पावसाळ्यातील चटपटीत मेनू

डॉ. जयश्री बुकटे
सोमवार, 1 जुलै 2019

फूड पॉइंट
पावसाळ्याच्या सुरवातीला सतत वातावरण बदलत असते. त्या बदललेल्या वातावरणानुसार चटपटीत खाण्याची हुक्की येते. अशावेळी नेहमीचेच पदार्थ न करता जरा वेगळा मेनू केला, तर त्या वातावरणाबरोबरच त्या पदार्थाची रंगत आणि लज्जत आणखी वाढते. अशाच काही रेसिपीज इथे देत आहोत.
 

मसाला पॅकेट
साहित्य : आलू भुजिया आणि नमकिन फरसाण प्रत्येकी १ लहान पॅकेट, अर्धी वाटी साधे फरसाण, १५ काजू, १ चमचा मिरची पावडर, अर्धा बारीक चमचा आमचूर व धने पावडर, चवीपुरते मीठ व साखर. पॅकेटसाठी वाटीभर मैदा, अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि तेल. 
कृती : मसाला करण्यासाठी आलू भुजिया, नमकिन फरसाण, साधे फरसाण, काजू हे मिक्‍सरमधून थोडे फिरवून घ्यावे. आता त्यात मिरची पावडर, आमचूर, धने पावडर, मीठ व साखर मिक्‍स करावे. हा झाला मसाला तयार. आता पॅकेट करण्यासाठी मैदा आणि गव्हाचे पीठ मळावे. पीठ मळताना त्यात थोडे तेल घालावे. मळलेले पीठ १५ मिनिटे झाकून ठेवावे. एक मोठ्या वाटीच्या आकाराची पुरी लाटावी. त्यात मधोमध मसाला भरावा. खालची बाजू दुमडावी. नंतर दोन्ही बाजू दुमडाव्यात. अशाप्रकारे सर्व बाजू दुमडाव्यात. दुमडलेली बाजू चिकटवण्यासाठी त्यावर थोडासा पाण्याचा हात लावावा. हे पॅकेट सोनेरी रंग होईस्तोवर तळावेत. कुरकुरीत झालेले हे पॅकेट १५ दिवसांपर्यंत टिकतात.


चिमणीचे घरटे
साहित्य : चार मध्यम आकाराचे बटाटे, १ छोटी वाटी उकडलेले मटार, लसणाच्या ५ पाकळ्या, २ चमचे मैदा, १ चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा आमचूर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, साखर आणि तळण्यासाठी तेल.
कृती : बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत. वाटाणा ठेचून घ्यावा. लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्याव्यात. हे सर्व मिश्रण एकत्र करावे. यात मिरची पावडर, आमचूर, गरम मसाला, मीठ व साखर घालावी. हे सर्व एकत्र मळून घ्यावे व त्याचे छोटे चपटे बॉल करावेत. त्यांना मध्यभागी किंचित दाबावे. या गोळ्यांना मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवावे. नंतर झिरो नंबरच्या शेवयांमध्ये घोळवावे. झाली घरटी तयार. आता ही घरटी तेलात तळावीत. ही चिमण्यांची घरटी खूप खुसखुशीत लागतात. सर्व छोट्यांना ही घरटी नक्की आवडतील.


पालक कबाब
साहित्य : अर्धी पालकाची जुडी, अर्धी वाटी वाफवलेला मटार, ३ बटाटे, पाव वाटी बेसन, १ चमचा मिरची पावडर, चिमूटभर ओवा, १ लहान चमचा धने व जिरे पावडर, हळद, चवीपुरते मीठ, १०-१२ काजूचे तुकडे, तळण्यासाठी तेल.
कृती ः पालक गरम पाण्यात १ मिनिट उकळावा. नंतर तो निथळून एकदम बारीक चिरून घ्यावा. वाफवलेला मटार ठेचून घ्यावा. बटाटे उकडून ठेचून घ्यावेत. बेसन तव्यावर परतून घ्यावे. आता या सर्व पदार्थांचे एकत्र मिश्रण करावे. या मिश्रणात मिरची पावडर, ओवा, धने पावडर, जिरे पावडर, मीठ, हळद घालावे. सर्व एकत्र मळावे व छोटे चपटे गोळे करावेत. ते करताना तळहातावर तेल लावावे म्हणजे चिकटत नाही. नंतर त्याच्या मध्यभागी काजूचे तुकडे चिकटवावेत. झाला पालक कबाब तयार. आता याला डीप फ्राय अथवा शॅलो फ्राय तेलात तळावेत. हे कबाब अगदी चटकदार लागतात.


पालक डाळ
साहित्य : अर्धी जुडी पालक, एक चमचा तिखट, १२-१४ पाकळ्या लसूण (ठेचलेला), २ बारीक कापलेले टोमॅटो, १ वाटी आख्खे मसूर, मीठ, हळद, जिरे, मोहरी, तेल आणि ३ चमचे तूप.
कृती : पालक निवडून बारीक चिरून घ्यावा. आता पालक, टोमॅटो, मसूर कुकरमध्ये ५ शिट्यांमध्ये शिजवावे. कुकर थंड झाला, की या पालक डाळीला चांगले हाटावे. पातेल्यात पळीभर तेल टाकून जिऱ्याची फोडणी करावी. जिरे तडतडले, की त्यात लसूण, हळद, मीठ, मिरची पावडर टाकावे. आता हटलेली डाळ फोडणीत ओतावी. या पालक डाळीला चांगली उकळी आल्यावर त्यात ३ चमचे तूप घालावे व थोडी घट्ट होईपर्यंत उकळावी. ही स्वादिष्ट पालक डाळ भाताबरोबर खूपच छान लागते.


शेंगदाण्याचा ठेचा
साहित्य : पाव किलो खमंग भाजलेले शेंगदाणे, २ कांदे, ८ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, हळद, १ चमचा मिरची पावडर, मीठ आणि मोहरी.
कृती : शेंगदाणे पाखडून मिक्‍सरमधून भरडून काढावेत. फोडणीसाठी तेल गरम करावे. त्यात जिरे, मोहरी तडतडून घ्यावी. यात लसणाचा ठेचा व मिरचीचा ठेचा परतावा. आता त्यात बारीक कापलेला कांदा घालून लालसर परतावा. नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट, मीठ, मिरची पावडर घालावी. ४ चमचे पाणी घालून वाफवून घ्यावे. झाला झणझणीत शेंगदाण्याचा ठेचा तयार. भाकरीबरोबर तर फारच रुचकर लागतो.

संबंधित बातम्या