कोविडचे धडे: जैवविविधता आणि झूनॉटिक आजार

डॉ. गुरुदास नूलकर 
सोमवार, 7 जून 2021

पर्यावरण दिन विशेष

सुमारे तेरा हजार वर्षांपूर्वी, प्राचीन मानव शिकारी-अन्न संकलक अवस्थेतून शेतीकडे वळला, तेव्हापासून पृथ्वीवर आपला पर्यावरणीय भार वाढत गेला. आधुनिक मानवाचे जीवन तांत्रिक प्रगतीने सुखकर झाले, पण या जीवनशैलीतून निसर्गावर होणारे परिणाम मात्र दुर्लक्षित राहिले. आज पृथ्वीवरील ७७ टक्के जमीन केवळ मानवी लोकसंख्येला पोसण्यात गुंतलेली आहे. गेल्या दशकातील वाढीमुळे १.९ दशलक्ष चौरस किलोमीटर रानवा नाहीसा झाला आणि सत्तर टक्के जैवविविधता घटली असल्याचे २०२० सालच्या ‘लिव्हिंग प्लॅनेट’ अहवालात म्हटले आहे. हे परिसंस्थांच्या कार्यास बाधक आहे.

पर्यावरणीय सेवा कमकुवत झाल्यामुळे पृथ्वीची सजीवसृष्टी पोसण्याची क्षमता कमी होत चालली आहे. हवामान बदलातून हे स्पष्ट दिसतेच, पण घटलेल्या जैवविविधतेचे एक भयानक प्रकटीकरण म्हणजे गेल्या काही दशकात सातत्याने उद्भवणारे नवनवीन आजार. इतिहासकालीन प्लेगपासून ते सार्स, मर्स, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू, इबोला आणि कोविड -१९ यांचे विषाणू प्राण्यांमधून आपल्या शरीरात शिरले आहेत. नैसर्गिक परिसंस्थांचे संतुलन बिघडल्याने सूक्ष्मजीव मानवी शरीरात शिरतात आणि इथेच त्यांचा प्रसार होतो. अशा रोगांना ‘झूनॉटिक’ आजार असे नाव आहे. 

मानव आणि जैवविविधता: एक महत्त्वपूर्ण नाते 
पृथ्वीवरील सर्व प्रजाती, जनुकीय वैविध्य आणि नैसर्गिक परिसंस्थांमधले फरक, या सगळ्याची बेरीज म्हणजे जैवविविधता. सौर ऊर्जेचा वापर करून प्रत्येक परिसंस्थेच्या जैविक आणि भौतिक घटकांत ऊर्जा आणि पदार्थांची देवाणघेवाण चालू असते. या विनिमयातून पर्यावरणीय सेवा प्राप्त होतात. जलचक्र, पोषणद्रव्यांवर पुनर्रप्रक्रिया, कार्बनचा साठा, जनुकीय विविधतेचा सांभाळ, विघटन प्रक्रिया, स्थानिक हवामानावर नियमन, वनस्पतींचे परागीभवन अशा सेवांमुळे जीवसृष्टी पोसली जाते. आपले अन्न, पाणी, हवा आणि संतुलित हवामानाच्या गरजांची पूर्तता पर्यावरणीय सेवांच्या माध्यमातून होते. विपुल जैवविविधतेमुळे परिसंस्थांना आघात पचवण्याची लवचिकता प्राप्त होते आणि त्यांची कार्यक्षमता सशक्त राहते. 

मानवी शरीरही एक परिसंस्था आहे. इथे जिवाणू आर्केआ, बुरशी, प्रोटोझोआन, विषाणू अशा अनेक सूक्ष्मजीवांना आसरा आणि पोषण मिळते. आपल्या आरोग्यात त्यांच्या चयापचयाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्यामुळे आपले शरीर त्यांना निरुपद्रवी मित्र म्हणून ओळखते. याला ‘ओल्ड फ्रेण्ड्स हायपोथेसिस’ म्हटले जाते. बहुतेक सर्व प्राण्यात उपयुक्त कामगिरी करणारे असे सूक्ष्ममित्र असतात. पण एका प्रजातीचे सूक्ष्मजीव जर दुसऱ्या प्रजातीत गेले तर तिथे ते विषाणू होतात आणि आजारात रूपांतर होते, असं सहसा होत नाही. पण काही परिस्थितीत ते शक्य होतं. सूक्ष्मजीवांचा स्वाभाविक अधिवास, म्हणजे यजमान प्राणी किंवा त्यांचे आरोग्य धोक्यात आले तर ते दुसऱ्या यजमानाचा शोध घेतात. किंवा ज्या प्राण्यांचा मानवाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध येतो, त्यांच्यातही सूक्ष्मजीवांची अदलाबदल होऊ शकते. रेबिजचे विषाणू कुत्र्यां‍तून माणसात आले, कारण आपला त्यांच्याशी रोजच संबंध येतो. निपाह व्हायरस हा भयानक विषाणू आजारी डुकरांमधून बाहेर पडला. 

त्यामुळे नैसर्गिक परिसंथा सुदृढ असणे हे आपल्या आरोग्यासाठी अनिवार्य आहे. पण सुदृढ परिसंस्था म्हणजे काय? निसर्गात प्रत्येक सजीवाला नैसर्गिक शिकारी असतो. एका भूरूपात विविध प्रजातींचे समुदाय राहात असतात. त्यांच्या पासून एक प्रभावी अन्न साखळी तयार होते आणि सर्व प्रजातींची संख्या नियंत्रित राहते. पण परिसरात माणूस आला की जैवविविधता बदलते. तिथे काही परकीय वनस्पती लावल्या जातात, वाहनांचा वावर वाढतो, प्रदूषण आणि आवाजाचा त्रास सुरू होतो. कीटक, पक्षी आणि प्राणी तिथून पळ काढतात. माणसाबरोबर पाळीव प्राणी येतात आणि नैसर्गिक संतुलन पूर्णपणे बिघडते. आज पृथ्वीवरील ७० टक्के पक्षी आणि ६० टक्के जनावरं पाळीव आहेत! या सर्व कारणांमुळे जैवविविधतेत आमूलाग्र बदल होतात आणि अन्न साखळी कोलमडते. तिथल्या परिसंस्थांची कार्यक्षमता कमकुवत होते आणि सूक्ष्मजिवांचे अस्तित्व धोक्यात येते. अशी परिस्थिती ‘झूनॉटिक’ आजारांसाठी पोषक आहे. रेबीज, लेप्टोस्पायरोसिस, प्लेग, स्क्रब टायफस, निपाह व्हायरस, कायसानूर फॉरेस्ट डिसीझ, सालमनेलोसिस, कोरोना व्हायरसमुळे होणारे सार्स, मर्स आणि कोविड-१९ हे सर्व आजार ‘झूनॉटिक’ स्वरूपाचे आहेत. मानवांतील संसर्गजन्य रोगांपैकी सुमारे ६० टक्के रोग आणि नवनवीन संसर्गजन्य रोगांपैकी ७५ टक्के रोग झूनॉटिक असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने (यूएनईपी) दिला आहे. 

जैवविविधता जोपासण्याची गरज 
केवळ निकोप निसर्ग आणि सुदृढ मानवी आरोग्यासाठी जैवविविधता गरजेची नाही, तर शेतीमध्येही तिचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. वेगवेगळे पक्षी, कीटक, सरपटणारे आणि उभयचर प्राणी असलेल्या बहुपीक शेतीत सक्रिय अन्न साखळी असते. अनेक संशोधनात असे दिसते की या प्रकारच्या शेतीत रोगांवर नैसर्गिक नियंत्रण ठेवले जाते आणि रसायनमुक्त शेती करता येते. नैसर्गिक अन्न साखळीमुळे तिथे कोणा एका प्रजातीचा उपद्रव होत नाही. मातीत सूक्ष्मजीवांचे वैविध्य असणे शेतीसाठी महत्त्वपूर्ण आहे. मातीतील खनिजे पिकांना वापरण्यायोग्य स्वरूपात करून देण्यात सूक्ष्मजीवांचा हात असतो. त्यांचा अभाव असलेल्या मातीची पोषणक्षमता कमकुवत असते. पृथ्वीतलावरील जंगलांचा प्रसार आणि रक्षण करण्यासाठी जैवविविधता अनिवार्य आहे. किटकांकडून परागीभवनाची विनामूल्य सेवा आपल्याला मिळते.

झाडांची फळं खाऊन प्राणी आणि पक्षी बिया दूरवर पसरवण्याचे काम करतात. केवळ अशा सेवांमुळे वनस्पतींचा प्रसार होतो आणि जंगले तग धरतात. जीवशास्त्रात ‘बायोडायव्हर्सिटी हायपोथेसीस’ असे एक प्रमेय आहे. यात असे म्हटले जाते की सक्षम नैसर्गिक वातावरण आणि जैवविविधतेच्या संपर्कात आपण असलो तर आपल्या शरीरातील सूक्ष्मजीवांना पुष्टी मिळते. त्यातून आपली रोगप्रतिकारक शक्ती बळावते आणि विकारांपासून संरक्षण मिळते. अनेक मानवी औषधांचा कच्चा माल जंगलातून मिळतो. वनप्रजातींमध्ये क्विनीन, रेसरपीन, क्विनिडीन, एफिड्रिन, कॅफिन अशी औषधी द्रव्ये मिळतात. काही वनस्पतींमधून अँटीकॅन्सर गुणधर्मही मिळाले आहेत.

उत्क्रांतीच्या प्रवासात जैवविविधतेच्या संबंधातून आणि विनियोगातून मानवी संस्कृतीची जडणघडण झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असलेल्या आपल्या देशात इतके सांस्कृतिक वैविध्य आहे. रशिया, चीन किंवा युरोपीय राष्ट्रांत

आपल्या इतके नैसर्गिक वैविध्य नसल्याने तिथे सांस्कृतिक वैविध्यही नाही. 
भारतातील जैवविविधता आणि झूनॉटिक आजार पृथ्वीतलावरील केवळ तीन टक्के जमीन असलेल्या भारतात जगातील आठ टक्के जैवविविधता आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या देशात भौगोलिक वैविध्य विपुल आहे. जंगलं, पर्वतरांगा, खारफुटी, गवताळ प्रदेश, दलदल, वाळवंट, हिमनद्या यातून वनस्पतींचे लाखो प्रकार उद्भवले आणि प्राण्यांसाठी विविध प्रकारचे अधिवास आणि खाद्य उपलब्ध झाले. यामुळे आपण ‘मेगाडायव्हर्स’ देश बनलो. पण शेती, औद्योगीकरण आणि शहरांच्या विस्तारामुळे जंगलं आणि रानवे नाहीसे होत चालले आहेत.

दोन वर्षांपूर्वी छत्तीसगडमधील १.७ लाख हेक्टर वनक्षेत्र कोळसा खाणीसाठी सुपूर्त केले गेले. गेल्या वर्षी गोव्यातील मोलेम नॅशनल पार्कच्या उत्कृष्ट जंगलात तीन मोठे पायाभूत प्रकल्प करण्यास मंजुरी मिळाली. यामुळे २५० हेक्टर वनक्षेत्र नष्ट होणार आहे. कर्नाटकातील प्रस्तावित हुबळी-अंकोला रेल्वे प्रकल्पामुळे ७२७ हेक्टर वनराईमधली सव्वादोन लाख झाडं जाणार आहेत. हिमालय पर्वतरांगातून मोठ्या धरणांचे प्रकल्प होत आहेत. यामुळे जंगल तर नष्ट होतंच, पण गंगेच्या पठारावर येणारा पोषणयुक्त गाळ बंद होणार आहे.

अशा प्रकल्पांमुळे वन्यजीवांचे अधिवास धोक्यात आले. प्राणी जंगलाबाहेर आले की त्यांचा उपद्रव होतो. आज रानडुक्कर, माकडे, वानर, हत्ती, बिबटे, हरिण, काळवीट, सांबर अशा अनेक वन्य प्राण्यांचा शेतीत उपद्रव होत आहे. त्यांचा शेती, फळबागा आणि पाळीव प्राण्यांशी संबंध वाढल्याने झूनॉटिक रोगांना हे आमंत्रणच आहे. कायसनूर फॉरेस्ट डिसीझ या भयानक रोगाची निष्पत्ती कर्नाटकातील कायसनूर जंगलात माकड आणि माणसांच्या संबंधातून झाली. रेबीज या शंभर टक्के प्राणघातक आजाराने भारतात दरवर्षी वीस हजार मृत्यू होतात. हा रोग पाळीव कुत्र्यांतून माणसात आणि जंगली प्राण्यांतही शिरतो. कोल्हे, तरस, लांडगे, रानकुत्री अशा वन्य प्राण्यांत रेबीज आढळतो कारण हे प्राणी रात्री गावाजवळ येऊन कुत्र्यांनी उष्टावलेले जिन्नस खातात. निपाह व्हायरसही असाच एक नवीन झूनॉटिक रोग आहे. वटवाघुळात सापडणारा हा व्हायरस मानवी शरीरात शिरला कारण झाडावर टांगलेल्या मडक्यातील ताडी पिण्यासाठी वटवाघुळे येतात आणि तिथे व्हायरसचा शिरकाव होतो.

आर्थिक वृद्धी आणि वाढता उपभोग 
जैवविविधतेत घट आणि परिसंस्थांची कमकुवत कार्यक्षमता हे आर्थिक वृद्धीचे दुर्लक्षित परिणाम आहेत. औद्योगिक वाढीच्या ध्यासात संसाधनांचा वापर वाढतो आणि निसर्गावर ताण येतो. अर्थव्यवस्थेतून होणाऱ्या प्रदूषणाने उभ्या राहिलेल्या हवामान बदलाच्या संकटाचा वन्यजीवांवर विपरीत परिणाम होतो आहे. टुंड्रा, बोरियल फॉरेस्ट, हिमालय, खारफुटी जंगलं, दलदलीचे प्रदेश आणि प्रवाळ (कोरल रीफ्स) अशा नाजूक परिसंस्थांमधील जैवविविधतेत लक्षणीय घट होऊन तिथले सूक्ष्मजंतू विस्थापित होण्याची शक्यता वाढली आहे. 

पुढचा मार्ग 
जैवविविधतेविषयीच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाची (सीबीडी) स्थापना १९९३ साली झाली. जैवविविधतेचे संरक्षण ही सर्व मानवजातीसाठी चिंतेची बाब आहे आणि विकास प्रक्रियेचा अविभाज्य घटक आहे, असे या अधिवेशनात मानले गेले. वनस्पती आणि वन्यजीवांना राष्ट्रीय सीमेचे बंधन नसते, त्यामुळे सर्व राष्ट्रांच्या सहकार्याशिवाय त्यांचे संवर्धन शक्य नाही. 

आज अनेक देशांत वन्यप्राण्यांचे संवर्धन चालू आहे. पण हे पुरेसे नाही. अर्थव्यवस्थेचा पर्यावरणीय आघात कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल करणे आवश्यक आहेत. त्याच बरोबर संवर्धनासाठी अनेक मार्ग पत्करावे लागणार आहेत. ओसाड भूरूपावर वनीकरण, नद्या आणि जलमय प्रदेशांचे संवर्धन, पर्वत रंगांचे संरक्षण, प्रजातींचे संवर्धन, मानव आणि प्राण्यांच्या संघर्षांवर उपाय, अधिवासातील विविधता जपणे, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, स्थानिक वनस्पतींची लागवड करणे अशा भिन्न मार्गातून केलेले संवर्धन योग्य ठरेल. 

भारतासारख्या ‘मेगाडायव्हर्स’ देशात, झूनॉटिक रोग अधिक संभाव्य आहेत. त्यामुळे आपल्या देशात निसर्ग संवर्धनाचे काम अत्यंत काटेकोरपणे केले पाहिजे. आज ही जबाबदारी केवळ पर्यावरण मंत्रालयाकडे आहे. पण कृषी, आरोग्य, जलसंपदा, पृथ्वी-विज्ञान, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, खाणकाम, वाणिज्य व उद्योग या सर्व मंत्रालयांतून सहकार्य मिळणे आवश्यक आहे. यासाठी पावले उचलली नाहीत तर भविष्यात कोविड-१९ पेक्षा भयानक रोगांना तोंड द्यायची तयारी ठेवली पाहिजे. हे खर्चीक तर असणारच पण यातून सामाजिक आणि आर्थिक स्वास्थ्यही कोलमडेल, यात शंका नाही. 

(लेखक सिंबायोसिस विद्यापीठात प्राध्यापक आणि इकॉलॉजिकल सोसायटीचे विश्वस्त आहेत. शाश्वत विकास आणि पर्यायी अर्थव्यवस्था या विषयात त्यांचे संशोधन आणि लिखाण चालू आहे. ‘अनर्थशास्त्र’ या त्यांच्या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र राज्य वाङ्‌मय पुरस्कार मिळाला.)

संबंधित बातम्या