जैवविविधतेचं लेणं मिरवणारं शहर 

ओंकार धर्माधिकारी, कोल्हापूर
सोमवार, 7 जून 2021

पर्यावरण दिन विशेष

इथल्या मातीलाच ऐतिहासिक वारसा लाभला. प्रगतीचा आलेख उंचावताना राजर्षी शाहू महाराजांनी निसर्गही सांभाळला. म्हणूनच शहरीकरणाच्या पसाऱ्यात इथली जैवविविधता टिकून आहे. ती टिकवण्यासाठी कोल्हापूरकरही कटिबद्ध आहेत. इथली जैवविविधताही या शहराचा एक वेगळा पैलू दर्शवते. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या हिरव्यागार कोल्हापूरची ही वेगळी ओळख.

कलानगरी,  क्रीडानगरी, संस्थानिकांचे शहर, चित्रपट पंढरी अशी कितीतरी विशेषणं कोल्हापूर शहराला मिळाली. एकेकाळी तटबंदीच्या आत मधले कोल्हापूर शहर काळाच्या ओघात तटबंदीच्या बाहेर विस्तारले. पूर्वीची सीमा दर्शवणारी तटबंदी आता मध्यवस्ती म्हणून ओळखली जाते. शहरीकरणाच्या गतीमान स्पर्धेला कोल्हापूरही अपवाद नाही. वाढणारी लोकसंख्या, त्यामुळे वसणारी उपनगरे, तेथील सोयीसुविधांसाठी होणारे विकास प्रकल्प यामुळे शहराचा आकार वाढत गेला. पूर्वीचं कोल्हापूर आणि आत्ताचं वाढतं कोल्हापूर यामध्ये लक्षणीय फरक दिसतो. गेल्या दहा पंधरा वर्षांत तर शहराचा चेहरा मोहराच बदलून गेला आहे. मात्र कायम राहिली ती या शहरातील जैवविविधता. कधी कमी तर कधी जास्त असा तिचा आलेख चढता, उतरता राहिला. मात्र, कोल्हापूरकरांनी जैवविविधता जपली. प्रसंगी आंदोलनं उभारली. चळवळी सुरू झाल्या पण प्रशासनावर अंकुश ठेवून त्यांनी जैवविविधतेला धोका असणाऱ्या गोष्टींचा थोपवलं. भावना आणि श्रद्धा जपत नागरिकांनी रंकाळ्यातील गणेश विसर्जन बऱ्याच अंशी कमी केलं. नदी घाटावरही विसर्जन जवळपास थांबलं. वृक्षारोपण, वृक्षसंगोपन चळवळ शहरात रुजली. वेगवेगळ्या संस्था आता दर रविवारी वृक्षारोपणाचे काम करतात. शहरातील जलस्त्रोतांच्या संवर्धनासाठीही कोल्हापूरकर सजग आहेत. त्यामुळे आज शहरातील वृक्षसंपदा, जलस्रोत टिकले आहेत. गेल्या वर्षी महापालिकेने जैवविविधतेचा अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार शहर आणि परिसरात झाडे, झुडुपे, वेली व अन्य वनस्पतींच्या ५६५ प्रजाती अाढळतात. २३१ प्रजातींचे पक्षी शहरात दिसतात. फुलपाखरांच्या ३५ प्रजातींची नोंदही या अहवालात आहे. सरपटणारे २५ प्राणी आढळले असून येथील जलाशयांमध्ये २६ प्रकारच्या माशांच्या जाती आहेत. सस्तन प्राण्यांच्या २३ प्रजाती दिसतात. अशा एकूण ९०६ प्रजातींची नोंद या अहवालात आहे.

इतक्या विपूल प्रमाणात शहरात जैवविविधता दिसून येते, याचे सर्वात महत्त्वाचं कारण शहराच्या भौगोलिक स्थितीमध्ये दिसून येतं. पश्चिम घाटाच्या कुशीत कोल्हापूर शहर वसलं आहे. शहरापासून पन्नास ते साठ किलोमीटर गेलं की पश्चिम घाटातील डोंगर दऱ्या लागतात. शहरामध्ये रंकाळा, परताळा, राजाराम, कळंबा, न्यू पॅलेस, हनुमान तलाव, कोटीतीर्थ, लक्षतीर्थ हे तलाव आहेत. तर शहराच्या भोवतीनं कणेरी, कंदलगाव, वडणगे, शिरोली, नेर्लीतामगाव असे तळ्यांचे दुसरे रिंगण आहे. या शिवाय शहरातून गोमती आणि जयंती या नद्या वाहतात. त्यांना मिळणारे सखल भागातील छोटे-मोठे ओढे, ओहळही आहेत. यामुळे शहरात मुळातच पाणथळ जागा अधिक आहेत. पर्यायानं या ठिकाणी झाडे, झुडुपे आणि त्यावर अवलंबून असणारी जीवसृष्टी पहायला मिळते. डाळींब, जांभूळ, शेवगा, सुपारी, सीतापळ, रामफळ, इडलिंबू, नारळ, आंबा, पेरू, चिक्कू, केळी, फणस, चिंच ही फळझाडे तर शहरात आहेतच. पण याच सोबत वाळा, गवती चहा, नागरमोठा, अडुळसा, अश्वगंधा, ब्राह्मी, अडुळसा, नीरगुडी, बेल, वाळा, नाग केसर, गुळवेल अशा असंख्य औषधी वनस्पतीदेखील पहायला मिळतात. महापालिकेच्या जैवविविधता अहवालात वृक्षांची वर्गवारी त्यांच्या संख्येनुसार केली आहे. शहरामध्ये ज्या प्रजातींची संख्या १ ते १० एवढीच आहे अशा ३१६ दुर्मीळ (शहरामध्ये दुर्मीळ) प्रजातींचे वृक्ष आहेत. ११ ते १०० संख्येत आढळणारे २१५८ वृक्ष आहेत. शंभर ते पाचशे दरम्यान असणारे १२,४०१ वृक्ष आहेत. पाचशे ते हजार या संख्येत आढळणारे १२,२९५ वृक्ष आहेत आणि हजारच्या पुढे असणारे सुमारे ५ लाख ३५ हजार ७८४ वृक्ष आहेत. सर्व मिळून शहरात नोंदवलेल्या झाडांची एकूण संख्या ५ लाख ६२ हजार ९५४ इतकी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षांची संख्या हे प्रमाण तुलनेने सुस्थितीत आहे. शहराभोवती गवताळ जागाही (ग्रास लँड) भरपूर आहेत. टी.ए.बटालीयन, टेंबलाईची टेकडी, शिवाजी विद्यापीठ, चित्रनगरीची टेकडी, शेंडा पार्क, पुईखडी, चंबूखडी या ठिकाणी गवताळ भाग असून त्यामध्ये गवताचे विविध प्रकार आढळतात. येथील तलावांमध्ये पाणवनस्पतींच्याही अनेक प्रजाती आहेत. यामध्ये पानकणीस, केंदाळ, कुमुदीनी, कमळ, दादमारी यांसह अन्य वनस्पतीही आढळतात.

प्राणी आणि पक्षी यांच्याबाबतीतही शहरात वैविध्य आढळते. शहरात नानेटी, खापर खवल्या, हरणटोळ, मांजऱ्या, कवड्या, वेगवेगळे सरडे, पाली दिसतात. तसेच नाग, धामण, घोणस, फुरसा, डुरक्या घोणस हे सर्प नियमीतपणे दिसतात. शहरात दोन ते तीन वेळा अजगर सापडल्याचीही नोंद आहे. पक्ष्यांमध्ये कावळा, चिमणी, कबुतर, कोकिळा, भारद्वाज, बदक, बगळा, घार, मोर, लांडोर, यांच्याह माशीमार, स्वर्गीय नर्तक, कवड्या गप्पीदास, निलपंख, तांबट, टकाचोर, पर्पल हेरॉन, बुलबुल, सुगरण असे विविध प्रकारचे पक्षी दिसतात. टाऊनहॉल बागेमध्ये वटवाघळांची वसाहत आहे. तर जुन्या शिवाजी पुलाखाली पाकोळ्यांची वसाहत आहे. शहराच्या भोवतीने १३ किलोमीटर पंचगंगा नदी फिरते. त्यामुळे पाणमांजर, कासव, विविध प्रकारचे मासे अढळतात. नदी आणि तलावात मरळ, मांगशा, काला मासा, मृगळ, कटला, डोकऱ्या, गारा, रोहु, शिंगाळा, शिगटी असे विविध मासे आढळतात. शहरात ५४ सार्वजनिक उद्याने आहेत. शहराच्या एकूण भूभागापैकी ३५०० एकर जागा या उद्यानांनी व्यापली आहे. या शिवाय शिवाजी विद्यापीठाच्या ८५३ एकर जागेवर गर्द वनराई आहे. येथे विविध प्रकारचे किटक, सरपटणारे प्राणी, पक्षी, ससा, रानमांजर यांसारखे प्राणी आहेत. बोटॅनिकल गार्डनध्ये दुर्मीळ वृक्ष आहेत. टाऊन हॉल बाग, शेंडापार्क येथील ऑक्सिजन पार्क यासारख्या ठिकाणी दाट वनराई आहे. शहराच्या मध्यवस्तीमध्येही झाडांचे प्रमाण बरे आहे.

शहरातील या जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात नागरिकांचा फार मोठा वाटा आहे. रंकाळा, विद्यापीठ, राजाराम तलाव येथे फिरायाला येणाऱ्यांचे वेगवेगळे ग्रुप आहेत. ते या ठिकाणी वृक्षारोपण, वृक्षसंगोपन याचे उपक्रम राबवतात. प्राणी, पक्षी यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थाही शहरात चांगल्या प्रकारे सक्रिय आहेत. असे असले तरी शहरीकरणाचे परिणाम या जैवविविधतेवरही होत आहेत. नव्या उपनरातील सांडपाणी तलावांमध्ये सोडले जाते. जाहिरातींचे होर्डिंग दिसण्यासाठी झाडे तोडली जातात. काही ठिकाणी पेवर ब्लॉक घालून जमिनीत मुरणारे पाणी गटारीत सोडले जाते. 

पाणथळ जागांवरही अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे जैविविधतेसमोर  काही आव्हाने आहेतच. असे असले  तरी कोल्हापूरकर जैवविविधतेच्या बाबतीत सजग आहेत. विविध उपक्रमातून हा वारसा ते पुढच्या पिढीकडे देत आहेत. जैवविविधतेने नटलेले हिरवेगार कोल्हापूर ही ओळख अलीकडे ठळक झाली आहे.

पक्षीतीर्थाचा प्रयोग
शहरालगत असणाऱ्या टेंबलाई टेकडीच्या पायथ्याला पक्षीतीर्थ तयार करण्यात आले. येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले गेले. पक्ष्यांच्या तृषाशांतीसाठी एक छोटे तळेदेखील खोदण्यात आले. पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून हा परिसर ध्वनीप्रतिबंधीत करण्यात आला. काही काळ येथे पक्षी यायचेही, पण तेथे स्थिरावले नाहीत. काहींच्या मते येथील झाडे पक्षांच्या उपयोगाची नव्हती. कारण काही असले तरी नागरिकांची जैवविविधेबाबतची  तळमळ यातून दिसते.

‘सकाळ’चे योगदान
शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला. ‘चला झाडे लावूया‘ ही मोहीम ‘सकाळ’ने २०१० साली सुरू केली. यामध्ये व्यावसायिक संस्था, व्यापारी संस्था, सामाजिक, शैक्षणिक, संघटना यांनी सहभाग घेऊन परिसरात हजारो झाडे लावली. गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. आजही ५ जूनला विविध संस्था, संघटना एकत्र येऊन वृक्षारोपण करतात. ‘सकाळ’चा एक उपक्रम आता व्यापक लोकचळवळ झाला आहे. याशिवाय दाजीपूर अभयारण्यात स्वच्छता मोहीम ‘सकाळ’ने राबवली. राज्यातील अशा प्रकारचे पहिलेच अभियान होते. रंकाळा, पंचगंगा यांच्या संवर्धनासाठीही ‘सकाळ’ने पुढाकर घेऊन लोकचळवळ उभारली.

कोल्हापूर शहरामध्ये गेल्या तीस वर्षांपासून विविध पर्यावरण चळवळी आंदोलने प्रबोधनात्मक उपक्रम सुरू आहेत. त्यामुळे समाजामध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जनजागृती झाली आहे. शहराला विपुल जैवविविधतेचा वारसा आहे. पाणथळ जागा, दाट हरित पट्टे, गवताळ प्रदेशांबरोबरच ओढे, तलाव, नदी सारखे जलस्रोत आहेत. त्यामुळे वनस्पती, प्राणी, पक्षी, सरीसृप यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. ही जैवविविधता टिकवण्यासाठी नागरिक, प्रशासन, विविध संस्था, संघटना यांचे सकारात्मक प्रयत्न आहेत.
- उदय गायकवाड, . (पर्यावरणतज्ज्ञ)

संबंधित बातम्या