जैविविधतेची घुसमट

मिलिंद तांबे, मुंबई
सोमवार, 7 जून 2021

पर्यावरण दिन विशेष

मुंबई म्हटले की आठवतात त्या गगनचुंबी इमारती, काँक्रीटचे रस्ते, मार्गांना जोडणारे पूल, त्यावरून भरधाव जाणाऱ्या गाड्या, लोकांची गर्दी आणि रात्रीचा झगमगाट. पण मुंबईचे अस्तित्व, मुंबईची ओळख याही पलीकडची आहे. कारण मुंबईला निसर्गानेही भरभरून दिले आहे. 

मुंबईत नद्या-डोंगर-दऱ्या आहेत. अफाट समुद्र, खाडी, तिवरांची-खारफुटीची जंगलं आहेत. मुंबईत प्राण्यांचा अधिवास आहे. पशु-पक्षी विहार करत आहेत. जीव-जंतूंचे अस्तित्व आहे. निसर्गाचे भरभरून देणे मुंबईला लाभले आहे. निसर्गाने बहाल केलेली जैवविविधता हीसुद्धा मुंबईची जिवंत ओळख आहे. मुंबईत गवताळ कुरणे आहेत. येथे किडे असतात. त्यांना खाण्यासाठी पक्षी येतात. पाणथळ जागा, तलाव यांचे महत्त्वही आहे. तिथेही भरपूर पक्षी येतात. येथे सर्पदेखील येतात. एकट्या मुंबईमध्ये किमान ६० प्रजातींचे सर्प आढळतात. 

पवई तलाव ३७० एकर परिसरात पसरलेले होता. त्याच्या १७ हजार एकर पाणलोट क्षेत्रात ५० वर्षांपूर्वी येथे आढळणारी जैवविविधता आता आढळत नाही. बोरिवली नॅशनल पार्क, धारावी येथील निसर्ग उद्यान येथे प्राणी-पक्षी पाहण्यास मिळतात. माहीम, भांडुप, शिवडी, वांद्रे येथे दलदलीचे प्रदेश आहेत; तेथे जैवविविधता आहे. जैवविविधता हा जंगलाचा भाग आहे. ती जपणे ही काळाची गरज आहे.

शहराच्या मध्यभागी असलेल्या बिबट्यांच्या वर्चस्वाखालील वनांपासून ते समुद्रकिनाऱ्यावरील वन्यजीवांपर्यंत, फ्लेमिंगोंच्या फडफडाटाने गुलाबी झालेल्या पाणथळ जागांपासून ते लालजर्द खेकड्यांनी चमकणाऱ्या तिवरांपर्यंत सगळे काही मुंबईत आहे. लाल-तपकिरी खेकडे, पवई तलावातील मगरी, चितळ, सरडे, साप, समुद्रीसाप, बेडूक, माकडे, हरणे, कोळी, विंचू, दोन प्रकारचे सी इगल, इल मासा, ऑक्टोपस, सँडपायपर पक्षी, हिवाळ्यात पाहुणे म्हणून येणारे फ्लेमिंगो अशी समृद्ध जीवसृष्टी मुंबईत आहे, असे निसर्ग अभ्यासक सौरभ सावंत सांगतात. 

मुंबईत आता गरुड-गिधाडे नसली तरी समुद्रात डॉल्फिन, हॅमरहेड मासा, करवती तोंडाचा मासा असे वेगवेगळे दुर्मीळ सागरीजीव आहेत. बिबट्या, उदमांजर, अजगर अशा लुप्त होत जाणाऱ्या प्रजाती आहेत. जरा शेजारी वसई परिसरात ऑलिव्ह रिडले कासवे आहेत, कर्नाळा अभयारण्याजवळ गरुड आहेत. हे मुंबई परिसरातील सारे वन्यजीवसृष्टीचे वैभव आहे जे जपणे गरजेचे आहे असेही सावंत सांगतात. अनेक परदेशी पक्षी लाखो मैलांचा प्रवास करून मुंबईत अंडी घालण्यासाठी येत. मात्र जागतिक तापमानवाढीसह पर्यावरणाचा झालेला ऱ्हास त्यांच्या मुळावर उठला आहे. परदेशी पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. इतकेच नाही तर त्यांचा मुंबईत थांबण्याचा कालावधीही कमी झाला असल्याचे सावंत सांगतात. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
मुंबई शहराच्या मध्यभागी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. याचे क्षेत्रफळ १०४ चौरस किमी आहे. येथील कान्हेरी लेण्यांमुळे याला कृष्णगिरी म्हणजे ‘काळा पहाड’ हे नाव पडले होते. १९८१मध्ये नावात बदल परत एकदा बदल होऊन हे उद्यान ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून ओळखले जाऊ लागले. इथे सुमारे ४० प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे, विविध रंग, आकारांचे २५० प्रकारचे पक्षी, ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि ९ प्रकारचे उभयचर आहेत. या वन साम्राज्यातला सर्वात मोठा भक्षक बिबट्या ही येथे वावरतो. तसेच  मुंगूस, उदमांजर,  रानमांजर, अस्वल, लंगूर अशा प्राण्यांचा येथे संचार असतो. या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात मुख्यतः  करंज, साग, शिसव , बाभूळ,  बोर,  निवडुंग  असून  बांबूची बेटेही  आहेत.

पक्ष्यांचा अधिवास नष्ट होतोय
मुंबई शहरामध्ये राष्ट्रीय उद्यान आहे. खारफुटीच्या जागाही आहेत. पण या पार्श्वभूमीवर या शहरातील जैवविविधतेचा आजवर सखोल अभ्यास झालेला नाही. अलीकडच्या काळात काही प्रमाणात अभ्यास केला जातोय, पण तो फारच अपुरा आहे. यासंदर्भात अभ्यास न झाल्याने पूर्वी या शहरामध्ये उंच इमारती होण्याआधी कोणते पक्षी दिसायचे, कोणती झाडे होती यांची नेमकी माहिती उपलब्ध होत नसल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे साहाय्यक संचालक राहुल खोत यांनी सांगितले.
शहराच्या विस्तारीकरणामध्ये अधिवास नष्ट होत आहेत, पक्षी-प्राण्यांबरोबरच झाडांनाही धोका निर्माण होत आहे. काही झाडांचा वापर पक्षी अंडी घालण्यासाठी करतात. मात्र, ही झाडे नष्ट झाल्याने किंवा त्या ठिकाणी दुसरी झाडे आल्याने ही झाडे किंवा खारफुटी नैसर्गिक अधिवास असलेल्या पक्ष्यांसाठी समस्या निर्माण होत असल्याचे खोत यांनी सांगितले. शहरामध्ये कावळे, कबुतरे, घारी यांची संख्या वाढली आहे. या सर्व बाबींचा संयुक्तपणे शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अभ्यास झाला तर शहरातील पुढील बदलांचा आढावा घ्यायला मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

नैसर्गिक वारशाचे जतन
मुंबईत नव्याने रस्ते बांधले जात नसले तरी रस्त्यांच्या दुरुस्तीसह प्रकल्प आणि इतर कामांसाठी गेल्या तीन वर्षांत ५० हजारांहून अधिक झाडांवर संकट ओढावले आहे. मिठी नदीलगतची जैवविविधताही नष्ट झाली आहे. आता आपण जैवविविधता टिकविण्यासाठी काम केले पाहिजे. किमान ऑक्सिजनसाठी तरी मुंबईतील जंगल टिकवा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. सध्या मुंबईत ३३ लाख वेगवेगळ्या प्रकारची झाडे असल्याची माहिती पर्यावरण तज्ज्ञ चंद्रकांत गट्टू यांनी दिली. 

जैवविविधतेचा नकाशा
‘ग्रीन ह्युमर’ या शीर्षकाखालील कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहन चक्रवर्ती यांनी मुंबईचा पहिलाच जैवविविधता नकाशा तयार केला आहे. यामध्ये वन्यप्राण्यांची वसतिस्थाने, तिवरांची वने, शहरातील हिरव्या जागा आणि शहरात दिसणाऱ्या ९०हून अधिक प्रजाती दाखवलेल्या आहेत. अशाश्वत विकासामुळे धोक्यात आलेल्या मुंबईच्या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी मुंबईकरांनी कृती केली पाहिजे याची आठवण करून देण्याचे काम हा नकाशा करतो. हा अनोखा नकाशा ‘बायोडायव्हर्सिटी बाय द बे’ या अभियानासाठी तयार करण्यात आला आहे. जैवविविधता जपण्याचा मुद्दा सर्वांसमोर आणण्याच्या हेतूने मुंबईकरांनी मिळून स्थापन केलेल्या ‘मिनिस्ट्री ऑफ मुंबईज् मॅजिक’ या समूहाने हे अभियान सुरू केले आहे.

नैसर्गिक अधिवास महत्त्वाचा 
मुंबईतील खारफुटीचे क्षेत्र वाढले असा दावा खारफुटी विभागाकडून कागदावर केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र खारफुटीजवळ दिसणारे पक्षी गायब झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कागदावरील झाडांची संख्या वाढली म्हणजे मुंबईला लाभलेली जैवविविधता परत मिळेल, असा दावा करता येत नाही असे पर्यावरण तज्ज्ञ आनंद पेंढारकर यांनी म्हटले आहे. खारफुटी असो किंवा झाडे त्यांची अनैसर्गिक वाढ पशु-पक्षी किंवा जीव-जंतूंचा अधिवास तयार करत नाहीत. खारफुटींच्या आधी गोड्या पाण्याचे तलाव होते. केवड्याची बने होती, ती ही नष्ट झाल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

बांधकामाचा भस्मासुर
सध्या मोठ्या प्रमाणात रहिवासी संकुले उभारली जात आहेत. मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे. त्यामुळे येथील हरित पट्टा कमी होऊ लागला आहे. या परिसरात डोंगररांगा, पाणथळ जागा आणि गवताची कुरणे अशा तीन भागांचा समावेश होतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी, विविध प्रकारच्या वनस्पती, कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे इत्यादींचा वास आहे. या ठिकाणी होत असलेली विकासकामे, कचरा टाकणे, पाण्याचे प्रदूषण, अतिक्रमणविरोधी खोदकाम, डोंगरांवर वारंवार लागणाऱ्या आगी, यामुळे येथील जैवविविधता नष्ट होत आहे, अशी तक्रार वनशक्ती संस्थेचे प्रमुख स्टॅलिन दयानंद करतात. 

किनाऱ्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न
मुंबई शहरात दररोज सुमारे ८-१० हजार टन कचरा गोळा केला जातो. यात प्लास्टिकच्या पिशव्या, काचा, पत्र्याचे डबे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे तुकडे हे सर्व समुद्रात मिसळतात. स्वयंपाकघरातील पाण्यापासून ते मैल्यापर्यंत दररोज अंदाजे ३०० कोटी लीटर सांडपाणी पाच मलनिस्सारण केंद्रांतून मुंबईच्या समुद्रात सोडले जाते. याशिवाय झोपड्या व नाल्यातून वाहणारे किमान १०० ते १५० कोटी लीटर सांडपाणी समुद्रातील पाण्यात मिसळते. यातील विषारी रासायनिक घटक पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन संपवून टाकतात. पाणी ऑक्सिजन विरहित झाले की समुद्रातील जलचर आणि वनस्पती मरायला लागतात. यामुळे हजारो मासे मरून पडतात. यामुळे पर्यावरणाची शृंखला खंडित होत आहे, असे मत भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळचे निमंत्रक डॉ. गिरीश राऊत यांनी व्यक्त केले.  

मुंबईतील नद्या
मुंबईत दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि मिठी या चार नद्या आहेत. या चारही नद्यांचा उगम मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून होतो. संपूर्ण मुंबई शहर ४०० चौरस किलोमीटर असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या एक चर्तुर्थांश म्हणजे १०४ चौरस किलोमीटर आहे. इथून उगम पावलेल्या नद्या कांदळवन क्षेत्रातून प्रवास करत अरबी समुद्राला मिळतात.

वाढत्या शहरीकरणामुळे झाडे कमी होत आहेत. म्हणजेच प्राणी व पक्ष्यांसाठीचा नैसर्गिक अधिवास कमी होत आहे. त्यामुळे प्राणी, पक्षी यांच्या संख्येवर परिणाम होतो. मुंबईतील नॅशनल पार्क, गोराई येथील टेकड्या, खारफुटी इत्यादी स्वरूपातील नैसर्गिक अधिवास टिकवला, तर अजूनही आपण उरलेली जैवविविधता टिकवू शकतो.
- राहुल खोत, साहाय्यक संचालक , बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी

मुंबईबद्दल बोलायचे झाल्यास पक्षी आणि प्राण्यांची संख्या कमी झाली आहे. ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, वाढते शहरीकरण यांमुळे त्यांच्या अन्न, पाणी आणि निवारा या मूलभूत गरजाच शहरात पूर्ण होऊ शकत नाहीत. जैवविविधतेला मदत न करणारी गुलमोहर, रेन ट्री यांसारख्या झाडांची संख्या वाढत आहे.  मात्र पक्ष्यांच्या अधिवासासाठी आवश्यक झाडे नष्ट होत आहेत. शिवाय अलीकडच्या काळात कीटकनाशकांचा वापर बेसुमार वाढला आहे. त्यामुळे पक्ष्यांचे खाद्य असलेले कीटक नष्ट होत आहेत. याचा परिणामदेखील जैवविविधतेवर होत असल्याचे  दिसते.
- अविनाश कुबल, माजी उपसंचालक, महाराष्ट्र निसर्ग उद्यान

संबंधित बातम्या