पर्यावरणावरील महासंकट आणि उपाय

प्राजक्ता महाजन
सोमवार, 7 जून 2021

पर्यावरण दिन विशेष

गेल्या सुमारे पन्नास वर्षांत जगावर प्रभाव पाडणारा विलक्षण माणूस म्हणजे बिल गेट्स. ह्या माणसाचे पहिले रूप बहुतेक सगळ्यांच्या परिचयाचे आहे. संगणक क्रांतीतील त्यांचे योगदान आणि त्यामुळे जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतले त्यांचे स्थान, हे त्यांचे पहिले रूप. दुसऱ्या रूपात आपल्या अफाट संपत्तीतला ९५ टक्के भाग समाजकार्यासाठी द्यायचा निश्चय करून ते गरीब देशांमधून क्षय, मलेरिया, पोलिओ अशा रोगांचे उच्चाटन करण्यासाठी झटताना दिसले आणि आता तिसऱ्या रूपात त्यांनी ‘पर्यावरण’ हा विषय हाती घेतलेला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी ‘हाऊ टू ॲव्हॉईड अ क्लायमेट डिझास्टरः द सोल्यूशन्स वी हॅव ॲण्ड द ब्रेकथ्रूज् वी नीड’ (वातावरण बदलाचे संकट कसे टाळता येईल? आपल्याकडची उत्तरे आणि नव्या वाटांची गरज) हे पुस्तक लिहिले आहे. 

आलिशान घरात राहणारा, विमानाने फिरणारा अतिश्रीमंत माणूस पर्यावरणाबद्दल कशाला बोलतो, असा प्रश्न लोक उपस्थित करतात. लोकांचा हा आक्षेप मान्य करूनही बिल गेट्स म्हणतात, की हे पुस्तक बरीच वर्षे अभ्यास करून माहितीपूर्वक, विचारपूर्वक लिहिलेले आहे आणि ते स्वत:च्या आयुष्यात नेहमी शिकत आणि बदल करत आलेले आहेत.

आपण सगळे मिळून दरवर्षी ५१ अब्ज टन (म्हणजे ५१ वर ९ शून्ये!) एवढे उष्णता-धारक वायू वातावरणात सोडतो आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतेच आहे. आपल्याला जर पृथ्वीवरचा विनाश थांबवायचा असेल, तर हे प्रमाण २०५० सालापर्यंत शून्यावर आणावे  लागेल, हे गेट्स पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करतात. वातावरणातले प्रदूषण आणि कर्ब-उत्सर्जन ‘कमी करणे’ यापेक्षा ते ‘शून्य करणे’ हेच ध्येय आवश्यक आहे. नळाची धार कमी केली तरी बादली (थोड्या उशिरा का होईना) भरून वाहतेच. त्यामुळे जिथे आवश्यकता असेल तिथे नळ बंदच करावा लागतो. कोरोना काळातही उत्सर्जन फक्त ५ टक्क्यांनीच कमी झाले. म्हणजे शून्यावर आणणे हे कसे गोवर्धन पर्वत उचलण्याचे काम आहे, ते लक्षात येते. ह्या प्रश्नाचा सर्व अंगांनी धांडोळा घेऊन पुस्तकाच्या शेवटी ते शून्य उत्सर्जनाकडे जाण्याचा ढोबळ आराखडा सांगतात.     

आपण वातावरणात सोडलेल्या कार्बन डायऑक्साइडपैकी वीस टक्के वायू पुढची दहा हजार वर्षे वातावरणात तसाच राहतो! त्यामुळे आपल्याला नुसतीच शून्याकडे वाटचाल करून भागणार नाही, तर पूर्वी उत्सर्जित केलेले उष्णता-धारक वायू काढून घेण्याची व्यवस्थाही कधी ना कधी करावी लागणार आहे. औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या काळाशी तुलना केली, तर पृथ्वीचे आजचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढलेले आहे. आपण जर उत्सर्जन थांबवू शकलो नाही, तर २०५०पर्यंत हे तापमान १.५ ते ३ अंश सेल्सिअसने वाढेल. दीड आणि दोन अंशांमध्ये अर्ध्याच अंशाचा फरक असला, तरी दोन अंश तापमान वाढल्यावर होणारी हानी मात्र दीड अंशाच्या हानीच्या दुप्पट असणार आहे.

जगाची लोकसंख्या (स्थिर होण्यापूर्वी) मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आजही जगातल्या ८० कोटी लोकांकडे वीज नाही. बऱ्याच गरीब देशांमध्ये खूप मोठ्या लोकसंख्येला धड घरे नाहीत. ह्या सगळ्या लोकांना व्यवस्थित राहणीमान मिळू नये, असे म्हणता येणारच नाही. जगात सगळ्यांना सुविधा मिळायला हव्या, गरिबी निर्मूलनाचे स्वागत करायला हवे. त्यामुळे उत्सर्जन वाढतच जाणार आहे. उदाहरणार्थ, दर महिन्याला एक नवे न्यूयॉर्क शहर उभे केल्याइतकी बांधकामे जगात पुढची चाळीस वर्षे होत राहणार आहेत. त्यामुळे वापर कमी करून उत्सर्जन थांबवू, असे मानण्याला काही अर्थ नाही. जे संसाधनांचा भरमसाट वापर करतात, त्यांनी तो कमी केलाच पाहिजे. पण त्याचवेळी संपूर्ण जगाचा वस्तूंचा, विजेचा आणि वाहतुकीचा वापर वाढतच जाणार आहे हे समजून घ्यावे लागेल आणि त्यानुसार मार्ग काढावा लागेल.  

आपण वर्षाला जे ५१ अब्ज टन उत्सर्जन करतो, त्यातले ३१ टक्के उत्पादन क्षेत्रातून,  २७ टक्के ऊर्जा क्षेत्रातून, १८ टक्के शेती आणि पशुपालनातून, १६ टक्के वाहतुकीतून आणि ६ टक्के  इमारती उबदार किंवा थंड राखण्यातून होते.

ऊर्जा
जगातली ४० टक्के ऊर्जानिर्मिती  कोळशापासून होते. गेली ३० वर्षे हे 
प्रमाण साधारण असेच आहे. गेट्स सौरऊर्जा, पवनऊर्जा ह्यावर चर्चा करून त्यांचे प्रमाण कसे वाढवता येईल, त्यातली आव्हाने कोणती, त्यात अजून कुठले नवे संशोधन लागेल हे तर विस्ताराने सांगतातच, पण शून्यावर जायचे असल्यास अणुऊर्जेला पर्याय नाही, हेही नि:संदिग्धपणे सांगतात. अणुऊर्जा जास्तीत जास्त सुरक्षित कशी करता येईल ह्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तिला विरोध करण्यावर भर दिला जातो, हे दुर्दैवी आणि चुकीचे आहे असे गेट्स स्पष्टपणे मांडतात. 

उत्पादन क्षेत्र 
स्टील, सिमेंट, काँक्रिट, प्लास्टिक, काच ह्या वस्तूंचे उत्पादन थांबवणे 
अशक्य आहे. उलट वाढत्या लोकसंख्येमुळे ते वाढत जाणार आहे. उत्पादन 
प्रक्रियेसाठी जी प्रचंड वीज आणि उष्णता लागते, ती अपारंपरिक स्रोत किंवा अणुऊर्जेपासून मिळवावी लागेल. त्याखेरीज स्टील आणि सिमेंट तयार करताना ज्या रासायनिक क्रिया होतात, त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, तो पकडून बंदिस्त करावा लागेल. ह्याला कार्बन-कैद म्हणतात.  

शेती आणि पशुपालन 
शेती आणि कुरणांसाठी जी जंगलतोड होते, त्यातून १.६ अब्ज टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात वाढतो. श्रीमंत देशांमध्ये २० टक्के अन्न वाया जाते. अमेरिकेत हा आकडा ४० टक्क्यांवर जातो. हे फेकलेले अन्न सडते आणि त्यातून मिथेन वायूचे उत्सर्जन होते. पृथ्वीची लोकसंख्या २१०० सालापर्यंत ४० टक्क्यांनी वाढणार आहे; पण अन्नाची मागणी मात्र त्याहून बरीच जास्त वाढणार आहे. कारण जशी आर्थिक परिस्थिती सुधारते, तसे लोक जास्त अन्न घेतात, जास्त मांसाहार करतात. मांसाहारासाठी (प्राण्यांना खाऊ घालायला) जास्त पीक घ्यावे लागते. अन्नाची मागणी ७० टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या जातींवर संशोधन करणे, दुष्काळात, पुरात टिकणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करणे इथपासून ते उत्सर्जन न करणारी खते तयार करणे आणि प्रतिमांसाचे पदार्थ तयार करणे अशा विविध पातळीवर काय काय प्रयत्न सुरू आहेत आणि अजून किती लढाई बाकी आहे ते वाचायला मिळते. प्रतिमांस म्हणजे मांस असल्यासारखे दिसते आणि चवीलाही तसेच लागते; पण ते शाकाहारी असते. स्वत: गेट्स मांसाहारी बर्गर आणि प्रतिमांसाचे बर्गर ह्यातला फरक ओळखू शकले नाहीत, त्याबद्दलही ते सांगतात. 

वाहतूक
पेट्रोल हे अतिशय शक्तिशाली आणि त्यामानाने स्वस्त स्फोटक द्रव्य आहे. जैविक इंधने, हायड्रोकार्बन इंधने, त्यांचे तंत्रज्ञान, त्याच्या किमती, त्यातले नवीन संशोधन आणि आव्हाने ह्या सगळ्याची पुस्तकात विस्ताराने चर्चा केली आहे. भविष्यात इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवत न्यावा लागेल. पण मोठ्या वाहनांना आणि लांब पल्ल्यासाठी हे तंत्रज्ञान वापरताना मर्यादा पडतात. विमान उड्डाण करते, तेव्हा त्याच्या एकूण वजनातले २० ते ४० टक्के वजन इंधनाचे असते. जेट इंधनाऐवजी तेवढीच ऊर्जा देणाऱ्या जर बॅटरी वापरायच्या ठरवल्या, तर त्यांचेच वजन जेट इंधनाच्या तब्बल ३५ पट असेल. म्हणजे वजन इतके जास्त होऊ शकते, की उड्डाणच करता येणार नाही! अशी आव्हाने, त्याला तोंड देण्यासाठी संशोधनाची गरज आणि आपण कुठवर पोहोचलो आहोत, हे गेट्स उलगडून सांगतात.   

जसजशी जगातली गरिबी कमी होत जाणार आहे, तसतसे उत्सर्जन वाढत जाणार आहे. म्हणून आपल्याला नवीन तंत्रज्ञान, कल्पकता, संशोधन ह्यांची नितांत गरज आहे. गरिबांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारत उत्सर्जन शून्याकडे नेण्याची कसरत करावी लागणार आहे. मधल्या काळात आपल्याला तापमानवाढीच्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. दुर्दैवाने तापमानवाढीला जे फारसे कारणीभूत नाहीत अशा गरिबांना ह्याचा सगळ्यात जास्त फटका बसतो आहे आणि बसणार आहे.

गेट्स ह्यांनी सुचवलेला आराखडा असा 

  • संशोधनावरचा सरकारी खर्च पाचपट करा. 
  • सरकार आणि उद्योगधंद्यांनी एकत्र काम करा - उद्योगांनीही गुंतवणूक करा. 
  • सर्व सरकारी कामे आणि प्रकल्पांसाठी फक्त हरित तंत्रज्ञान वापरलेल्याच वस्तू, इंधन विकत घ्या आणि मागणी निर्माण करा. 
  • कार्बन कर लावा आणि हरित तंत्रज्ञान वापरणाऱ्या उद्योगांना सवलती द्या.  
  • नव्या तंत्रज्ञानासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करा. 
  • हरित ऊर्जा, हरित इंधने आणि हरित उत्पादनाची मानके तयार करून जाहीर करा. 
  • नवे कायदे, करपद्धती आणि व्यापारी व्यवस्था तयार करा. 
  • हे सर्व देशांनी मिळून करायचे काम आहे आणि त्यासाठी श्रीमंत राष्ट्रांनी पुढाकार घेऊन सुरुवात करा.
  • वेगवेगळ्या देशांनी एकमेकांशी व्यापार करताना हरित तंत्रज्ञानाच्या अटी घाला.
  • ह्यासाठीची धोरणे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक अशा सर्व पातळ्यांवर वेगाने राबवा.

बिल गेट्स पॅरिस पर्यावरण कराराच्यावेळी सक्रिय होते. पर्यावरणाशी संबंधित धोरणे राबवावीत ह्यासाठी ते वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी संपर्क करत असतात. त्यांनी वेगवेगळ्या ‘हरित’ संशोधनांना अर्थसाहाय्य दिलेले आहे. सुरक्षित अणुऊर्जा तयार करणारी कंपनी काढून त्याचा प्रयोग करण्याची सिद्धता केलेली आहे. जगभरातल्या २८ अतिश्रीमंत लोकांना घेऊन breakthroughenergy.org   नावाची संस्था सुरू केली आहे. ह्याद्वारे हे लोक नवीन हरित तंत्रज्ञानात गुंतवणूक करतात.
पण आपण सामान्य माणसे काय करणार? आपल्यालाही करण्यासारख्या गोष्टी त्यांनी सुचवल्या आहेत. आपल्या कामाच्या ठिकाणी हरित तंत्रज्ञान वापरावे म्हणून आपण मागणी आणि पाठपुरावा करू शकतो. आपल्या धोरणकर्त्यांकडे आग्रह धरू शकतो. हा मुद्दा निवडणुकीत यावा म्हणून दबावगट तयार करू शकतो. ग्राहक म्हणून मांसाहार कमी करू शकतो, प्रतिमांस खाऊ शकतो. ज्यांना गाडी घ्यायची आहे, ते इलेक्ट्रिक गाडी घेऊ शकतात. थोडासा खर्च जास्त झाला तरीही हरित तंत्रज्ञानाच्या वस्तू, ऊर्जा आपण वापरू शकतो. आपण मागणी वाढवल्यावरच हे स्वस्त होणार आहे.
हे पुस्तक अगदी सरळ, सोपे आणि थेट मुद्द्याला हात घालणारे आहे. बरीच आकडेवारी आणि तंत्रज्ञान सोपे करून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू सफल झालेला आहे आणि हे सगळे करताना कुठेही कंटाळवाणे झालेले नाही. पर्यावरणाचा गुंतागुंतीचा व्यापक प्रश्न आणि त्याचे बहुपदरी महत्त्वाकांक्षी उत्तर ह्याचा विस्तृत पट ह्यातून आपल्याला चांगला समजतो. महत्त्वाच्या विषयावरचे महत्त्वाचे पुस्तक वाचल्याचे समाधान मिळते.

जसजशी जगातली गरिबी कमी होत जाणार आहे, तसतसे उत्सर्जन वाढत जाणार आहे. म्हणून आपल्याला नवीन तंत्रज्ञान, कल्पकता, संशोधन ह्यांची नितांत गरज आहे. गरिबांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारत उत्सर्जन शून्याकडे नेण्याची कसरत करावी लागणार आहे. मधल्या काळात आपल्याला तापमानवाढीच्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. दुर्दैवाने तापमानवाढीला जे फारसे कारणीभूत नाहीत अशा गरिबांना ह्याचा सगळ्यात जास्त फटका बसतो आहे आणि बसणार आहे.

संबंधित बातम्या