कच्च्या फणसाचे चवदार पदार्थ

अनघा देसाई
सोमवार, 4 एप्रिल 2022

फूड पॉइंट

कुयरी, मिरचीची भाजी
साहित्य : अर्धा किलो मोठे तुकडे केलेला कच्चा फणस, २ मोठे चमचे तेल, १ कप बारीक चिरलेला कांदा, २० पाकळ्या लसूण, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, मीठ चवीप्रमाणे, अर्धा कप ओले खोबरे, कोथिंबीर आवडीप्रमाणे.
कृती : फणसाचे साल आणि मधला दांडा काढून, तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावे. नंतर हलक्या हाताने ठेचून, कुस्करून घ्यावे. लसूण आणि हिरव्या मिरच्या एकत्र कुटाव्यात. तेल मध्यम आचेवर गरम करावे. त्यात कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतावा. त्यात कुटलेले लसूण, मिरची घालून परतावे. खमंग वास आल्यावर हळद घालून अर्धा मिनिट परतावे. त्यात कुस्करलेला फणस आणि मीठ घालून चांगले ढवळावे. झाकण ठेवून वाफ आणावी. मग त्यात खोबरे मिसळून, झाकण न घालता दोन मिनिटे शिजवावे. वरून कोथिंबीर घालून वाढावे. 

लखनवी भाजी
साहित्य : तेल आवश्यकतेप्रमाणे, ३ मसाला वेलची (ठेचलेली), ३-४ तेजपत्ता, २-४ दालचिनीचे तुकडे, ८-१० लवंगा, १ किलो कच्चा फणस, १ किलो कांदे, अर्धा चमचा हळद, २ चमचे धणे पूड, २ चमचे लाल मिरची पूड, १ कप दही, मीठ चवीप्रमाणे.
कृती : फणसाचे साल आणि दांडा काढून १ इंच आकाराचे तुकडे करावेत. कांदा उभा पातळ चिरावा. तेल गरम करून फणसाचे तुकडे लालसर रंगावर तळून निथळून घ्यावेत. फणस तळून उरलेल्या तेलातले २ मोठे चमचे तेल गरम करून त्यात मसाला वेलची, तेजपत्ता, दालचिनी, लवंगा १ मिनिट परतावे. त्यात कांदा आणि तळलेला फणस घालून ५ मिनिटे परतावे. नंतर हळद पूड, मिरची पूड, धणे पूड आणि फेटलेले दही घालून चांगले मिसळावे. झाकण ठेवून पूर्ण शिजवावे.     

कुयरीची मसालेदार भाजी
साहित्य : अर्धा किलो कच्चा फणस, पाव कप काळे वाटाणे, दीड कप बारीक चिरलेला कांदा, १० पाकळ्या लसूण, २ हिरव्या मिरच्या, १ इंच आले, अर्धा चमचा हळद पूड, पाऊण चमचा मिरची पूड, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ चवीप्रमाणे, २ मोठे चमचे तेल, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा राई, अर्धा चमचा साखर, अर्धा कप ओले खोबरे, कोथिंबीर (आवडीप्रमाणे).
कृती : काळे वाटाणे ८-१० तास भिजवून प्रेशर कुकरमध्ये उकडून घ्यावेत. फणस साल आणि दांडा काढून, तुकडे करून शिजवावे व ठेचून कुस्करून घ्यावा. तेल गरम करून त्यात राई, हिंग घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालावा व मऊ होईपर्यंत परतावा. त्यात ठेचलेले आले लसूण आणि मिरची परतावी. नंतर हळद, मिरची पूड एक मिनिट परतून त्यातच शिजवलेले काळे वाटाणे त्यातील पाण्यासकट घालावेत. उकळी आल्यानंतर ठेचलेला फणस आणि मीठ घालून परतावे. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजू द्यावे. चवीला साखर आणि गरम मसाला घालावा. १-२ मिनिटांनंतर खोबरे आणि कोथिंबीर मिसळावी. ही भाजी थोडा वेळ मुरू द्यावी आणि नंतर वाढावी.

शमी कबाब
साहित्य : पाचशे ग्रॅम कच्चा फणस, १ कप भिजवलेली चणा डाळ, २ कांदे बारीक चिरून, २ तेजपान, ३ -४ लवंगा, १ इंच दालचिनी, अर्धा चमचा काळे मिरे, २ मसाला वेलची, अर्धा चमचा शहाजिरे, १ इंच आले, २० लसूण पाकळ्या, २-३ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद पूड, अर्धा मोठा चमचा मिरची पूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव कप चिरलेला पुदिना, २ मोठे चमचे तेल, तूप आवश्यकतेनुसार.
कृती : फणसाचे साल आणि मधला दांडा काढून लहान तुकडे करावेत. तेल गरम करून त्यात तेजपान, लवंगा, दालचिनी, काळे मिरे, मसाला वेलची, शहाजिरे एक मिनिट परतावे. नंतर भिजलेली चणा डाळ, फणसाचे तुकडे, आले, लसूण, हिरवी मिरची घालून चणा डाळीचा रंग बदलेपर्यंत परतावे. आता हळद पूड, मिरची पूड, गरम मसाला मिसळावा व थोडे पाणी घालून डाळ पूर्ण शिजवून घ्यावी. थंड करावी व नंतर मसाला वेलची आणि तेजपान काढून टाकून, पुदिना घालावा. हे मिश्रण ब्लेंडरमध्ये बारीक करावे. मिश्रणाचे चपटे गोळे करावेत. तव्यावर तूप सोडून हे गोळे भाजावेत किंवा कढईमध्ये तेलात तळावेत. चटणी किंवा सॉसबरोबर खायला द्यावेत.

रस्सा भाजी
साहित्य : तीनशे ग्रॅम कच्चा फणस चौकोनी तुकडे केलेला, अर्धा कप मक्याच्या कणसाचे तुकडे, अर्धा कप लाल भोपळ्याचे तुकडे, अर्धा कप सुरणाचे तुकडे, १-२ शेवग्याच्या शेंगा २ इंच आकाराचे तुकडे करून, २ मोठे चमचे तूर डाळ, १ मोठा चमचा तेल, अर्धा चमचा राई, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पूड, १ चमचा लाल मिरची पूड, मीठ चवीप्रमाणे, अर्धा कप ओले खोबरे, १ चमचा धणे, १०-१२ काळे मिरे, १०-१२ तिरफळ (ऐच्छिक), चिंचेचा कोळ आवडीप्रमाणे, गूळ आवडीप्रमाणे.
कृती : तूर डाळ २ तास पाण्यात भिजवावी. तिरफळ २ तास पाव कप पाण्यात भिजवावे. नंतर ते कुस्करून पाणी घ्यावे. काळे मिरे, धणे आणि ओले खोबरे जाडेभरडे वाटावे. तेलात राई, हिंगाची फोडणी करून भिजवलेली तूर डाळ परतावी. त्यात हळद पूड, मिरची पूड घालून परतावे. त्यातच सर्व भाज्या परतून त्या बुडतील एवढे पाणी घालून शिजवाव्यात. भाज्या जवळजवळ शिजल्यानंतर चिंचेचा कोळ आणि गूळ घालून एक उकळी आल्यानंतर वाटलेले धणे, मिरे, खोबरे मिसळावे. सर्वात शेवटी तिरफळाचे पाणी मिसळून एक उकळी  आणावी.

बिर्याणी
साहित्य : चारशे ग्रॅम कच्च्या फणसाचे तुकडे, ४०० ग्रॅम तांदूळ, २ मोठे चमचे बेसन, ४ मोठे चमचे तेल, ३ लवंगा, २ तेजपान, १ चमचा जिरे, ३ हिरवी वेलची, १ मसाला वेलची, १ इंच दालचिनी, अर्धा चमचा काळे मिरे, १ मोठा कांदा बारीक चिरलेला, २ मोठे चमचे वाटलेले आले लसूण, २ मध्यम बारीक चिरलेले टोमॅटो, मीठ चवीप्रमाणे, २ चमचे लाल मिरची पूड, १ चमचा हळद पूड, १ मोठा चमचा धणे पूड, अर्धा मोठा चमचा बिर्याणी मसाला, अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिना, २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, तूप, केशर, तळलेले काजू सजावटीसाठी.
कृती : फणसाचे तुकडे अर्धा चमचा हळद पूड आणि चवीपुरते मीठ घालून उकडून घ्यावेत. पाणी पूर्ण निथळून घ्यावे. फणसाच्या तुकड्यांना अर्धा चमचा मिरची पूड लावून थोडा वेळ मुरू द्यावे. नंतर त्यावर बेसन पसरावे. तव्यावर थोडे तेल घालून हे तुकडे तपकिरी रंग येईपर्यंत परतावेत. पुरेशा पाण्यात चवीपुरते मीठ घालून थोडी कणी ठेवून तांदूळ शिजवावा. तयार भात ताटात पसरून मोकळा करावा. पातेल्यात तेल गरम करून सर्व आख्खा मसाला अर्धा मिनिट परतावा. कांदा परता. नंतर आले, लसूण परतून टोमॅटो आणि मीठ घालावे. टोमॅटो थोडे मऊ झाल्यानंतर उरलेली मिरची पूड, हळद पूड, धणे पूड, बिर्याणी मसाला क्रमाने घालून ५ मिनिटे शिजवावे. त्यात अर्धा-पाऊण कप पाणी घालून उकळी आणावी. आता तळलेले फणसाचे तुकडे त्यात मिसळून ५ मिनिटे शिजू द्यावे. त्यावर अर्धी कोथिंबीर आणि पुदिना पसरून शिजलेल्या भाताचा थर द्यावा. वरून उरलेली कोथिंबीर आणि पुदिना पसरून २ चमचे तूप आणि चुरडलेले केशर घालावे. घट्ट झाकण लावून मंद आचेवर १० मिनिटे शिजवावे. वाढताना काजूने सजवावे.

लोणचे
साहित्य : पाचशे ग्रॅम कच्चा फणस, अर्धा चमचा हळद पूड, २ मोठे चमचे बडीशेप, १ मोठा चमचा धणे, १ मोठा चमचा राई, १ चमचा मेथी, १ मोठा चमचा जिरे, १ मोठा चमचा कलौंजी, २० लसूण पाकळ्या, १ चमचा हळद पूड, २ मोठे चमचे किंवा अधिक मिरची पूड, २ मोठे चमचे आमचूर, ३ मोठे चमचे मीठ, तेल (शक्य असल्यास सरसोंचे) आवश्यकतेप्रमाणे.
कृती : फणसाचे चौकोनी तुकडे करावेत. थोडे मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून पुरेशा पाण्यात फणस अर्धवट शिजवून घ्यावा. फणस पाणी निथळून कपड्यावर पसरून सुकवावा. बडीशेप, धणे, राई, मेथी, जिरे, कलौंजी वेगवेगळे भाजून एकत्र कुटावे. सुकलेल्या फणसाच्या तुकड्यांना आमचूर, मीठ आणि कुटलेला मसाला लावावा. १ कप तेल गरम करून गॅस बंद करावा. लसूण घालून भांडे खाली उतरवावे. कोमट झाल्यावर हळद पूड, मिरची पूड मिसळावी. हे तेल फणसाच्या मसाला लावलेल्या तुकड्यामध्ये मिसळावे. हे सर्व कोरड्या बरणीत भरावे. थोडे तेल गरम करून थंड करावे. फोडी बुडतील इतपत हे तेल बरणीत घालावे. हे लोणचे ३-४ दिवसांत मुरते.

फणसाची करी
साहित्य : तीन-चार लाल सुक्या मिरच्या, अर्धा इंच आले, १ मोठा चमचा धणे, ५ पाकळ्या लसूण, अर्धा चमचा हळद पूड, २ मोठे चमचे तेल, अर्धा कांदा बारीक चिरलेला, १ कढीपत्त्याची डहाळी, ३०० ग्रॅम चौकोनी तुकडे केलेला फणस, अर्धा कप ओले खोबरे, २ मोठे चमचे चिंचेचा कोळ, गूळ चवीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे.
कृती : सुक्या मिरच्या गरम पाण्यात तासभर भिजवाव्यात. भिजलेल्या मिरच्या, आले, धणे, लसूण, हळद पूड एकत्र बारीक वाटावी. ओले खोबरे बारीक वाटावे. पातेल्यात तेल गरम करून कांदा परतावा, त्यात कढीपत्ताही परतावा. नंतर एकत्र वाटलेला मसाला एक मिनिट परतून फणसाचे तुकडे आणि मीठ घालून, परतून पुरेसे पाणी घालून शिजवावे. अर्धवट शिजल्यावर चिंचेचा कोळ घालावा. एक उकळी आल्यावर वाटलेले खोबरे घालून करीमध्ये आवडीप्रमाणे पाणी घालावे. फणस पूर्ण शिजल्यानंतर गॅसवरून करी उतरवावी. गरम वाफाळलेल्या भातावर करी वाढावी.  

संबंधित बातम्या