लाडू, कबाब, बर्फी आणि आइस्क्रीम

सुजाता नेरुरकर 
सोमवार, 2 मे 2022

फूड पॉइंट

आंबा-नारळ लाडू
साहित्य : एक नारळ (खोवून), १ कप दूध, १ कप साखर, १ कप हापूस आंब्याचा रस, १ टीस्पून वेलची पूड.
कृती : एका कढईमध्ये खोवलेला नारळ, दूध घ्यावे. हे मिश्रण १०-१५ मिनिटे मंद विस्तवावर शिजत ठेवावे. मग त्यामध्ये साखर, आंब्याचा रस घालून परत शिजवावे. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यामध्ये वेलची पूड घालून मिक्स करावे. थोडे थंड झाल्यावर त्याचे लाडू वळावेत.

आंबा-पनीर कबाब
साहित्य : आवरणासाठी : चार मोठे बटाटे, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून क्रीम, पाव कप मैदा, एका ब्रेड स्लाईसचा चुरा, मीठ चवीनुसार, ३ टोस्टचा चुरा.
सारण भरण्यासाठी : एक कप पनीर (लहान तुकडे करून), १ कप आंबा (लहान तुकडे करून), १ हिरवी मिरची (चिरून), ८-१० पुदिना पाने (चिरून), मीठ चवीनुसार, तेल - कबाब तळण्यासाठी.
कृती : बटाटे उकडून, सोलून, किसून घ्यावेत. मग त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, मैदा, ब्रेडचा चुरा, मीठ घालून चांगले मळून घ्यावे. त्याचे लिंबाएवढे गोळे करावेत.
पनीर व आंब्याचे लहान-लहान तुकडे करून त्यामध्ये पुदिना, हिरवी मिरची, मीठ घालून सारण तयार करावे.
बटाट्याचे गोळे हातावर थापून त्यामध्ये एक-एक टेबल स्पून सारण भरावे व गोळा बंद करावा. एक-एक गोळा टोस्टच्या चुऱ्यामध्ये घोळवून घ्यावा. नंतर नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल घालून कबाब दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावेत.

मॅंगो सुजी केक
साहित्य : एक मोठा हापूस आंबा (रस काढून), दीड कप रवा, अर्धा कप साखर, अर्धा कप दूध, अर्धा कप तेल, दीड टीस्पून बेकिंग पावडर, ड्रायफ्रूट सजावटीसाठी.
कृती : प्रथम आंबा स्वच्छ धुऊन त्याचा रस काढावा. ज्युसरच्या भांड्यात आंब्याचा रस व साखर घेऊन ग्राइंड करावे. मिक्सरच्या भांड्यात रवा थोडा बारीक करून घ्यावा. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात मिक्सरमधून काढलेला आंब्याचा रस व रवा मिक्स करावा. मग त्यामध्ये दूध व तेल मिक्स करावे. त्या बाऊलवर झाकण ठेवून ३० मिनिटे बाजूला ठेवावे. खोलगट नॉनस्टिक पॅन गरम करावा. त्यामध्ये एक स्टँड ठेवावा. केकच्या भांड्याला तेलाचा हात लावून त्यावर गव्हाचे पीठ शिंपडून भांडे बाजूला ठेवावे.
रव्याच्या मिश्रणावरील झाकण काढून बघा, रवा चांगला फुलून आला असेल. जर मिश्रण जास्त घट्ट वाटले तर थोडेसे दूध घालून परत मिश्रण हलवून घ्यावे. मग त्यामध्ये बेकिंग पावडर घालावी. हे मिश्रण केकच्या ओतावे. त्यावर ड्रायफ्रूटने सजवून भांडे पॅनमध्ये ठेवावे. पॅनचे झाकण लावावे. विस्तव मंद आचेवर ठेवून ४० मिनिटे केक बेक करावा. ४० मिनिटांनी झाकण काढून केकमध्ये सुरी खुपसून केक झाला का ते तपासावे. सुरीला मिश्रण चिकटले नसेल तर विस्तव बंद करून पाच मिनिटे भांडे तसेच ठेवावे. मग झाकण काढून केकचे भांडे बाहेर काढावे व केक थंड करायला ठेवावा. हा मॅंगो सुजी केक म्हणजेच आंबा-रव्याचा केक थंड झाल्यावर कापून सर्व्ह करावा.

मँगो मलई कुल्फी
साहित्य : एक कप खवा ,२ कप म्हशीचे दूध (आटवून), १ कप मिल्क पावडर, १ कप फ्रेश क्रीम, १ कप आंब्याचा रस, १ कप साखर, २ चिमटी पिवळा खाण्याचा रंग.
कृती : दूध व साखर मिक्स करून दहा मिनिटे आटवून घ्यावे व थंड करायला ठेवावे. 
आंब्याचा रस मिक्सरमध्ये ३० सेकंद ब्लेंड करून घ्यावा. ब्लेंडरमध्ये आटवलेले दूध, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम, आंब्याचा रस, पिवळा रंग घालून ब्लेंड करावे. हे मिश्रण ॲल्युमिनियमच्या भांड्यात अथवा डब्यात ओतून चार तास डीप फ्रीजमध्ये सेट करायला ठेवावे. कुल्फीच्या मोल्डमध्येही सेट करायला ठेवता येईल.

मँगो मस्तानी

साहित्य : चार कप दूध, २ कप आंब्याचा रस, २ टेबलस्पून साखर, ४ टेबलस्पून (स्कूप) व्हॅनिला किंवा मँगो आइस्क्रीम, २ टेबलस्पून फ्रेश क्रीम (आवडत असेल तर फेटून घालावे), ड्रायफ्रूट सजावटीसाठी, बर्फाचे तुकडे.
कृती : आंब्याचा रस काढून त्यामध्ये साखर घालावी व मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यावे. दूध, आंब्याचा रस मिक्स करून परत मिक्सरमध्ये ब्लेंड करावे. मग बर्फाचे तुकडे, व्हॅनिला किंवा मँगो आइस्क्रीमचा एक स्कूप घालावा. आवडत असेल तर वरून फ्रेश क्रीम घालावे व ड्रायफ्रूटने सजवावे.

कलाकंद 

साहित्य : अर्धा लिटर दूध (क्रीमयुक्त), १ कप हापूस आंब्याचा रस, अर्धा कप साखर, अर्धा कप मिल्क पावडर, १ टीस्पून वेलची पूड, काजू-बदाम-पिस्ते तुकडे सजावटीकरिता.  
कृती : प्रथम आंबा स्वच्छ धुऊन त्याचा रस काढावा. ज्युसरच्या भांड्यात आंब्याचा रस ब्लेंड करून घेऊन बाजूला ठेवावा. 
नॉनस्टिक पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवावे. दूध १० मिनिटे मंद विस्तवावर गरम करून घ्यावे, मग त्यामध्ये आंब्याचा रस घालून मिक्स करावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवावे. मिश्रण आटले की त्यामध्ये साखर घालून अजून थोडे घट्ट होऊ द्यावे. मिश्रण घट्ट झाले की त्यामध्ये मिल्क पावडर व वेलची पूड घालून मिक्स करून घ्यावे. मिश्रण अजून थोडे घट्ट झाले की विस्तव बंद करून पॅन खाली उतरवावा. 
एका स्टीलच्या ट्रेवर ट्रेच्या मापाचा बटर पेपर ठेवावा. त्यावर ड्रायफ्रूटचे तुकडे पसरून त्यावर तयार केलेले मिश्रण घालून एकसारखे करावे. आता ट्रे पूर्ण थंड होईपर्यंत बाजूला ठेवावा. थंड झाल्यावर त्याचे तुकडे कापावेत.

मलई बर्फी

साहित्य : अर्धा लिटर दूध (म्हशीचे), पाव कप हापूस आंब्याचा रस (घट्ट), १ टेबलस्पून मिल्क पावडर, २ टेबलस्पून साखर, १ चिमूट तुरटी, ड्रायफ्रूट सजावटीसाठी.
कृती : दूध गरम करायला ठेवावे, त्यामध्ये तुरटी विरघळून घ्यावी. दूध गरम झाले की साखर, मिल्क पावडर, आंब्याचा रस घालून मंद विस्तवावर आटवायला ठेवावे. मिश्रण पूर्ण आटले पाहिजे.
मिश्रण आटल्यावर एका स्टीलच्या प्लेटमध्ये किंवा स्टीलच्या ट्रेमध्ये ओतून एकसारखे पसरून घ्यावे. मग त्यावर ड्रायफ्रूट घालून सजवावे. आंब्याची मलई बर्फी थंड झाल्यावर फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावी.

आंब्याचे रोल
साहित्य : एक कप आंब्याचा रस, १ कप बेसन, २ टेबलस्पून तूप, अर्धा कप साखर, पाव टीस्पून वेलची पूड, २ टेबलस्पून मिल्क पावडर, बदाम व काजू सजावटीसाठी.
कृती : आंब्याचा रस मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यावा.
नॉन स्टिक पॅनमध्ये १ टेबलस्पून तूप गरम करावे. तूप गरम झाले की  त्यामध्ये बेसन मिक्स करावे आणि मंद विस्तवावर छान खमंग भाजावे. बेसन भाजून झाल्यावर बाजूला काढून ठेवावे.
त्याच पॅनमध्ये ब्लेंड केलेला आंब्याचा रस व साखर मिक्स करावे. साखर पूर्ण विरघळल्यावर त्यामध्ये भाजलेले बेसन घालून घट्ट होईपर्यंत आटवावे. मिश्रण घट्ट झाले की विस्तव बंद करावा. मिश्रण थोडेसे थंड होऊ द्यावे. मग त्यामध्ये मिल्क पावडर व वेलची पूड घालून मिक्स करावे. या मिश्रणाचे छोटे छोटे रोल करावेत. वरून काजू बदामाचे तुकडे लावून सजवावे व सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या