रानभाज्यांचा उत्सव...

डॉ. कांचनगंगा गंधे
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांची आणि त्यातल्या पोषणमूल्यांची माहिती आपल्या पूर्वसूरींनी होतीच म्हणून त्या त्या ऋतूतला वनस्पतींना सणवार, उत्सव, व्रतवैकल्यात कथांमार्फत गुंफून त्यांना आदराचं स्थानही दिलं!

वर्षाऋतुतल्या- श्रावण-भाद्रपदातल्या-नवनिर्मितीची, वाढीची, हिरव्या रंगाची जागा शरद-हेमंतातल्या आश्विन-कार्तिकात परिपूर्णतेनं, तृप्तीनं आणि सोनसळी रंगाने घेतली. ऋतू बदलाची, परिवर्तनाची चाहूल लागली. एक ऋतू लयाला जाताना तो पुढे बहरणाऱ्या ऋतूला चेतना देतो, पण स्वतःच्या काही खुणा काही काळ तरी त्यांच्याबरोबर देऊनच! 

शरदाच्या आरंभी- आश्विनात अधून मधून गडगडाटी पर्जन्यधारांबरोबर विद्युल्लतेची तेजःपुंज रेखीव लकेर चमकत होती, तेच आश्विनाचं वैशिष्ट्य! निसर्गानं आत्तापर्यंत भरभरून दिलं होतं! पण अजूनही जमिनीवर, जमिनीत बरंच काही होतं! कारीट, करांदे, कडवंच्या, गारबी, शेंदाड, धोंडस असे काही वेल वर्षाऋतुतलं पाणी पिऊन जोमानं वाढत होते. हादगा, अबई, बिलिंबी भाद्रपदाच्या शेवटाला फुलायला लागले, कोंडफळ, खण्या कोन, कमळदांडी, ताडी, रान अळू सारखे कंदही अन्न साठवायला लागले. या सर्वांनाच शरद- हेमंतातल्या दिव्यांच्या उत्सवात-दीपावलीच्या उत्सवात सहभागी व्हायचं होतं, ते ही परिपूर्ण होऊनच!

सर्वच ऋतूंत परोपकाराचं व्रत घेतलेल्या वनस्पतींनी आश्विन-कार्तिकातल्या सुगीच्या दिवसातही ते निष्ठेनं चालू ठेवलं होतं! आपल्याकडे जे आणि जसं आहे ते सर्वस्व देऊन माणसाचं आरोग्य निकोप ठेवायचं हे त्यांनी मनोमन ठरवलं होतं! वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांची आणि पोषकतेची माहिती आपल्या पूर्वसूरींनी होतीच म्हणून त्या त्या ऋतूतल्या वनस्पतींना सणवार, उत्सव, व्रतवैकल्यात कथांमार्फत गुंफून त्यांना आदराचं स्थानही दिलं!

शरद ऋतूतला मनाला आनंद देणारा, तृप्त करणारा, चैतन्य देणारा, माणसाचे आरोग्य निकोप राहण्यासाठी सर्वतोपरी भरभरून देणारा उत्सव म्हणजे दीपावली! वसुबारस-दीपावलीचा पहिला दिवस. गाय वासरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. जे अमंगळ आहे, वाईट आहे, जी दुष्ट प्रवृत्ती आहे तिचा सर्वनाश व्हावा यासाठी योजलेला नरकचतुर्दशीचा दुसरा दिवस. नरकासुर, श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांच्याशी निगडित असलेली कथा श्रीमद्‌भागवत पुराणात आहेच. नरकासुर वधाचं प्रतीक म्हणून ह्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी ‘कारीट’ (कारीटं, चिरटं) हे गोलसर किंचित लांबट, गुळगुळीत फिकट हिरवं, राखट-निळसर झाक असलेले फळ डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडण्याची प्रथा आहे. फळातून बाहेर पडणारा रस-गर हे नरकासुराच्या रक्ताचे रूपक मानतात.

पूर्वी शेतकरी शेतात अनवाणी काम करायचे. याच सुमारास मातीत जंत कृमींच्या अळ्या पायातून शरीरात शिरण्याची शक्यता जास्त! रानवेलीला येणाऱ्या कारीटाच्या गर आणि बियांमध्ये जंत व कृमिनाशक रासायनिक घटक आहेत, त्यामुळे अळ्यांचा अटकाव होतो. फळांची चव कडू, तुरट असली तरी त्याच्यात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे त्यांचा आहारात समावेश व्हावा म्हणून कच्च्या व पिकलेल्या फळांचा लोणचं घालतात. ताज्या फळांच्या चकत्या करून उन्हात वाळवून वर्षभर वापरतात. आदिवासी लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवसात ह्या फळांच्या फाकाचा पणतीसारखा उपयोग करतात. भाताचं तूस पसरून ते पेटवून त्यावर जनावरांना चालायला लावतात तेव्हा त्यांच्या खुराखाली कारीटाची फळं टाकतात. त्यांनाही कृमींचा त्रास होऊ नये हा उद्देश!

फक्त दिवाळीच्या सुमारास येणाऱ्या, छोट्या कलिंगडासारख्या (हिरव्या फळांवर फिकट व गडद गडद पट्टे), काकडीच्या कुळातल्या रानवेलीवरच्या कडवंच्या (मेक्या) म्हणजे जीवनसत्त्व, खनिज, अँटिऑक्सिडंट्स, पोषक घटक, फायबर आणि औषधी गुणधर्मांचं ‘छोटं कोठार’! काकडीसारखी चुरचुरीत चव आणि लिंबासारख्या आंबटपणामुळे त्यांची भाजी आणि आणि लोणचं अतिशय रुचकर लागतं!

रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या दिवाळीच्या जेवणात ‘गारबी’च्या जाड वेलाच्या शेंगा/ बियांची भाजी हमखास असतेच ती खूप औषधी आणि पौष्टिक आहे, पण कच्चा बिया विषारी असल्यामुळे त्या भाजीत वापरत नाहीत. शेंगा आगीवर भाजतात, त्यातल्या बिया काढून १० ते १२ तास भिजत घालून नंतर भाजी करण्यासाठी वापरतात.

मोतिया रंगाची फुलं येणारा ‘हादगा’ म्हणजे नवरात्र आणि दिवाळी यांच्यातला दुवा! फुलं, शेंगांची भाजी करतात. चव झणझणीत तुरट व कडवट असली त्यात अनेक पोषक घटक, जीवनसत्वे खनिजे असल्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहतं!

आश्विन महिन्याच्या सुरुवातीला ‘अबई’च्या वेलाला कोवळ्या शेंगा येतात. त्यांची टोकं कोयत्यासारखी असल्यामुळे ह्या वेलाला ‘कोयते वाल’, ‘महाशिंबी’ अशीही नावं आहेत. कोवळ्या शेंगेत प्रथिने, कर्बोदकांशिवाय कॅल्शिअम, झिंक, मॅग्नेशिअम अशी खनिजं असल्यामुळे त्याची भाजी आणि लोणचं ही करतात. पण ह्यात अल्कलॉइडस असल्यामुळे भाजी करताना ती तीन चार वेळा पाणी घालून काढून टाकावं लागतं!

कोकणात दिवाळीच्या सुमारास ‘बिमलं’ (बिलिंबी) लांबट द्राक्षासारखी, राय आवळ्याच्या रंगासारखी  फळं झाडाच्या खोडाला  अगणित लोंबत असतात. भाद्रपद-आश्विनात तांबट-जांभळट फुले येतात. फळं  अतिशय आंबट असली तरी त्याचं लोणचं करतात,  पण त्याला खूप साखर लागते. अळूच्या भाजीत चिंचेच्या ऐवजी आंबटपणासाठी  ‘बिमलं’ वापरतात. पिकलेली फळं औषधी असली तरी फार दिवस टिकत नाहीत म्हणून ती सोलून सूर्यप्रकाशात वाळवून त्याची ‘सोलं’ म्हणजे ‘आसाम सुंटी’ करतात. बिमलीची फळ बायोगॅसच्या भट्टीत टाकली तर मिथेन गॅस तयार होण्याचं प्रमाण वाढतं!

भाद्रपदात तयार होणाऱ्या ‘शेंदणी’ व ‘शेंदाड’ (मृगाक्षी) च्या फळाच्या काचऱ्या वाळवून दिवाळीत तळून खातात. दिवाळीत आदिवासी लोक गोड शेंदाडाची शिकरण करतात. पण ही फळं उष्ण असल्यामुळे ती फारशी वापरली जात नाहीत.  गौरी-गणपतीच्या भोजनात जसं ‘मावळी काकडी’चे महत्त्व आहे, तसं दिवाळीत मोठ्या काकडीचं म्हणजे ‘धोंडस’चं (तवस) महत्त्व आहे.

शरद-हेमंत ऋतूत  जसं जमिनीवरच वैभव वाढत असतं  तसं जमिनीखालीही  ‘कंद’ वाढतात. ते पौष्टिक असल्यामुळे  दिवाळीच्या थंडीत त्यांचा आरोग्य निकोप राहण्यासाठी फायदाच होतो.

रताळ्यासारखा पण खूप जाड, वेडावाकडा वाढणारा, आतून जांभळ्या रंगाचा ‘गोराडू’चा (‘कोंदफळ’, ‘कोनफळ’, ‘नागरचिने’)  कंद दिवाळीत तयार होतो.  गोराडूची भाजी रुचकर आणि पौष्टिक आहे.  कंद सोलून त्याचे पातळ काप करून सुकवून त्याचे पीठ करतात.  ते तवकिरीसारखं वापरता येतं.  ‘गोराडू’ पेक्षा लहान, आइस्क्रीमच्या कोनासारखा, लांबट दांडक्या सारखा लांबट, कंद माती खणत खाली वाढतो म्हणून त्याला ‘खण्या कोन’ म्हणतात, हा आतून पांढरा असतो, त्याचे ‘वेफर्स’ करतात.

अळूच्या कंदासारखा पण लांब वरवंट्यासारखा ‘ताडी’ हा कंद दिवाळीच्या सुमारास कोकणात अनेक ठिकाणी तयार होतो. यात लोह खूप असतं! साल काढून अमसुलाच्या रसात हे कंद घालून नंतर त्याचे काप करतात, ते कढीत  घालतात किंवा वांग्याच्या कापासारखे भाजून खातात.

कमळाच्या अनेक जाती आहेत, पाण्याच्या चिखलात त्याचे कंद असतात. ‘कमलाक्ष’ या कमळाचे देठ पांढरे आणि इतर कमळांच्या देठापेक्षा जाड असतात. जे देठ चिखलात रुतलेले असतात ते जास्त स्वादिष्ट लागतात. ह्या देठांना ‘भिसे’ म्हणतात.  भिशाचे लहान तुकडे किंवा काचऱ्या करून सुकवतात, आणि तेलात किंवा तुपात तळून खातात, हे फार पौष्टिक आहे. 

शरद-हेमंत ऋतूतल्या थंडीच्या दिवसात माणसाचं शरीर निरोगी ठेवणाऱ्या, फारशी निगा न राखताही दरवर्षी त्याच सुमारास वाढणाऱ्या निसर्गातल्या ह्या वनस्पती म्हणजे माणसाचे ‘सखे सोबती’ आहेत.

संबंधित बातम्या