आणि कसे हे सांगणारी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांची वेळीच दखल घेऊन योग्य ती पावले उचलणे आवश्‍यक आहे. पर्यावरणाची जपणूक करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.

आपल्या आजूबाजूचे नैसर्गिक पर्यावरण लक्षणीय वेगाने बदलते आहे. पूर्वी पर्यावरणात होणारे नैसर्गिक बदल सहजासहजी लक्षात येत नसत, पण गेल्या काही वर्षांतल्या, विशेषतः विसाव्या शतकाच्या अखेरीच्या आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या घटना पाहता पर्यावरणातील बदलांची प्रक्रिया जलद होऊन बदलांचा वेगही खूपच वाढल्याचे जाणवते आहे. पर्यावरणात होत असलेले हे बदल कशामुळे होत आहेत आणि ते समजून घेण्याची एवढी निकड का आहे, याची काही कारणे आहेत. आजच्या हवामानाशी आणि वातावरणाशी विसंगत वाटणाऱ्या घटना, वृक्ष, प्राणी, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती (Behavior), अस्तित्वासाठी अनुकूल नसणाऱ्या परिस्थितीतही जिवंत राहण्याची त्यांची धडपड याची अजूनही समाधानकारक अशी न मिळालेली उत्तरे हे यातले महत्त्वाचे कारण आहे. पर्यावरणांत भूशास्त्रीय काळांत झालेले बदल सर्वत्र एकाच वेळी घडले, की वेगवेगळ्या कालखंडांत व विविध ठिकाणी झाले हे नक्की करणे हेही एक कारण आणि या घटनांच्या अभ्यासातून पर्यावरणीय बदलांचा जागतिक इतिहास उकलणे हे तर सर्वांत महत्त्वाचे कारण होय. 

अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, उन्हाळ्यांची वाढती तीव्रता, नदीपात्रांतील गाळाचे वाढते प्रमाण, विध्वंसक वादळांची वाढती संख्या, भूजलाच्या वारंवार बदलत्या पातळ्या आणि समुद्राचे किनारी भागातले वाढते आक्रमण या कोणाच्याही सहजपणे लक्षात याव्या अशा घटना आहेत. काही घटना अशा आहेत, ज्या सहजपणे दिसून येत नाहीत. थोड्याशा काळजीपूर्वक अभ्यासानंतर आणि निरीक्षणानंतर त्या लक्षात येतात व त्यांतील बदलांची दिशा आणि तीव्रताही समजते. आर्क्‍टिक आणि अंटार्क्‍टिक; तसेच ग्रीनलॅंड प्रदेशांतील समुद्रपृष्ठावरील बर्फाची कमी होणारी जाडी, महासागर, आखाते व उपसागर यांतील जलचरांच्या संख्येत होणारे बदल, त्यांच्या नष्ट होणाऱ्या जाती-प्रजाती, वाळवंटे आणि अरण्य प्रदेशांच्या बदलत्या सीमा, वनस्पतींचे झपाट्याने बदलणारे साहचर्य (Association) आणि हवामानांत व समुद्रपातळीत होत असलेले बदल पर्यावरण तज्ज्ञांना गेली काही वर्षे अस्वस्थ करीत आहेत. या घटना ज्या वेगाने घडत आहेत, तो वेग तर जास्तच काळजी वाढवणारा आहे. 

प्राचीन काळापासून असे अनेक प्रकारचे पर्यावरणीय बदल पृथ्वीवर होत आले आहेतच; मात्र, त्यावेळी या बदलांची गती खूप संथ होती. दहा लाख वर्षांपासून पृथ्वीवर झालेले पर्यावरणीय बदल खूपच आश्‍चर्यकारक आहेत. अतिप्राचीन बदलांचा कालखंड २५ कोटी वर्षे इतका विस्तृत असल्याचे सिद्ध झाले आहे. प्राचीन काळांतील बदलांचा कालखंड एक हजार वर्षे, तर अर्वाचिन (Recent) काळांत हा केवळ शंभर वर्षे इतकाच होता. याचाच अर्थ असा, की अतिप्राचीन काळापासून अर्वाचिन काळापर्यंत पर्यावरणातील बदलाची प्रक्रिया हळूहळू वेगवान झाली. यावरून असेही लक्षात येते, की कमी आणि मर्यादित काळांत जास्त आणि वेगवान बदल होण्याची वृत्ती निसर्गात वाढीस लागलेली आहे. सध्याच्या काळात (Modern period) बदलाचा हा कालखंड फक्त १० ते १५ वर्षे टिकून लगेचच वाढतोही आहे. 

हे बदल नैसर्गिक घटना म्हणून घडत असले तरी त्यापैकी अनेक बदल व्हायला माणूसच कारणीभूत आहे हेही आता नक्की झाले आहे. विकास, सुविधा, सुधारणा, प्रगती यांसारख्या नावांनी निसर्गात सुरू असलेल्या अमर्याद हस्तक्षेपाचा तो अटळ परिपाक आहे. पर्यावरणाचा ढासळणारा समतोल सावरण्यासाठी खूप मोठ्या प्रयत्नांची गरज आता भासू लागली आहे. 

देशभरांत आणि महाराष्ट्रातही १९९० पासूनच नदीपात्रे व खाड्या यातून होणाऱ्या वाळू रेतीच्या उपशामुळे अनेक ठिकाणी भूजल पातळी खाली जाणे, नदीपात्राच्या व खाडीच्या आजूबाजूची जमीन खचणे, लहान मोठे पूल व नदीकाठचे रस्ते ढासळणे, नदीपात्रे कोरडी पडणे, खारफुटीची वाढ खुंटणे अशा अनेकविध घटना घडत आहेत. अनेक गावात आढळणाऱ्या या समस्यांची साधी नोंदही कुठे झालेली दिसत नाही. वाळू काढलेल्या नदीपात्रात कोरड्या ऋतूत पाणी टिकून न राहण्याची समस्या मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील अनेक नद्यांत दिसून येत आहे. नदीपात्रे व खाड्यातून वाळू आणि रेती काढल्यामुळे पाणी निघून जाण्यास होणारा नैसर्गिक अडथळा दूर होतो व पाणी पात्रातून सहजपणे निघून जाते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यामुळे कायमस्वरूपी नदीप्रवाह हंगामी झाले आहेत. त्यात केवळ पावसाळ्यातच पाणी दिसते. 

समुद्रकिनाऱ्याजवळील खाड्यांतून वाळू व रेती काढल्यामुळे समुद्राचे खारे पाणी आत घुसते. यामुळे आजूबाजूच्या विहिरीतील पाण्याची क्षारता वाढते. कोकणातील अनेक खाड्यांतून गोड्या पाण्यात वाढणारे मासे व इतर जलचर खारट पाण्याच्या या आक्रमणामुळं नष्ट झाले आहेत. साधारणपणे नदी व खाडी पात्रातून वाळू व रेती उपसताना ती एक मीटरपेक्षा जास्त खोलीवरून उपसली, तर वर सांगितलेल्या सर्व समस्या उद्‌भवतात असे दिसते. काळजीपूर्वक व मर्यादित स्वरूपात आणि विशेषतः अयांत्रिक पद्धतीने वाळूचा उपसा केल्यास तसेच नदी व खाडीतील पाण्याची पातळी व खोली योग्य ठेवल्यास वाळू उपशाचे नदीपात्रावर चांगले परिणामही दिसतात. अशा वाळू उपशामुळे नदीपात्रांची जल साठवणक्षमता वाढते. नियंत्रित रेती उपशामुळे किनारी प्रदेशात पूर येण्याचा धोकाही कमी होतो. पावसाळ्यात अशा नद्या व खाड्यातून पाण्याचा पटकन निचरा होतो. 

भूजल हीसुद्धा एक महत्त्वाची नैसर्गिकसंपदा असून पिण्यासाठी, जलसिंचनासाठी, उद्योगधंद्यासाठी, नदीपात्राची जलधारण व प्रवाही क्षमता टिकून राहण्यासाठी आणि पाणथळ जागांच्या अस्तित्वासाठी भूजलाचे मोठेच योगदान असते. मात्र, आज हे भूजल माणसाच्या हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे. सर्वत्र जाणवणारा भूजलाचा तुटवडा आणि टंचाई दूर करण्यासाठी कृत्रिम भरपाईचा (Replenishment) प्रयोग होणे आवश्‍यक आहे. टंचाईचे मुख्य कारण हे कमी खोलीवरच्या जलधारक खडकांचे न होणारे पुनर्भरण आणि खोल विंधन विहिरींच्या अनिर्बंध वाढणाऱ्या संख्येमुळे खोल जलधारक खडकातील झपाट्याने कमी होणारा भूजलाचा साठा हेच आहे. 

प्रत्येक पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यानंतर उपलब्ध होऊ शकणारे भूजल आणि त्याचे संवर्धन करण्याच्या पद्धतीच्या योजना अशी सगळी माहिती त्या क्षेत्रातील सर्वच गावांना ऑक्‍टोबर - नोव्हेंबर महिन्यात दिली गेली तर ती फायद्याची ठरू शकेल. कृत्रिम भूजल भरण प्रयोगांना प्राधान्य दिले जाणेही गरजेचे आहे. भूजलाचे व्यवस्थापन हे गतिशील, सहज मोजमाप न करता येण्यासारख्या अनियंत्रित घटकांचे व्यवस्थापनच असते. ते परिणामकारकपणे करण्यासाठी ग्रामीण पातळीवर कराव्या लागणाऱ्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा हिशेब, संरक्षण आणि जलधारकाचे निश्‍चितीकरण याची माहिती स्थानिकांना योग्य वेळेत देण्यानेही या समस्येचा सामना करणे सोपे होईल. उपलब्ध भूजलाचे मूल्यमापन हे गावपातळीवर व स्थानिकांच्या सहभागाने केल्यास भविष्यातील भूजलटंचाईवर मात करता येईल असे वाटते. 

पाणथळ प्रदेश (वेटलॅंड्‌स) हे जलीय जैवविविधतेचे (Aquatic biodiversity) प्रचंड मोठे साठे असतात. परिसरीय, पर्यावरणीय आणि आर्थिक असे त्यांचे महत्त्वही खूप मोठे आहे. जगातले अनेक पाणथळ प्रदेश आज पर्यावरणीय ऱ्हासाची; विशेषतः जलप्रदूषणाची ठिकाणे म्हणून कुप्रसिद्ध होऊ लागली आहेत. जगभर आणि भारतभर पसरलेल्या पाणथळी आज शहरीकरण, प्रदूषण आणि बदलते भूमीउपयोजन यांचा खूप मोठा ताणतणाव सहन करीत आहेत. परिणामी त्यांचा भौगोलिक विस्तार आक्रसतो आहे आणि त्यांची आर्थिक, पर्यावरणीय आणि जलशास्त्रीय क्षमताही कमी होते आहे. भारतातील पाणथळीचा अभ्यास असे दाखवतो, की आपल्याकडे पाणथळ क्षेत्र संधारणाची व विकासाची कुठलीही ठोस आणि निश्‍चित यंत्रणा नाही. भारताच्या एकूण जलनीतीमध्ये या प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचे दिसते. 

झपाट्याने कमी होणारी पाण्याची प्रत ही भारतातील पाणथळ प्रदेशांची मोठी समस्या आहे. शहरे आणि शेतजमिनी यातून सतत पाणथळीत येणाऱ्या पाण्यामुळे गोड्या पाण्याच्या पाणथळ प्रदेशांची पाण्याची प्रत खालावली आहे. पाणथळ प्रदेशात असलेली झाडे, वनस्पती मोठ्या प्रमाणावर तोडली जात आहेत. यातून गाळ व मातीही काढली जात आहे. पर्यायाने इथल्या पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. समुद्रकिनारी असलेल्या खाड्यांतून तोडली जाणारी खारफुटीची झाडे हे याचे उत्तम उदाहरण आहे. शहरानजीकच्या पाणथळ भागात तर मातीची भर घालून तिथे इमारतींची बांधकामेही करण्यात आली आहेत. मुंबईजवळ अगदी कल्याण-डोंबिवलीपर्यंत आणि कोलकता, चेन्नई इथे पाणथळ जागांचा इमारतींच्या बांधकामासाठी अनिर्बंध व भरपूर वापर केला गेल्याचे आढळते. पाणथळ जागेत जी जलजिवांची पैदास होते, ती माणसाच्या त्या भागात चालणाऱ्या विविध उद्योगांमुळे कमी होऊ लागली आहे. नदीमार्गातील बंधारे, भिंती यामुळेही पूर मैदानांचा आणि नद्यांचा संबंध कमी होऊन पाणथळ प्रदेश आक्रसू लागले आहेत. सर्वच पाणथळींना त्यांचे पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्निर्माणासाठी, ती आरक्षित करणे हाच एकमेव पर्याय खूप सकारात्मक आहे . 

पृथ्वीवरचे गोड्या पाण्याचे मुख्य स्रोत पाऊस, पृष्ठजल (नदी - नाले, जलाशये) आणि भूजल हेच आहेत. पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या असलेल्या गोड्या पाण्याच्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षांत घट झालेली नसली, तरी त्याची प्रत मात्र झपाट्याने खालावत जाते आहे. भारतासारख्या देशात तर ही समस्या फार उग्र झाली आहे आणि शहरातील पाण्याप्रमाणे गावे आणि खेड्यातील पाण्याचीही प्रत बिघडते आहे. १९९१ ते २०१८ या काळात भारतातील ५८ टक्के तळी, जलाशये आणि पाणथळ जागा इतर कारणांसाठी वापरात आणल्यामुळे नष्ट झाल्या आहेत. दरवर्षी होणारा या महत्त्वाच्या जलस्रोताचा ऱ्हास २ ते ३ टक्के इतका आहे. याचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे देशांतील प्रत्येक शहरात पूरपरिस्थितीचे प्रमाण वाढले आहे. सांडपाण्याच्या अत्यंत चुकीच्या व्यवस्थापनामुळे बरेच जलस्रोत प्रदूषित झाले आहेत. निरनिराळ्या उद्योगसमूहांतून कोणत्याही प्रकारची शुद्धीकरण प्रक्रिया न करता जलस्रोतात अनेक रसायने व प्रदूषके सोडली जात आहेत आणि यावर कुठलाही कायदेशीर वचक नाही. भारतात अजूनही सगळ्या जलस्रोतांविषयी विश्‍वासार्ह अशी माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे पूर्वीचे किती जलस्रोत नष्ट झाले, किती नद्या कोरड्या पडल्या, किती आक्रसल्या, किती नद्यांचे अरुंद नाले झाले याविषयी काहीच अंदाज करता येत नाही. भूजल आणि जलजशैल यांची दुर्दशा तर वर्णन करण्यापलीकडे आहे. 

सागरी प्रदूषण ही जगातील समुद्रकिनारी प्रदेशांना भेडसावणारी एक फार मोठी पर्यावरणीय समस्या आहे. निवासी सांडपाणी, शेतजमिनीतून होणारे पाण्याचे निर्गमन, निरनिराळ्या औद्योगिक संकुलातून रसायनांचे व दूषित पदार्थांचे समुद्रात होणारे उत्सर्जन यामुळे सागरी प्रदूषण होते. किनारी प्रदूषकांचे सर्वांत जास्त प्रमाण हे नागरी वस्त्यांच्या जवळून वाहणाऱ्या नदीमुखातून म्हणजे खाड्यांतून होते. जगातील अनेक मोठ्या किनारी शहरांच्या जवळ असलेल्या वाळूच्या पुळणीवर प्रदूषण इतके प्रमाणाबाहेर वाढले आहे, की या पुळणी (Beaches) पर्यटकांसाठी व स्थानिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. रासायनिक प्रदूषके, तेलगळती, घरगुती सांडपाणी व मैलापाणी आणि इतर अनेक प्रकारच्या त्याज्य पदार्थांचे तरंगणारे गोळे, सिगारेटची थोटके, प्लास्टिकच्या पिशव्या व वस्तू यांचे प्रमाण सगळीकडेच वाढताना दिसते आहे. दवाखाने व रुग्णालये यांतून समुद्रात सोडली जाणारी त्याज्य औषधे आणि इतर वैद्यकीय वस्तूंचा कचराही मोठ्या प्रमाणावर शहरानजीकच्या किनाऱ्यांचे प्रदूषण वाढवीत असतो. किनारी व सागरी प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, औद्योगिक, रासायनिक, दूषित पदार्थांवर व तेलगळतीवर नियंत्रण अशा अनेक उपायांची गरज आज सगळ्या जगातल्या किनारी प्रदेशांना जाणवते आहे. 

पर्यावरणाचा तोल का आणि कसा बिघडला आहे ते सांगणारी ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला कुणालाही दिसून येतील. त्यांची योग्य ती दखल घेऊन पर्यावरण आणि पर्यायाने निसर्गाची जपणूक करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणे ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे.  

संबंधित बातम्या