नाचणी स्पेशल

अनघा देसाई
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

फूड पॉइंट

नाचणी आरोग्यासाठी लाभदायक. अशा या नाचणीपासून केलेल्या आणि नाश्‍त्यासाठी खाता येतील अशा काही चवदार रेसिपीज...

केक
साहित्य : अर्धा कप गूळ, अर्धा कप पाणी, पाव कप बारीक चिरलेला खजूर, १ कप नाचणी पीठ, १ चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा दालचिनी पूड, २ अंडी, ५-६ मोठे चमचे तेल, अर्धा कप दही, २ केळी (कुस्करून), अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, १ चिमूट मीठ, पाव कप काजू/अक्रोडचे तुकडे.
कृती : पाणी गरम करून त्यात गूळ विरघळवून घ्यावा. त्यातच खजूर भिजत घालावा. नाचणी पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दालचिनी पूड एकत्र चाळून घ्यावी. अंड्यांमध्ये व्हॅनिला इसेन्स घालून फेसावे. त्यातच तेल, कुस्करलेली केळी, गूळ, खजूर मिश्रण आणि मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे. नंतर ओले आणि सुके मिश्रण हलक्या हाताने एकत्र करावे. काजू आणि अक्रोडचे तुकडे मिसळून घ्यावेत. तूप किंवा तेल लावलेल्या केकच्या टिनमध्ये ओतून ओव्हनमध्ये २० ते ३० मिनिटे भाजून (बेक) घ्यावे.

हलवा
साहित्य : १ कप नाचणीचे पीठ, अर्धा कप पाणी, १ कप गूळ, २ कप नारळाचे दूध, चिमूटभर मीठ, ४ चमचे तूप, पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळ पूड, काजू बदामाचे तुकडे.
कृती : नाचणीचे पीठ, पाणी आणि नारळाचे दूध गुठळ्या न होऊ देता एकत्र करावे. त्यातच गूळ घालून विरघळेपर्यंत ढवळावे. हे मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत राहावे व शिजवावे. पूर्ण शिजून मिश्रण चकचकीत दिसू लागल्यावर त्यात एकेक चमचा करून ४ चमचे तूप जिरवावे. तूप कडेने सुटू लागल्यावर वेलची जायफळ पूड आणि काजू बदामाचे काप मिसळावेत. तूप लावलेल्या ताटात मिश्रण थापून, थंड झाल्यावर वड्या कापाव्यात.

शेवया
साहित्य : दीड कप नाचणी पीठ, अर्धा कप तांदूळ पीठ, पावणेदोन कप पाणी, मीठ चवीपुरते, तेल आवश्यकतेप्रमाणे.
कृती : पाणी उकळत ठेवून त्यात मीठ आणि एक चमचा तेल घालावे. दोन्ही पिठे एकत्र करून उकळत्या पाण्यात घालावीत. घालताना लाकडी चमच्याने ढवळत राहावे. सर्व एकत्र झाल्यावर झाकण ठेवून १-२ मिनिटे वाफ आणावी. पीठ हाताला सोसवेल एवढे थंड झाल्यानंतर हाताला आवश्यकतेप्रमाणे पाणी किंवा तेल लावून चांगले मळून शेवेच्या सोऱ्यात मावण्यासारखे लांबट गोळे वळावेत. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळावे. या उकळत्या पाण्यात एकावेळी १ किंवा २ वळलेले गोळे घालावेत. शिजलेला गोळा वर तरंगेल, तो गरम असताना सोऱ्यात घालून शेव पाडावी (गरम असताना शेव हाताळू नका). थंड झाल्यावर राई, हिंग, उडीद डाळ व कढीपत्ता यांची फोडणी करावी. वरून ओले खोबरे, कोथिंबीर घालून वाढावे किंवा दूध, साखर, वेलची पूड घालून खीर करावी.

ढोकळा

साहित्य : एक कप नाचणी पीठ, १ कप रवा, १ कप दही, अर्धा कप पाणी, १ इंच आले (वाटलेले), १ चमचा खाण्याचा सोडा, १ मोठा चमचा तेल, १ चमचा मीठ, अर्धा इंच दालचिनी - पाव चमचा काळे मिरे - पाव चमचा बडीशेप - पाव चमचा धने एकत्र पूड करून.
फोडणीसाठी : दोन चमचे तेल, १ चमचा राई, २ चमचे तीळ, कढीपत्ता, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून.
कृती : नाचणी पीठ, रवा, दही, पाणी, मीठ, वाटलेले आले व मसाला पूड गुठळ्या होऊ न देता एकत्र करावे. कमीतकमी अर्धा तास हे मिश्रण मुरू द्यावे. मोठ्या कुकरमध्ये पाणी उकळावे. ढोकळा वाफवायच्या थाळ्याला तेल लावून घ्यावे. खायचा सोडा एक चमचा पाण्यात विरघळवून नाचणी पिठाच्या मिश्रणात घालून चांगले फेटावे. मिश्रण लगेच थाळ्यात ओतून वाफवायला ठेवावे. १०-१५ मिनिटे वाफवावे. ढोकळा शिजला की नाही ते सुरीच्या टोकाने टोचून बघावे. सुरीला पीठ चिकटले तर आणखी थोडा वेळ वाफवावे. थंड झाल्यावर आवडीप्रमाणे तुकडे कापून वरून फोडणी पसरवून वाढावे.

घावन
साहित्य : पाऊण कप नाचणी पीठ, पाव कप तांदूळ पीठ, अंदाजे दीड कप पाणी, मीठ चवीप्रमाणे, तेल आवश्यकतेप्रमाणे.
 कृती : नाचणी पीठ, तांदूळ पीठ, मीठ एकत्र करून पाणी मिसळून पळीवाढ मिश्रण तयार करावे. बिडाच्या चांगल्या गरम तव्याला तेल लावून १-२ पळ्या मिश्रण गोल पसरवून झाकण ठेवावे. २ मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून आणखी १ मिनीट शिजू द्यावे, नंतर घडी करून काढून घ्यावे. चटणी किंवा तुमच्या आवडत्या करीबरोबर वाढावे.

कुकीज

साहित्य : अर्धा कप नाचणी पीठ, अर्धा कप कणीक/बेसन, अर्धा कप दळलेली साखर, पाऊण चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा वेलची पूड, ६ मोठे चमचे तूप, २ मोठे चमचे दूध (आवश्यक वाटल्यास).
कृती : दोन्ही पिठे व बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी. तूप फेसून घ्यावे, त्यात साखर घालून फेसावे. मऊ मिश्रण तयार झाल्यावर हलक्या हाताने चाळलेले पीठ आणि वेलची पूड मिसळून एक गोळा तयार करावा. हा गोळा क्लींग फिल्मने गुंडाळून फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवावा. थंड झालेल्या पिठाचे लहान चपटे गोळे करून ओव्हनमध्ये १०-१२ मिनिटे भाजून घ्यावे.

इडली

साहित्य : अर्धा कप उडीद डाळ, अर्धा कप तांदूळ, अर्धा कप पोहे, २ कप नाचणी पीठ, मीठ चवीप्रमाणे, तेल आवश्यकतेप्रमाणे.
कृती : उडीद डाळ, तांदूळ ५-६ तास वेगवेगळे पाण्यात भिजवावेत. कमीतकमी पाण्यात दोन्ही वाटून घ्यावे. पोहेपण अर्धा तास पाण्यात भिजवून वाटून घ्यावेत. हे सर्व एकत्र करून फेटून घ्यावे. त्यातच नाचणी पीठ आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी व मीठ घालून इडलीसाठी पीठ तयार करावे. अंदाजे १० ते १२ तासांनी पीठ फुगल्यानंतर इडलीपात्रात इडल्या वाफवून घ्याव्यात. चटणी, सांबारबरोबर सर्व्ह करावे.

थालीपीठ

साहित्य : दोन कप नाचणीचे पीठ, पाव कप ताजे ओले खोबरे, ४ किंवा आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या, १ इंच आले, १ चमचा जिरे, १ चमचा धने, २ मोठे चमचे कोथिंबिरीचे कोवळे देठ, पाव चमचा हळद, पाव कप चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे, तेल आवश्यकतेप्रमाणे.
कृती : नाचणीचे पीठ थोडेसे सुके भाजून घ्यावे. ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, आले, जिरे, धने, कोथिंबिरीचे कोवळे देठ एकत्र वाटून घ्यावे. तेल सोडून सर्व साहित्य एकत्र करावे. आवश्यकतेप्रमाणे पाणी वापरून पिठाचा सैलसर गोळा तयार करावा. मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन थालीपीठ थापावे. तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे. दही, लोणचे, तळलेली मिरची याबरोबर थालीपिठाचा आस्वाद घ्यावा.

संबंधित बातम्या