नवनवीन स्वादाच्या वड्या

आरती पालवणकर, ठाणे
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

फूड पॉइंट

आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना खायला देण्यासाठी वड्यांच्या नेहमीपेक्षा वेगळ्या पाककृती...

डाळिंब रसाच्या वड्या 

साहित्य : अर्धा कप डाळिंबाचा रस, प्रत्येकी १ कप साखर, मिल्क पावडर, डेसिकेटेड कोकोनट, गुलाबी, लाल रंग, पिठीसाखर, तूप.
कृती : थोडे डेसिकेटेड कोकोनट बाजूला काढून ठेवावे. उरलेले खोबरे, डाळिंबाचा रस, साखर, मिल्क पावडर एकजीव करावे. त्यानंतर मिश्रण घट्ट शिजवावे. शेवटी बाजूला काढून ठेवलेले खोबरे घालून मिश्रण गॅसवरून उतरवावे. मग रंग व थोडी पिठीसाखर घालून घोटावे. ट्रेला तूप लावून त्यावर वड्या थापाव्यात.

संत्र्याची वडी
साहित्य : अर्धा कप संत्र्याचा रस, १ कप मिल्क पावडर, १ कप डेसिकेटेड खोबरे, अर्धा कप साखर, आवडीनुसार केशर सिरप.
कृती ः संत्र्याचा रस घेऊन त्यामध्ये मिल्क पावडर, डेसिकेटेड खोबरे घालावे. त्यामध्ये साखर घालावी. सर्व मिश्रण एकजीव करावे व घट्ट होईपर्यंत शिजवावे. घट्ट झाले की गॅसवरून उतरवून थोडी पिठीसाखर व केशर सिरप घालावे व घोटावे. नंतर वड्या थापाव्यात.

बीट-गाजर-नारळ वड्या
साहित्य : एक कप बीट व गाजराचा एकत्रित कीस, १ कप खवलेला नारळ, पाऊण कप दूध, दीड कप पिठीसाखर, मिल्क पावडर, साखर, १ टेबलस्पून तूप.
कृतीः कढईत तूप तापवून त्यावर गाजर-बीट कीस जरा परतून घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये साखर, दूध, नारळ चव घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यामुळे वड्या सुबक, एकसंध होतात. मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर मिश्रण घट्ट शिजवावे. शेवटी दोन टेबलस्पून मिल्क पावडर घालून मिश्रण गॅसवरून उतरवावे. त्यात थोडी पिठीसाखर घालून घोटावे व वड्या थापाव्यात. 

विड्याच्या पानाच्या वड्या
साहित्य : अर्धा कप विड्याची कात्रीने कापलेली पाने, १ टेबलस्पून  
गुलकंद, अर्धा कप मिल्क पावडर, पाऊण कप डेसिकेटेड खोबरे, १ कप पिठीसाखर, पाऊण कप दूध, १ टेबलस्पून बदाम पूड, २ थेंब हिरवा रंग, १ टेबलस्पून तूप.
कृती ः तूप गरम करून त्यामध्ये विड्याची पाने थोडी परतावीत. त्यामध्ये रंग व बदाम पूड सोडून वरील सर्व जिन्नस घालून एकत्रित शिजवावे. मिश्रण घट्टसर होऊन मधे गोळा झाले की गॅसवरून उतरवावे. त्यामध्ये रंग घालावा व वरून बदाम पूड पेरून वड्या थापाव्यात.

उसाच्या रसाच्या वड्या
साहित्य : दोन कप उसाचा ताजा रस, दीड कप नारळ चव, एक कप साखर, पिठीसाखर, केशर, वेलची पूड.
कृती ः उसाचा रस व नारळ चव एकत्र शिजवावा. मिश्रण जरासे 
घट्टसर झाले की त्यात साखर घालावी. मिश्रण पूर्ण घट्ट झाले की उतरवून त्यात केशर, वेलची पूड, थोडी पिठीसाखर घालून घोटावे व वड्या थापाव्यात.

पपईच्या वड्या
साहित्य : एक कप किसलेली केशरी कडक पपई, १ कप मिल्क पावडर, १ कप साखर, १ टेबलस्पून पिठीसाखर, केशर.
कृती ः पपईचा कीस, साखर व मिल्क पावडर एकत्रित शिजवावे. मिश्रण घट्ट झाले की गॅसवरून खाली उतरवून त्यामध्ये केशर व पिठीसाखर घालून घोटावे व वड्या पाडाव्यात.

मटार वड्या 
साहित्य : एक कप वाटलेले कोवळे मटार, १ कप साखर, पाव कप काजू पूड, पाव कप मिल्क पावडर, पिठीसाखर, १ टेबलस्पून तूप, हिरवा रंग.
कृती ः कढईत तूप गरम करून त्यावर मटार परतावेत. दोन मिनिटांनी खाली उतरवून त्यामध्ये मिल्क पावडर व काजू पूड घालावी. साखरेत पाव कप पाणी घालून एकतारी पाक करावा. त्यामध्ये मटारचे मिश्रण घालून घट्ट शिजवावे. घट्ट झाले की खाली उतरवून त्यामध्ये थेंबभर हिरवा रंग, थोडी पिठीसाखर घालून घोटावे व वड्या थापाव्यात.

संबंधित बातम्या