परसातले पक्षी

शेखर ओढेकर
सोमवार, 29 मार्च 2021

ललित

साधारण पाच सात वर्षांपूर्वी मी नर्सरीतून काही रोपे आमच्या बिल्डिंगच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत लावण्यासाठी आणली होती. परिसर स्वच्छ राहावा, सुंदर दिसावा हाच उद्देश होता. या रोपांमध्ये हेमेलिया या फुलाचे एक रोप होते. इतर झाडांबरोबर हेमेलियाचे झाड जसजसे मोठे होऊ लागले, तसतसा एक एक पक्षी झाडावर हजेरी लावू लागला. पण झाडे मोठी झाल्यावर, विशेषतः हेमेलिया त्या मानाने चांगले मोठे झाले होते, पक्ष्यांची संख्या हळूहळू वाढायला लागली. मग सुरू झाला एक नवीन प्रवास...  दिवसभरात किती आणि कोणते पक्षी झाडावर येतात याचा अभ्यासच सुरू झाला!

दिवसाची सुरुवात व्हायची ‘ट्वि ट्वि’ करत येणाऱ्या शिंपी पक्ष्याच्या आवाजाने. आकाराने चिमणीसारखाच पण अत्यंत आकर्षक असा हा पक्षी. डोके तांबूस रंगाचे, पंख आणि शरीराचा वरचा भाग काळसर हिरव्या रंगाचा, पोटाचा भाग पांढऱ्या रंगाचा, डोळे तांबूस आणि शरीराच्या मनाने लांब शेपटी आणि तीही कायम वर! अतिशय चंचल असा हा पक्षी. सारख्या उड्या मारत फिरणे हाच त्यांचा उद्योग. झाडावरचे, पानांवरचे, जमिनीवरचे बारीक किडे, अळ्या हे त्याचे खाद्य. अन्नाच्या शोधार्थ इकडून तिकडे उड्या मारत जाणारा हा पक्षी. आकाराच्या मानाने ओरडणे, आवाज एकदम खणखणीत. हा आवाज आपले लक्ष वेधून घेतो. 

काही वेळाने ‘कूप कूप’ असा घुमणारा आवाज ऐकू येऊ लागला की समजावे भारद्वाजचे आगमन झाले आहे. भारद्वाज हा एक रुबाबदार पक्षी, आपल्या तोऱ्यातच हिंडत असतो. आल्यावर झाडाच्या एका फांदीवर बसून आसपासचा परिसर न्याहाळत असतो. आकाराने कावळ्याएवढा, रंग काळसर पण पंख तांबूस, डोळे मण्यासारखे लालबुंद. छोटे मोठे किडे, अळ्या, त्याचबरोबर सरडे, पाली, पक्ष्यांची अंडी, पिल्ले हेदेखील त्याचे खाद्य. त्यामानाने उडणे कमी पण चाल मात्र डौलदार! मोकळ्या जागेत जमिनीवर जेव्हा हा चालत असतो, तेव्हा त्याचा रुबाब बघण्यासारखा असतो. मला तर महान क्रिकेटपटू सर विव्हियन रिचर्ड्स जेव्हा फलंदाजीला मैदानात उतरतात, तेव्हाची त्यांची जी चाल, देहबोली (प्रचंड आत्मविश्वास असलेली व प्रतिस्पर्ध्याला एकदम तुच्छ लेखणारी) असते, त्याचीच आठवण होते. हा पक्षी जोवर झाडावर आहे तोपर्यंत इतर छोटे छोटे पक्षी त्या झाडाच्या आसपासदेखील येत नाहीत. तो उडल्यानंतरच पक्ष्यांची लगबग सुरू होते.

या झाडावर खरी गंमत येते चसमिस किंवा चष्मेवाला या पक्ष्याची. अतिशय सुंदर, आकर्षक, आकाराने लहान असा हा पक्षी. हिरवट पिवळा रंग, पंखांना काळपट कडा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्याभोवती गोलाकार पांढऱ्या कडा, जणू चष्माच; म्हणून चष्मेवाला! हा पक्षी एकटा झाडावर येत नाही. ‘झुई झुई’ असा आवाज करत त्यांचा एक छोटासा थवाच येऊन धडकतो. या छोट्या मित्रांना पाण्यात खेळायला फार आवडते. झाडांना पाणी घालत असताना काही क्षणातच ही मंडळी एकेक हजर होतात. झाडांच्या पानांवर साचलेल्या पाण्यावरदेखील मस्ती करतात, झाडाभोवती आपण केलेल्या आळ्यात साचलेल्या पाण्यात तर यथेच्छ खेळ चालतो. पाण्यामुळे झाडावरील बाहेर आलेले कीटक म्हणजे यांच्यासाठी मेजवानीच! झाडाच्या फांदीला अगदी उलटे लटकूनदेखील किडे शोधतात, तसेच फुलातील मधुरसदेखील खातात. ही मंडळी जास्त वेळ थांबत नाहीत, पण प्रचंड धुमाकूळ घालून जातात.

दिवसभरात त्या मानाने जास्त वेळा झाडावर चकरा मारणारे व बऱ्यापैकी थांबणारे म्हणजे सन बर्ड्स! शिंजीर म्हणून ते ओळखले जातात. एक जांभळा शिंजीर अन् एक जांभळ्या, तांबूस पाठीचा, पिवळसर पोटाचा शिंजीर. हे शिंजीर अतिशय देखणे पक्षी. आपली छानशी बाकदार चोच फुलांमध्ये घालून त्यातील मधुरस घेण्यासाठी यांची लगबग सुरू असते. मधुरस घेण्यासाठी ते आपल्या जिभेचा उपयोग करतात. फुलातील मधुरस घेण्यासाठी झाडाच्या फांदीवर बसायला जागा नसेल, तर हे हवेतल्या हवेत पंखांची जोरदार फडफड करून फुलाजवळ येऊन पटकन चोच फुलात घालून मधुरस शोषून घेतात. हे दृश्य फारच अप्रतिम असते. हा क्षण जेव्हा कॅमेऱ्यात टिपला जातो, तेव्हा फोटोग्राफर नक्कीच कृतकृत्य होतो. मी त्यातलाच एक भाग्यवान आहे. हे पक्षी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना ‘विच विच’ असा आवाज करत ओरडत जातात. या शिंजीर पक्ष्याच्या मादीचा रंग मात्र भुरकट असा असतो. नराप्रमाणे आकर्षक आणि चमकदार रंग मादीला नसतात.

रॉबिन हा अजून एक नित्यनेमाने येणारा पक्षी. आकाराने साधारण चिमणीसारखाच पण दिसायला जरा गुबगुबीत. नर निळसर काळ्या रंगाचा, तुकतुकीत, पार्श्वभाग मात्र तांबूस रंगाचा. मादी मात्र एकदम भुरकट रंगाची! जमिनीवरील किडे, अळ्या, कीटक शोधणे हेच मुख्य काम. त्यामुळे दिवसभर यांची भटकंती नजरेस पडते. या पक्ष्याची शीळ मंजूळ असते, दिवसभरात ती बऱ्याचवेळा ऐकायला मिळते. शीळ वाजवताना याची शेपटी आपोआपच वर जात असते, हे दृश्य छान दिसते. याच पक्ष्याचा मोठा भाऊबंद म्हणजे दयाळ पक्षी. हा आकाराने रॉबिनपेक्षा बराच मोठा. काळ्या तुकतुकीत अंगावर, पंखांवर पांढरे पट्टे; ते अगदी आकर्षक दिसतात. मादी मात्र भुऱ्या रंगाची. यांची शीळदेखील खूपच छान असते. त्यात थोडी विविधता असून ती जरा लांबलचक असते.

बुलबुल हा पक्षी तर या भागातला रहिवासी वाटावा अशा पद्धतीनेच वावरत असतो. याचे मुख्य काम म्हणजे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवलेल्या मातीच्या मोठ्या भांड्यात मनसोक्त आंघोळ करणे. या भांड्यातील पाणी पक्ष्यांनी पिण्याऐवजी बुलबुलच्या आंघोळीनेच लवकर संपते. हा बुलबुल साधारण पाच ते सहा इंच लांब असावा. लाल पार्श्वभाग व तपकिरी रंगावर पांढरे खवले खवले, डोके काळे असा रंग. याचे काहीसे कर्कश्‍श ओरडणे चालूच असते.

यांच्या जोडीला येणारा, मस्ती करणारा, दादागिरी करणारा एक पक्षी म्हणजे नाचरा (fantail flycatcher). काळ्या रंगाचा, काळ्या रंगावर पांढऱ्या भुवया, तोंडाचा बराचसा भागदेखील पांढरा असा हा पक्षी! शेपटीची पिसे पंख्यासारखी पसरून शरीराचा मागचाच भाग हा सारखा हलवत असतो. शिंपी पक्ष्याप्रमाणेच चंचल. जवळपास दुसरा पक्षी दिसल्यास एकदम धावून जाणे व त्या पक्ष्याला हुसकावून लावणे अशा पद्धतीने एक प्रकारची त्याची दादागिरीच चालू असते. याचा आवाजदेखील कर्कश्‍शच, पण कधी कधी आवाज बराही ऐकू येतो.

राम गंगा हा अजून एक नित्य भेट देणारा. हा पक्षी चिमणीसारखाच दिसणारा. फक्त रंग काळा आणि पांढरा एकत्र. डोके काळे बाकी अंगावर पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे मिश्रण! दोन्ही गालांवर पांढऱ्या रंगांचा मोठा भाग. पाठ करड्या रंगाची. हा बऱ्याच वेळा झाडाच्या खोडातील किडे, अळ्या शोधताना दिसतो. तो चोचीने खोडातील किडे ओढतानासुद्धा दिसतो. खरे तर राखी वलगुली हे या पक्ष्याचे नाव. पण राम गंगा म्हणून जास्त ओळखला जातो. 

हेमेलियाच्या झाडावर व परिसरात या नेहमी येणाऱ्या पक्ष्यांशिवाय इतर काही पक्षीदेखील बऱ्याच वेळा हजेरी लावून जातात. त्यात प्रामुख्याने कोकीळ आणि कोकिळा. वसंत ऋतूत कोकीळ येऊन हमखास ‘कुहू कुहू’ ऐकवून जातो. कोकिळा त्यामानाने जास्त नजरेस पडत नाही. कर्कश्‍श ओरडणाऱ्या सातभाईंची धाड अशीच कधीतरी येते. मांजर, एखादा शिकारी पक्षी जवळ दिसल्यास हे पक्षी ओरडून ओरडून प्रचंड गोंधळ घालतात. त्यांनादेखील पाण्यात आंघोळ करायला फार आवडते.

राखी वटवट्या, थरथऱ्या, लाल कंठाची माशीमार हे पक्षी त्या मानाने कमी येतात, पण निश्चित येतात. राखी वटवट्या नावाप्रमाणेच सारखा आवाज करीत उड्या मारत जात असतो. शिंपी पक्ष्याप्रमाणे साधारण वाटतो, पण काळपट असतो व शेपटी थोडी जाड व लांब असते. किडे, अळ्या हेच याचे खाद्य. थरथऱ्या काळसर तांबूस रंगाचा. याची सवय म्हणजे शेपटी सारखी कंप पावल्यासारखी हलवायची. हा एका जागी शांत उभा असला तरीदेखील शेपटीची थरथर चालूच असते. लाल कंठाची माशीमार त्यामानाने शांत असते. करड्या रंगावर गळ्याशी लालसर रंग, पांढरे पोट अशा रंगसंगतीचा हा पक्षी सुंदर दिसतो. झाडावर हा बऱ्याच वेळा शांत बसलेला असतो.

या झाडावर खरा गोंधळ माजतो जेव्हा शिक्रा येतो. शिक्रा हा शिकारी पक्षी. तो आल्या आल्या जवळ असलेले सर्व पक्षी मोठमोठ्याने ओरडून इतर पक्ष्यांना सावध करीत असतात. शिक्रा साधारणपणे झाडाच्या उंच फांदीवर जाऊन बसतो व तिथून संपूर्ण परिसराचे निरीक्षण करीत असतो. त्याची नजर अतिशय तीक्ष्ण असते. सावज कुठे मिळते याचा कायम शोध घेत असतो. कुठल्याही शिकारी पक्ष्याप्रमाणे बाकदार छोटी चोच, भीती वाटावी असे भेदक डोळे (मादीचे पिवळसर तर नराचे लालसर), अतिशय तीक्ष्ण नखांचे पाय, बदामी रंगावर पांढरे, तपकिरी रंगाचे ठिपके, पोटाचा भाग पांढरा असा हा शिक्रा. अधूनमधून हा झाडावर नक्कीच येतो.

या सर्व पक्ष्यांव्यतिरिक्त बिल्डिंगला लागून असलेल्या मोकळ्या जागेतील झाडांवरचे पक्षीदेखील इथे हजेरी लावतात. त्यातल्या त्यात वेडा राघू आणि खंड्या हे जास्त दिसतात. वेडा राघू अतिशय आकर्षक रंगांचा, बारीकशी पण लांब चोच असलेला पक्षी. कीटक, फुलपाखरे, टोळ हे त्यांचे खाद्य. याची खासियत म्हणजे तो हवेतल्या हवेत कीटक, टोळ पकडतो आणि झाडावर आणून झाडाच्या फांदीवर पकडलेल्या कीटकांना, फुलपाखरांना जोरात आपटतो, जेणेकरून त्या कीटकांचे कठीण भाग तुटून भक्ष्य खाण्यासाठी सोपे जाते. खंड्यादेखील जवळच्या झाडावर येऊन समाधी अवस्थेत बराच वेळ बसलेला दिसतो. खाद्य शोधण्यासाठी त्याच्या मानेची सतत चालू असलेली विशिष्ट प्रकारची हालचाल बघण्यासारखी असते. एखाद्या स्प्रिंगप्रमाणे ती वर खाली होत असते.

खरे म्हणजे जेव्हा हेमेलिया आणि इतर रोपे लावली त्यावेळी असे वाटलेही नव्हते की इथेच काही काळानंतर पक्ष्यांची अशी मांदियाळी जमेल आणि एक विरंगुळ्याचा, आनंदाचा आणि अभ्यासाचा नवीन मार्ग मिळेल. अवतीभवती असलेल्या काँक्रीटच्या जंगलातदेखील पक्ष्यांची एवढी रेलचेल, त्यांचा सहवास मिळू शकतो, हे मात्र कुणाला खरेच वाटत नाही हे नक्की!

संबंधित बातम्या