मूस, पॅनकेक अन सॅलड

अनघा देसाई
सोमवार, 2 मे 2022

फूड पॉइंट

लस्सी
तयारीचा वेळ : १० मिनिटे
कृतीची वेळ : १० मिनिटे
वाढप : २ जणांसाठी
साहित्य : एक कप आंब्याच्या फोडी, १ कप दही, अर्धा कप थंड दूध, ४ चमचे साखर, पाव चमचा वेलची पूड, बर्फाचे खडे (ऐच्छिक).
कृती : थोड्या आंब्याच्या फोडी सजावटीसाठी बाजूला ठेवाव्यात. उरलेल्या फोडी, दही, थंड दूध, साखर, वेलची पूड हे साहित्य ब्लेंडरमध्ये घालून २ मिनिटे ब्लेंड करावे. लस्सी थंड हवी असल्यास बर्फाचे खडे घालावेत. नंतर ग्लासमध्ये ओतून बाजूला ठेवलेल्या फोडींनी सजवावे.

मूस

तयारीचा वेळ : १० मिनिटे
सेटिंगचा वेळ : ६० मिनिटे     
वाढप : ४ जणांसाठी
साहित्य : दोन आंबे, १-२ मोठे चमचे साखर, अर्धा कप व्हिपिंग क्रीम, सजावटीसाठी बदाम पिस्त्याचे काप.
कृती : आंबे सोलून फोडी करून घ्याव्यात. ब्लेंडरमध्ये आंब्याच्या फोडी आणि साखर ब्लेंड करावी. क्रीम फेसून घ्यावे (शक्यतो व्हिस्कर किंवा इलेक्ट्रिक बीटर वापरावा). फेसलेल्या क्रीममध्ये आंब्याचा ब्लेंड केलेला गर हलक्या हाताने मिसळावा. तुमच्या आवडीच्या ग्लासमध्ये किंवा बाऊलमध्ये भरून फ्रीजमध्ये कमीतकमी एक तासभर थंड करायला ठेवावे. सर्व्ह करताना बदाम पिस्त्याचे काप घालावेत. 

सॅलड
तयारीचा वेळ : १५ मिनिटे
कृतीची वेळ : २० मिनिटे + फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी लागणार वेळ
वाढप : ४ जणांसाठी
साहित्य : सॅलडसाठी - एक हेड लेट्युस छोटे तुकडे केलेला, १ लाल सिमला मिरची (किंवा अर्धी लाल सिमला मिरची आणि अर्धी पिवळी सिमला मिरची),३ आंबे फोडी करून, अर्धा कप चिरलेला पातीचा कांदा, एक तृतीयांश कप भाजलेले शेंगदाणे, पाव कप कोथिंबीर (ऐच्छिक), १ मिरची बारीक चिरलेली.
ड्रेसिंगसाठी – पाव कप पीनट बटर, पाव कप लिंबाचा रस, १ मोठा चमचा सोया सॉस, १ मोठा चमचा व्हिनेगर, १ मोठा चमचा मध, १ चमचा तिळाचे तेल, २ लसूण पाकळ्या, चिली फ्लेक्स आवडीप्रमाणे.
कृती : भाजलेले शेंगदाणे बाजूला ठेवून सॅलडचे उर्वरित सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करावे. लसूण पाकळ्या बारीक ठेचून त्यात ड्रेसिंगचे इतर साहित्य मिसळावे. एकत्र केलेल्या सॅलडच्या साहित्यावर तयार ड्रेसिंग ओतून अलगद मिसळावे. आवडीप्रमाणे फ्रीजमध्ये थंड करावे. वाढण्यापूर्वी भाजलेल्या शेंगदाण्यांनी सजवावे.

केक
तयारीचा वेळ : १५ मिनिटे
कृतीची वेळ : १ तास
वाढप : ४ जणांसाठी
साहित्य : पाऊण कप मैदा, १ चिमूट मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, दीड मोठा चमचा लोणी, ३ मोठे चमचे साखर, अर्धा कप आंब्याचा रस, १ अंडे, २-३ मोठे चमचे दूध, २ मोठे चमचे बदाम पिस्त्याचे काप.  
कृती : मैदा, मीठ, बेकिंग पावडर एकत्र चाळावी. लोणी आणि साखर एकत्र फेसावे. अंडे फेसून घ्यावे. फेसलेले अंडे लोणी साखरेच्या मिश्रणात हळूहळू एकजीव करावे. त्यातच मैदा, आंब्याचा रस चमचा चमचा हलक्या हाताने हळूहळू मिसळावा. मिश्रण अधिक घट्ट वाटल्यास आवश्यकतेप्रमाणे दूध मिसळावे. केकच्या साच्याला लोणी लावून तयार मिश्रण त्यात ओतावे. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअसला ३५ मिनिटे बेक करावे. थंड झाल्यावर साच्यातून केक काढावा.

पुऱ्या
तयारीची वेळ : ३० मिनिटे
कृतीची वेळ : ४० मिनिटे
वाढप : अंदाजे १२ पुऱ्या
साहित्य : एक चमचा जिरे, अर्धा चमचा राई, २ चमचे चिली फ्लेक्स, १ कप मैदा, पाव चमचा मीठ, १ मोठा चमचा पातळ तूप, अर्धा कप आंब्याचा गर, १ चमचा साखर, पाणी आवश्यकतेप्रमाणे.
कृती : आंब्याचा रस आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्यावे. जिरे आणि राई ह्यांची भरड पूड करावी. मैद्यामध्ये जिरे राई पूड, चिली फ्लेक्स, मीठ घालून आंब्याच्या रसात पीठ घट्ट भिजवावे. आवश्यक वाटल्यास थोडेसे पाणी वापरावे. १५-२० मिनिटांनी पुऱ्या लाटाव्यात व तळाव्यात.

पॅनकेक
तयारीचा वेळ : १० मिनिटे + ३० मिनिटे
कृतीची वेळ : ३० मिनिटे
वाढप : २ जणांसाठी (अंदाजे ८ पॅनकेक)
साहित्य : एक कप कणीक, १ चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा मीठ, १ मोठा चमचा साखर (ऐच्छिक), पाऊण कप दूध, अर्धा कप आंब्याचा रस, २ मोठे चमचे पातळ तूप, तूप तळण्यासाठी, आंब्याच्या फोडी आणि मध सजावटीसाठी.
कृती : कणीक, बेकिंग पावडर, मीठ एकत्र करावे. दूध, आंब्याचा रस, साखर आणि पातळ तूप एकत्र फेटून घ्यावे. हे मिश्रण तयार कणकेच्या मिश्रणात ओतून एकत्र करावे. एकत्र करताना गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तयार मिश्रण चमच्यातून सहज  पडत नाही, असे वाटल्यास थोडे अधिक दूध घालावे. हे मिश्रण अर्धा तास झाकून ठेवावे.अर्ध्या तासाने सपाट तवा किंवा पॅन गरम करावा. तव्यावर तूप पसरावे. त्यावर एक- दीड मोठे चमचे तयार पीठ पसरावे आणि लहान पोळ्या तयार कराव्यात. दोन्ही बाजूंनी तूप सोडून भाजून घ्यावे.वरून आंब्याच्या फोडींनी सजवून खायला द्यावे. आवडत असल्यास वरून मधाची धार सोडावी.

मँगो सॅगो पुडिंग
तयारीचा वेळ : २० मिनिटे
कृतीची वेळ : ३० मिनिटे अधिक २ तास फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी.
वाढप : ४ जणांसाठी
साहित्य : दोन कप आंब्याच्या फोडी, १ कप नारळाचे दूध, २ मोठे चमचे मध, अर्धा कप साबुदाणा, पाव चमचा मीठ.  
वरच्या थरासाठी - पाव कप नारळाचे दूध, पाव कप आंब्याच्या फोडी.
कृती : साबुदाणा पुरेशा पाण्यात पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यावा. गाळणीने गाळून थंड पाण्याने धुऊन घ्यावा.
 १ कप आंब्याच्या फोडी, मध आणि नारळाचे दूध ब्लेंडरने  ब्लेंड करावे. त्यात शिजवलेला साबुदाणा आणि १ कप आंब्याच्या फोडी मिसळून चार बाऊलमध्ये विभागून फ्रीजमध्ये ठेवून थंड करावे. एक तासाने त्यावर नारळाचे दूध पसरून आणखी कमीतकमी तासभर थंड करावे. सर्व्ह करताना आंब्याच्या फोडींनी सजवावे.

रायते
तयारीचा वेळ : १५ मिनिटे
कृतीची वेळ : १५ मिनिटे
वाढप : २ जणांसाठी
साहित्य : चार-पाच रायवळ आंबे, पाव कप ओले खोबरे, १ चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा जिरे, पाव चमचा राई, १०० मिली पाणी, पाव कप गूळ, १ मोठा चमचा तेल, अर्धा चमचा राई, १ चिमूट हिंग, मीठ चवीप्रमाणे.
कृती : आंबे धुऊन सोलावेत. सालींना चिकटलेला गरही काढून घ्यावा. ओले खोबरे, मिरची पूड, जिरे आणि पाव चमचा राई १०० मिली पाण्यात वाटून घ्यावे. तेल गरम करून राई, हिंगाची फोडणी करावी. सोललेले आंबे रसासकट फोडणीत घालावेत. मिश्रण ढवळून झाकण ठेवावे. मध्यम आचेवर ५ मिनिटे शिजू द्यावे. नंतर खोबऱ्याचे वाटण, मीठ आणि गूळ घालावा. गूळ विरघळेपर्यंत उकळावे. आणखी ५ मिनिटे उकळी आणून उतरवावे.   

संबंधित बातम्या