भाताच्या विविध पाककृती 

जयश्री दामले, रोहा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत. 

बिरडे भात 
साहित्य : एक भांडे तांदूळ (कोलम), एक वाटी वाळाचे सोललेले बिरडे, आले - मिरची - लसूण - कोथिंबीर - गरम मसाला, मीठ नारळाचा चव, ओले खोबरे, कढीपत्ता, फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, हळद, अर्धी वाटी तेल, दोन चमचे साजूक तूप 
कृती : प्रथम तांदूळ धुवून १० मिनिटे ठेवावेत. नंतर पातेल्यात तेल गरम करून खमंग फोडणी तयार करावी. त्यात वाल घालून सर्व मिश्रण परतावे. आले, मिरची, लसूण, कोथिंबीर मिक्‍सरवर बारीक वाटून हे मिश्रण घालावे. चवीला मीठ घालावे. भात सुकल्यावर त्यावर दोन चमचे तूप घालून बिरड्याला म्हणजे बिरडे भाताला वाफ येऊन द्यावी. सर्व्ह करताना बिरडे भातावर खोबरे, कोथिंबीर घालावी.

बटाटे भात 
साहित्य : एक भांडे कोलम तांदूळ, छोटे बटाटे १० ते १२, आले - मिरची - लसूण पेस्ट, तिखट, मीठ, साजूक तूप, अर्धी वाटी, कोथिंबीर, कढीपत्ता, फोडणीचे साहित्य, लिंबू खोबरे 
कृती : प्रथम बारीक बटाटे धुऊन घेऊन त्यांची साले काढून ठेवावीत. नंतर तेलाची फोडणी करून तांदूळ धुऊन त्यात घालावे. बटाटेही घालावे. तयार केलेली आले मिरची, कोथिंबीर, लसूण पेस्ट त्या भातात घालून भात चांगला ढवळून घ्यावा. फोडणीमध्ये कढीपत्ता अवश्‍य टाकावा. वाफ आणावी. मीठ घालावे. वरून लिंबू पिळून परत चांगली वाफ आणावी. हा बटाटे भात दिसायलाही छान दिसतो. वरून ओले खोबरे कोथिंबीर तूप घालावे. 

गोड मावा भात 
साहित्य : एक भांडे कोलम तांदूळ, पाव किलो मावा, वेलची, चारोळी, बेदाणे, काजू, एक भांडेभर साखर, साजूक तूप, ओले खोबरे 
कृती : प्रथम कढईत मावा घेऊन त्यात साखर, वेलची पूड, चारोळी बेदाणे, काजू तुकडे घालून चांगले एकत्र करून ढवळून घ्यावे. नंतर साधारण हाताला मावा चिकट लागला, की वरून आपण केलेला तांदळाचा साधा भात एकत्र कालवावा. मावा भात एकत्र कालवला, की वरून खोबरे ओले घालावे. सर्व्ह करताना साजूक तूप घालावे.

शाही फोडणी भात 
साहित्य : एक भांडे तांदूळ (कोलम), अर्धी वाटी कोबी, एक टोमॅटो, एक कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य, तिखट, मीठ, ओले खोबरे, लिंबू शेंगदाणे 
कृती : प्रथम तेलाची फोडणी करावी. त्यात चिरलेली कोबी, मिरची, कांदा, कोथिंबीर, मीठ घालावे व त्यात मोकळा करून भात घालावा व तो भात ढवळावा. तिखट-मीठ व्यवस्थित घालून तो सर्व भात नीट कालवावा व खोबरे घालून लिंबू वरून पिळून सर्व्ह करावा. 

संसारी कांदे भात 
साहित्य : पाच-सहा संसारी कांदे म्हणजे एकदम छोटे कांदे, एक भांडे तांदूळ (कोलम), तिखट, मीठ, गोडा मसाला, आले, मिरची, लसूण, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य, अर्धी वाटी तेल, ओले खोबरे 
कृती : प्रथम तांदूळ धुऊन दहा मिनिटे निथळत ठेवावेत. नंतर बारीक कांदे साधारण चीर देऊन तसेच अख्खे ठेवावे. खमंग फोडणी करून तांदूळ व कांदे फोडणीत परतावे. नंतर गोडा मसाला, तिखट, मीठ, आले, मिरची, लसूण पेस्ट त्यात घालून कांदे भात ढवळावा. वाफ येऊ द्यावी. या कांदे भातावर साजूक तूप घालावे. वरून ओले खोबरे कोथिंबीर घालावी.

गोळे भात 
साहित्य : एक भांडे कोलम तांदूळ, एक भांडे बेसन पीठ, तिखट, मीठ, फोडणीचे साहित्य, मिरची, कोथिंबीर, आले, लसूण, अर्धी वाटी साजूक तूप. 
कृती : प्रथम बेसन ताटात घेऊन त्यामध्ये तिखट मीठ आले मिरची, कोथिंबीर, लसूण यांची पेस्ट तयार करून ते बेसन नीट मळून घ्यावे. त्याचे बारीक गोळे तयार करावे. नंतर तांदूळ स्वच्छ धुऊन भात करावा. ते सर्व गोळे भातावर ठेवून चांगली वाफ आणावी. वाफ आली, की बेसनाचे गोळेही शिजतात. हा गोळेभात खूपच छान लागतो. भातावर साजूक तूप घ्यावे.

पुरण भात 
साहित्य : एक भांडे वासाचे तांदूळ, एक वाटी हरभरा डाळ, एक वाटी गूळ, वेलची किंवा जायफळ, ओले खोबरे एक वाटी, साजूक तूप, चारोळी, लवंग. 
कृती : एक भांडं तांदळाचा १० नग लवंगा घालून भात तयार करावा. नंतर हरभरा डाळीचे पुरणपोळीप्रमाणे पुरण तयार करून वेलची जायफळ लावावे. मिक्‍सरला पुरण लावून घ्यावे. नंतर एका छोट्या काठाच्या ताटलीत पहिला भाताचा थर लावावा. त्याच्यावर तूप लावून त्या भाताच्या थरावर पुरणाचा थर लावावा असे चार थर लावायचे. वरून ओले खोबरे चारोळ्या लावून आपल्याला हवे तशा आकारात कापावे.

प्रवासी भात 
साहित्य : एक भांडे इंद्रायणी तांदूळ, साईसह दही (सायट्याचे दही), जिरे, भरून केलेला वाळलेल्या मिरच्या, दूध अर्धी वाटी, मीठ, फोडणीचे साहित्य, तिखट मीठ 
कृती : इंद्रायणी तांदळाचा मऊसर भात करून घ्यावा. इंद्रायणी तांदळाला वास खूप छान असल्याने हा भात रुचकर लागतो. तो भात एका परातीत काढून त्याच्यात साईसह दही घालावे. मीठ घालावे आणि आपण भरून मिरच्या वाळवतो त्या मिरच्या ५ ते ६ तळून भातातच मिक्‍स कराव्यात. हा भात व्यवस्थित कालवून चवीप्रमाणे मीठ घालावे. फोडणी हवी असेल, तर तळलेल्या मिरचीचे तेल उरले त्यात जिरे घालून भातावर घालावे. हा भात प्रवासाला न्यायला एकदम उत्तम, सारखी तहान लागत नाही. घसा सुकत नाही.

शाही केशरी भात 
साहित्य : चांगला सुवास असलेला एक भांडे तांदूळ, एक भांडे साखर, ओले खोबरे, वेलची सर्व ड्रायफ्रूट, सफरचंद, बेदाणे, डाळिंब, आपल्याला आवडणारी फळे कमी प्रमाणात घालावी. केळे घातले तरी अर्धेच घालावे. खायचा कलर एक वाटी, साय, एक बारीक वाटी साजूक तूप, लवंगा, दालचिनी. 
कृती : प्रथम तूप तापवून त्यात १० ते १२ लवंगा, दालचिनी टाकून त्यात वासाचे तांदूळ धुऊन टाकावे व चांगले हलवून मोकळा भात करून घ्यावा. एक भांडे साखर घेऊन त्यात साखर बुडेपर्यंत पाणी घालावे व गोळीबंद पाक तयार करावा. त्यात सर्व ड्रायफ्रूट, बेदाणे, फळांच्या फोडी घालाव्या. ऑरेंज कलर घालावा. वेलची पूड, ओले खोबरे घालून चांगली वाफ द्यावी. भात तयार झाला, की वरून डाळिंबाचे दाणे घालावे.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या