फूड पॉइंट

जयश्री सुरेश दामले, रोहा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत. जयश्री सुरेश दामले, रोहा

तुळशीच्या बीचे बॉल
साहित्य : एक वाटी तुळशीचे बी, एक वाटी कणीक, एक वाटी रवा, अर्धी वाटी साजूक तूप, दीड वाटी गूळ, या पदार्थाला वेलची, जायफळ वगैरे लागत नाही. कारण तुळशीला छान वास असतो.
कृती : कढईत तूप घालून कणीक, रवा मंद भाजून घ्यावा. गूळ बारीक चिरून घ्यावा. भाजलेल्या मिश्रणात सर्व एकत्र करावे. वरून तुळशीचे बी किंवा तुळशीची पाने एकदम बारीक करून मिश्रणात घालावी. मस्तपैकी छोटे - मोठे बॉल वळून घेणे. हे अत्यंत आरोग्यदायी आहेत. रोज सकाळी एक बॉल खावा.

बाजरी स्वीट
साहित्य : एक वाटी बाजरीचा रवा, दीड वाटी गूळ, अर्धी वाटी साजूक तूप, वेलदोडा पूड, नारळाचा चव, १ चमचा बडीशेप पावडर, जायफळ पावडर, गूळ
कृती : प्रथम रवा तुपावर भाजावा. त्यात नारळाचा चव घालून थोड्या वेळाने तीन वाट्या गरम पाणी घालून मऊ शिजवावा. हा रवा शिजायला थोडा वेळ लागतो. बाजरीचा रवा शिजून मऊ झाल्यावर गूळ घालावा. गुळाचे प्रमाण आवडीप्रमाणे घ्यावे. एक ते दोन वाफा आल्यावर वेलची पावडर, बडीशेप पावडर जायफळ पावडर घालावी. आवडीप्रमाणे बेदाणे, काजू घालून नीट घोळवून घ्यावे. बाजरी स्वीट तयार.

जांभळाचा सुधारस
साहित्य : अर्धा किलो पिकलेली जांभळे, २ ते ३ वाट्या साखर (वाटी मध्यम घेणे)
कृती : पिकलेली जांभळे स्वच्छ धुवून बियांसकट कुकरला लावावी. चांगली शिजली, की साखरेचा चिकट २ तारी पाक तयार करावा. त्या पाकात शिजलेली जांभळे बियांसहीत टाकावी. नीट ढवळून घ्यावी. हा जांभूळ सुधारस पोळीबरोबर - भाकरीबरोबर छान लागतो. मधुमेही व्यक्ती हा जांभूळ सुधारस खाऊ शकतात. या सुधारसाला जांभळा रंग येतो.हा सुधारस पातळ झाला,असे वाटल्यास पुन्हा गरम करून छान स्वच्छ पांढरा काचेच्या बरणीत भरावा.

कारल्याचे धपाटे
साहित्य :
एक मोठे कारले, दोन कांदे, एक चमचा लाल तिखट, मीठ, पाव किलो कणीक, २ चमचे तेल, गोडा मसाला अवश्‍य.
कृती : प्रथम कारल्याचे काटे काढावे. नंतर अगदी बारीक चिरून मीठ लावावे. साधारण १० मिनिटांनी सर्व कडू पाणी काढून टाकावे. कणीक परातीत घेऊन कांदे बारीक चिरून घ्यावे. २ चमचे तेल पिठात टाकावे. तिखट मीठ चवीप्रमाणे गोडा मसाला घालून सर्व मिश्रणात कारले त्याच्यात मळायला घ्यावे. पीठ थोडे घट्ट मळावे. छानसे धपाटे लाटावे. तेलाचा एक चमचा तव्यावर टाकून धपाटे छान शेकावे. कारल्यामध्येसुद्धा औषधी गुणधर्म आहेत तब्येतीला चांगले असते. हे कारले धपाटे मुलंसुद्धा आवडीने खातात.

मुळ्याचे वडे
साहित्य : तीन जुड्या मुळ्याच्या, एक वाटी एकदम बारीक दाण्याचा कूट, तीन कांदे, ५-६ हिरव्या मिरच्या, एक वाटी ओले खोबरे, गरम मसाला एक चमचा, मीठ, कोथिंबीर
कृती : मुळे किसून थोड्या तुपावर परतून घ्यावे. कांदे बारीक चिरावे. मिरची, कोथिंबीर, आले, ओले खोबरे, मिक्‍सरला बारीक करून घ्यावे. सर्व मिश्रणात मीठ घालावे. सर्व चांगले मिक्‍स करून घ्यावे. बेसन पिठात तिखट, मीठ, हिंग, हळद गरम मसाला सर्व एकत्र करून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यावे. मुळ्याचे लहान गोल वडे तळावे. (बटाटेवडेप्रमाणे मुळ्याचे गोळे करून तळावे.)

उडदाच्या पापडाची भजी
साहित्य : दहा ते बारा उडदाचे पापड, अर्धी वाटी ताक, १ वाटी नाचणीचे पीठ, मिरच्या, कोथिंबीर, हिंग, हळद, मीठ, आले एक तुकडा, तळण्यासाठी तेल
कृती : ताकात हिंग घालून त्यात उडीद पापड भिजत घालावा. नंतर चमच्याने चांगले ढवळावे. मिरची, कोथिंबीर, आलं बारीक चिरून घ्यावे. चवीला मीठ घालून चांगलं मळून घ्यावे. भजीच्या पिठाप्रमाणे भिजवून गरम तेलात भजी तळावी. नारळाची चटणी या भज्यांबरोबर छान लागते.

रुचकर खमंग भेळ
साहित्य : एक वाटी मटकी, एक वाटी मटार, एक वाटी शेंगादाणे, तीन वाट्या कुरमुरे, कोथिंबीर, टोमॅटो तीन बारीक,. दोन कांदे, दोन वाट्या बारीक शेव, मीठ, मिरच्या, ओले खोबरे, डाळिंब, लिंबू, पापड
कृती : मटकी, मटार यांना मोड आणावे. मगच भेळीत वापरावे. मोड आलेले मटकी, मटार वाफवावे. त्यात कांदे, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर, मीठ घालून सर्व एकत्र कालवून घ्यावे. वरून ओले खोबरे, बारीक शेव घालावी. ही भेळ पौष्टिक तर आहेच, पण रुचकर खमंग लागते. कोथिंबीर, ओले खोबरे, डाळिंबाचे दाणे वरून घालावे. पापड कुस्करून घालावा.

दमदार स्वादिष्ट वांगे
साहित्य : अर्धा किलो छोटी वांगी, तीन कांदे, शेंगदाणा कूट, गरम मसाला एक पाकीट, कोथिंबीर, ओले खोबरे, मीठ, लाल तिखट, थोडासा गूळ, दोन टोमॅटो
कृती : वांग्याची देठं काढून मधे चीर द्यावी. वांगी सर्व पाण्यात टाकावी. कांदे बारीक चिरावे. टोमॅटो बारीक चिरावा. त्यात आपल्याला आवडेल त्याप्रमाणे तिखट मीठ टाकावे. गरम मसाला अंदाजाने घालावा. थोडा गूळ, शेंगदाणा कूट घालावे. सर्व मसाला व्यवस्थित कालवून घ्यावा. वांग्यात भरावा. पातेल्यात फोडणी जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून सर्व वांगी फोडणीला टाकणे व हलवून एक ते दीड भांडं पाणी घालावे व मंद शिजवावी. त्यावर ओले खोबरे बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. दहा ते पंधरा मिनिटात दमदार वांगी तयार

शहाळ्याची भाजी
साहित्य : एकदम कोवळा नारळ (शहाळे) ओले खोबरे, तिखट, मीठ, जिरेची पावडर, धन्याची पावडर, मिरची, कोथिंबीर, एक वाटी दाण्याचे कूट, चवीपुरती साखर, फोडणीचे साहित्य, तेल अर्धी वाटी
कृती : प्रथम शहाळे फोडून घ्यावे. ते पातळ कोवळे खोबरे विळीवर बारीक चिरावे व तेलाची खमंग फोडणी करून हे शहाळेचे तुकडे फोडणीला घालावे. हे एक दहा मिनिटात चांगले शिजतात. मग त्याच्यात तिखट, मीठ, धना जिरा पावडर, दाण्याचा कूट, मीठ, चवीला साखर घालून चांगले ढवळून झाकण ठेवावे. शिजली की वरून कोथिंबीर चिरून घालावी. ही भाजी उपासाला चालते. छान लागते.

विड्याच्या पानाचा पापडा
साहित्य : दहा पाने विड्याची (खायची पाने), पाव किलो बेसन, तिखट, मीठ, चिमूटभर सोडा, तेल
कृती : बेसन पिठात पाणी घालून बेसन सारखे करावे. त्यात चवीप्रमाणे तिखट-मीठ थोडासा सोडा घालावा. विड्याची पाने स्वच्छ धुवून त्यांची देठ काढावी व एक एक संपूर्ण पान बेसन पिठात बुडवून कढईत तापलेल्या तेलात सोडावे. मंद तळावे. छान कुरकुरीत तळून काढावे. हे विड्याच्या पानाचा पापडा छान लागतो. विड्यांचा पानाचा छान वास येतो. लहानांना, मोठ्यांना हे पापडे छान आवडतात, आवडीने खातात.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या