मेथीचे पदार्थ...

कोमल मोरे
सोमवार, 17 जानेवारी 2022

फूड पॉइंट

पराठा

साहित्य  : दोन कप बारीक चिरलिली मेथी, दीड कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ कप गव्हाचे पीठ, दीड कप तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, १ टीस्पून ओवा, हळद, चवीनुसार मीठ, तेल किंवा तूप. 
कृती : प्रथम चिरलेल्या मेथीच्या पानांवर थोडे मीठ घालून ते १० मिनिटे बाजूला ठेवावे. नंतर त्यामध्ये बाकीचे साहित्य घालून चांगले एकत्र करून हलवावे. त्यामध्ये थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे. शेवटी थोडे तेल घालून मळावे. नंतर मळलेली कणीक अर्धा तास भिजत ठेवावी. त्यानंतर कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. गॅसवर तवा गरम करायला ठेवावा. प्रत्येक गोळ्याचे आपल्या आवडीच्या आकाराचे पराठे लाटावेत. हा पराठा तूप लावून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावा. तयार पराठा चटणी, दही किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करावा.

गोटा भजी 

साहित्य  : दोन वाट्या बारीक चिरलेली मेथी, ७-८ मिरच्या, आले, लसूण, दीड कप बेसन पीठ, जिरे, कोथिंबीर, रवा, चवीनुसार मीठ आणि भजी तळण्यासाठी तेल.    
कृती : सर्वात आधी धुऊन चिरलेली मेथी भाजी एका पातेल्यात घ्यावी. मिरच्या, आले, लसूण एकत्र वाटून घ्यावे. ही पेस्ट भाजीवर घालावी. मग बेसन पीठ घालून छान पीठ भिजवून घ्यावे. त्यामध्ये इतर साहित्य म्हणजे जिरे, कोथिंबीर, मीठ आणि रवा घालून एकजीव करून घ्यावे. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भजी सोडून तळावीत. गरमागरम भजी चटणी किंवा टोमॅटो केचअपबरोबर सर्व्ह करावीत.

ताकातली भाजी 

साहित्य  : दोन वाट्या चिरलेली मेथी, २-३ वाट्या ताक, अर्धी वाटी बेसन, जिरे, हिंग, अर्धा टीस्पून किसलेले आले, ६-७ लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल, ३-४ लाल मिरच्या, चवीनुसार साखर. 
कृती : प्रथम कढई गरम करून त्यात तेल घालावे. गॅसची आच मंद ठेवावी. तेलात जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी द्यावी. त्यात चिरलेली मेथी घालून चांगली परतावी. त्याचवेळी ताकात बेसन पीठ घालून चांगले मिक्स करावे. नंतर ते शिजलेल्या मेथीवर घालावे. आता त्यात किसलेले आले आणि चवीनुसार साखर आणि मीठ घालावे. छान उकळी येऊ द्यावी आणि गॅस बंद करावा. नंतर एका वेगळ्या भांड्यात तेल गरम करून त्यात लसूण आणि लाल मिरच्या घालाव्यात. तयार भाजीवर ही फोडणी गरमगरमच ओतावी. ताकातली मेथीची भाजी तयार.

वरण 

साहित्य  : एक वाटी तुरीची डाळ, १ वाटी निवडलेली मेथी, आले-लसूण पेस्ट, १ कांदा, ४-५ हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरे, हळद, गोडा मसाला, थोडासा गूळ, चिंच किंवा कोकम आणि तेल. 
कृती : प्रथम तुरीची डाळ धुऊन वरणासाठी शिजवतो तशी शिजवून घ्यावी. मेथीची निवडलेली पाने धुऊन बारीक चिरावीत. नंतर कढईत फोडणीसाठी तेल घ्यावे. त्यात मोहरी, जिरे, मिरचीचे तुकडे घालावेत. नंतर आले-लसूण पेस्ट घालावी. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतावा. नंतर त्यात हिंग, हळद घालावी. नंतर चिरलेली मेथी घालून परतावी. आता शिजलेली डाळ टाकून परतून गरजेनुसार पाणी टाकावे. झाले मेथीचे वरण तयार.

पातळ भाजी 

साहित्य  : दोन-तीन वाट्या चिरलेली मेथी, १ छोटा कप भाजलेले शेंगदाणे किंवा अर्धी वाटी दाण्याचे कूट, ८-१० लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ, हळद आणि फोडणीसाठी तेल.
कृती : प्रथम शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जिरे आणि मीठ एकत्र करून त्यात थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. हे सगळे पदार्थ जितके छान मिसळतील, तेवढे जास्त चांगले. कढईत तेल गरम करावे. त्यात जिरे आणि हळद घालून फोडणी करून त्यात मेथी परतावी. भाजीवर झाकण ठेवून १-२ मिनिटे शिजवावी. नंतर त्यात मिक्सरमध्ये वाटलेले वाटण घालून १०-१२ मिनिटे उकळू द्यावे. झाली पातळ भाजी तयार. गरमगरम भातावर ही भाजी छान लागते. 

कढीगोळे
साहित्य  : दोन-तीन वाट्या मेथीची पाने, ३ वाट्या ताक, २ वाट्या बेसन पीठ, तूप, जिरे, १ तमालपत्र, २-३ लवंगा, हिंग, मीठ आणि साखर चवीनुसार, फोडणीसाठी तेल, ८-९ सुक्या लाल मिरच्या, तिखट. 
कृती : कढी करण्यासाठी : प्रथम एका पातेल्यात तूप गरम करून त्यात जिरे, तमालपत्र आणि लवंगा घालून फोडणी करावी. नंतर ताकात चमचाभर बेसन पीठ घालून चांगले मिक्स करावे व नंतर हे मिश्रण त्या फोडणीत घालावे. त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालून मंद आचेवर उकळत ठेवावे.  
गोळे करण्यासाठी : प्रथम चिरलेली मेथी एका भांड्यात घ्यावी. त्यात बेसन पीठ, मीठ, ओवा आणि थोडेसे तिखट घालून चांगले घट्ट मळावे. नंतर हाताला तेल लावून आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे तयार करून उकळत्या कढीत सोडावेत. १०-१५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. कढीतले गोळे तरंगू लागले की शिजलेत असे समजावे आणि गॅस बंद करावा. नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी घालावी. त्यावर लाल मिरच्या घालाव्यात. मिरच्या चांगल्या परतल्या की गॅस बंद करावा. ही फोडणी कढीगोळे वाढताना त्यावर वरून घालावी.   

पालक-मेथी भाजी
साहित्य  : दोन-तीन वाट्या चिरलेला पालक, १ वाटी चिरलेली मेथी, ४-५ लाल मिरच्या, १ चमचा आले-लसूण पेस्ट, ७-८ पाने कढीपत्ता, दीड वाटी आंबट ताक, २-३ चमचे बेसन, तेल, जिरे, मोहरी, हळद आणि चवीनुसार मीठ. 
कृती : सर्वात आधी ताकामध्ये बेसन पीठ चांगले मिक्स करून घ्यावे. कढई किंवा पातेल्यात तेल घालून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, आले-लसूण पेस्ट आणि हळद घालावी. नंतर पालक आणि मेथी घालावी. चांगले परतावे. त्यात ताक-बेसनाचे पातळ मिश्रण ओतावे. त्यानंतर थोडे पाणी घालून मंद आचेवर शिजू द्यावी. चवीनुसार साखर आणि मीठ घालावे. आपली भाजी तयार आहे. ही भाजी गरमागरम भाताबरोबर फार छान लागते.

शंकरपाळी 

साहित्य  : एक वाटी निवडलेली मेथीची भाजी, १ वाटी मैदा, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, १ चमचा धने पूड, १ चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ आणि तेल. 
कृती : प्रथम मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुऊन बारीक चिरावी. नंतर एका भांड्यात मैदा चाळून घ्यावा. चाळलेल्या मैद्यामध्ये तिखट, हळद, मीठ, धने पूड आणि जिरे पूड घालावी आणि मिसळून घ्यावे. नंतर त्यात तेलाचे गरम मोहन घालून मेथीची भाजी मिसळावी. आता सर्व घटक एकजीव करत पीठ चांगले मळून घ्यावे. मळलेले पीठ साधारण पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. पंधरा मिनिटांनी नेहमीसारखी पोळी लाटावी व शंकरपाळीसारखे काप करावेत. गरम गरम तेलात छान खमंग तळावे. ही शंकरपाळी चहाबरोबर खूप टेस्टी लागतात.

 

संबंधित बातम्या