खमंग, चटपटीत पराठा! 

कोमल मोरे
सोमवार, 6 जुलै 2020

पराठा हा पदार्थ शक्यतो सर्वांना आवडतो. शिवाय सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम असा हा उत्तम पर्यायही असतो! मात्र दरवेळी ठराविक प्रकारचेच पराठे न करता नेहमीच्या रेसिपीत थोडे बदल करून वेगवेगळ्या प्रकारे पराठे करता येतील. अशाच काही रेसिपीज इथे देत आहोत...  

पालक पराठा
साहित्य : तीन मोठे चमचे तूप, अर्धा छोटा चमचा तेल, दीड वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी पालक पेस्ट, १ छोटा चमचा मिरची-लसूण-आले पेस्ट, चवीनुसार मीठ, पाव चमचा गरम मसाला, अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, १ छोटा चमचा धनेपूड
कृती : एका मोठ्या परातीत कणीक भिजवण्यासाठी वरील सर्व साहित्य घ्यावे. आता त्यात थोडे-थोडे पाणी घालून पोळ्यांसाठी करतो तशी मऊसर कणीक मळून घ्यावी. अर्धा चमचा तेल कणकेच्या गोळ्याला लावून आणखी २ मिनिटे कणीक मळावी. आता हा चांगला मळलेला कणकेचा गोळा कमीतकमी २५ मिनिटे झाकून ठेवावा. नंतर या कणकेचे एकसारखे लहान गोळे करून घ्यावेत. आता एक-एक गोळा घेऊन पालकच्या पोळ्या लाटून तूप लावून गरम तव्यावर खरपूस भाजाव्यात. गरमागरम पालक पराठा रायत्याबरोबर खायला द्यावा.

खजूर पराठा 
साहित्य : अर्धा कप बिया काढलेले खजुराचे तुकडे, अर्धा कप दूध, तूप, गव्हाचे पीठ व चवीनुसार मीठ. 
कृती : प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात दूध आणि खजुराचे तुकडे एकत्र करून वाटून घ्यावेत. आता तयार पेस्टमध्ये पीठ, मोहन म्हणून तूप व चवीनुसार मीठ घालावे व कणीक मळून घ्यावी. आता तयार कणकेचे छोटे छोटे गोळे करून पराठे लाटून गरम तव्यावर तूप घालावे खमंग भाजून घ्यावेत. घरातील लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींना हा पराठा नक्की खायला द्यावा.

आलू पराठा 
साहित्य : दोन ते अडीच वाटी गव्हाचे पीठ, २ मध्यम आकाराचे शिजलेले बटाटे, १ चमचा लसूण पेस्ट, १ ते दीड चमचा मिरच्यांचा ठेचा, पाऊण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा जिरे, १ लहान चमचा जिरेपूड, मीठ व बटर. 
कृती : प्रथम गव्हाच्या पिठात चवीनुसार मीठ घालून कणीक मळून घ्यावी. आता शिजलेले बटाटे किसून घ्यावेत. त्यामुळे बटाट्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. नंतर त्यात लसूण पेस्ट, ठेचा, कोथिंबीर, जिरेपूड आणि मीठ घालून मिक्स करून घ्यावे. आता कणकेचे आणि बटाट्याच्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे समान गोळे करून घ्यावेत. कणकेच्या गोळ्याची छोटी पोळी लाटून त्यात बटाट्याच्या मिश्रणाचा एक गोळा मध्यभागी ठेवावा आणि कणकेची बाकीची टोके मध्यभागी आणून बटाट्याचे मिश्रण पूर्ण कव्हर करावे (पुरणपोळीला जसे स्टफिंग करतो त्याप्रमाणे). पोळपाटावर थोडेसे गव्हाचे पीठ लावावे आणि हलक्या हाताने पराठा लाटावा. गरम तव्यावर बटर किंवा तेलावर पराठा खरपूस भाजून घ्यावा. गरमागरम सर्व्ह करावा.

कोबी पराठा
साहित्य : आवश्यकतेनुसार गव्हाचे पीठ, मीठ, तूप, कोबीचा कीस, मिरची, आले, कोथिंबीर, हळद, हिंग, जिरेपूड.
कृती : एका परातीत गव्हाचे पीठ घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ घालून कणीक मळून घ्यावी. तयार कणीक थोडावेळ बाजूला ठेवावी. आता कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. आले व मिरची वाटून घ्यावी. भरून एका भांड्यात तूप गरम करून त्यात वाटलेली मिरची, हिंग, हळद, कोबीचा कीस, कोथिंबीर, मीठ, जिरेपूड घालून वाफवून घ्यावे. आता कणकेचे लहान गोळे करून घ्यावेत. एक एक गोळा घेऊन त्यात कोबीच्या मिश्रणाचे स्टफिंग करून पराठा हलक्या हाताने लाटून घ्यावा. गरम तव्यावर तूप सोडून खमंग भाजावा. गरमागरम पराठा दह्याबरोबर सर्व्ह करावा.

मूग डाळ पराठा
साहित्य : दोन वाट्या गव्हाचे पीठ, १ वाटी मूग डाळ, मीठ, हिंग, हळद, तिखट, तेल, जिरे. 
कृती : प्रथम मूग डाळ ४ ते ५ तास भिजत घालावी. नंतर पाण्यातून काढून पूर्ण निथळून घ्यावी. आता मिक्सरमधून खरबरीत वाटून घ्यावी. एका परातीत गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, हिंग, हळद, तिखट, मोहनासाठी थोडेसे गरम तेल, जिरे आणि वाटलेली मूग डाळ घालून कणीक मळून घ्यावी. आता तयार कणकेचे लहान लहान गोळे करून पराठे लाटावेत. गरम तव्यावर तेल सोडून खरपूस भाजून घ्यावेत. भाजताना पराठा थोडासा दाबावा म्हणजे अर्धवट वाटलेली डाळ छान खरपूस होईल.

फरसाण पराठा
साहित्य : आवश्यकतेनुसार गव्हाचे पीठ, मीठ, २ वाट्या फरसाण, १ छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट, गरम मसाला, चाट मसाला.  
कृती : एका परातीत गव्हाचे पीठ घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ घालून कणीक मळून घ्यावी. तयार कणीक थोडावेळ बाजूला ठेवावी. आता एका बोलमध्ये फरसाण कुस्करून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून सारण तयार करावे. आवडत असल्यास चिंचेचा कोळ घालून या सारणाला आंबटगोड चव आणू शकता. नेहमीप्रमाणे कणकेच्या गोळ्यात हे सारण भरून पराठा लाटून भाजून घ्यावा. पराठ्याला चटपटीत चव येते. नायलॉन शेवेचाही असा पराठा करता येतो.

चॉकलेट पराठा
साहित्य : आवश्यकतेनुसार गव्हाचे पीठ, चोको चिप्स, मीठ, तूप.
कृती : एका परातीत पीठ घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ व तूप घालावे आणि हातांनी चांगले चोळून घ्यावे. आता या पिठात पाणी घालून मऊसर कणीक मळून घ्यावी. साधारण १० मिनिटांनी या कणकेचे गोळे करून घ्यावेत. आता मध्यम आकाराच्या आणि जाडीच्या पोळ्या लाटून घ्याव्यात. पोळपाटावर एक पोळी ठेवून त्यावर चोको चिप्स पसरावेत. लगेच वरून दुसरी पोळी पसरवून कडा दाबून बंद करून टाकाव्यात. आता पराठा गरम तव्यावर तूप सोडून भाजून घ्यावा. चोको चिप्स विरघळून पराठ्याला छान फ्लेवर येतो.

मेथी पराठा
साहित्य : दोन कप बारीक चिरलेली मेथीची पाने, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ कप गव्हाचे पीठ, अर्धा कप तांदळाचे पीठ, मिरची-आले-लसूण पेस्ट, चवीनुसार, १ चमचा दही, १ चमचा ओवा, हळद, चवीनुसार मीठ, तेल किंवा तूप.
कृती : मेथीची पाने आणि थोडे मीठ एकत्र हालवून १० मिनिटे बाजूला ठेवावे. नंतर त्यामध्ये बाकीचे साहित्य घालून चांगले एकत्र करून हालवून घ्यावे. आता त्यात थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे. शेवटी तयार कणकेवर थोडे तेल घालून मळून घ्यावी. आता ही तयार कणीक अर्धा तास तरी भिजण्यासाठी बाजूला ठेवावी. नंतर या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. गॅसवर तवा गरम करायला ठेवावा. आता एक-एक गोळा घेऊन पराठा लाटून घ्यावा आणि दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्यावा. पराठा भाजताना आवडीनुसार तूप किंवा तेल लावावे. झाला पराठा तयार! हा गरमागरम पराठा कोणतीही चटणी, दही किंवा लोणच्याबरोबरही छान लागतो.  

संबंधित बातम्या