बटाटा पिझ्झा, खजुर रोल

जयश्री पाठराबे, नवी मुंबई
सोमवार, 19 सप्टेंबर 2022

फूड पॉइंट
 

खायच्या पानांचा मुखवास
साहित्य : कोणत्याही प्रकारची १० खायची पाने, ४ चमचे बडीशेप, ४ चमचे अळशी (जवस), १ चमचा ओवा, १ चमचा तीळ, ८ चमचे किसलेले सुके खोबरे, ४ चमचे गुलकंद.
कृती : खायची पाने चांगली धुवावीत. त्यांचा स्वच्छ कपड्याने पुसावे आणि ३ ते ४ तास पंख्याखाली सुकायला ठेवावे. बडीशेप, अळशी (जवस), ओवा, तीळ आणि किसलेले सुके खोबरे हे जिन्नस वेगवेगळे भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर हे सर्व जिन्नस एकत्र करून त्यांची मिक्सरमधून थोडी जाडसर पूड करून घ्यावी. खायची पाने सुकल्यावर त्यांचे जाड देठ काढून टाकावे आणि कात्रीने बारीक चिरून घ्यावीत. आता एका पसरट भांड्यात वर केलेली पूड, बारीक चिरलेली पाने आणि गुलकंद छान एकजीव करावे. तुमचा घरगुती पौष्टिक खायच्या पानांचा मुखवास तयार झाला. सर्व जिन्नसांचे प्रमाण कमी अधिक झाले तरी काही फरक पडत नाही. हा मुखवास फ्रीजमध्ये ठेवला तर २-३ आठवडे व्यवस्थित टिकतो. बाहेरही १-२ आठवडे चांगला रहातो. पाने मात्र चांगली सुकलेली हवीत.

चीज बॉल
साहित्य : (तीन ते चार व्यक्तींसाठी) चार कच्ची केळी, १ कप पातळ पोहे, २ चमचे कॉर्नफ्लोअर किंवा मैदा, २-३ चीज क्युब, मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लाल तिखट, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ.
कृती : कच्ची केळी सालासकट कुकरमध्ये २-३ शिट्यांवर वाफवून घ्यावीत. थंड झाल्यावर साले काढून चांगली कुस्करावीत किंवा किसावीत. त्यात पोहे, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि गरज वाटल्यास थोडे कॉर्नफ्लोअर किंवा मैदा घालून चांगले मिक्स करावे. हे झाले बॉलचे वरचे आवरण. आता चीज क्युबचे छोटे छोटे तुकडे करावेत. एका क्युबचे साधारण ६-८ तुकडे होतात. आता मिश्रणाचा लिंबाएवढा गोळा किंवा तुम्हाला हव्या त्या आकाराचा गोळा घेऊन त्याची पारी करावी आणि एक चीज तुकडा मध्यभागी ठेवून व्यवस्थित बॉल तयार करून घ्यावा. असे सगळे चीज बॉल तयार करून घ्यावेत. कढईमध्ये तेल चांगले गरम करावे आणि बॉल लालसर होईपर्यंत तळावेत. गरमागरम खावेत, खूप चविष्ट लागतात. बच्चेकंपनी अगदी खूश होऊन जाईल. जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर त्यात फ्राय करू शकता. चवीमध्ये जास्त फरक पडत नाही. चीजचा तुकडा जास्त मोठा घेऊ नये, नाहीतर तळताना चीज बाहेर येऊ शकते.

बटाटा पिझ्झा
कधी कधी दुपारची भाजी थोडी उरते. घरातील मंडळी सकाळचीच भाजी पुन्हा रात्री खायचा कंटाळा करतात. अशावेळी संध्याकाळच्यावेळी ही डिश करून खायला दिली तर मुले खूश होतील आणि भाजीही संपेल.
साहित्य : (तीन ते चार व्यक्तींसाठी) एक कप कोणतीही उरलेली भाजी (थोडी कमी जास्त झाली तरी हरकत नाही), २ कांदे, ४ बटाटे, १ टोमॅटो, १ चमचा लाल तिखट, १ कप किसलेले चीज, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, टोमॅटो सॉस, चवीसाठी मीठ.
कृती : कांदे आणि टोमॅटो बारीक चिरावेत. एका कढईत थोड्या तेलात उरलेली भाजी घालून गॅसच्या मंद आचेवर २ मिनिटे परतावी. नंतर त्यात बारीक चिरलेले कांदे आणि टोमॅटो घालून २ मिनिटे परतावे. लाल मिरची, मीठ घालावे. चांगले मिक्स करावे आणि  गॅसवरून उतरवून भाजी बाजूला ठेवून द्यावी. साले काढून बटाटे किसून घ्यावेत. किसाला थोडे मीठ चोळावे. आता एका नॉनस्टिक तव्यावर बटाट्याचा कीस घालून पुरीच्या आकाराएवढा पसरवा. साधारण पुरीएवढाच जाड थर असावा. २-३ मिनिटांनंतर परतून दुसऱ्या बाजूने तेवढाच वेळ शेकून घ्यावे. हा झाला पिझ्झा बेस. अशाप्रकारे सगळे बेस करावेत. नंतर प्रत्येक बेसवर थोडी भाजी पसरून त्यावर किसलेले चीज आणि कोथिंबीर घालावी. हवा असल्यास थोडा टोमॅटो सॉस घालावा आणि गरम गरम खायला द्यावे. मुलांना आणि घरातील इतर मंडळींनाही हा बटाटा पिझ्झा नक्की आवडेल.

खजूर रोल
साहित्य : पाव किलो खजूर, २०० ग्रॅम ज्वारी पीठ, ४ चमचे साजूक तूप, ४ मोठे चमचे राजगिरा लाही किंवा भाजलेली खसखस, आवडत असल्यास ३ चमचे कोणतेही २-३ सुकामेव्याचे प्रकार - भाजून आणि भरडून.
कृती : ज्वारी पीठ मंद आचेवर लाडूसाठी जसे भाजून घेतो तसेच कोरडे भाजावे. गॅस बंद करण्यापूर्वी ५ मिनिटे आधी तूप घालून पुन्हा पीठ चांगले भाजावे. पीठ थंड झाल्यावर, थोडी राजगिरा लाही किंवा खसखस आणि सुकामेवा सोडून इतर सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सर मधून फिरवून घ्यावेत. साधारण लाडू वळता येतील एवढे मिश्रण एकसंध झाले पाहिजे. सरबरीत वाटल्यास आणखी थोडा खजूर घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर त्यात सुक्यामेव्याची भरड घालावी. मिश्रण पोळपाटावर हाताने गोल आकार देत गुंडाळी करावे. त्याचे हव्या असलेल्या लांबीचे रोल कापावेत. हे रोल राजगिरा लाही किंवा खसखसमध्ये घोळवावे, जेणेकरून रोलला त्याचे कोटिंग होईल. चविष्ट आणि पौष्टिक खजूर रोल तयार आहेत.

पौष्टिक ओट कटलेट
साहित्य : (तीन ते चार व्यक्तींसाठी) दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, २ कप भिजवलेले ओट (१० मिनिटे पाण्यात भिजवावेत आणि चाळणीमध्ये थोडा वेळ ठेवून सर्व पाणी निथळून घ्यावे), ४ चमचे तांदळाचे पीठ, २ चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, १ चमचा लाल मिरची पावडर (आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता), १ चमचा आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीसाठी मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : तेल वगळून सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घ्यावेत. मिश्रणाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे कटलेट करावेत. नॉन-स्टिक तव्यावर थोडे तेल घालून भाजून घ्यावेत किंवा आपल्या आवडीनुसार तळून घ्यावेत. गरम गरम कटलेट हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावेत.

ज्वारी-शेंगदाणे लाडू

साहित्य : दोन वाट्या ज्वारी पीठ, १ वाटी शेंगदाणा कूट, सव्वा वाटी गूळ, १ वाटी साजूक तूप, सजावटीसाठी काजू, काळ्या मनुका
कृती : ज्वारी पीठ मंद आचेवर भाजायला घ्यावे. सतत हलवत राहावे. दहा मिनिटे भाजल्यावर त्यात ३-४ चमचे तूप घालावे आणि पुन्हा ७-८ मिनिटे सतत परतत चांगले भाजावे. परातीत काढून थंड करायला ठेवावे. गूळ किसावा. भाजलेले ज्वारी पीठ थंड झाल्यावर त्यात शेंगदाणा कूट आणि गूळ थोडा घालावा. मिश्रण मिक्सरमधून थोडे फिरवून घ्यावे, जेणेकरून गूळ बारीक होईल. आता मिश्रण पुन्हा परातीत काढून त्यात थोडे थोडे तूप घालून एकजीव करावे. गोड कमी वाटल्यास थोड्या मिश्रणात गूळ घालून पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यावा. असे केल्याने एकदम गूळ न घालता अनावश्यक गोडपणा टाळता येतो. पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून लाडू वळता येताहेत का ते बघावे. कोरडे वाटल्यास थोडे तूप घालावे. असे थोडे थोडे तूप घातल्याने लाडूंचा तूपकटपणा कमी करता येईल. आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू वळावेत. वळताना काजू आणि काळ्या मनुका लावून लाडू आकर्षक करावे.

केळ्याचे पॅनकेक

साहित्य : (तीन ते चार व्यक्तींसाठी) दोन मध्यम पिकलेली केळी, २ चमचे गूळ (आवडीनुसार प्रमाण कमी-जास्त करू शकता), १ कप दूध, ८-९ चमचे तांदळाचे पीठ, ३ चमचे साजूक तूप (हे प्रमाणही कमी-जास्त करू शकता), मध किंवा मेपल सिरप किंवा चॉकलेट सिरप, चिमूटभर मीठ. 
कृती : मध/मेपल सिरप/चॉकलेट सिरप आणि दूध वगळून साहित्यामध्ये दिलेले सर्व पदार्थ एकत्र करावेत. अगोदर अर्धा कप दूध घालावे आणि मिक्सरमधून छान एकजीव करून घ्यावे. नंतर लागल्यास थोडे थोडे दूध घालून डोशाच्या पिठापेक्षा जास्त पण आंबोळीच्या पीठापेक्षा कमी घट्ट अशा प्रमाणात मिश्रण तयार करून घ्यावे. बिडाचा किंवा नॉन-स्टिक तवा चांगला तापवून घ्यावा. त्यावर थोडे तूप घालावे आणि हवे तेवढे मिश्रण घेऊन डावाने हळूहळू तव्यावर गोल पसरावे. गॅस अर्धा मिनिट मोठ्या आचेवर ठेवून नंतर मंद ठेवावा. २-३ मिनिटे झाकून पॅनकेक छान भाजून घ्यावा. झाकण काढून पॅनकेकच्या वरच्या बाजूला थोडे तूप लावावे आणि उलटवा. आता या बाजूनेही २-३ मिनिटे खरपूस भाजावा. असेच इतर पॅन-केक तयार करावेत. मेपल सिरप, चॉकलेट सिरप किंवा मधाबरोबर खायला घ्यावेत. एक सोपी, पौष्टिक, चविष्ट आणि पटकन होणारा पदार्थ केल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल. 

ग्रॅनोला

साहित्य : एक कप पातळ/जाडे पोहे, १ कप राजगिरा लाही - लाही नाही मिळाली तर राजगिरा चिक्की घ्यावी, २ कप मखाना, १ कप मका दाणे किंवा २ कप मका लाही, ज्वारी लाही (वरील जिन्नसांपैकी एखाद-दुसरा नसेल तरी चालेल), ४ चमचे गूळ (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येईल), ४ चमचे काळ्या मनुका, २ चमचे सुकामेवा आपल्या आवडीप्रमाणे घ्यावा.
कृती : पोहे ३-४ मिनिटे सुके भाजून घ्यावेत. मखानाही ५-६ मिनिटे सुकाच भाजून घ्यावा. मक्याचे दाणे चांगल्या तापलेल्या कढईत मंद आचेवर सुके भाजायला घ्यावेत. २ ते ३ मिनिटांत तडतडायला लागतील. लगेच झाकण ठेवून त्यांना तडतडू द्यावे. तडतडण्याचा आवाज थांबला की गॅस बंद करावा. मक्याच्या लाह्या तयार झाल्या. आता वरील सर्व जिन्नस थंड झाले की त्यात काळ्या मनुका, सुका मेवा आणि गूळ घालून मिक्सर मधून थोडे बारीक करून घ्यावे. किती बारीक हवेत ते तुमच्या आवडीवर आहे, पण अगदी पावडर करू नये. हा झाला चविष्ट आणि पौष्टिक ग्रॅनोला तयार. हा ग्रॅनोला तुम्ही सकाळी नाश्ता म्हणून दुधात किंवा चहात घालून खाऊ शकता. संध्याकाळी भूक लागली तर चिवडा म्हणूनदेखील खाऊ शकता. कधी स्वीट-डिश म्हणून या ग्रॅनोलाची खीर करू शकता.

 

संबंधित बातम्या