निसर्ग रक्षणार्थ।

इरावती बारसोडे 
मंगळवार, 11 जून 2019

पर्यावरण संवर्धन
 

एप्रिल-मे महिना... सकाळी आपल्या इच्छित स्थळी पोचण्याची आपल्याला घाई असते. उन्हामुळं आधीच जीव नकोसा झालेला असतो आणि त्यातच सिग्नल लागतो. आता उन्हात एका जागी थांबायचं या विचारानं आपण आणखी वैतागतो. मिनिटभरच थांबायचं असतं, पण तरीही आपण वैतागतो. अशातच रस्त्याच्या कडेला झाडाची सावली आपल्याला दिसते आणि सावलीत थांबायचं म्हणून आपण कधी नव्हे ते झेब्रा क्रॉसिंगच्या खूप अलीकडं थांबतो. कसं छान गार गार वाटतं. झाडाला मनापासून धन्यवाद देतो आणि सिग्नल सुटला, की लगेचच सुसाट गाडी हाणतो. 

झाडाचं महत्त्व उन्हाळ्यातच आपल्याला खूप जाणवतं. सावली हे झाडानं आपल्याला दिलेलं अतिशय किरकोळ देणं आहे. झाडं पर्यावरणासाठी आणि मानवाच्या अस्तित्वासाठी किती महत्त्वाची आहेत, हे सुज्ञ जाणकारांना वेगळं सांगायला नको. सरकार दर वर्षी अमुक एक कोटी झाडं लावण्याची घोषणा करतं. त्यातली किती लावली जातात आणि किती जगतात हा मुद्दा वेगळा. झाडं लावण्याबरोबरच ती जगणं खूप गरजेचं आहे. हा कळीचा मुद्दा ओळखून अनेक संस्था आणि लोक वैयक्तिक पातळीवर कोणताही गाजावाजा न करता, स्व-खर्चातून आणि लोकसहभागातून वृक्षलागवडीचं काम अविरतपणे करत असतात. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, फक्त निसर्गाचा समतोल राहावा म्हणून! गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षलागवड करणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही ‘निसर्गमित्रां’विषयी...

देवराई फाउंडेशन 
देवराई फाउंडेशनचे विश्‍वस्त धनंजय शेडबाळे सांगतात, ‘गेली दहा वर्षं आम्ही बिया गोळा करून रोपं तयार करत आहोत. आत्ता उन्हाळ्यामध्ये खूप बिया मिळतात. ठिकठिकाणी जाऊन आम्ही त्या गोळा करतो. त्यामध्ये ५०-६० प्रकारच्या देशी झाडांच्याच बिया गोळा केल्या जातात. ताम्हण, बहावा, कांचन, अर्जुन यांसारख्या नेहमीच्या झाडांच्या बिया तर आम्ही गोळा करतोच. पण त्याशिवाय अँटिहॅरिस टॉक्‍सिकॅरिया, अग्लेया, स्टर्क्‍युलिया गटाटा यांसारख्या दुर्मिळ झाडांच्याही बिया गोळा करतो. यातलं अँटिहॅरिस टॉक्‍सिकॅरिया हे झाड अतिशय दुर्मिळ आहे. महाराष्ट्रात फारतर पन्नास एक झाडं असतील, असं वनस्पतितज्ज्ञ सांगतात. त्यातलं एक ताम्हिणीमध्ये आहे.’ 

फाउंडेशनतर्फे पुणे आणि परिसर, तसंच पुण्याबाहेरूनही बिया पुण्यात आणून इथं रोपं तयार केली जातात आणि ती रोपं पुन्हा त्या-त्या झाडासाठी योग्य असलेल्या भौगोलिक प्रदेशात नेऊन लावली जातात. कुठंही कुठलंही झाड लावून चालत नाही, ते नीट वाढत नाही. उन्हाळ्यात बिया गोळा करायच्या आणि पावसाळा सुरू झाला, की रोपं तयार करायची. ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरूच राहतं. जून-जुलैमध्ये पाऊस आला, की झाडं लावायला सुरुवात होते. मागच्या वर्षी जून-जुलैमध्ये पेरलेल्या बियांची रोपं आता या पावसाळ्यामध्ये लावली जातील. त्याशिवाय ही रोपं वाटलीही जातात, कुठल्याही मोबदल्याशिवाय. झाडं लावण्यासाठी, ती जगवण्यासाठी मार्गदर्शनही केलं जातं. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी स्वतःच्या रोपवाटिका सुरू केल्या आहेत. 

ग्रीन आर्मी
ग्रीन आर्मी हा एका सेवाभावी संस्थेचा एक छोटासा भाग. साधारण दहा वर्षांपूर्वी समाजासाठी काहीतरी चांगलं करावं, या हेतूनं आता आपणही झाडं लावायची असं ठरवून त्यांनी सुरुवातीलाच एकदम २०० झाडं लावली. त्यातली जेमतेम २०-२५ झाडं जगली. सलग दोन वर्षं हा प्रयोग केल्यानंतर याचा काहीच उपयोग होत नाही, असं लक्षात आलं. मग त्यांनी ठरवलं, आपण झाडं लावायलाच नकोत. दुसऱ्यांनी लावलेल्या झाडांना फक्त पाणी घालू. पण त्याचाही काही फायदा झाला नाही. झाडं मेलीच. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं लावून ती एक वर्षही जगत नव्हती, सगळी मेहनत वाया जात होती. खूप सारी झाडं मेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, नुसती झाडं लावून उपयोग नाही. ती जगली पाहिजेत. मग झाडं जगवण्यासाठी खूप प्रयोग झाले आणि आता एवढ्या वर्षांनंतर एआरएआयच्या टेकडीवर बरीच झाडं जगवण्यात ग्रीन आर्मीला यश झालं आहे. 

ग्रीन आर्मीनं २०१७ च्या पावसाळ्याआधी टेकडीवरचा एक भूभाग निवडला. तज्ज्ञांकडून त्याची पाहाणी करून घेतली. म्हणजे तिथं माती आहे ना, मुरूम, दगड नाहीत ना, मुळं पसरायला वाव आहे ना, या गोष्टींची खात्री करून घेतली. चार-पाच फुटांवर १५० खड्डे खणले. तीन-साडेतीन फुटांची रोपं आणून त्या खड्ड्यांमध्ये लावली. रोपं आणताना मुद्दाम चिंच, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ अशी स्थानिक वृक्षांची रोपं आणली. सुरुवातीला एकूण १२८ झाडं लावली. त्यातली १०० झाडं जगली. उरलेल्यांपैकी काही तग धरू शकली नाहीत; तर काही बकऱ्या, शेळ्या खाऊन गेली. ही सार्वजनिक जागा असल्यामुळं इथं काही मर्यादा येतात. झाडांभोवती कुंपण वगैरे काही घालता येत नाही, तसंच २४ तास राखणही करता येत नाही. मागच्या वर्षी जी झाडं जगली नाहीत, त्यांच्या जागी नवीन झाडं लावण्यात आली. आज दोन वर्षांनंतर ११६ झाडं जगवण्यात यश आलं आहे. ग्रीन आर्मी वर्षभर त्यांची काळजी घेते. चार-पाच जणांची कोअर टीम दर आठवड्याला जाऊन झाडांकडे लक्ष पुरवते. नुसतं पाणी घालणं नाही; तर झाडांवर कीड आली तर औषधं फवारणं, खतं घालणं हे कामही केलं जातं. उन्हाळ्यामध्ये ३०-३५ जण झाडांची काळजी घेतात. उन्हाळ्यामध्ये दर आठवड्याला पाणी घालावं लागतं. एकदा पाऊस सुरू झाला, की महिनाभर झाडांकडं पाहिलं नाही तरी चालतं. या डिसेंबर महिन्यापर्यंत झाडं बरीच मोठी होतील. नंतर त्यांची एवढी काळजी घ्यावी लागणार नाही. ग्रीन आर्मीचा उद्देश हाच आहे, की नुसती झाडं न लावता ती जगणं महत्त्वाचं. प्रत्येकानं खूप नाही, पण चार-पाच झाडं लावून ती जगवली तर त्याहून सुरेख गोष्ट नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. 

निसर्गराजा मित्र जीवांचे
‘दहा वर्षांपूर्वी आम्ही काही मित्रांनी रायगडावर जाऊन बिया गोळा केल्या आणि त्याची रोपं तयार केली. तो आमचा पहिला उपक्रम. सुरुवातीच्या काळात सर्वजण शिकत असल्यानं पैशांची चणचण होती. मग, रोपं लावण्यासाठी आजूबाजूच्या घरातून दुधाच्या पिशव्या मागून आणल्या आणि त्यात रोपं तयार केली. घरासमोर आणि जिथं जागा मिळेल तिथं ही रोप जगवली,’ निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेचे माणिक धर्माधिकारी सांगत होते. किवळे येथील सुजाता आणि मुकुल दत्तानी यांनी त्याचं फार्म हाउस या तरुणांना नर्सरीसाठी वापरण्यासाठी दिलं. त्यातून मोफत रोपं देण्यासाठी लीला रोपवाटिका सुरू केली. झाडं जगविण्याचं आश्‍वासन दिल्यास देशी प्रजातींची रोपं संस्था कसलाही मोबदला न घेता उपलब्ध करून देऊ लागली. २०१७ च्या पावसाळ्यात महाराष्ट्र शासनानं चार कोटी वृक्ष लावगड केली. त्यातील पुरंदर मधील हिवरे इथं वन विभागाच्या हद्दीतील तीन हजार झाडांचं पालकत्व संस्थेनं घेतलं आहे. २०१८ मध्ये पुरंदर तालुक्‍यातील उदाची वाडी या गावात दोन हजार, तसंच कराड तालुक्‍यातील वडगाव हवेली या गावात एक हजार रोपांची लावगड केली. त्यासाठी डोंगरावर पाण्याच्या टाक्‍या ठेवून त्यावर ठिबकसिंचन व्यवस्था केली. या कामांसाठी संस्थेनं लोकसहभागातून निधी उभा केला. 

शहरातील नागरिकांना वृक्षारोपण करण्यासाठी मोफत रोपं मिळावीत यासाठी २०१८ मध्ये इतर संस्थांच्या सहकार्यानं आणि लोकसहभागातून तळावडे मधील रुपीनगर इथं सोमेश्‍वर रोपवाटिका, तसंच मारूण्जी इथं अमलताश रोपवाटिका सुरू करण्यात आल्या.

विविध सोसायट्या आणि शाळांना वृक्षारोपणासाठी मोफत रोपं उपलब्ध करून दिली जातात. शाळांमध्ये रोपवाटिका कार्यशाळा घेतल्या जातात. वन्य पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध होण्यासाठी वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी पाणवठ्यांची सुविधा तसेच पक्ष्यांसाठी धान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कामाचं स्वरूप वाढावं आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा म्हणून संस्थेनं विविध महाविद्यालयांबरोबर परस्पर सहकार्य करार केला आहे. संस्थेच्या ‘हर मोके पे पेड’ या उपक्रमाअंतर्गत विविध सण, वाढदिवस, लग्न समारंभ, विविध कंपन्यांच्या कर्मचारी संमेलनाच्या प्रसंगी भेट म्हणून औषधी वनस्पतीची रोपं भेट म्हणून देण्यासाठी लोकांना मोफत रोपं उपलब्ध करून प्रोत्साहित करण्यात येतं. संस्थेला या कामांसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

निगडी प्राधिकरणात माझी छोटी रोपवाटिका आहे. तिथं रोपं तयार करून वाटतो. त्याशिवाय प्राधिकरणाच्या सेक्‍टर १७ मध्ये २००८ पासून झाडं लावतो आहे. आतापर्यंत मी एकट्यानं ३५ मोठी झाडं जगवली आहेत. बकुळ, जांभूळ, बहावा, ताम्हण, पळस, पिचकारी, सीता अशोक, बूचपांगारा अशी स्थानिक झाडंच लावली आहेत. चेरीही लावली आहे. त्यातील बकुळ, बहावा, चेरी, पळस ही झाडं चांगली मोठी झाली आहेत. जांभूळ, चेरी यांसारख्या झाडांमुळं पक्ष्यांना अन्न मिळतं. लतादीदींच्या वाढदिवसाच्या दिवशीही मी झाड लावलं आहे. त्याशिवाय इतर काहीजणांचे वाढदिवसही झाडं लावून साजरे केले आहेत. 
नर्सरीमध्ये रोपं तयार करून आम्ही लोकांना देतो, तेव्हा एकच अपेक्षा असते, की लोकांनी त्या झाडाला आपल्या मुलाप्रमाणं किमान तीन वर्षं तरी जपावं. झाडाला स्वतःचं मूल मानलं, की आपुलकी निर्माण होते आणि व्यवस्थित काळजी घेतली जाते. झाड कसं वाढतंय याचा पाठपुरावा करण्यासाठी झाडाचा तीन महिन्यांतून एकदा फोटो पाठवा, असं आम्ही लोकांना सांगतो. शक्‍य असेल तिथं स्वतः जाऊन झाडं बघतो, गरज असेल तर मार्गदर्शन करतो. 
- लालासो माने

देशी वनस्पतींचा प्रसार करण्यासाठी मी गेली अनेक वर्षं रोपं तयार करून फुकट वाटतो आहे. पूर्वीचं जंगलं तुटलं, त्यात स्थानिक झाडं तुटली. त्यामुळं निसर्गाचं संतुलन बिघडलं. विदेशी झाडांमुळं पक्ष्यांना अन्न मिळणं बंद झालं. पक्षी कमी झाले, की निसर्गाचं सगळं चक्रच बिघडतं. विदेशी झाडांचा पक्ष्यांना उपयोग नाही. म्हणूनच हे अंतर भरून काढण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केला. काटेसावर, हिरडा, बेहडा, बाभळी, वड, पिंपळ, आवळा यांसारख्या झाडांमुळं पक्ष्यांना बारा महिने खाद्य मिळतं. परिसंस्थेचं संतुलन बिघडत नाही. लोकांमध्ये देशी वनस्पतींविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी रोपं देताना मी एक पैसाही घेत नाही. कारण, निसर्गाचं ऋण सर्वांत मोठं आहे; त्यानं आपल्याला, आपल्या आई-वडिलांना आणि त्यांच्या आधीच्या सगळ्या पिढ्यांना जगवलं आहे. वनस्पती, निसर्ग ही शाश्‍वत संपत्ती आहे. 
पुण्याच्या आसपास साधारण ३०० प्रकारच्या झाडांच्या प्रजाती आहेत. आता दरवर्षी जाऊन कुठलं झाड कुठं आहे, हे माहीत झालं आहे. या झाडांच्या नोंदी ठेवलेल्या आहेत. प्रत्येक झाडाचं निसर्गचक्र नोंदवून ठेवलं आहे. अनेक लोक, संस्था बिया गोळा करायला मदत करतात. एवढ्या वर्षांमध्ये हजारो लोकं जोडली गेली आहेत. ज्याला जी रोपं हवीत, ज्या बिया हव्यात त्या आम्ही देतो. कुठलीही अट नाही. काही वेळा बिया/रोपांची अदलाबदलसुद्धा करतो. म्हणजे, माझ्याकडं काटेसावरच्या बिया असतील आणि दुसऱ्याकडं बहाव्याच्या बिया असतील, तर बियांच्या बदल्यात बिया देतो. कुठलीही बी वाया जाऊ नये, असा प्रयत्न असतो. बिया, रोपं देऊन आम्ही फक्त खारीचा वाटा उचलतो. झाड नेऊन ते जगवणं ही त्या-त्या व्यक्तीची जबाबदारी आहे. 
- रघुनाथ ढोले  

संबंधित बातम्या