झटपट पौष्टिक रेसिपीज

कांचन रानडे, डोंबिवली
सोमवार, 25 मार्च 2019

फूड पॉइंट
रोज रोज त्याच त्या भाज्या आणि तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर या झटपट होणाऱ्या पण पौष्टिक असणाऱ्या हटके रेसिपीज नक्की करुन बघा...

ओट्‌सचे टोमॅटो ऑम्लेट
साहित्य : एक वाटी ओट्‌स, एक वाटी पाणी, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा, एक टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, एक टेबलस्पून तिखट, एक टेबलस्पून जाड रवा, मीठ.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून तव्यावर तेल लावून, त्यावर ऑम्लेट घालावे. दोन्ही बाजूंनी खमंग भाजावे. गरमागरम ऑम्लेट सॉसबरोबर सर्व्ह करावे. वर दिलेल्या प्रमाणात मध्यम २ ते ३ ऑम्लेट तयार होतात. हे ऑम्लेट डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम आहेत. कारण ओट्‌समध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ‘बी’, कॅल्शिअम आणि लो-कॅलरीज असतात.

नाचणी रवा डोसा
साहित्य : एक वाटी नाचणीचे पीठ, पाववाटी जाड रवा, एक टीस्पून जिरे, २ ते ३ हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून, ४ ते ५ कढीपत्त्याची पाने बारीक चिरून, मीठ, पाव वाटी आंबट ताक, अर्धी ते पाऊण वाटी पाणी.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून डोशाचे मिश्रण तयार करावे. लगेचच तव्यावर थोडेसे तेल घालून पातळसर डोसे घालावेत. गरमागरम डोसे चटणीबरोबर सर्व्ह करावेत. वर दिलेल्या प्रमाणात २ ते ३ डोसे तयार होतात. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. मधुमेह असणाऱ्यांसाठी हा पदार्थ उत्तम आहे.

मक्‍याच्या पिठाची गोड पानगी
साहित्य : एक वाटी मकापीठ, एक वाटी दूध, दोन टेबलस्पून बारीक केलेला गूळ, पाव टीस्पून जायफळ पूड, पाव टीस्पून साजूक तूप, पानगी लावायला केळीची पाने.
कृती : प्रथम दुधात गूळ विरघळून घ्यावा. नंतर त्यात मकापीठ, तूप, जायफळ पूड घालावी. हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. केळीच्या पानावर थापून वरूनही केळीचे पान लावून तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावे. वरील प्रमाणात दोन पानग्या तयार होतात. मक्‍याच्या पिठाऐवजी आपण तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ तसेच मिश्र पिठेही घेऊ शकतो.

सोयाबीनच्या पुऱ्या
साहित्य : एक वाटी सोयाबीनचे पीठ, दोन टेबलस्पून कणीक, एक टेबलस्पून बारीक चिरलेला पालक, एक टेबलस्पून बारीक चिरलेली मेथी, एक चिमूट हिंग, हळद, चवीनुसार मीठ, एक टीस्पून लाल तिखट, एक टीस्पून ओवा, मोहनासाठी दोन टेबलस्पून तेल, तळण्यासाठी दोन टीस्पून तेल.
कृती : वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करून पुरीसाठी भिजवतो, तसे घट्ट पीठ भिजवणे. नंतर नेहमीसारख्या पुऱ्या लाटून तेलात तळाव्यात. या प्रमाणात ८ ते १० पुऱ्या तयार होतात.

बीटाची भजी
साहित्य : पाववाटी उकडून किसलेले बीट, एक बारीक चिरलेला कांदा, पाव टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून तिखट, मीठ, मोहनासाठी दोन टीस्पून गरम तेल, अर्धी वाटी बेसन, तळण्यासाठी तेल.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून भजीचे मिश्रण तयार करून घ्यावे. नेहमीसारखी भजी तेलात सोडावीत. कुरकुरीत तळून घ्यावीत. गरमागरम भजी सॉसबरोबर सर्व्ह करावीत. नैसर्गिक लाल रंगाची ही आगळीवेगळी भजी आपल्याला नक्कीच आवडतील!

बीटाची पीठ पेरलेली भाजी
साहित्य : एक वाटी कच्चे किसलेले बीट, २ ते ३ टीस्पून तेल फोडणीसाठी, एक टीस्पून मीठ, तिखट, पाव टीस्पून हिंग, हळद, ओवा, पाव वाटी बेसन.
कृती : प्रथम तेलाची हिंग, हळद, ओवा घालून फोडणी करावी. नंतर बीटाचा किस घालून परतून घ्यावे. झाकण ठेवून बीट शिजवून घ्यावे. नंतर त्यात मीठ, तिखट घालावे. गरज वाटल्यास पाण्याचा हबका मारावा. नंतर त्यात बेसन घालून झाकण ठेवून शिजवून घ्यावे. कोथिंबीरीने सजवावे.
टीप : याच भाजीचे आपण स्टफ पराठे करू शकता. बीटामध्ये ए, बी, सी जीवनसत्त्वे तसेच लोह, चुना, फॉस्फरस आहेत. बीट हे रक्तवर्धक, शक्तिवर्धक आहे.

शेजवान आप्पे
साहित्य : एक वाटी बारीक रवा, दोन टीस्पून शेजवान सॉस, कांदापात, कोबी, सिमला मिरची बारीक चिरून प्रत्येकी एक टेबलस्पून, मीठ, एक ते सव्वा वाटी ताक, पाव टीस्पून खाण्याचा सोडा, आप्पेपात्र.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण तयार करून घ्यावे. आप्पेपात्रात तेलाचा हात लावून त्यात पीठ घालावे. आप्पे दोन्ही बाजूंनी खमंग भाजावेत. भाजताना बाजूने तेल सोडावे. अाप्पेपात्र नसल्यास त्या पिठाचे तव्यावर उत्तपेही करू शकता.

कलिंगडाच्या पांढऱ्या भागाची भजी
कलिंगड खाऊन झाले, की साधारणपणे आपण त्याचा पांढरा भाग टाकून देतो. पण त्यापासून आपण भजी बनवली तर?
साहित्य : एक वाटी कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचा किस, एक चिमूट ओवा, एक टीस्पून मीठ, तिखट, मावेल इतके म्हणजे अंदाजे दीड ते दोन वाट्या बेसन.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण तयार करावे. नेहमीप्रमाणे तेलात भजी तळावीत. सॉसबरोबर सर्व्ह करावीत. पाणी अजिबात घालू नये. किसाला पाणी सुटते. वर दिलेल्या प्रमाणात २० ते २५ भजी तयार होतात.

संबंधित बातम्या