वन्यजीव सांभाळतात पर्यावरण
पर्यावरण संवर्धन
आजचा विषय ‘पर्यावरण संवर्धनात वन्यजीवांचा सहभाग’ हा आहे. निसर्ग हा स्वतः एक उत्कृष्ट इंजिनिअर आहे. गोष्टी घडवणं व बिघडवणं हे त्याला अगदी फक्कड जमतं. त्यातले विविध जीव निसर्गाच्या समतोलात आपापल्या परीनं योगदान देत असतात... अगदी नकळत. ‘सकाळ साप्ताहिक’मधील ‘निसर्गकट्टा’ या माझ्या लेखमालेमधून मी आत्तापर्यंत वनस्पती, उत्क्रांती, कीटक अशा विविध गोष्टींना स्पर्श केलेला आहे. ही लेखमाला यापुढेही सुरू राहणार आहेच, पण आजच्या या विषयाच्या निमित्ताने चर आणि अचर असे दोन्ही वन्यजीव निसर्गाचा समतोल कसे सांभाळतात, याबद्दल ‘परदेशात घडलेली एक’ आणि ‘आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असलेली एक’ अशा दोन गोष्टी बघूया... १९७२-७४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सभेत मंजूर झालेला पर्यावरण दिन दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी जगभर मोठ्या उत्साहानं साजरा झाला, त्यानिमित्त हा खास लेख...
अमेरिकेतल्या वायोमिंग, इडाहो आणि माँटाना या तीन राज्यांमध्ये पसरलेल्या यलोस्टोन नॅशनल पार्क या अजस्र राखीव क्षेत्रात घडलेली ही घटना आहे. आपल्याला कल्पना आहेच, की फूड पिरॅमिडमध्ये प्रोड्युसर्स म्हणजे वनस्पती जेवढ्या महत्त्वाच्या आहेत, तेवढेच महत्त्वाचे आहेत त्या पिरॅमिडच्या सर्वोच्च स्थानी असलेले भक्षक (एपेक्स प्रेडिटर्स). यातला एक घटक जरी कमी झाला, तरी निसर्गात असमतोल व्हायला सुरुवात होते. हळूहळू एकेक चिरा ढासळू लागतो व त्या परिसराची तब्येत खालावते. याला ‘ट्रॉफिक कॅस्केड’ असं म्हणतात. यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये अगदी असंच झालं होतं. या पार्कमध्ये एपेक्स प्रेडिटर्स होते लांडगे. तिथल्या रानांमधून, दऱ्याखोऱ्यांमधून आणि गवताळ प्रदेशांमधून मुक्तपणे हिंडणाऱ्या लांडग्यांच्या अस्तित्वावर युरोपियन लोकांच्या प्रवेशानंतर गदा यायला सुरुवात झाली. गेम हंटिंग ही जगभर प्रचलित असलेली अगदी प्राचीन पद्धत. म्हणजे आनंदासाठी शिकार. आपल्याकडच्या जुन्या कथांमध्येसुद्धा नाही का राजे मृगयेला जात! पण याच्याच बेबंद हैदोसामुळं पर्यावरणाच्या असमतोलाची सुरुवात झाली. लांडग्यांचं अस्तित्व असेपर्यंत तिथल्या सर्व सिस्टिम्स अगदी सुरळीत चालू होत्या. लांडगे नाहीसे झाल्यावर तिथल्या एल्क नावाच्या हरणांची संख्या बेसुमार वाढू लागली. त्यांच्या अमर्याद चराईमुळं छोट्या वनस्पती व गवत नाहीसं होऊ लागलं. यामुळं मातीची धूप होऊ लागली. कायोटीसारख्या लांडग्यांच्याच कुळातल्या छोट्या शिकारी प्राण्यांची संख्या वाढू लागली व त्याचा परिणाम ससे, उंदीर अशा छोट्या प्राण्यांच्या संख्येवर झाला. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं अशी ही साखळी हळूहळू तुटायला लागली व त्याचे परिणाम निसर्गाच्या घसरलेल्या दर्जावर दिसायला लागले. माणसांच्या अवकृपेमुळं जवळजवळ सत्तर वर्षं त्या भागात लांडग्यांचं अस्तित्वच नव्हतं. या ट्रॉफिक कॅस्केडवर उपाय म्हणून माणसांनी एल्क, कायोटी यांची शिकार सुरू केली आणि एकदिवस त्यांचीही संख्या धोकादायक पातळीपर्यंत खाली आली. शेवटी निसर्ग जे करू शकतो ते मनुष्य कदापि करू शकत नाही, याची जाणीव झाल्यावर या सगळ्यांच्या संरक्षणासाठी १९७३ मध्ये कायदा निर्माण करण्यात आला. यलोस्टोनमधल्या शिकारी थांबवल्या गेल्या, परंतु तरीही निसर्गाची तब्येत काही सुधारताना दिसेना. यावर इलाज म्हणून शेवटी १९९५ मध्ये कॅनडा तसंच इतर राज्यांमधून लांडगे आणून या पार्कमध्ये सोडण्यात आले. यानंतर मात्र निसर्गानं आपलं काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला जरी संख्या कमी असली, तरी लांडग्यांनी या प्रदेशात आल्यानंतर एल्कच्या शिकारीला सुरुवात केली. यामुळं एल्कच्या वागणुकीत मोठा बदल झाला. लांडगे असलेले प्रदेश एल्क टाळू लागले. विशेषकरून ते जिथं ट्रॅप होऊ शकतात, असे दऱ्याखोऱ्यांचे प्रदेश ते टाळू लागले. लांडग्यांच्या भीतीनं त्यांचा पिल्लं जन्माला घालायचा दरही खालावला. एल्कची संख्या कमी झाल्यावर त्या प्रदेशात पुन्हा गवत तसंच झुडुपं जोमानं वाढू लागली. काही काही वनस्पतींची उंची तर सहा वर्षांमध्ये पाचपट झाली. उजाड, ओसाड प्रदेशांमध्ये ॲस्पिन, विलो आणि कॉटनवूड या तिथल्या स्थानिक वनस्पती मुबलक दिसू लागल्या. वनस्पतींची संख्या वाढल्यावर तिथं पक्ष्यांची संख्या वाढू लागली. विशेषकरून स्थलांतरित पक्ष्यांना हक्काचं घर मिळालं. वनस्पती वाढल्यामुळं तिथं बीव्हर्सची संख्या वाढू लागली. बीव्हर्स हे ऑटर्ससारखे (हुदळे) पाण्यात राहणारे, परंतु उंदरांच्या कुळातले शाकाहारी जीव आहेत. हे जीव नद्यांच्या प्रवाहांमध्ये फांद्या व ओंडक्यांपासून धरणं बांधून पाणी अडवतात (आपण करतो तसा प्रवाह पूर्णपणे थांबवत नाहीत) व त्या अडलेल्या पाण्याच्या मध्यभागी फांद्यांच्या ढिगापासून केलेलं घर बांधतात. या घराला पाण्याच्या खालून प्रवेशद्वार असतं. तर, या बीव्हर्सची संख्या वाढल्यामुळं पाणी अडवलं जाऊ लागलं. यामुळं ऑटर्स, मासे, सरीसृप, उभयचर तसंच इतर जलचरांची संख्या वाढू लागली. याचबरोबर लांडग्यांनी कायोटींच्या संख्येवर नियंत्रण आणायला सुरुवात केल्यामुळं तिथं उंदीर व सशांची संख्या वाढायला लागली. यामुळं त्यांच्यावर पोट भरणारे ससाणे, गरुड असे विविध शिकारी पक्षी येऊ लागले. लांडग्यांच्या उरलेल्या शिकारीवर ताव मारायला कावळे, बाल्ड ईगल हेही तिथं आढळू लागले. फलधारी वनस्पतींची संख्या वाढल्यामुळं तिथं अस्वलं येऊ लागली व तीही काही प्रमाणात एल्कच्या पाडसांची शिकार करून शाकाहारींची संख्या नियंत्रणात ठेवू लागली. परंतु, याहून सर्वांत मोठी गोष्ट काय झाली असेल, तर लांडग्यांनी चक्क नदीचा स्वभाव बदलला. वनस्पतींमुळं मातीची धूप थांबली. त्यामुळं नद्यांचे काठ जास्त भक्कम झाले. नद्यांची वळणं कमी झाली. नद्यांचं पात्र मर्यादेत राहिलं. नद्यांमध्ये जास्त जलाशय निर्माण झाले. थोडक्यात, लांडग्यांनी फक्त तिथली निसर्गव्यवस्थाच सुरळीत केली असं नाही, तर त्यांनी तिथल्या भूरचनेचीही दुरुस्ती केली. ‘काय फरक पडणारे नसले वाघ तर?’ असं अनेकांना अज्ञानापोटी म्हणताना मी ऐकलं आहे. ‘एपेक्स प्रेडिटर’ नसेल तर फरक पडतो. खूप मोठा फरक पडतो. अमेरिकेनं हे अनुभवलं आहे. आपल्यावर हा अनुभव घेण्याची वेळ कदापि येऊ नये. आता आपण दुसरं उदाहरण पाहू... हे आहे एका झाडाचं. एक झाड किती प्रकारच्या जिवांना आसरा देत असतं, किती प्रकारच्या इकोसिस्टिम्स सांभाळत असतं.. थोडक्यात, ‘मल्टिटास्किंग’ करत असतं हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे.
केशवसुत म्हणतात, ‘या विश्वाचा आकार केवढा - ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा.’ मला तर पुढं जाऊन विचारावंसं वाटतं, की ‘डोक्याएवढा की कुतुहलाएवढा?’ काय काय आहे या विश्वात आणि काय काय दडलंय त्यातल्या प्रत्येकाच्या विश्वात! मी नुसत्या एका वटवृक्षाचं अर्धा तास निरीक्षण केलं, तर माझी मती गुंग झाली. असंख्य छोट्या छोट्या इकोसिस्टिम्स कशा काय एकसंधपणे नांदू शकतात याचं उत्तम उदाहरण हा वृक्ष होता. वृक्षाच्या मुळांपाशी, त्याची छाया आणि त्यामुळं राहिलेल्या ओलाव्यामध्ये शेवाळं उगवलेलं होतं. त्यातलं थोडंसं शेवाळं किंचित वर उचलून पाहिलं, तर अनेक सूक्ष्म कीटक त्याच्याखाली वावरत होते. या कीटकांना खायला आलेले काही इतर कीटकभक्ष्यी कीटक तिथं आजूबाजूला वावरत होते. मुळांच्या जवळ असलेल्या एका छिद्रामधून मुंग्यांची एक रांग हालचाल करत होती. त्यांचं पालापाचोळ्याचे कण तसेच इतर जैविक कचऱ्याच्या साफसफाईचं काम चालू होतं. तिथंच मुळांपाशी फनेल वेब स्पायडरचं जाळं होतं, ज्यात काही मुंग्या अडकलेल्या होत्या. हा कोळी मुंग्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवत होता. तिथून थोडं वर खोडावर ब्रॅक फंगस उगवलेलं होतं, जे खोडामधल्या मृत पेशींचं विघटन करायचं काम करत होतं. खाली पडलेल्या पाचोळ्यामधून, पाचोळ्याचं खतात रूपांतर करणारे पील मिलीपीड्स आणि त्यांच्याच ‘मायरियोपोडा’ या क्लासमधले मेंबर्स असलेले शिकारी सेंटीपीड्स म्हणजे ‘गोम’ फिरत होते. ‘डेट्रीटीव्होरस’ म्हणजे असाच पालापाचोळा आणि मृत खोड, फांद्या खाऊन जगणाऱ्या वाळवीचं एक छोटुसं वारूळ तिथं शेजारीच होतं. या सगळ्यांमुळं त्या पालापाचोळ्यापासून ह्युमस तयार होऊन तिथल्या मातीचा कस वाढत होता. आजूबाजूच्या मातीत आणि दगडांच्या आसपास खेकड्यांची व उंदरांची बिळं होती, जी जमिनीत हवा खेळती ठेवत होती. झाडाच्या खोडावर असलेल्या कपच्यांच्या मागं ‘चिलोनिथी’ फॅमिलीमधले स्युडोस्कॉरपियन्स नावाचे जेमतेम अर्धा मिलिमीटर लांबीचे अष्टपाद जीव राहात होते. झाडाच्या फांद्यांवर अनेक पक्षी होते. त्यातले काही खोडामधले किडे शोधत होते, तर काही फांद्या-पानांमध्ये लपलेले किडे शोधत होते. त्यांच्या चोचींच्या आकारातला फरक त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल, शिकार करण्याच्या पद्धतीबद्दल खूप काही सांगत होता. शाखांच्या वरच्या भागात एक रिकामं घरटं होतं. बहुधा शिकारी पक्ष्याचं असावं. त्याच्या काठावर व खाली त्याच्या पिल्लांनी केलेली विष्ठा होती. या विष्ठेमुळं तिथल्या मातीचा कस वाढायला किंचितसा ‘शीटभार’ लागला होता. तसंच या विष्ठेमुळं फक्त विष्ठेचं विघटन करणाऱ्या बॅक्टेरियांना आणि बुरशीला अन्न मिळालं होतं. झाडाच्या खोडावर वुली बेअर मॉथचा एक सुरवंट होता. तो त्या वृक्षोत्तमावरच बहुधा कोष विणून मेटामॉर्फोसिस पूर्ण करणार असावा. तसंच खोडावर सिकाडाची (दुपारी किर्रर्रर्र असा आवाज करतात ते कीटक) एक रिकामी खोळही होती. कदाचित त्याच वृक्षाच्या भूमिगत मुळांमधून रस पीत त्याचं कित्येक वर्षांचं बालपण पार पडलं असावं आणि प्रौढावस्था आल्यावर मातीतून बाहेर येऊन, खोडावर बसून कात टाकून त्यानं त्या वृक्षाचा निरोप घेतला असावा. वृक्षाची मुळं माती धरून ठेवत होती व माती पाणी शोषून ठेवत होती. वृक्षाच्या पर्णभारामुळं वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण राहून सुट्टी माती उडून जाण्याचं प्रमाण मर्यादेत राहात होतं.
असं हे धावतं, वाढतं, सरतं जग एका वृक्षाभोवती नांदत होतं व त्या वृक्षाची तोड न झाल्यास पुढची शेकडो वर्षं नांदत राहील. या शेकडो वर्षांत कोट्यवधी पानं गळतील, हजारो फांद्या धाराशाई होतील. झाडावरचे पक्षी मातीस मिळतील. या सगळ्यांना मातीत सामावणारे कीटकही मातीत सामावतील. झाडाच्या मुळांवरचे सूक्ष्म बॅक्टेरिया हवेतला नायट्रोजन मातीत मिसळून ती माती अजूनच कसदार करतील. त्यामुळं झाडाला एनर्जी मिळून त्यावर दरवर्षीप्रमाणंच लक्षावधी फळं उगवतील व अनेक पशूपक्षीकीटकांना अन्न पुरवून तो वृक्ष बीजप्रसार करायला लावेल. परंतु, या चक्राचीही गती एक दिवस नैसर्गिकरीत्याच संपुष्टात येईल आणि तो वृक्ष उन्मळून पडेल. पुन्हा एका नव्या पद्धतीच्या चक्राला जन्म देण्यासाठी.
आपणसुद्धा आपलं कुतूहल थोडं वाढीस लावायला हवं. यामुळं कदाचित निसर्गातल्या विविध घटकांबद्दल आपल्यात संवेदनशीलता निर्माण होऊन निसर्गाची जपणूक होईल. हे आपल्याच भावी पिढ्यांच्या निरामय जीवनासाठी करायचं आहे.