पर्यावरण आणि जैवसंपदा

डॉ. अंकूर पटवर्धन
सोमवार, 7 जून 2021

पर्यावरण दिन विशेष

पर्यावरण आणि जैवविविधता यांच्यात खूपच जवळचा संबंध आहे. पर्यावरण म्हणजे फक्त आपल्या भोवतालचे पाणी, हवा, माती, घन-कचरा वगैरे नाही तर किंबहुना पर्यावरण म्हणजे नैसर्गिक जिवंतपणा. हा जिवंतपणा जाणवेल, टिकेल जेव्हा जैवविविधता असेल आणि जैवाविविधता असेल तरच पर्यावरण टिकेल. आपल्या आजूबाजूला वनस्पती, पशू-पक्षी, कीटक, उडणारी फुलपाखरे, गाणारे पक्षी नाहीयेत असा विचार क्षणभर का होईना पण करून बघा. असे चित्रच किती भयावह असेल? 

वन्य प्राणी, पशुपक्षी, जंगले आणि माणूस यांचे महत्त्व सांगणारे एक अतिशय समर्पक असे संस्कृत वचन आहे. 

यावत् भूमंडलं धत्ते सशैल वन-काननम् ।
तावत् तिष्ठति मेदिन्यां संतति: पुत्रपौत्रिकी ।।

(जोपर्यंत पृथ्वीवरती प्राण्यांसहित असलेली वने अस्तित्वात आहेत तोपर्यंत या पृथ्वीवर माणसांच्या अनेक पिढ्या सुखेनैव नांदू शकतील).

वारंवार येत असलेल्या टोळधाडी, त्यामुळे होणारे पिकांचे नुकसान, बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेली माणसे, रान गव्यांमुळे झालेले शेतीचे नुकसान, हत्तींनी गावात घातलेला धुडगूस यासारख्या बातम्या आता नवीन राहिलेल्या नाहीत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जंगले, त्यातील नैसर्गिक स्रोत, तेथील जैवविविधता यांचा विकासाशी असलेला संबंध नीट समजून घेण्याची व ते स्रोत जोपासण्याची नितांत गरज भासू लागली आहे. थोडक्यात काय तर पाच ‘ज’ (जल, जंगल, जमीन, जानवर आणि जन) यांचा हा समतोल नीट साधला गेला नाही तर शाश्वत विकास हे स्वप्नच राहील. भारतातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या भविष्यात शहरात वास्तव्यास येत असताना, त्यामुळे तुटणारी जंगले व नष्ट होणारे अधिवास, नैसर्गिक स्रोत यामुळे हवामान बदलाच्या आव्हानाला सामोरे जाणे दिवसेंदिवस कठीण होईल.

अलीकडेच आपण ॲमेझॉनच्या 
जंगलाची राख आणि ऑस्ट्रेलिया देशात लागलेला वणवा याबद्दल ऐकले. अॅमेझॉन सारख्या जंगलाला लागलेल्या आगीचा काय परिणाम होऊ शकेल याचे अभ्यास आता पुढे येऊ लागले आहेत. एका शास्त्रीय अभ्यासानुसार जगभरातल्या विषुववृत्तीय जंगलांमधून असणाऱ्या जैव-वस्तुमानामुळे (बायोमास) साधारण ३७५ पेटाग्राम इतक्या कार्बनची साठवण होते (एक पेटाग्राम म्हणजे १ बिलियन किंवा १ अब्ज टन). विषुववृत्तीय वर्षावने अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या सुमारे ५० दशलक्ष जातींना (कीटक व इतर) आसरा देतात. म्हणजेच जर का ॲमेझॉन सारखी जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नाहीशी व्हायला लागली तर जगभरात कार्बनचे प्रमाण किती वाढेल व किती जैविक घटक, अन्न साखळ्या नष्ट होतील याची कल्पनाही न केलेली बरी. 

जैवविविधता, अन्न-सुरक्षा व जीवनसमृद्धता
विविध देशांच्या प्रतिनिधींच्या समावेश असलेल्या ‘इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी’च्या (आयपीबीईएस) अहवालात जैवविविधता, परिसंस्थेचे आरोग्य आणि त्याचे मनुष्याला होणारे फायदे यांच्यातील नाजूक नातेसंबंध उलगडून दाखविण्यात आला आहे. जगभरात अंदाजे एक अब्ज लोक अजूनही जंगलातून मिळणाऱ्या विविध स्रोतांवर पोषणासाठी अवलंबून आहेत. अनेक आदिवासी किंवा प्राचीन, ग्रामीण जाती-जमाती ज्या निसर्गावर अवलंबून आहेत त्यांच्या आहारातील सुमारे ३० ते ५० टक्के प्रथिनांची गरज वन्य प्राण्यांच्या स्वरूपातून येते. तसेच जगभरात सुमारे सत्तर टक्के लोक आरोग्याच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी निसर्गावर अवलंबून आहेत.

परागीभवनावर अवलंबून असणाऱ्या अन्नधान्याच्या उत्पादनात गेल्या पाच दशकात सुमारे ३०० टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. तसेच जगातील ९० टक्के सपुष्प वनस्पती या परागीभवनासाठी प्राण्यांवर अवलंबून आहेत. यातील ७५ टक्के वनस्पती मनुष्याला अन्नपुरवठा करतात. जवळजवळ दोन लाख प्रकारचे कीटक, पशु-पक्षी परागीभवनाची ही क्रिया पार पाडतात. यातील महत्त्वाचे घटक आहेत मधमाश्‍या आणि फुलपाखरे. ढोबळ मानाने सांगायचे झाले तर आपण खात असलेला अन्नाचा प्रत्येक तिसरा घास परागीभवनामुळे तयार झालेला आहे. परागीभवनामुळे बीजधारणा होऊन जंगल वाढीस चालना मिळते. म्हणजेच जगण्याला आवश्यक असा ऑक्सिजनसुद्धा या परागीभवनाचेच एक अंग आहे. ठिकठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक स्रोतांनी आपली जीवनशैली घडविली आहे. उदाहरणार्थ रानभाज्या (कंदमुळे, पाने) किंवा शेतकऱ्यांनी राखलेले पिकांचे पारंपरिक वाण. शेतीतील जैवविविधतासुद्धा अन्न- सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरू लागली आहे. एकविसाव्या शतकात जैवसंपदेशी संबंधित उद्योग एकूण अर्थव्यवहाराच्या ४० टक्के उलाढाल घडवतील, असा अंदाज आहे. थोडक्यात, शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही तर, भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल, अशी ही परिस्थिती आहे.

‘जैवविविधता म्हणजे काय? कशाला करावयाचे जैवविविधतेचे संरक्षण?’ असे प्रश्न एका चर्चासत्रात कानावर पडले. ‘शहरात कुठे जैवविविधता टिकून राहिलीये? वृक्षारोपण केले आणि चार झाडांना पाणी घातले की झाले तिचे संरक्षण,’ असा अनेक स्तरात असलेला गैरसमज जाणवला. सध्या तर जागोजागी टेकडीवर, मोकळ्या माळरानात वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत असतात. परंतु प्रत्येक जागेची तिथल्या स्थानिक ऋतुमानानुसार स्वतंत्र अशी स्वतःची परिसंस्था विकसित झालेली असते. तिथले अधिवास विशिष्ट असे असतात. त्यामुळे वृक्ष लागवड करताना ती डोळस असायला हवी. गवताळ माळराने, कुरणे, खुरटी जंगले या साऱ्यांचे पर्यावरणात आपले आपले म्हणून एक महत्त्व असते, विशिष्ट स्थान असते, ते तसेच टिकवून ठेवायला हवे तरच त्यावर अवलंबून असणारी जैवविविधता फोफावेल. सरसकट सर्वत्र होणारे वृक्षारोपण हानिकारकच आहे. शिवाय नैसर्गिक जंगलेच अधिक चांगल्या प्रकारे कार्बन शोषून घेऊ शकतात असे जगभरातल्या अभ्यासातून दिसून आले आहे. मुद्दाम लागवड केलेल्या कृत्रिम लागवडीची (प्लांटेशनची) कार्बन शोषून घेण्याची क्षमता कमी असते. म्हणजेच नैसर्गिक वनांमुळे ‘ग्रीन हाउस इफेक्ट’ किंवा ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा दुष्परिणाम जास्त चांगल्या प्रकारे कमी होतो. कृत्रिम लागवड नैसर्गिक वनांना पर्याय असू शकत नाही.

खरेच करता येईल का जंगलाची किंमत?
इमारती लाकूड, हिरडा, बेहडा सारखी औषधी झाडे, मध, तेंदूपत्ता यासारखे वनउपज यासारख्या गोष्टी बाजारात विकल्या जात असल्याने त्यातून मिळणारा ‘फायदा’ आपल्याला लगेच समजेल, परंतु जंगलातल्या इतर वन्य प्रजातींचे काय? एखाद्या प्रजातीचे महत्त्व त्या प्रजातीचे स्थानिक पर्यावरण टिकवून ठेवण्यात किती योगदान आहे व त्यामुळे इतर जीवनावश्यक गोष्टींना कसा फायदा होतो यावरून ठरू शकते, उदा. अंजनी, कुंभा, किंजळयांसारखी वरवर उपयोगी न भासणारी वन्यझाडे स्वतःकडे अनेक मधमाश्या, फुलपाखरे, पक्षी यांना आकर्षित करत असतात. अशाच कीटकांच्या जैवविविधतेमुळे परागीभवन होऊन आजूबाजूला असणारी आंबा, चिकू, काजू यांसारखी झाडे फळतात व त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळते. म्हणजेच अनेक प्रकारची झाडे- झुडुपे, वेलींनी समृद्ध असे जंगल टिकून राहिले तर, प्राणी, पक्षी आणि कीटक तर वाढतीलच; पण आपल्या बागाही टिकून राहतील. हिरवाईने नटलेल्या डोंगरांमधून बारमाही पाणी असणारे झरे, नद्या उगम पावतात. बरेचदा डोंगराच्या वळचणीला वसलेल्या गावांचे जीवनमान या जलस्रोतांवर अवलंबून असते. ह्या वरून आपणच धडा घ्यायला हवा की जंगलाची किंमत ही तत्कालीन आर्थिक फायद्यापेक्षा वर्षानुवर्षे मिळणाऱ्या इकॉलॉजिकल सिक्युरिटीमध्ये मोजायला हवी. 

लोकसहभागाचे निसर्ग संवर्धनातील महत्त्व 
आपली जैवसंपदा फक्त अभयारण्ये, प्राणिसंग्रहालये, बोटॅनिकल गार्डन, संरक्षित वने यातूनच फक्त सुरक्षित ठेवता येणार नाही. त्यासाठी विकेंद्रीकरणाची आणि सक्षम अशा लोकसहभागाची आवश्यकता आहे. सखोल अभ्यासाने व लोकसहभागाने जिथे शक्य आहे तिथे वन्यसंपदेचे आर्थिक फायदा आणि नुकसानीच्या हिशोबाशी असणारे व शाश्वत विकासाशी जोडले गेलेले नाते उलगडून दाखवायला हवे. जैवविविधता कायद्याअंतर्गत बंधनकारक असलेल्या स्थानिक जैवविविधता समित्या -बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीज् -बीएमसी - गावोगावी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून तयार व्हायला हव्यात व त्यांच्या क्षेत्रातील जैवसंपदेचे नियोजन व व्यवस्थापन यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायला हवी. प्रत्येक वेळेला वन खात्यावर अवलंबून राहणे योग्य होणार नाही. आपला खारीचा वाटा आपण उचलल्याने जर एक सक्षम नियोजनबद्ध निर्णयक्षम प्रणाली तयार झाली तरच होईल शाश्वत विकासाकडे वाटचाल, आणि मग खऱ्या अर्थाने होईल 'सबका साथ, सबका विकास' !!
केल्याने होत आहे रे.....

“कॉन्झर्वेशन : इट्स टाइम टू पुट वर्ड्‌स इन-टू अॅक्शन” (संवर्धनः आता शब्दांना कृतीची जोड देण्याची वेळ आली आहे) हे वाक्य आता फक्त बैठका, परिषदा यामधून न मांडता प्रत्यक्षात अंगीकारण्याची वेळ आली आहे. आपणसुद्धा आपला खारीचा वाटा उचलूया आणि जैवविविधता जोपासायचा संकल्प करूया. हा खारीचा वाटा आपल्याला घरबसल्यासुद्धा माहितीचे संकलन करून उचलता येईल. प्रत्येक वेळा जंगलातच जाण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे पशू-पक्षी पाहत असतो. त्याचे फोटो पण काढतो. ती माहिती आपण आपल्या नावासकट शास्त्रीय संकलनासाठी उपयोगात आणू शकतो. यासाठी त्या विषयाची जाण असायलाच हवी असा नियम नाही. असल्यास उत्तमच. जैवविविधता माहिती-तंत्रज्ञान या विषयातील तज्ज्ञ डॉ. विजय बर्वे यांच्याशी बोलताना असे जाणवले की, सध्या तरुण मुला-मुलींमध्ये एखाद्या फुलपाखराचे, पक्षी, प्राणी, वनस्पतींचे फोटो काढून ‘फेसबुक’, ‘इंस्टाग्राम’, ‘व्हॉटसअॅप’ सारख्या समाज माध्यमांवर अपलोड करून लाईक्स मिळवण्याची चढाओढ असते. त्यात क्षणिक आनंद असेलही, परंतु अशातून निसर्ग अभ्यासकांना वापरण्यायोग्य माहिती सहज उपलब्ध होत नाही. याउलट आपण काढलेले फोटो iNaturalist, India Biodiversity Portal, Biodiversity Atlas of India यांसारख्या शास्त्रीय आधार असणाऱ्या वेबसाईटवर जर का अपलोड केले तर जगभरातल्या तज्ज्ञांकडूनही आपल्याला प्रतिसाद मिळतो, पटकन ओळखू न येणाऱ्या प्रजातीचे नाव, अन्य शास्त्रीय माहिती समजते. तसेच आपण जिथे फोटो काढला त्याची आवश्यक माहिती आपल्या स्वतःच्या नावाबरोबर साठविली जाते. त्याचबरोबर आपण पाहिलेले फुलपाखरू, कीटक, पक्षी, प्राणी इतरत्र कुठे आढळून आला असेल तर या माहितीचे आपोआप संकलन होत राहते. मुख्य म्हणजे अशी माहिती अनेक वर्षांनंतरसुद्धा संशोधकांना सहज उपलब्ध होऊ शकते. वन्यजीवाच्या एखाद्या दुर्मीळ प्रजातीचा शोध, किंवा तिचा आढळ हौशी निसर्गप्रेमींमुळे उजेडात आल्याची अनेक उदाहरणे आहेत, कारण पर्यटन, ट्रेकिंग, निसर्गभ्रमंतीसाठी आपण जागोजाग फिरत असतो. त्यामुळेच एखादी जागा संरक्षित करण्यास, त्या प्रजातीचे संवर्धन करण्यात अशा माहितीचा उपयोग होतो. ‘ग्लोबी’ (Global Biotic Interactions) या संकेतस्थळावर तर आता वन्यप्राणी, कीटक इत्यादींच्या परस्पर संबंधांचे माहितीचे संकलन होते आहे. यामध्ये पशु-पक्षी यांच्या खाण्याच्या सवयी, त्यांचा परागीभवनातील सहभाग, त्यांचे भक्षक आदींच्या नोंदी होतात आणि ही माहिती जैवविविधतेच्या अभ्यासासाठी आणि संवर्धनासाठी वापरली जाते. अशा लाखो हौशी निसर्गप्रेमींच्या सहभागातूनच निसर्गातील अनेक गुपिते, प्राणी-पक्षी-फुलपाखरांचे स्थलांतराचे मार्ग यासारख्या गोष्टी उजेडात येऊ लागल्या आहेत. 

निसर्गावर आक्रमण न करता, नैसर्गिक रचनांना धक्का न लावता निसर्गाशी जवळीक साधण्याची काही अनिवार्य पथ्ये पाळून आपणही या प्रवाहात सामील होऊन  निसर्गप्रेमी म्हणून जैवविविधतेच्या, पर्यायाने पर्यावरणाच्या, संवर्धनात  डोळसपणे आपला खारीचा वाटा उचलूया.

(लेखक जीव-शास्त्राचे संशोधक असून आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अण्णासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभागाचे प्रमुख आहेत व प्रतिष्ठेच्या ‘एल्सेविअर’
या आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे भारतीय मानकरी आहेत.)

गावोगावी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून समित्या तयार व्हायला हव्यात व त्यांच्या क्षेत्रातील जैवसंपदेचे नियोजन व व्यवस्थापन यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायला हवी. प्रत्येक वेळेला वन खात्यावर अवलंबून राहणे योग्य होणार नाही. आपला खारीचा वाटा आपण उचलल्याने जर एक सक्षम नियोजनबद्ध निर्णयक्षम प्रणाली तयार झाली तरच होईल शाश्वत विकासाकडे वाटचाल, आणि मग खऱ्या अर्थाने होईल ''सबका साथ, सबका विकास'' !!

सरसकट सर्वत्र होणारे वृक्षारोपण हानिकारकच आहे. शिवाय नैसर्गिक जंगलेच अधिक चांगल्या प्रकारे कार्बन शोषून घेऊ शकतात असे जगभरातल्या अभ्यासातून दिसून आले आहे. मुद्दाम लागवड केलेल्या कृत्रिम लागवडीची (प्लांटेशनची) कार्बन शोषून घेण्याची क्षमता कमी असते. म्हणजेच नैसर्गिक वनांमुळे ‘ग्रीन हाउस इफेक्ट’ किंवा ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा दुष्परिणाम जास्त चांगल्या प्रकारे कमी  होतो. कृत्रिम लागवड नैसर्गिक वनांना पर्याय असू शकत नाही.

संबंधित बातम्या