पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज

वैशाली खाडिलकर
सोमवार, 20 एप्रिल 2020

फूड पॉइंट
कोरोना हा जीवघेणा साथीचा आजार जगभर झपाट्याने पसरत आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी आपण घरात तर बसायला हवेच, पण त्याचबरोबर सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. त्यामुळे घरातून बाहेर न पडता घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून तयार केलेल्या काही खास रेसिपीज...

अन्नपूर्णा पराठा
साहित्य : एक कप आटा, पाव कप गव्हाचा दलिया, २ टेबलस्पून चणाडाळ, १ टीस्पून आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट, १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, ४ पुदिन्याची कुस्करलेली पाने, १ टीस्पून नूडल्स मसाला, चवीनुसार मीठ, हळद, पाव टीस्पून ठेचलेला ओवा, २ टेबलस्पून दही, १ टीस्पून भाजलेले तीळ (पांढरे किंवा काळे), आवश्यकतेनुसार तूप
कृती ः स्टीलच्या प्रेशरकुकरमध्ये डब्यात चणाडाळ व दलिया तीन शिट्या करून शिजवून घ्यावे. नंतर ते थंड होऊ द्यावे व परातीत काढावे. मॅशरने लगदा करावा. नंतर त्यात इतर सर्व साहित्य घालावे व एकजीव करावे. गरजेनुसार पाणी घालून कणीक मळावी. या कणकेचे समान आकाराचे गोळे करावेत. एक एक गोळा घेऊन ४ इंच व्यासाचा पराठा लाटावा. गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवून त्यावर तूप घालावे व पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा व गरमागरम सर्व्ह करावा. या पराठ्याबरोबर गोड दही छान लागते.

पनीर-स्टफ ढोकळा कप्स
साहित्य : दोन कप तयार इडली बॅटर किंवा ढोकळ्याचे बॅटर, १ कप बेसन, अर्धा कप रवा, अर्धा कप दही, मीठ, तेल, साखर, इनो सॉल्ट
स्टफिंगसाठी : प्रत्येकी पाव कप किसलेले पनीर व चीज, अर्धा कप उकडलेल्या बटाट्याचा लगदा, २ टेबलस्पून टोमॅटो केचप, १ चिमटी हळद, प्रत्येकी १ टीस्पून चिली सॉस व आले-लसूण पेस्ट, पाव टीस्पून काळीमिरपूड, मीठ, १ टीस्पून आमचूर पावडर, २ टेबलस्पून काजू तुकडे व बेदाणे, तेल, जिरे, मोहरी, हिंग यांची फोडणी
कृती ः ढोकळ्याच्या बॅटरसाठीचे साहित्य घेऊन मऊसर मिश्रण तयार करावे. काचेच्या बोलमध्ये पनीर, चीज व इतर स्टफिंगचे साहित्य घेऊन त्याचे मिश्रण तयार करावे. त्यावर फोडणी देऊन ते कालवून घ्यावे. त्याचे चपटे गोळे करावे. नंतर सिलिकॉनचे कप घ्यावेत. त्यात प्रथम ढोकळा बॅटरचा थर द्यावा. नंतर त्यामध्ये स्टफिंगचा चपटा गोळा घट्ट दाबून बसवावा. त्यावर पुन्हा ढोकळा बॅटरचा थर द्यावा. इडली कुकरमध्ये हे कप्स प्लेटमध्ये ठेवावेत व १०-१५ मिनिटे वाफवून घ्यावेत. नंतर थोड्या वेळाने छान कप्स मोल्डमधून बाहेर काढावेत. सर्व्हिंग प्लेटमध्ये घेऊन लगेच सर्व्ह करावेत. याबरोबर पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचप द्यावा.

मटकीचे कढण
साहित्य : एक कप मटकी, १ कप ओल्या नारळाचे दूध, २ मिरच्या, आले, जिरे, ४ लसूण पाकळ्या यांचे वाटण, आवश्यकतेनुसार गूळ, फोडणीसाठी तूप, मोहरी, जिरे आणि हिंग
कृती ः एका भांड्यात मटकी रात्री भिजत घालावी. सकाळी चाळणीत उपसून काढून ठेवावी व तिला थोडे मोड येऊ द्यावेत. नंतर एका स्टीलच्या डब्यात २ कप पाणी घेऊन प्रेशरकुकरमध्ये ४ शिट्या करून शिजवून घ्यावे. आता यातील मटकीची उसळ करावी व पाण्याचे कढण करावे. कढण करण्यासाठी एका स्टीलच्या वाडग्यात हे पाणी घ्यावे. त्यात ओल्या नारळाचे दूध घालावे. नंतर मिरची, आले, जिरे आणि लसूण यांचे केलेले वाटण घालावे. आवडीप्रमाणे गूळ घालावा. गॅसवर जाड बुडाची कढई ठेवून त्यात तूप, जिरे, मोहरी व हिंग घालून खमंग फोडणी करावी व त्यात हे मटकीचे पाणी घालून चांगले उकळत ठेवावे. नंतर त्यात थोडे थोडे ताक घालत सारखे ढवळत राहावे व उकळले की गॅस बंद करावा. सर्व्हिंग बोलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर घालून गरमागरम खावे.
टीप : याचप्रमाणे मूग, काळे वाटणे, चवळी, कुळीथ या कडधान्यांचे काढणही करता येते.

कंगणी पराठ्याचा हलवा
साहित्य : पराठ्यासाठी ः एक कप कंगणीचे पीठ, २ टेबलस्पून बेसन, मीठ, अर्धा टीस्पून तिखट, १ चिमटी हळद, तेल, २ टेबलस्पून दही.
हलव्यासाठी : पाव कप दूध पावडर, पाव कप साखर, २ टेबलस्पून शुद्ध तूप, पाव कप डेसिकेटेड कोकोनट किंवा ओल्या नारळाचा चव, पाव टीस्पून वेलची-जायफळपूड, दुधात खवलेल्या ४ केशरकाड्या, १ कप घट्ट दूध, सजावटीसाठी काजू-बदाम-पिस्ते काप
कृती ः कंगणी तृणधान्याची मिक्सरमधून पावडर करून ती स्टीलच्या परातीत घ्यावी. त्यात बेसन, तिखट, हळद, मीठ, दही घालून एकजीव करावे व आवश्यकतेनुसार पाणी घालून कणीक तयार करावी. तेल लावून चांगली मळावी. कणकेचे समान आकाराचे गोळे करावेत. एक एक गोळा घेऊन गोलाकार पराठा लाटावा. दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्यावा. नंतर जरा थंड झाल्यावर हाताने कुस्करावे व मिक्सरमधून रवाळ पावडर करून घ्यावी. गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घालावे. त्यात पराठ्याचा रवा खमंग भाजावा. त्यात घट्ट दूध घालून २ मिनिटे ढवळावे. नंतर त्यात दूध पावडर, साखर, डेसिकेटेड कोकोनट घालून एकजीव करावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवून त्यात केशरकाड्या, वेलची-जायफळपूड घालावी. आता गॅस बंद करावा. सर्व्हिंग बोलमध्ये हलवा काढून, काजू-बदाम-पिस्ते घालून सजवावा व गरमागरम खायला द्यावा.

चिंचेचे सार 
साहित्य : पाव कप जुनी चिंच, पाऊण कप गूळ, अर्धा टीस्पून तिखट, स्वादानुसार मीठ, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, २ सुक्या लाल मिरच्या, ७-८ कढीपत्ता पाने
कृती ः स्टीलच्या वाडग्यात गरम पाण्यात चिंच १५ मिनिटे भिजवावी. नंतर त्याचा कोळ करून ४ कप पाणी तयार करावे. त्यात तिखट, मीठ, गुळपावडर घालून एकजीव करावे. गॅसवर स्टीलच्या कढईत तेल घालून खमंग फोडणी करावी व त्यात हे पाणी घालून त्याला चांगली उकळी आणावी. झाले चमचमीत चिंचेचे सार तयार! सर्व्हिंग बोलमध्ये काढून वरून कोथिंबीरीने सजवावे व गरमागरम भाताबरोबर खायला द्यावे.

त्रिरत्नडाळ खिचडी 
साहित्य : दोन कप शिजलेला भात, प्रत्येकी पाव कप शिजलेली मसूरडाळ, तूरडाळ, मूगडाळ, २ टीस्पून तेल, ‌२ टेबलस्पून दूध, पाणी
ग्रेव्हीसाठी : अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, ४ लसूण पाकळ्या, १ चमचा भाजलेले जिरे, २ मिरच्यांचे तुकडे, ४ काश्मिरी मिरच्यांचे तुकडे यांचे वाटण, २ टेबलस्पून तूप, १ कांदा बारीक चिरलेला, अर्धा टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून पुलाव मसाला, मीठ, साखर, १ कप फेटलेले दही, कांद्याच्या चकत्या, बटाट्याच्या चकत्या, टोमॅटोच्या चकत्या, वाफवलेले मटार आणि मका दाणे.
कृती ः गॅसवर नॉनस्टिक कढईत तूप गरम करून कांदा परतावा. त्यात तयार वाटण घालून २ मिनिटे खमंग वास येऊपर्यंत परतावे. मसाले, मीठ, साखर घालून पुन्हा मिनिटभर परतावे. आता गॅस बंद करावा. त्यात दही घालून ढवळावे. कांदा चकत्या तेल टाकून सोनेरी रंगावर परतून घ्याव्या. एका बोलमध्ये शिजलेला भात, डाळी, मीठ घालून एकजीव करावे व याचे २ भाग करावेत. मायक्रोव्हेव सेफ काचेच्या बोलमध्ये तूप लावावे. त्यावर कांदाच्या परतलेल्या चकत्या व १ भाग भातडाळीचे मिश्रण पसरावे, त्यावर ग्रेव्ही ओतावी. नंतर त्यावर उरलेल्या भातडाळीचे मिश्रण पसरावे. कांदा चकत्या, टोमॅटो चकत्या, बटाट्याच्या चकत्या, वाफवलेले मटार व मका दाणे पसरावेत. शेवटी सगळीकडे दूध ओतावे. मायक्रोव्हेवमध्ये हाय मोडवर ५ मिनिटे शिजवावे किंवा गॅसवर नॉनस्टिक हंडीत हीच कृती करावी व मंद आचेवर ५ ते १० मिनिटे ठेवावे, वेळ झाली की तपासून बघावे. गरमागरम सर्व्ह करावे.

नारळ चोथ्याची भाजी - चपाती रोल
साहित्य : दोन वाट्या नारळाचे दूध काढून उरतो तो चोथा, जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, मीठ, साखर, अर्धा टीस्पून जिरेपूड, अर्धा टीस्पून मिरपूड, २ मिरच्यांचे तुकडे, १ चिमटी आल्याचा कीस, १ टेबलस्पून तेल, कोथिंबीर
कृती ः गॅसवर स्टीलच्या कढईत तेल तापवावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. त्यात कांदा व नारळाचा चोथा खमंग परतावा. बेसन भाजून घ्यावे. गॅसची आच मंद ठेवावी. नंतर त्यात अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित ढवळावे. नंतर अंदाजानुसार मीठ, साखर, जिरेपूड, मिरपूड, मिरचीचे तुकडे, आल्याचा कीस घालावा व सारखे परतावे. भाजी कोरडी होत आली, की त्यात १ टेबलस्पून तेल टाकावे व मोकळे होईपर्यंत परतावे. नंतर गॅस बंद करून त्यावर कोथिंबीर पेरावी. ही भाजी चपतीमध्ये भरून त्याचा रोल करावा, छान लागतो.

स्टफ-चटणी उपमा-बॉम्ब
साहित्य : चटणीसाठी : अर्धी वाटी ओला नारळ चव, १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना, पाव वाटी भाजलेले शेंगदाणे आणि तीळ, १ टीस्पून आमचूर पावडर, ‌४ मिरच्या, ४ लसूण पाकळ्या, अर्धा टीस्पून भाजलेले जिरे-मीरे, मीठ.
उपमासाठी (पारीसाठी) : एक वाटी बारीक रवा, १ टेबलस्पून हिरव्या व लाल मिरच्यांचे तुकडे, तूप, जिरे, हिंग,‌ कढीपत्ता, १ टेबलस्पून चणाडाळ-उडीदडाळ, दीड वाटी आंबट ताक, मीठ, पाणी, १ टेबलस्पून मसाला शेंगदाणे, तूप गरजेनुसार, २ टेबलस्पून बेसन किंवा सातू पीठ, तेल, भाजलेल्या पोह्यांचा चुरा गरजेनुसार, टोमॅटो केचप.
कृती ः पोळ्या करून झाल्या की त्याच तव्यावर मंद आचेवर २ मिनिटे नारळ चव बदामी रंगावर भाजून घ्यावा. इतर साहित्य घेऊन मिक्सरमध्ये चटणी करून घ्यावी. त्यात पाणी घालू नये. चटणी कोरडी असावी. ती एका बोलमध्ये काढावी. गॅसवर कॉपर बॉटम स्टीलची कढई ठेवून त्यात तूप घालावे. रवा मंद आचेवर भाजावा. नंतर प्लेटमध्ये काढावा. त्याच कढईत तूप घालावे व खमंग फोडणी करावी. नंतर रवा घालून ढवळावे व बाकीचे साहित्य घालावे. नंतर ताक ‌घालावे व गरज वाटेल तसे पाणी घालावे. मंद आचेवर सारखे ढवळत उपमा करावा. उपमा मऊसर असावा. तयार झाल्यावर प्लेटमध्ये काढावा. थंड होऊ द्यावा. याच्या बॉम्बसाठी पाऱ्या करायच्या आहेत. उपमा मळून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. हाताला तेल लावून पारी करावी. लिंबाएवढे गोळे तयार करावे. एक गोळा हातात घ्यावा. त्यामध्ये चटणीचे सारण भरावे. मोदकांसाठी करतो तशी पारी मिटवावी. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. एका काचेच्या बोलमध्ये बेसन घेऊन त्यात पाणी घालून पातळसर मिश्रण करावे. प्लेटमध्ये पोह्यांचा केलेला चुरा ठेवावा. प्रत्येक बॉम्ब वरील मिश्रणात बुडवावा व चुऱ्याच्या प्लेटमध्ये घोळवावा. अशाचप्रकारे सर्व बॉम्ब करावे. गॅसवर कढईत तेल तापवावे. मंद आचेवर बॉम्ब खमंग तळावेत. प्लेटमध्ये काढावेत. प्लेटमध्ये एक मोठा सूपचा चमचा ठेवावा व त्यावर केचप घालावे. त्यावर बॉम्ब ठेवावा, टुथपीक टोचावी.

संबंधित बातम्या