वेगळ्या प्रकारच्या खिरी

अनिता मांडेकर, कुदनूर, जि. कोल्हापूर
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

सणावाराला किंवा एरवीही शेवयांची, गव्हाची खीर नेहमी केली जाते. पण आता वेगळ्या प्रकारची खीरही करून बघा...

बदामाची खीर
साहित्य : अर्धी वाटी बदाम काप, ४ कप दूध, वेलदोडे पूड, साखर.
कृती : प्रथम बदाम गरम पाण्यात भिजत घालावेत व नंतर त्याची सालं काढावीत. बदाम गंधासारखे बारीक वाटावेत (पेस्टप्रमाणे). एका पातेल्यात दूध तापत ठेवावे. उकळी आल्यावर त्यात वाटलेल्या बदामाची पेस्ट घालावी. वेलची पूड व चवीप्रमाणे साखर घालून पाच मिनिटे शिजत ठेवावे. गार झाल्यानंतर पिण्यास द्यावी.

राजगिऱ्याची खीर
साहित्य : एक वाटी राजगिरा, १ वाटी चिरलेला गूळ, चवीला थोडे मीठ, १ वाटी खोवलेले खोबरे, वेलदोडा पूड, दूध.
कृती : राजगिऱ्याला पाण्याचा हात लावून तो चांगला सडावा. पाखडून त्याचा कोंडा काढून टाकावा. नंतर राजगिरा पाण्यात शिजत घालावा. शिजल्यावर गूळ, खोबरे व किंचित मीठ घालून पुन्हा चांगले शिजवावे. नंतर खाली उतरवून वाढावयाच्यावेळी त्यात दूध व वेलदोडा पूड घालून खीर वाढावी. राजगिरा प्रेशरकुकरमध्ये शिजवल्यास सडावा लागत नाही. 

दुधी भोपळ्याची खीर
साहित्य :  एक लिटर दूध, अर्धा दुधी भोपळा, पाऊण वाटी साखर, पाव वाटी कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाची पिठी, चारोळी, तूप, वेलदोडा पूड.
कृती : प्रथम दुधी भोपळा साल काढून किसून घ्यावा. पाण्यात घालून स्वच्छ धुऊन घ्यावा. पाणी काढून निथळून घ्यावा. निथळलेला कीस तुपावर चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात दूध घालून तो कीस दुधामध्ये शिजवावा. दुधाला उकळी आल्यावर त्यात तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लोअर घालावे व नंतर थोडे शिजवून खाली उतरावे. त्यात साखर, वेलची पूड घालावी आणि ढवळावे. वर चारोळ्या घालाव्यात.

कोहळ्याची खीर

साहित्य :  अर्धा किलो कोहळा, १ लिटर दूध, साखर, चारोळी, वेलदोडे.
कृती : कोहळ्याच्या मोठ्या फोडी चिरून आतील बिया काढून टाकाव्या. नंतर त्या फोडी किसाव्यात. तयार कीस वाफेवर चांगला शिजवून घ्यावा. तो कीस जेवढा होईल, तेवढीच साखर घ्यावी. १ लिटर दूध साधारण अर्धा लिटरपर्यंत आटवावे. आटलेल्या दुधामध्ये कोहळ्याचा कीस व साखर घालून खिरीला पुन्हा उकळत ठेवावे. खीर जास्त घट्ट हवी असेल तर दुधाला अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर लावावे.

भगरीची खीर
साहित्य :  एक वाटी वऱ्याचे तांदूळ, १ वाटी चिरलेला गूळ किंवा साखर, अर्धा खोवलेला नारळ, वेलदोडा पूड, २ वाट्या दूध, २ चमचे तूप.
कृती : वऱ्याचे तांदूळ चांगले तांबूस रंगावर भाजावेत. नंतर त्यात पाणी घालून चांगले मऊ शिजवून घ्यावेत. तांदूळ शिजल्यावर त्यात दूध घालावे. गूळ किंवा साखर व खोवलेले खोबरे घालावे आणि पुन्हा एकदा खीर चांगली शिजवून घ्यावी. खीर चांगली शिजल्यावर त्यात वेलदोडे पूड घालावी.

मेथ्याची खीर
साहित्य : चार-पाच चमचे मेथ्या, एक वाटी दूध, ५-६ चमचे साखर.
कृती : मेथ्या रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात. नंतर सकाळी उपसून बारीक वाटाव्यात. दूध आणि साखर एकत्र गरम करावे. दूध वाटलेल्या मेथ्यामध्ये घालावे आणि एकसारखे हलवून खीर तयार करावी. ही खीर बाळंतपणात जास्त उपयुक्त आहे.

संबंधित बातम्या